Login

हरवलेले नाते

आजींचे नाते हरवले होते की आजी हरवल्या होत्या? याचे उत्तर अंतराला सापडले नाही. कोण होत्या त्या आजी? जाणून घेण्यासाठी वाचा - हरवलेले नाते.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
संघ - सोनल

हरवलेले नाते

नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या दरम्यान अंतरा योगा क्लासला निघाली होती. जातानाही तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. तिथून आल्यानंतर सर्वात आधी नवऱ्याचा डबा करून द्यावा लागणार होता. तो कामावर गेल्यानंतरही संबंध दिवसभर घरातली बारीक-सारीक कामे सुरू असायची. एवढे बरे होते, की मुलगी मोठी झाल्यामुळे तिला तिचे फारसे बघावे लागत नसे. संसाराच्या रहाटगाड्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते; म्हणून तिने स्वतःसाठी योगा क्लास लावून घेतला होता.

आपल्याच विचारात अंतरा भरभर अंतर कापत निघाली होती. तितक्यात तिच्या हाताला मुलायम स्पर्श जाणवला. कुणीतरी मागून तिचा हात धरला होता. भर रस्त्यात असा कुणी हात धरला हे पाहण्यासाठी ती झटक्यात मागे वळली. एका आजीबाईंनी तिचा हात पकडून ठेवला होता. त्यांचा कोमल स्पर्श आणि डोळ्यांतील आर्जंव तिच्या मनाला भिडली.

"अगं.. ये पोरी, मला ओळखते का गं तू?" आजीबाईंनी मलूल आवाजात तिला विचारले.

"नाही आजी, कोण आहात तुम्ही? मला असे का विचारत आहात?" अंतरा संभ्रमात पडली.

"काय सांगू बाई आता. एक-दीड तासापासून माझं घर शोधत आहे, पण मला ते सापडतच नाहीये." एवढं बोलून त्यांच्या डोळ्यांतून आसवे गळायला लागली.

"तुम्ही आधी शांत व्हा. हे घ्या, थोडे पाणी पिऊन घ्या." अंतराने आपल्या पिशवीतून पाण्याची बाटली काढून त्यांच्या हातात दिली.

दिलेल्या बाटलीला तोंड लावून त्या घटाघटा पाणी प्यायल्या. कदाचित तहानेने त्या व्याकुळ झाल्या असाव्या. पाणी प्यायल्यानंतर त्यांना थोडे बरे वाटले.

"आजी, आता मला नीट सांगा. नक्की काय घडले आहे ते?" अंतराने आजीला दिलासा देत विचारले.

"अगं पोरी, सकाळी दूध आणायला मी घराबाहेर पडली आणि रस्ताच विसरली बघ. मी इथेच कुठेतरी राहते, पण मला आठवत नाहीये."

"आजी, तुम्ही घाबरू नका. आपण तुमचे घर शोधू. सर्वात आधी मला तुमचे नाव सांगा?"

"मला नाही माहित पोरी."

"बरं, तुमचं आडनाव तरी आठवत आहे का? इथे आसपास राहणाऱ्या लोकांना विचारता येईल."

"नाही ना." आजी वैतागून म्हणाल्या.

"काहीतरी तर आठवत असेल." अंतराने विचारले.

"मला काहीच आठवत नाहीये. जाऊ दे, तुला माझ्यामुळे उशीर होत असेल. तू जा. माझ्यामुळे तुझा खोळंबा नको व्हायला." आजी रडवेल्या चेहऱ्याने म्हणाल्या.

"इतके काही नाहीये आजी. आज मी योगा क्लासला नाही गेले तर काही बिघडणार नाही. चला, आपण दोघी मिळून तुमचं घर शोधू." अंतरा हसऱ्या चेहऱ्याने त्यांना आश्वस्त करत म्हणाली.

खरे तर, इतक्या सकाळी लोकांचे दरवाजे ठोठावून आजीबाईंबद्दल विचारणे तिला योग्य वाटत नव्हते. 'स्वतःच्या घरी घेऊन जावे तर नवऱ्याने नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडले असते. त्यातल्या त्यात अनोळख्या व्यक्तीला घरी आणले म्हणून दोन-चार शब्द सुनावले देखील असते. त्याचेही बरोबरच आहे म्हणा. आजकाल चित्रविचित्र घटना घडत असतात; त्यामुळे त्याला काळजी वाटणे साहजिकच आहे. बरं, त्या दरम्यान आजीबाईंना कुणी शोधायला निघाले तर उगाच गोंधळ व्हायचा. पोलिसांची मदत घ्यावी तर इतक्या सकाळी आपल्याला कोण दाद देईल?' असे एक ना अनेक विचार तिच्या मनात घोंगावू लागले.

त्या आजीबाई मात्र तिच्याकडे आशेने बघत होत्या. थोडा विचार केल्यानंतर तिला एक कल्पना सुचली.

"चला आजी, आज मी माझ्या योगा क्लासला दांडी मारली ना म्हणून आपण प्रभात फेरी काढूया. तितकाच माझा व्यायाम पण होईल." अंतरा उत्साहाने म्हणाली.

"म्हणजे? मला नाही समजले." आजी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागल्या.

"तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही इथेच कुठेतरी राहत असाल. वयोमानानुसार जास्त लांब जाणे तुम्हाला शक्य नाही; म्हणून आपण जवळपासच्या सर्व कॉलनीमध्ये तुम्हाला कुणी ओळखते का याचा तपास करू. तुमचे घर सापडले नाही तर मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईल. काळजी करू नका." अंतरा त्यांच्या हातांवर हात ठेवत म्हणाली.

तिचे बोलणे ऐकून त्यांच्या उतरलेल्या चेहऱ्यावर उमेदीची लकेर उमटली. खरे तर, अंतराला देखील ठाऊक नव्हते, की ती त्या आजींना त्यांच्या घरी पोहोचवू शकेल की नाही? पण तरीही तिने दैवावर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे ठरवले.

सर्वात आधी तर ती त्याच कॉलनीत अजून कुणी दिसतंय का ते शोधू लागली, पण सकाळी सकाळी सर्वांची दारे बंद होती. तितक्यात एका घरातून दार उघडण्याचा आवाज झाला. आजींना त्याच जागी थांबण्याचा इशारा करत अंतरा लगबगीने तिकडे गेली.

"माफ करा. एक मदत हवी होती." अंतरा त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात बोलली.

सकाळी सकाळी दारात कोण करमडलं, म्हणून तो पुरुष रागीट चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता. अंतराचा नाईलाज होता.

"तुम्ही ह्या आजींना ओळखता का?" शक्य तितक्या सौम्य आवाजात तिने विचारले.

"त्या तुमच्याबरोबर आहेत ना? मग तुम्ही नाही ओळखत का त्यांना?" तो तिरसटपणे बोलला.

"त्या हरवल्या आहेत. त्यांना त्यांचे घर आठवत नाहीये. कृपया त्यांच्याकडे नीट बघून सांगता का?" अंतराने विनंतीपूर्वक विचारले.

दारातून थोडीशी मान बाहेर काढत त्याने आजींना पाहिले व निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, "मला ह्या कॉलनीमध्ये घर घेऊन वीस वर्षे झाली, पण पूर्वी मी यांना इथे कधीच पाहिले नाही. तुम्ही थेट पोलिसात जा. पोलिस बरोबर शोधून काढतील."

नको असलेल्या सल्ल्यासहित मोलाची माहिती देऊन त्याने तावातावाने दार लावून घेतले.

इतकं तर कळलं होतं, की आजीबाई या कॉलनीत राहत नव्हत्या. याचा अर्थ पुढच्या कॉलनीत तपास करावा लागणार होता. अंतरा आजींना घेऊन पुढच्या कॉलनीत गेली.

"आजी, तुम्हाला चहा घ्यायचा होता ना! चला आपण इथे कुठे चहा मिळतो का ते बघू आधी."

वयस्कर लोकांना उठल्याबरोबर चहा लागतो हे तिला माहीत होते.

"नको बाई, त्या चहाच्या नादातच घर सोडले आणि मी स्वतःला हरवून बसली." आजी उदास होत म्हणाल्या.

"अहो आजी.. तुम्हाला कुठे माहित, की तुम्ही रस्ता चुकणार म्हणून, पण तुम्ही दूध घ्यायला एकट्या का बाहेर पडल्या? घरात दुसरे कुणी नव्हते का?"

"पोराला सुट्टी म्हणून आज तो उशिरापर्यंत झोपणार हे मला माहित होते. नातवांच्या देखील शाळेला सुट्टी असल्याने घरातली मंडळी लवकर उठणार नाही याची मला खात्री होती. सकाळी चहाची तल्लफ लागते, म्हणून मी फ्रिजमध्ये दूध बघायला गेली तर दूध संपले होते. म्हटलं आता हे लोक काही दहा वाजल्याशिवाय उठणार नाही. मग मीच पैसे घेऊन दूध घ्यायला बाहेर पडली. घरातल्यांना माहित पण नसेल, की मी घरात नाहीये ते." सांगता सांगता त्या आजींच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागले.

"आधी तुम्ही डोळे पुसा बघू. आता आपण शोधायला निघालो आहे ना." अंतरा त्यांना सांत्वना द्यायला लागली.

बोलता बोलता अंतराची नजर चौफेर भिरभिरत होती. कुणीतरी आजींच्या शोधात येईल असे तिला वाटत होते. वाटेत जो कुणी दिसेल त्याला विचारायचे असे अंतराने ठरवले. सकाळी फिरायला जाणाऱ्या दोन-तीन लोकांना विचारून देखील झाले, पण त्यांनी विचित्र नजरेने पाहत ओळखत नाही असेच सांगितले.

पुढच्या कॉलनीत गेल्यावर समोरून एक महिला त्यांना येताना दिसली. अंतराने तिला आजींबद्दल विचारले. ती महिला अतिशय घाईत असल्याने पटापट बोलून मोकळी झाली.

"मी ह्या कॉलनीमध्ये बऱ्याच लोकांच्या घरी कामाला जाते. जवळपास सर्वांची घरे मला माहित आहेत. या इथल्या नाहीत हे मी ठामपणे सांगू शकते. तुम्ही त्यांना त्यांचे आडनाव विचारा. त्यांचे घर लगेच सापडेल."

पुढचे काही विचारायच्या आत ती निघून पण गेली.

अंतरा आणि आजी दोघांचा चेहरा पडला, पण तरीही त्या आजींना वाईट वाटू नये; म्हणून अंतरा त्यांना धीर देत होती.

"आजी, अजून थोडा वेळ शोधू आपण. नाहीच सापडले तर सरळ माझ्या घरी जाऊ. मग बघू पुढे काय करायचे ते. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा?" अंतराने विचारले.

"पोरी, स्वतःचा कामधंदा सोडून तू माझ्यासोबत फिरत आहे. त्यातच सगळं आलं. सध्या तरी मला तुझ्या आधाराशिवाय काहीच दिसत नाहीये." रडवेल्या चेहऱ्याने त्या म्हणाल्या.

अंतरा त्यांची मानसिक स्थिती समजू शकत होती. आजींना ह्या वयात असे फिरवणे तिला योग्य वाटत नव्हते. शिवाय लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या घरी पोहोचावे असेही तिला वाटत होते. अजून अर्धा एक तास फिरून मग सरळ आपल्या घरीच घेऊन जावे असे तिने ठरवले. त्याशिवाय दुसरा उपाय पण नव्हता.

चालत चालत दोघी एका कॉलनीच्या सुरुवातीला येऊन पोहोचल्या.

"आजी, इथे काही ओळखीचे वाटत आहे का? थोडे आठवून बघा ना."

"आमचा रो हाऊस आहे. शिवाय आमच्या घराला लोखंडी फाटक आहे. फाटकावर फुलांची वेल पसरली आहे." आजींनी थोडेसे आठवून सांगितले.

परंतू, असे कितीतरी रो हाऊस तिथे होते. 'त्यात आजींचे घर नेमके कोणते? हे कसे समजणार?' अंतरा मनातल्या मनात विचार करत हतबल झाली. तरीही कॉलनीत शिरल्यानंतर आजींना तिथे कुणी ओळखते का? हे बघावे लागणार होते.

आजींचा हात धरत ती त्यांना घेऊन जाऊ लागली. तिथून पुढे काही अंतरावर गाई-म्हशींचा गोठा होता. तिथे एक महिला व पुरुष गाई म्हशींना चारा टाकत होते. आजींना तिथेच थांबवून अंतरा घाईघाईने त्यांच्याकडे गेली.

"तुम्ही या आजींना ओळखता का?" एका दमात ती म्हणाली.

"हो, ते काय.. त्या कोपऱ्यातलं त्यांचं घर आहे." ती महिला बोट दाखवत म्हणाली.
अंतराच्या आनंदाला पारावर उरला नाही.

"आजी, घर सापडले तुमचे."

अंतरा मागे वळून हसतच म्हणाली, पण त्याआधीच त्या आजी त्यांच्या घराजवळ पोहोचल्या होत्या. 

"हो, हेच माझे घर आहे. मी तुला म्हटले होते ना! घराच्या फाटकावर फुलांची वेल आहे ते." आजींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

अंतरा आजींजवळ गेली.

"आजी, नक्की हेच घर आहे ना!" अंतरा मिश्किलपणे हसून म्हणाली.

"तुझे खूप खूप आभार. चल तुला सर्वांची ओळख करून देते." आजी उत्साहाने हसून म्हणाल्या.

"नको आजी, तुम्ही आधी घरात जा. मी पण निघते. माझ्या घरचे वाट बघत असतील."

"अगं, आत तरी ये. माझ्यासाठी तू इतकी फिरली. तुला अशी कशी परत जाऊ देऊ." असे म्हणून आजी त्यांच्या मुलाला जोरजोरात आवाज देऊ लागल्या.

परंतू, घरातून त्यांच्या हाकेला कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता.

"अगं, तो वरच्या माळ्यावर झोपला असेल. दिवसभर काम करून दमून जातो ना. थांब, सुनेला आवाज देते."

आजी अंतराकडे बघून थोड्याशा नाराजीने म्हणाल्या.

मुलाकडून काहीच उत्तर येत नसल्याने, त्यांनी त्यांच्या सुनेला आवाज द्यायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून वरच्या मजल्यावरून कुणीतरी धपाधप पावले टाकत येत असल्याचे वाटू लागले. त्याक्षणी आतून दार उघडले गेले.

"ए म्हातारी, झोपू दे ना. सकाळी सकाळी काय गोंधळ लावला आहे. सारखी तुझी कटकट असते." त्यांचा मुलगा चिडून बोलत होता.

"अरे, मी दूध घ्यायला बाहेर गेली होती. मला आपले घर सापडत नव्हते. या मुलीने मला इथे आणून सोडले."

"तुला कुणी बाहेर जायला सांगितले होते? एक दिवस चहा नसता मिळाला, तर मेली नसती तू." रागाने अंतराकडे एक कटाक्ष टाकत तो म्हणाला.

हे ऐकून त्या आजींचा चेहरा पडला. त्यांना अजून जास्त अपमानास्पद वाटू नये; म्हणून अंतराला तिथून निघून जावेसे वाटत होते.

त्या आधीच त्या मुलाने धाडकन तिच्या तोंडावर दार लावले. आतून केवळ त्या मुलाचे अस्त्राप्रमाणे चालणारे धारदार शब्दशस्त्रच तेवढे कानी पडत होते.

तोंडावर दार लावल्यामुळे अंतराच्या मनाला फार वाईट वाटले. तिने तिच्या घरचा रस्ता धरला.

ह्या अनपेक्षित घटनेमुळे अंतरा विचारात पडली. त्या घरात आजी निव्वळ अडगळ म्हणून वाटत होत्या. आजींना स्मृती विस्मरणाचा त्रास आहे याची जाणीव घरातल्या सर्वांना असेलच, तरीही त्यांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला गेला. त्या आजी हरवल्या होत्या हे घरातल्या कुणाच्या खिजगणतीत देखील नव्हते. आजींना सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो, तर घरातल्यांनी त्यांच्यासाठी रात्रीच दूध का आणून ठेवले नाही? अंतराने त्या आजींना घरापर्यंत सुखरूप आणून सोडले तरी त्यांच्या मुलाला तिचे साधे आभार देखील मानावेसे वाटले नाही.


'आजी त्यांच्या घरच्यांना इतक्या नकोशा झाल्या होत्या का? नेमकं आजी हरवल्या होत्या की त्यांचे नाते?' असे एक ना अनेक न सुटलेले प्रश्न अंतराच्या मनात उसळत होते.

बाकीच्या नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवल्या तर, सरते शेवटी त्या आजींना सुखरूप त्यांच्या घरी सोडल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर साफ झळकत होते. तिने त्या आजींना त्यांचे हरवलेले घर शोधून दिले होते, पण त्यांची हरवलेली नाती शोधणे जरा अवघडच होते.

समाप्त.

( ही सत्यकथा आहे. नायिकेच्या जागी लेखिकेचे नाव वाचले तरी चालेल.)

लेखन - अपर्णा परदेशी.
0