Login

हरवलेल्या वाटा भाग 1

कथा सामान्य स्त्रीची

सामान्य स्त्रीची कथा.
स्पर्धा - जलद लेखन, नोव्हेंबर
'तोंड दाबून बुक्क्यांचा मार.' (हरवलेल्या वाटा.)


सासुबाईंची नजर पाहून काम करणारी स्मिता अस्वस्थ होत होती. ' काय चुकलं माझं?' तिला कळत नव्हतं. तिची नजर
सारखी हॉलमध्ये टिव्ही बघत असलेल्या विमल ताईंवर जात होती. पन्नाशीला आलेली 'ती ' संसाराला पंचवीस वर्षे होऊन गेली तरी सासुबाईंच्या भीतीपोटी आजही घरची कामं उरकत होती. त्यांच्या सूचना पाळत होती.

"काय झालं?" स्मिताचा धाकटा लेक सुबोध नुकताच ऑफिसमधून आला होता.

"आई, या वयात आजीला काय घाबरायचं? तोंड उघडून विचार ना सरळ." चहाचे घोट घेत असलेला सुबोध म्हणाला.

"हम्म. म्हणजे तासभर लेक्चर ऐकावं लागेल. त्यापेक्षा शांत राहून कामं केलेली बरी."

"हेच चुकतं तुझं. आम्ही तुझी बाजू घेऊन बोललो की तुला आवडत नाही आणि तू स्वतः काही बोलत नाहीस."

"जाऊ दे रे. इतक्या वर्षांची सवय झालीय आता. ना त्यांच्यात काही बदल झाला ना माझ्यात! दादा आला वाटतं. जा बघ जा." स्मिता विषय बदलत म्हणाली. तसा सुबोध मान हलवत उठून बाहेर आला.
"आई, चहा." मानसची सवय होती, आल्या आल्या चहाची ऑर्डर देऊन तो फ्रेश व्हायला आत जाई.

"झालाच. तू फ्रेश होऊन ये. दोघं मिळून चहा घेऊ." स्मिताने पट्कन आधण ठेवलं.

"हे बरंय. दादाला तुझी कंपनी आणि मला आजीची? आजी टिव्हीवरची नजर सुद्धा हटवत नाही. एकटक तिच्या सिरीअल्स बघत राहते. मी मात्र छताकडे बघत चहा प्यायचा!" सुबोध.

"आजीची कंपनी काय वाईट आहे? एकवेळ त्या मला अंतर देतील. पण त्यांचा तुम्हा दोघांवर फार जीव आहे सुबोध. तुम्ही आसपास असला तरी त्यांना बरं वाटतं." स्मिता म्हणाली. दोन चहाचे कप तिने टेबलावर ठेवले. सोबत बिस्किटाचा पुडा फोडला. इतक्यात मानस आला. "बाबा कधी येताहेत?"

"रात्री उशीरा येतील. तसा मेसेज आला होता." सुबोध.

"जेवायला काय करणार आहात?" आजी बाहेरून ओरडली.

"झालं, आत्ता चहाची वेळ झाली न झाली तोवर जेवण." सुबोध चिडून म्हणाला.

"असू दे रे. म्हाताऱ्या माणसांना विचारण्याची असते सवय. तू चिडू नकोस. आई आणि आजी बघून घेतील." मानस.

"हेच चुकतं तुझं. आपण घरात सगळे एकत्र राहतो. कोणी चुकीचं वागत असेल तर बोलायला नको का? की फक्त मजा बघत राहायची? हा त्या दोघींचा प्रश्न नाहीय तर आपणही बोलू शकतो ना." सुबोधला आई फार जवळची होती. आईला कोणी बोललेलं लहानपणापासून त्याला आवडत नव्हतं. शिवाय आजीने आईला जी वागणूक दिली होती ती त्याने जवळून पाहिली होती.

"सुबू, जाऊ दे." स्मिता डोळे मोठे करत म्हणाली. लाडाने ती धाकट्या लेकाला सुबू म्हणे. "तुम्हा दोघांची लग्नं झाली की वरच्या दोन खोल्यांत सुखाने राहणार आहे. मला आता विश्रांती हवी आहे. तुमचा संसार तुम्ही बघायचा. मी मध्ये लुडबुड करणार नाही. आईंकडे बघून मी सुनांशी कसं वागायचं नाही, हे ठरवून ठेवलं आहे." स्मिता मनातलं बोलली.

"आणि बाबांचं काय?" मानस.

"ते असतात का घरी? रिटायर्ड झाल्यापासून सतत हिंडत-फिरत असतात. असतील तेव्हा तेही वरच राहतील. तुम्ही या चार खोल्यांत सुखाने संसार करा."

"हे दोघे इथं राहिले तर बरं. नाहीतर जातील परदेशात. यांच्या बायका मागोमाग गेल्याच म्हणून समजा. मग तुला कसली विश्रांती मिळते? आणि सुना आल्यावर आपोआप कळतं. आपण सासुच्या भूमिकेत गेलो की अपेक्षा वाढतात. स्वभाव बदलतोच." विमल ताई आत आल्या.

"तरी बाबा सारखे सोबत चल म्हणत असतात. पण हीच जात नाही." मानस.

"मी गेले तर आईंकडं कोण बघणार? त्यांचं पथ्यपाणी कोण सांभाळणार? शिवाय तुम्हा दोघांचा डब्बा, खाणं -पिणं? घरची बारीक -सारीक कामं कोण करणार?" स्मिता.

"स्वयंपाकाला एक मावशी ठेवायची. तिला सवय झाली की बाकीची कामं पण पट्कन होऊन जातील." सुबोध.

'हे इतकं सोपं असतं तर मग कशाला? मी निवांतपणे जग फिरले असते. जुन्या एक एक आठवणी मनात घर करून राहिल्या आहेत. एक काळ असा होता, लग्नानंतर घराबाहेर पडणं देखील मुश्किल व्हायचं. पाठीवर सतत नजर भिरभिरत असायची. भीती, दडपण, अपराधी भाव, मानसिक अशांती अशा कितीतरी अपरिचित भावनांतून गेले मी. एकदा वाटायचं, पोटी एकतरी लेक असायला हवी होती. तिने आईचं दुःख समजून घेतलं असतं. समजावलं असतं.
पण ही कमी सुबोधने पूर्ण केली. तो कायम पाठीशी उभा राहिला.' स्मिता विचार करत राहिली.

ती भानावर आली तेव्हा मानस आणि सुबोध हळूहळू काहीतरी बोलत होते. विमल ताई पुन्हा टिव्ही पाहण्यात दंग झाल्या होत्या.
दोघा भावांची थट्टा -मस्करी चाललेली पाहून यांची जोडी आयुष्यभर एकत्र राहावी असा मनोमन आशीर्वाद देत स्मिता स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

"सुबू, चल जरा जाऊन येऊ." अचानक मानस गडबडीने उठून उभा राहिला.

"आत्ता? आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. कंटाळा आलाय मला."

"खूप महत्त्वाचं काम आहे. उद्या आईचा पन्नासाव्वा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट घेऊन येऊ. उद्या पुन्हा वेळ मिळायचा नाही." मानस हळूच म्हणाला. "उद्या लग्न झाल्यावर बायको म्हणेल तिकडं जावं लागतं. मग वेळ कोणतीही असो."

"तुला काय माहित?" सुबोध.

"ऑफिसमधले अनुभवी लोक सांगतात ना." मानस मोठा भाऊ असल्याच्या नात्याने धाकट्याला समजावत म्हणाला. हे बघून स्मिताला हसू आलं.

"आई, आलोच." म्हणत दोघं बाहेर पडले.

"आत्ता कुठं जाताय? संध्याकाळ झाली. दिवे लागणीला बाहेर पडू नये रे." नाही म्हणायला आजीने हटकलंच.

"आई, अहो जाऊ दे. काहीतरी काम असेल. तरुण मुलं घरात बसून काय करतील? बाहेर मित्र भेटणार असतील. सुट्टीचा प्लॅन ठरवणार असतील." स्मिता.

"सगळं जाऊ दे..म्हणत दिवस काढलेस. घर एकत्र बांधून ठेवायला कधी जमलंच नाही तुला. तुझ्या अशा स्वभावामुळे जयंत घरात थांबत नाही. जाणाऱ्याला कधी विचारतेस? कुठं, का निघाला आहात? कधी येणार आहात? काय काम आहे? स्वतःला जायला मिळत नाही म्हणून बाकीच्यांना सुट द्यायची." विमल ताई स्वभावानुसार बडबड करत राहिल्या.

"बघितलंस दादा, आजी कशी बोलते ते? बाबांना फिरायची आवड आहे, हे तिला माहिती नाही की काय? पण आईला बोलायची एकही संधी ती सोडत नाही. सगळ्याचं खापर तिच्यावर फुटायलाच हवं का? म्हणून मला राग येतो."
सुबोध म्हणाला ते खरं होतं. पण बोलून काय फायदा होता? एरवी बाबा असले की घर जरा शांत असायचं. त्यांच्यासमोर आजी अजूनही गोड गोड वागायची. जणू आजवर हिने सुनेला हाताला धरून सारं काही शिकवलं होतं. मग स्मिता सुद्धा आपल्या सासुच्या तात्पुरत्या बदललेल्या स्वभावाचा आनंद घ्यायची. जुनं सगळं 'जाऊ दे' म्हणत सोडून द्यायची.


"आईचं वाक्य आहे, जाऊ दे. सारं काही ठीक होईल. आपण आईसाठी जे करता येईल ते करायचं." मानस.