Login

हैप्पी न्यू इयर भाग 1

कावेरी व वनिता सासूबाई सूनबाई, यांची मंशा नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या परिवाराला आणायची. सासू सुनेला यश प्राप्त होईल का कि दुरावा वाढेल आणखी.
"आज रात्री कचोरी आणि बासुंदी पुरीचा बेत करू." पहिल्यांदा वर्षाच्या शेवटी शहरात मुलाकडे राहायला आलेली कावेरी बाई सून वनिताला उत्साहाने म्हणाली. वनिता मात्र गप्पच.

"मी स्वतः बनवते. तु फक्त त्या मिक्सरचं काम कर आणि तळून काढशील." कावेरी बाई परत बोलल्या.

"सासूबाई कोणासाठी तळून काढायचे?" कपड्यांच्या घड्या कपाटात लावत वनिताने प्रश्न केला.

" अगं कोणासाठी म्हणजे मुलांसाठी, आपल्यासाठी. " कावेरी उत्तरली.

" आपल्या दोघींसाठी करायचे म्हणाल तर ते मी एकटीच करून घेईन. पण आज रात्री तुमचा मुलगाही घरी राहत नाही मग माझी मुलं कशी मागे राहणार. " वनिता त्राग्याने बोलली.

" म्हणजे कुठे जातात हे सर्व? " कावेरी बाईचा प्रश्न.

" आपापल्या मित्रमंडळी सोबत पार्टी करायला. मीही जाणार होते पण तुम्हाला एकट्याला सोडून बरे वाटणार नाही म्हणून मग थांबत आहे घरीच. " वनिताने दुसरीकडे पहात त्यांना सांगितले.

" असा आहे तर माझी काही हरकत नाही जा तू. कचोऱ्या वगैरे उद्या किंवा परवा करू आपण." कावेरी बाई आपल्या सुनेला म्हणाल्या, " आमच्या तरुणपणी आपल्या गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष असायचे. मग हळूहळू मुलं मोठी झाली तशी म्हातारी अन लहान मंडळी टीव्ही समोर बसून दूरदर्शनवर येणारे नवीन वर्षा निमित्तचे डान्स, कॉमेडी असे कार्यक्रम पाहत. मी घरी गोड धोड बनवून जेवण करायला बसायचे. मग वेगवेगळी चॅनल्स आली, भांडणं होऊ लागली प्रत्येकाला आपापले पाहायचं असे. तरीही थोडा वेळ हे थोडा वेळ ते असे करून निभावून न्यायचो पण एकत्र असायचो. "

"सासूबाई, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मलाही वाटतं आपण सर्वांनी एकत्र मिळून नवीन वर्ष साजरे करावे पण ना तुमचे मूल ना माझे मूल, कोणीही ऐकत नाही तर मी काय करणार?" वनिताने विचारलं.

"तुझी खरंच इच्छा आहे का यावेळी आपण घरातच सर्वांनी मिळून नवीन वर्षाची सुरवात एकत्र करावी अशी?" कावेरी बाईने तिला विचारलं.

"खूप छान होईल पण हे शक्य कसे होईल? तुमच्या मुलाची न्यू इयर पार्टीची विशेष खरेदी करून झाली असेल एव्हाना." वनिताने कावेरीला सांगितले.

"ते मी पाहते." कावेरी म्हणाली.

" तुमचा मुलगा एक वेळ तुमचे ऐकूनही घेईल याबाबतीत. पण माझ्या मुलांचे काय. त्यांची एक महिन्या आधीपासूनच प्लॅनिंग सुरू झाली आहे. त्यातल्या त्यात दोन्हीही मुलांचे आपल्या बापाशी पटत नाही. बापाला मटण आवडतं मुलांना चिकन, बापाला कचोरी आवडते मुलांना आलू बोन्दा, जेव्हा बापाला बिचवर चील करायचे असते मुलांना पहाड चढायचा असतो, बापाला बाप्पी लहरी ऐकायचा असतो मुलांना बादशाह, खूप ताप असतो ही तिघे एका ठिकाणी असली कि मलाच ताण येतो भांडणं व्हायचा. त्यामुळे ते जितके वेगळे राहतात तितके मी त्यांना वेगळे राहू देते. " वनिता काळजीच्या स्वरात बोलली.

"असं आहे. मग तर त्यांनी एकत्र राहायलाच हवं. अजून मुलांची लग्न व्हायची आहेत. आताच त्यांच्यात तारताम्य आणायला हवं." कावेरी म्हणाली.

"पण ते कसं शक्य होईल समोर येताच बोलणे कमी भांडायला लागतात हे." वनिता बोलली.

"माझ्याकडे एक योजना आहे." कावेरी एक भुवई वर करून म्हणाली.

"चल मार्केटला."

"मार्केटला? आता कशाला? कचोरी साठीचे सामान घरीच आहे फक्त दूध लागेल ते मी मागवून घेते." वनिता म्हणाली.

"ठीक आहे. पण चार पावलावर स्टेशनरी आहे ना तिथे जायचे आहे. निघ लवकर." कावेरी बाई वनिताचा हात पकडून बाहेर घेऊन गेली.

क्रमश :

काय योजना असेल कावेरीकडे? काम करेल का तिची योजना? कि एकट्यातच पार पडेल तिचे हैप्पी न्यू इयर?
0

🎭 Series Post

View all