Login

हरवलेल्या वाटा भाग 4 अंतिम

कथा सामान्य स्त्रीची
"सून आल्यावर स्वभाव बदलतो." ताई ठसक्यात म्हणाल्या.

"इतका?" जयंत.

"ते तुला या जन्मात कळणं शक्य नाही. काल तुझी बायको बोलली, आज तू बोल." ताईंनी डोळ्याला पदर लावला.

"स्मिता तुला बोलली! हे आधीच बोलायला हवं होतं. तिने स्वतःची बाजू मांडली हे एक बरं झालं. तुला आठवतंय आई, अनेकदा मी तुला स्मिताची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो. पण तू कधीच ऐकलं नाहीस आणि तिने सगळं जाऊ दे म्हणून सोडून दिलं. तुझ्या वागण्यामुळे खोलवर दुखावली गेलीय ती. शक्य असेल तर माफी माग नाहीतर वागणं बदल." विमल ताई आ वासून आपल्या मुलाकडे बघत राहिल्या.

आपल्या नवऱ्याला हा साक्षात्कार कसा झाला? हेच स्मिताला कळेना. तिने मुलांकडे एक नजर टाकली. मानस स्वभावानुसार शांत होता. पण सुबोध मात्र गालातल्या गालात हसत होता. त्याची चोरी पकडली गेली.

"नसते उद्योग कोणी सांगितले?" तिने धाकट्या लेकाचा कान पकडला.

"आई, मी फक्त काल काय झालं ते बाबांना सांगितलं." सुबोध कान चोळत बाहेर पळाला.
"लग्न करायची वेळ आली तरी याचा बालिशपणा काही जात नाही." स्मिता रागावली.

"हिनेच नवऱ्याला भरीला घातलं असणार." सासुबाईंचं बोलणं तिच्या कानावर पडलं. "दिवसभर बाहेर गेला होता ना? याचसाठी गेला असणार."

"तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता आणि यापुढे कधीही असणार नाही , हे माहितीय मला. पण मी ह्यांना काहीही सांगितलं नाही. याआधीही सांगत नव्हते आणि इथून पुढं सांगणारही नाही." स्मिता.

"बघतेच मी, तुला सून आल्यावर कशी वागतेस ते!"

"मी तिला कायम सांभाळून घेईन. या घरची सून, लक्ष्मी म्हणून तिचा मान ठेवेन."

हे ऐकून सरला आत्या बाहेर आली. "काय चाललंय तुमचं? घरात शुभ कार्य ठरतंय. ते मनापासून इंज्योय करायचं सोडून एकमेकांवर आरोप काय करताय? आणि आई, तू जरा शांत रहा. दादा अन् वहिनीला त्यांच्या मुलांबद्दल काही ठरवण्याचा अधिकार नाहीय का? आता तू मार्गदर्शन करायचं सोडून मान काय घेतेस?"

आपल्या प्रेम कहाणीला भलतचं वळण लागलेलं बघून मानस रागाने लाल झाला." त्यापेक्षा मला विरोध झाला असता तर बरं झालं असतं. लहानपणापासून बघतोय मी, आजीने आईला कधी सुखांन चार घास खाऊ दिले नाहीत. सारखी कटकट , चिडचिड, अपेक्षा अन् मानापमान.. आई काय करते यावर तिचं सतत लक्ष असायचं. तिच्याविषयी बाहेर बोलताना आजी एकही चांगला शब्द कधी बोलली नाही.
या साऱ्याचा आमच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा कोणी विचारच केला नाही. पण आई मात्र आमच्यासमोर आजीविषयी नेहमी चांगलं बोलत आली. आता सगळं तिच्या मनाप्रमाणे व्हावं असं तिला वाटत असेल तर मी हे लग्न करणार नाही." मानस पाय आपटत खोलीत निघून गेला. सरला आत्या त्याला समजवायला मागं धावली.

"मी सतत बाहेर का जातो? याच कारण तूच होतीस आई." जयंत दुखावले गेले होते. "त्याचं खापर तू माझ्या बायकोवर फोडून रिकामी झालीस. तिने या घरासाठी, आपल्या सर्वांसाठी खूप काही केलंय. आपली स्वप्नं बाजूला ठेवली. आवडी -निवडी विसरली. का? तर सासुकडून एकदा तरी कौतुकाची थाप पाठीवर पडेल म्हणून."

स्मिता रडत होती. "बाहेर कित्ती कौतुक व्हायचं आईंचं. घरात दिसताना सारं आलबेल दिसायचं. पण प्रत्यक्ष परिस्थीत मी अनुभवली आहे. त्या लोकांना काय माहिती, 'दुरून डोंगर साजरे' असतात ते." ताईंना तोंड कुठं लपवू असं झालं होतं.

सरला आत्याने कशीबशी मानसची समजूत काढली. स्मिताला धीर दिला आणि ताईंना घेऊन ती खोलीत गडप झाली. याचा अर्थ आज रात्रभर ताईंना लेक्चर ऐकावं लागणार होतं.
-------------------------


लवकरच साखरपुडा पार पडला आणि लग्नाची गडबड उडाली. विमल ताई या यात सहभागी असल्या तरी अलिप्त होत्या. आपल्याकडून एकही पैसा खर्च केला नाही त्यांनी. तशी गरजही नव्हती. पण आपण नातवंडांसाठी आनंदाने काहीतरी करावं हे त्यांच्या गावीही नव्हतं.

सरला आत्या मात्र मनापासून राबत होती. लग्नात भरपूर आहेर केला तिने.
"सरला, इतकं कशासाठी? लग्न अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं. तुझी उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची होती." स्मिता तिचा हात हातात घेत म्हणाली.

"वहिनी, आईकडून कुठलीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तिची कमी मी भरून काढली असं समज." आत्या हसत म्हणाली. नव्या सुनेला तिने भरभरून आशीर्वाद दिले.

मानस आणि गौरीचा संसार सुरू झाला. गौरीला रुळायला अजिबात वेळ लागला नाही. म्हंटल्याप्रमाणे स्मिता घर सांभाळत असली तरी दोघांना मार्गदर्शन करत होती. मदत करत होती. गौरीने बरीचशी जबाबदारी अंगावर घेतली तर सुबोधचा विरोध कधीच मावळला होता. वहिनी म्हणून तो आता गौरीला मान देत होता.

"आई, आज मी काय करू?" म्हणत गौरीचा दिवस सुरू व्हायचा. सासू -सून दोघी मिळून घरकाम करायच्या. मनमोकळ्या गप्पा मारायच्या. स्मिताचा संध्याकाळचा चहा आधी मानससोबत व्हायचा. ती जागा आता गौरीने घेतली. ती जशी घरात आली तसं घराला एक नवं चैतन्य आलं होतं.
अधून मधून गौरी आपल्या दुकानात जाऊन बसायची. सासुकडून नव्या गोष्टी शिकायची. बऱ्याच वर्षांनी स्मिता खूप खुश दिसत होती. तिच्या मनात नवा उत्साह संचारला होता. मीपणा कधी तिच्याकडे नव्हताच. आता सुनेला तिनं आपल्या मुलांप्रमाणे ह्रुदयात स्थान दिलं होतं.

हे सारं विमल ताई बघत होत्या. आपल्या सुनेत पडलेला फरक त्यांना जाणवत होता. 'स्मिता आपल्या सुनेची जशी वागते तसं आपल्याला असं वागायला का जमलं नाही? की आपण सासू म्हणून फक्त मिरवण्याचा, अधिकार, हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला? विमल ताई विचारांत पडल्या.

आता बऱ्याचदा खरेदीच्या निमित्ताने स्मिता आता बाहेर पडायची. घरची बरीचशी जबाबदारी गौरीने घेतली असल्याकारणाने मिळालेला मोकळा वेळ ती कविता करण्यात, आपले छंद जोपासण्यात घालवत होती. मुलं खुश होती. जयंत तर आपल्या बायकोच्या प्रेमात नव्याने तरंगत होते.

"आई, याआधी असा मोकळा वेळ तुम्हाला मिळाला नाही का?" गौरी.

"मिळत होता ग. पण सासुबाई काय म्हणतील? असा विचार करून मी सवयीत अडकून पडले होते. मनात भीती घेऊन वावरत होते. आपल्या आवडी बाजूला सारून सुनेने केवळ घर सांभाळायचं, घरच्या लोकांना काय हवं, नको ते बघायचं. मोठ्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहायच्या. या चक्रात, जबाबदारीत अडकले होते. तू आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं. तुझ्या तारुण्याची, उत्साहाची लागण मला झाली. माझं पूर्वीचं रूप तुझ्यात पाहिलं मी अन् नव्या आयुष्याला सुरुवात केली." स्मिता भरभरून बोलत होती. आपल्या खोलीत बसलेल्या विमल ताई हे ऐकत होत्या.

'कित्येक वर्षांपूर्वी आपणही हेच केलं. स्वतःचं मन मारत आलो. आपल्या आवडी -निवडी विसरून गेलो. त्याकाळी 'शिकलेली' मी सासुसाठी घरकाम शिकून घेतलं अन् त्यातच पी. एच.डी. केली. माझ्या सासुने गिरवलेला धडा माझ्या सुनेकडून पुन्हा लिहून घेतला.' विमल ताईंचे डोळे पाझरू लागले. आपल्या चुकीची जाणीव त्यांना पश्चातापही करू देईना.

इतक्यात जयंत घाईघाईने आत आले. " स्मिता, काश्मीरचं बुकिंग करतोय. आता तरी येशील ना सोबत?"

"इतक्या थंडीत? आणि घर सोडून, आईंना सोडून असंच जायचं? स्मिताच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होतं.

"आता मी आहे ना? मी घर सांभाळेन. तुम्ही दोघं मस्तपैकी फिरून या." गौरीने आपल्याकडून होकार दिला.

"ती म्हणतेय तर जा. मी दिवसभर नुसती बसूनच असते, होईल तशी मदत करेन तिला. गेल्या कित्येक वर्षांत मोकळा श्वास घेतला नाहीयस. आता जबाबदारी कमी झाली. जे हवं ते कर." विमल ताई रडत होत्या. आपल्या चुकीची मनापासून झालेली जाणीव त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. ताईंचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. स्मिताने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"खरंच जा. मनापासून मोकळी हो." त्यांनी स्मिताच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती आनंदाने उठली.

"सुनेची आवड जपण्यासाठी सासुबाईंनी परवानगी देणं म्हणजे सुनेचा मान राखण्यासारखं आहे हे. नाही का?" जयंत उत्साहाने म्हणाले. त्यांनी पट्कन बुकिंग करून टाकलं.
स्मिताच्या चेहऱ्यावर संतोष, आनंद, उत्साह दिसत होता त्यामुळे आज सारं घर आनंदाने न्हाऊन निघालं होतं. हे बघून विमल ताईंच्या चेहऱ्यावर कधी न दिसणारं अबोल समाधान नाचू लागलं.
जी
'इतरांना ताब्यात ठेवताना आपण आपलाही आनंद गमावला. इथून पुढं अलिप्त राहायचं. खूप उशीर झाला असला तरी सुनेला, नात सुनेला त्यांचा, त्यांचा संसार करू द्यायचा.' मनाशी पक्कं करत विमल ताईंनी जयंतना हाक मारली. "निघण्याआधी मला सरलाकडे नेऊन सोड. काही दिवस तिथं राहीन म्हणते. इथं पोरांना त्यांचा संसार करू दे. मी मध्ये मध्ये करत नाही.

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं नाही ते आपल्या सुनेला मिळतं आहे, हे बघून स्मिताला समाधान वाटलं. हे सुखाचे दिवस आता भरभरून जगायचे असं ठरवत ती ट्रिपची तयारी करायला आत गेली. आज तिच्याहून सुखी दुसरं कुणीही नव्हतं. ज्या हरवलेल्या वाटेवरून चालण्याचं सुख स्मिता उपभोगण्यासाठी असुसली होती, त्या अनेक वर्षांनी आज समोर येऊन थांबल्या होत्या, खुणावत होत्या. त्यावरून ती स्वच्छंदपणे भटकणार होती..अगदी मनमुराद!