आज शिक्षकदिन, या निमित्ताने औचित्य साधून मला आज माझ्या आठवणींच्या पोतडीतून आणखी एक सुंदर आणि अमूल्य आठवण शब्दात मांडायची इच्छा झाली.
खरंतर पहिला गुरु आईचं..आईवडिलांचं स्थान आपल्या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांच्याइतकंच महत्वाचे स्थान आपल्या आयुष्यात आपल्याला लाभलेल्या शिक्षकांनाही आहे म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.
शाळेपासून कॉलेजपर्यंत लाभलेल्या सगळ्याच शिक्षकांचे खरंतर मनापासून आभार मानायचा आजचा हा दिवस पण काही शिक्षक असे असतात जे आयुष्य बदलवून टाकतात किंबहुना आयुष्य जगायला शिकवतात किंवा आयुष्याचा नेमका अर्थ समजावतात.. तसेच माझे एक आवडते सर, श्री.प्रशांत पाटील...
मी नववीत असतानाची ही गोष्ट, माझा गणित विषय जरा कच्चा होता किंवा मी गणित विषयाला घाबरत होते बहुदा..माझी बहीण दहावीला पाटील सरांकडे कलासला होती म्हणून ते आमच्या चांगल्या ओळखीत होते.अतिशय गरीब परिस्थतीत स्वतःचं शिक्षण पूर्ण करत ते त्यावेळी क्लासेस घेत होते. त्यांच्या कॉलेजच्या वेळेमुळे त्यांना इतर वर्गाचे क्लास घेणं शक्य नव्हतं. त्यांनी मला थोडं मार्गदर्शन करण्याचं आव्हान केलं कारण त्यावेळी ते फक्त दहावीचे क्लास घ्यायचे.
मला शिकवत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की माझं भाषा, विज्ञान आणि इतर विषयावर खूप चांगलं वर्चस्व आहे फक्त गणिताचा पाया जरा कच्चा असल्यामुळे आणि गणिताची थोडी भीती मनात असल्यामुळे माझी मजल 85% च्या वर जातं नव्हती. त्यांना समजलं की ही भीती निघाली तरच मी दहावीत चांगली गुण मिळवू शकेल आणि नववीत पाया पक्का झाला तरच दहावीला घवघवीत यश मिळू शकेल. त्यांनी एक युक्ती शोधली जर सकाळी सहा वाजेला नववीचा वर्ग सुरु केला तर त्यांना त्यांच्या कॉलेज साठी वेळही मिळेल आणि त्यांचं जे स्वप्न होतं की त्यांच्या विद्यार्थ्यांमधून कुणीतरी दहावीच्या बोर्डात मेरिटमध्ये यावं तेही पूर्ण करता येईल.
त्यांनी ठरवलं माझी ही भीती काढून टाकायची सुदैवाने त्यांना अजून विद्यार्थी मिळाले आणि आमचा क्लास अगदी जोरात सुरु झाला. त्यावेळी महिन्याची फी जेमतेम १००/- रु.होती तरीही परिस्थितीमुळे आईला ती वेळेत द्यायला जमत नव्हतं. सरानी कधीच मला फीसाठी विचारलं नाही ते फक्त शिकवत राहिले आणि दोनच महिन्यात माझी गणिताची भिती अशी काही दूर पळाली की मी इंजिनीयरिंग क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. सरांचे शिकवणं म्हणजे अगदी खेळीपुर्ण वातावरणाचे असायचं गणिताचा क्लास पण सतत हसणं, खिदळण, गंमतीजंमतीतून ते असं काही शिकवायचे की आजही मला गणिताचे कुठलही प्रमेय किंवा सूत्र विचारलं तरी मला तोंडपाठ आहे. एक जिवंतपणा असायचा कलासमध्ये... चार तास आमचा क्लास सुरु असायचा पण कधीच जाणवलं नाही की आम्ही इतका वेळ अभ्यास करत आहोत.
अपेक्षेप्रमाणे सरांच्या आणि माझ्या मेहनतीला यश आलं..मी केंद्रात तर पहिली आलेच शिवाय गणित विषयातही शाळेत पहिली आले.
अर्थात सगळं श्रेय सरांचे होतं पण माझ्या आयुष्यात त्यावेळी एक अघटित घडलं.. माझा दहावीचा निकाल लागण्याच्या महिनाभर आधीच अचानक माझे बाबा हे जग सोडून गेले. चार बहिणी, एक भाऊ सगळी जबाबदारी आईवर येऊन पडली.
इंजिनीयरिंग करायचं माझं स्वप्न बाजूला सारून मी कॉमर्सला प्रवेश घ्यायचं ठरवलं कारण विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन महागडे क्लास लावणं शक्यच नव्हतं.क्लास नाही लावायचा म्हंटल तरी विज्ञान शाखेची फी आणि पुढचा सगळा खर्च झेपणारं नव्हतंच. त्यात मी मराठी माध्यमातून शिकलेली तर एकाएक इंग्रजीमध्ये शिकणं, पेपर लिहणं खूप अवघड जाणार होतं. मी फोनवरच सरांना सांगितलं की मी कॉमर्सला ऍडमिशन घेतेय.
त्यावेळी मी ऍडमिशनच्या रांगेत उभी होते, डोळ्यासमोर अंधार होता, विचाराचं काहूर माजलं होतं..त्याचवेळी सर तिथे माझ्या आईला घेऊन पोहचले. योग्यता असून परिस्थतीपायी त्यांनाही इंजिनीयरिंग करता आली नव्हती तीच
वेळ त्यादिवशी परत माझ्या एका विद्यार्थ्यावर आली आहे हे त्यांना सहन होत नव्हतं. त्यांनी तिथे एका क्षणात निर्णय घेतला की अकरावी, बारावी विज्ञानचे क्लास सुरु करण्याचा..त्यांनी तात्काळ दुसरा फॉर्म आणून स्वतः माझा विज्ञान शाखेचा फॉर्म भरून माझं ऍडमिशन केलं. माझ्या आईला आश्वस्थ केलं की, "ही आता माझी मुलगी आहे, तिच्या भविष्याची जबाबदारी मी घेतो तुम्ही निश्चिन्त रहा."
त्यावेळी सरांचे नववी दहावीचे क्लास खूप चांगले सुरु होते आणि माझ्या एकटीसाठी ते सगळं सोडून, बंद करून इतक्या स्पर्धेच्या युगात नवीन सुरुवात करणं खूप जोखमीचं होतं तरीही सरानी ती जोखीम पत्करली. महिनाभर एकही विद्यार्थी वाढला नाही, मी निराश होतं चालले होते पण सर हारले नाही. अखेर महिनाभरानंतर दोन आणखी विद्यार्थी ज्यांना दुसरे महागडे क्लास परवडत नव्हते ते आमच्या कलासमध्ये आले..
पहिली चाचणी परीक्षा झाली..वर्गात ८० विद्यार्थी ज्यात ७०% विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून आलेले, काहीतर CBSE,ICSE मधून आलेले त्यांच्यामध्ये मी मराठी माध्यमातून, सरकारी शाळेतून शिकलेली गणित आणि भौतिकशास्त्र दोघांमध्ये अनुक्रमे दुसरी आणि तिसरी आले तेव्हा मला खरा आत्मविश्वास मिळाला.
आणि त्यानंतर आमच्या कलासमध्ये जी विद्यार्थ्यांची गर्दी झाली की बसायला जागा उरली नाही. बारावी बोर्डात कॉलेजचे 3 पैकी 2 टॉपर माझ्या पाटील सरांच्या क्लास मधले होते ज्यातली मी एक होते.
त्यानंतर मी इंजिनीयरिंग केलं आणि माझ्या सरांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं.. पुढे मी इंजिनीरिंयग कॉलेजलाही सेकंड टॉपर आले आणि त्याचं सगळं श्रेय पाटील सरांच आहे. आज मी जीही आहे, जशी आहे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे.
जेव्हा सगळं काही अस्ताव्यस्त होतं आणि ते कधी सुधारणार अशी अपेक्षाही नव्हती त्यावेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, धड्पडलेली मी मला पुन्हा उठून चालायला शिकवलं, जगायला शिकवलं, आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न दुसऱ्याच्या यशात पूर्ण होताना बघणं आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपल्याकडे जे काही थोडंफार आहे त्यातूनही दुसऱ्याला मदत करणं शिकवलं...एका व्यक्तीत मला शिक्षक,बाप,मित्र, भाऊ किती नाती मिळालीत याची गणतीच नाही. त्यांचे माझ्यावर किती उपकार आहेत याचं शब्दात वर्णन शक्यच नाही.
आज तर पाटील सरांची ख्याती आणि प्रगती अक्खा नाशिक जिल्हा बघतोय..त्यानंतर पाटील सरांनी खूप प्रगती केली.. नाशिक शहराच्या मधोमध आता त्यांचा स्वतःचा क्लास आहे आणि सगळं अगदी डिजिटल, hitech शिक्षण झालंय पण पाटील सर होते तसेच आहे.
त्यांच्याकडे बघून नेहमी एकच गोष्ट आठवते
"हरवले आभाळ ज्यांचे हो तयांना सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी.."