दारावरची बेल वाजली तसे संदीपने दार उघडले आणि दारात पोस्टमनला पाहून तो जरा थबकलाच. आता या मोबाईल फोनच्या काळात कोणी बरं पत्र पाठवले असेल तो विचार करत राहिला.
"साहेब इथे सही करा.." पोस्टमनच्या आवाजाने तो भानावर आला. समोर असलेल्या पेपरवर सही करत त्याने पत्र घेतले आणि दरवाजा लावून त्याने ते पत्र उघडले आणि तो पत्र वाचायला लागला.
'तीर्थरूप बाबा,
शि. सा. न. वि. वि.
शि. सा. न. वि. वि.
बाबा तुला हे पत्र पाहून कदाचित् आश्चर्य ही वाटेल कारण मी आज पहिल्यांदाच पत्र लिहितेय तुला असे. खरतरं सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे, आणि आपण दोघेही तिथे बोलतोच नेहमी मगं तसे असताना देखील मी हा पत्र लिहिण्याचा घाट का घातला असा प्रश्न तुला पडेल हे मला माहित आहे.
बाबा खरं सांगू पत्र लिहिण्याचे विशेष कारण हे आहे की मला तुझे आभार मानायचे आहेत. दोन दिवसांपूर्वी तु ज्या पद्धतीने माझी बाजू समजून घेतलीस आणि माझ्या निर्णयाचे समर्थन केलेस ते पाहून खूप बरे वाटले. एका नवर्याने बायकोवर हात उचलणे हे समाजाच्या दृष्टीने अगदीच सामान्य आहे. फार पूर्वीपासून आपल्या समाजात हे घडत आहे पण तु मात्र कुठलाही विचार न करता, समीर तुझा जावई आहे हे लक्षात असताना ही कुठलीच तमा न बाळगता त्याच्या कानाखाली लगावून दिलीस आणि माझ्यामागे अगदी खंबीरपणे उभा राहिलास. त्या क्षणी खूप आधार वाटला रे बाबा तुझा मला. तु मला तुझ्यासोबत घरी घेऊन आलास तेव्हा ही लोक किती काही बोलतं चं होते पण तु कोणाचाही विचार केला नाहीस आणि मला ही विचार नको करू असे सांगितलेस. तु माझा बाबा आहेस याचा खूप हेवा वाटतो मला कारण जिथे माझ्या इतर मैत्रिणींचे आईबाबा त्यांना संसारात तडजोड करायला सांगतात तिथे तु मला, माझा सन्मान मी चं करायला हवा, मी स्वतःचा आदर करायला हवा हे वारंवार सांगत आला आहेस. बाबा खूप खूप थँक्यु तुझ्यामुळे मी आज नव्याने आयुष्याची सुरुवात करत आहे.
बाबा तुला वाटेल की मी हे सगळे मेसेज वर सुद्धा पाठवू शकले असते पण खरं सांगू मला तुझ्याशी हे प्रत्यक्षात बोलायला जमतं नव्हतं आणि मेसेज वरून फक्त शब्दं पोहचतातं पण पत्रातून भावना म्हणून हा खटाटोप एवढा. बाबा मला तुझा खूप अभिमान आहे खरचं पण फक्त एक चं प्रश्न विचारायचा आहे तुला आणि आशा करते की तु मला खरेचं उत्तर देशील. बाबा मी लहान होते त्यावेळी पण सगळे कळतं होते मला. लहानपणी कित्येक वेळा मी तुला आईवर हात उचलताना पाहिले आहे. तु माझ्याशी मात्र खूप गोडं वागायचा पण आईला छोट्या छोट्या गोष्टींवरून ओरडायचा. मी आईला खूपवेळा रडताना पाहिले आहे एकटेच. मी विचारले तेव्हा ती नेहमी उत्तर द्यायची की, डोळ्यात कचरा गेला आहे म्हणून आणि सहजतेने अश्रू पुसायची. बाबा जशी मी मुलगी आहे तशीच आई सुद्धा कोणाचीतरी तरी मुलगी होती ना त्यावेळी? समीरने माझ्यावर हात उचलला तेव्हा तुला जशा वेदना झाल्या तशाच वेदना आजोबांना झाल्या असतील ना?खरेतर ह्या घडून गेलेल्या गोष्टींवर आता बोलण्यात काही चं अर्थ नाही पण बाबा तु अजूनही आईशी नीट वागतं नाहीस. इतक्या वर्षात एकदाही तुला आईचे अश्रू दिसले चं नाहीत का रे?
बाबा ती ही एका वडिलांची मुलगी चं होती ना मगं त्यावेळी तिच्यावर हात उचलताना तुला एकदाही आजी आजोबांचा विचार नाही का यायचा मनांत? अरे जसे तु मोठ्या विश्वासाने समीर च्या हातात माझा हात दिला होता तसेच त्यांनी ही तुझ्यावर विश्वास ठेवून आईचा हात तुला दिला असेल ना?
बाबा तु वडील म्हणून अगदी बेस्ट आहेस पण नवरा म्हणून तु कमी पडलास. इतक्या वर्षात तिने तुझ्याकडून एका प्रेमळ शब्दाची अपेक्षा केली होती पण तु तिला तेवढे ही नाही देऊ शकलास. बाबा मुलगी म्हणून मला काही अधिकार आहेत, माझे अस्तित्व आहे समाजात एक हे मला शिकवताना तु आईचे अस्तित्व पायाखाली किती सहजतेने चिरडले होतेस याची तुला जराही आठवण नाही का रे झाली? खरतरं मी तुला आज एवढे बोलतेय पण यामध्ये माझा ही वाटा तितकाचं आहे. तुझ्याबरोबर आईची गुन्हेगार मी सुद्धा आहे. मला कधी कळले चं नाही तिचे दुःख कारण तुझ्या प्रेमाने मी इतकी लाडावली होते की, आईचे प्रेम आणि काळजी मला टोचत होती त्यावेळी. तु मला घरी आणले तेव्हा आईकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेले ते अश्रू पाहून एका क्षणांत मला या सगळ्याची जाणीव झाली. बाबा तु तिच्या बाबतीत खूप चुकलास आणि आता कितीही केले तरी ती चूक काही सुधारता येणार नाही पण तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहित आहे म्हणून चं माझ्यासाठी एवढी एक चं गोष्ट करं तु प्लीज.
बाबा तुला जमलं चं तर आईला तिचा सन्मान पुन्हा परत मिळवून दे. इतके वर्ष तुझ्यापुढे लपलेले तिचे अस्तित्व, तिचे विचार याची तिला जाणीव करून दे. तुला कदाचित् माहित नसेल पण आई खूप छान पेंटिंग्ज करते, तिला खूप मोठे चित्रकार व्हायचे होते पण तुझ्याशी ती कधीचं या विषयावर बोलू शकली नाही. तु मला जसे नवे पंख दिलेस तसेच आईला ही पुन्हा नवे पंख आणि तो विश्वास देऊ शकशील ना? तु आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिले तर तु आईवर केलेले ते सगळे अन्याय मी माफ करेल. काही चुकीचे बोलले असेल तर माफ कर मला. '
पत्र वाचतात संदीपच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले. आपल्या मुलीकडून आलेल्या या पत्राने त्याच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले होते. त्याने मनाशीच पक्का निर्धार केला की या पत्राचे उत्तर म्हणून आता आपल्या बायकोला आणि आपल्या मुलीच्या आईला तिचा सन्मान परत मिळवून द्यायचा.. तिच्यासाठी हेच पत्राचे उत्तर असेल.
*समाप्त*
©ऋतुजा कुलकर्णी - सावजी ✍️