Login

हरवलेल्या वाटा भाग 3

कथा सामान्य स्त्रीची
"बाबा, कसे आलात?"

"मीच सांगितलं होतं रिक्षाने यायला." स्मिता.

"काय झालंय?" घरचं तणावपूर्ण वातावरण जयंतना जाणवलं.

"तुम्ही टेन्शन घेण्यासारखं काही नाही." मानस म्हणाला आणि थकलेले जयंत झोपायला गेले. विमल ताई उद्या लेकाला तिखट मीठ लावून काय सांगायचं? याचा विचार करत राहिल्या.
-------------------------------------------

"काकू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" दुसऱ्या दिवशी गौरी सकाळी हजर झाली.

"थँक्यू. तुझ्या लक्षात आहे तर." स्मिताने तिच्या हातात चहाचा कप दिला.

"हो. बाकी कोणी विश केलं नाही तुम्हाला? काल तर मानस..."ती काही बोलणार इतक्यात सुबोधने तिला अडवलं.

"अग, दरवर्षी येते ती. त्यात काय विशेष? आई, आम्ही तुझा वाढदिवस विसरलो नाहीय."

"दादा, तू तिला का बोलावलंस? तिच्या तोंडात काही राहत नाही." तो मानसकडे आला.

"मी बोलावलं नाहीय तिला. आपणहून आलीय गौरी. दरवर्षी येते तशीच."

"काकू, मानस?"

"अग, आत आवरतोय. सुबोध गेलाय त्याला बोलवायला." इतक्यात जयंत आले. "स्मिता, पट्कन आवरून घे. आपण देवीला जातोय."

"हे काय? रात्री तर आलात ना? दमला असाल. आता विश्रांती घ्या. आपण संध्याकाळी जाऊ आणि बाकी घरची कामं कोण करणार?"

"नको. आमचं ठरलंय. आवर तू. मानस म्हणाला डब्बा सांगतो. त्यात तिघांचं भागेल. गौरी तू जेवणार ना?" जयंत.

"नाही. मी घरी निघाले." इतक्यात मानस आला. दोघं हॉलमध्ये बोलत बसले. स्मिता आणि जयंत आवरून बाहेर गेले. तशा विमल ताई आल्या. "सांगायची सोय नाही, विचारण्याची पद्धत नाही. उठले नि गेले."

"आजी काकू थांबल्या होत्या. पण मीच म्हणाले, आजीला मी सांगते म्हणून." गौरी म्हणाली. ही आत्तापासूनच आईला सांभाळून घेते म्हणून मानस सुखावला.

"तू आलीस होय? आज बरा दिवस सापडला?" आजी.

"आज काकूंचा वाढदिवस आहे म्हणून आले." गौरी हसत म्हणाली. "ए मानस, संध्याकाळचा काय प्लॅन आहे? म्हणजे मला आवरून यायला बरं."

"सुबू, आत्या, मामा - मामी, गौरीचे आई -बाबा आणि ती कोपऱ्यावरची आईची मैत्रीण. इतकेच येतील. पावभाजीची ऑर्डर देऊन टाक आणि केक मी आणतो.

"केक मी आणेन आणि आमच्या घराशेजारी राहणाऱ्या बाई मस्त पावभाजी बनवतात. मी तीही ऑर्डर देईन." गौरी म्हणाली आणि मानस नाही म्हणू शकला नाही तर आपलं क्रेडिट गौरी घेऊन जाणार म्हणून सुबोधला राग आला.
"पावभाजी हल्ली सोसत नाही रे मला." आजी मध्येच म्हणाली.

"मग तुझ्यासाठी कमी तिखट सांगू. तू काळजी करू नको." मानस. अशा तऱ्हेने संध्याकाळचा बेत ठरला. आई - बाबा दुपारी जेवून येणार होते. मानस आणि गौरी केक बघायला गेले तर सुबोधने डेकारेशनचं काम हाती घेतलं. डब्बा आला आणि विमल ताई जेवून झोपल्या. सुबोधने आई -बाबा येण्याआधी आपली खोली सजवून ठेवली आणि तोही मित्राकडे गेला.
---------------------------------------


"सरप्राईज..." स्मिताला आत आलेलं बघून सगळे एकासुरात ओरडले. नणंद, गौरीचे आई -वडील, तिची जिवलग मैत्रीण, रूपा या सगळ्यांना आलेलं पाहून स्मिताला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

"केक कापून घे आधी." कोणीतरी म्हणालं. तिच्या आवडीचा फ्लेवर होता, चॉकलेट केक! तिची नजर सुबोध आणि मानस कडे वळली. दोघांच्या चेहऱ्यावर मंद हसू होतं. आपली लेक आली म्हणून विमल ताई खुशीत होत्या, सुनेचा वाढदिवस म्हणून कधी नव्हे ते पुढं पुढं करत होत्या. सगळ्यांचे चेहरे प्रसन्न दिसत होते. केक कापून झाला. पोटभर पावभाजी खाऊन झाली. तशा गप्पा रंगल्या. मुलाचं गिफ्ट स्मिताला फार आवडलं. कधी नव्हे ते जयंतनी तिच्यासाठी सुंदर विणकाम असलेली साडी आणली होती.

"स्मिता, जरा बोलायचं होतं." गौरीची आई, भावना पुढं आली.
"आज तुमच्या घरचे सगळेच इथं उपस्थित आहेत म्हणून हा विषय पट्कन बोलून टाकते." भावनाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.

'इतकं काय बोलायच असेल हिला?' स्मिता जयंतकडे बघायला लागली. तसे त्यांनी खांदे उडवले.

"तर..आमची गौरी आणि तुमचा मानस एकमेकांना पसंत करतात म्हणे. हो ना मुलांनो?" भावना. गौरी लाजत हो म्हणाली अन् मानस जागचा उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. "गौरी, मला सांगायचं ना.. मी आई -बाबांना आधी कल्पना दिली असती."

"मुद्दाम सांगितलं नाही. म्हंटल थेट आपणच बोलावं. तुम्हा मुलांचं काय ठरेल आणि काय नाही, हे सांगता यायचं नाही आणि योग्य वयात लग्न झालेलं बरं. पुढच्या महिन्यात गौरीला पंचवीस वर्षे पूर्ण होतील. आता तिच्या लग्नाची गडबड करायला नको का? आम्हाला मानस पसंत आहे. जयंत तुम्ही तुमचं मत सांगा." अभय काका म्हणाले.

"यातलं आम्हाला काहीच ठाऊक नाही." जयंत स्मिताकडे बघत म्हणाले. तशी तिनेही नकारार्थी मान हलवली. पण एक गोष्ट बोलतो, आमचं घर तुमच्या तोलामोलाचं नाही." जयंत.

"जयंत, तुम्ही चांगल्या हुद्द्यावर काम केलंय. तुमची दोन्ही मुलं नोकरी करतात. स्मिता उत्तम घर सांभाळते. सुशिक्षित घरात मोठं माणूस आहे. आणि आम्हाला काय हवं? आम्हीही गरिबीतून वर आलोय. सराफी दुकान असलं तरी कष्टाची किंमत कळते आम्हाला. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका." भावना.

या उत्तराने स्मिताला बरं वाटलं. ती कधी आश्चर्याने, आनंदाने कधी थोड्याशा रागाने गौरी आणि आपल्या लेकाकडे बघत होती.
"म्हणून आज इतकी तयार होऊन आलीस होय?" तिने गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. सॅटिनच्या निळसर साडीत ती मस्त दिसत होती. गालावर उमटलेली लालसर छटा तिला शोभून दिसत होती. गौरी परत एकदा छानशी लाजली.

मानस मात्र काहीतरी गुन्हा केल्यासारखा खाली मान घालून बसला होता. "आई, सॉरी. मी आधी सांगितलं नाही. कारण आमचं काहीच ठरलं नव्हतं." त्याने स्मिताचा हात हातात घेतला.

"अरे, ठीक आहे. तुमचं फिक्स नव्हतं ना? मग इतकं काय मनाला लावून घेतोस?" स्मिता त्याला धीर देत होती.

"काकू, मानसला काही कल्पना न देता मी आईला सांगितलं आणि तिने मनावर घेतलं. खरंतर मी सॉरी म्हणायला हवं."

"यात चूक , बरोबर असं काही नाहीय. हेच वय आहे पोरांचं. ते एकमेकांना आधीपासून ओळखतात. मैत्रीचं नातं पुढं गेलं, यात चूक ती काय?" जयंत समजुतीने घेत हलकंस हसत म्हणाले.
मग सर्वानुमते साखरपुडा उरकून घ्यायचा ठरला. सुबोध सुद्धा आपला राग विसरून आपल्या कुटुंबाच्या आनंदात सामील झाला.
पाहुणे मंडळी गेली आणि इतका वेळ शांत असणाऱ्या विमल ताई नाराज झाल्या. "घरात मोठी माणसं आहेत म्हणावं. त्यांना काही विचारायची पद्धत आहे की नाही? सगळं ठरवून रिकामे झालात!"

"आई, मुलांनी ठरवलंय त्याला आम्ही होकार दिला बस् आणि तूही होतीस तिथं. मध्ये बोलली असतीस तर काही फरक पडला नसता. सगळ्या गोष्टी माघारी बोलायची सवय आता तरी सोडून दे. मुलं खुश असतील तर आम्ही नकार का द्यावा? तूही त्यांच्या आनंदात सामील हो. बऱ्याच वर्षांनी कार्य ठरतंय घरात. त्यात मिठाचा खडा नको." जयंत कधी नव्हे ते विमल ताईंना बोलले. त्या थक्क होऊन आपल्या मुलाकडे बघत राहिल्या.

"तू इतकी वर्षे तुझ्या मनाचं करत आलीस. त्यासाठी स्मिताला वेठीला धरलंस. घर शांत, एकत्र राहावं म्हणून ती काही बोलली नाही आणि मीही तुला बोललो नाही. पण तुला कुठं थांबायचं हे कधी कळलंच नाही."

क्रमशः
0

🎭 Series Post

View all