Login

हसवणूक हॉटेल...भाग 1

जेवणे आणि हसणे एकत्र
हसवणूक हॉटेल...भाग 1

एक भन्नाट विनोदी कथा


गोपाळराव भोसले हे एक मध्यमवयीन गृहस्थ. निवृत्तीनंतर काहीतरी धडाकेबाज व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ठरवलं हॉटेल सुरू करायचं.

त्यांच्या डोक्यात कल्पना तर भन्नाट होती पण स्वयंपाकाचं काहीच कौशल्य नव्हतं. ते स्वतः स्वयंपाक करायला लागले तर लोकांनी ते हॉटेल नव्हे तर दवाखाना समजला असता. त्यामुळे त्यांनी गिरीजा मावशींना बोलावलं ज्या गावातल्या कोणत्याही कार्यक्रमात "सुगरण" म्हणून प्रसिद्ध होत्या.

हॉटेलचं नाव ठेवलं
"हसवणूक हॉटेल".

कारण? इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला काही ना काही तरी गोंधळ, गडबड आणि हास्याचा डोस मिळणार हे नक्की होतं.
पहिल्या दिवशी पहिल्याच ग्राहकाने ऑर्डर दिली.
"एक मिसळ आणि एक चहा द्या."

गिरीजा मावशी स्वयंपाकघरात गेल्या. पाच मिनिटांत परत आल्या आणि म्हणाल्या,
"मिसळ तयार आहे, पण चहा नाही."

गोपाळराव चक्रावले,
"का गं, चहा का नाही?"

"नाही कारण मी चहामध्ये चुकून आलंऐवजी मिरी टाकली. चहा प्यायल्यावर माणूस कराटे खेळायला लागेल."

गोपाळरावांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. ग्राहकही हसत हसत पळून गेला.

पहिल्याच दिवशी चहामध्ये मिरी पडून ग्राहक पळून गेल्यावर गोपाळरावांनी गिरीजा मावशींना चहाची जबाबदारी न देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच चहा बनवायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी एक नवीन ग्राहक हॉटेलमध्ये आला. हा होता दत्ता काकडे जो काहीही खाल्लं तरी त्यात नक्की काहीतरी चुका काढायचा.

"एक पोहे आणि चहा द्या." दत्ताने मागणी केली.

गिरीजा मावशींनी पोहे दिले आणि गोपाळरावांनी स्वतः तयार केलेला चहा समोर ठेवला.

दत्ताने चमच्याने पोह्यांची चव चाखली आणि म्हणाला,

"अगं गिरीजाबाई हे पोहे आहेत की लिंबाची कढी?"

गिरीजा मावशी गोंधळल्या,
"का रे दत्तू? चांगले तर आहेत पोहे."

"अहो लिंबाचं प्रमाण एवढं वाढलंय की पोहे चमच्याने खायला नाही प्यायला लागतील."

गोपाळरावांनी विषय बदलायचा म्हणून पटकन चहा पुढे केला,
"हे बघा हा माझ्या हातचा खास चहा. एकदा प्यायल्यावर विसरणार नाही."

दत्ताने घोट घेतला आणि चेहरा वाकडा तिकडा करून म्हणाला,
"अहो.. हा चहा आहे की चहाच्या नावाखाली 'गोडसर कडू औषध?"
गोपाळरावांनी चहा चाखला आणि त्यांच्याच डोळ्यांतून पाणी आलं. त्यांनी घाईघाईने स्वयंपाकघरात धाव घेतली आणि डब्बे तपासायला सुरुवात केली. त्यांना समजलं की त्यांनी साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं होतं.

त्याच वेळी हॉटेलमध्ये अजून तीन–चार लोक आले. त्यांचा चेहरा पाहून दत्ता हसत ओरडला,

"अहो लोकांनो... काही खायचं असेल तर आधी तुमचं आरोग्य विमा काढून या."

तितक्यात गावचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब देशमुख आले. त्यांना पाहताच गोपाळराव आनंदले.

"आप्पासाहेब आपल्यासाठी खास फराळाची थाळी आहे."

आप्पासाहेब गंभीरपणे खुर्चीत बसले आणि थाळी समोर घेतली.

पण पहिलाच घास तोंडात टाकताच त्यांच्या चेहऱ्यावर भयानक भाव आले. ते खोकत म्हणाले,

"अहो हे काय दिलंत? पुरणपोळी आहे की मिरचीची पोळी?"

गोपाळराव आणि गिरीजा मावशी पुन्हा धावत आत गेले. लक्षात आलं की गुळाऐवजी त्यांनी चुकून तिखट घातलं होतं.

आप्पासाहेबांनी कपाळाला हात लावला आणि हळूच पुटपुटले,

"हे हॉटेल आहे की 'चकमक प्रयोगशाळा'?"

गोपाळरावांनी आप्पासाहेबांची समजूत घालायचा प्रयत्न केला,

"अहो पहिल्या काही दिवसांत थोडे गोंधळ होतातच पण पुढच्या वेळी आम्ही."

तितक्यात आतून मोठा आवाज आला "धडाम..."

गिरीजा मावशी श्रीखंडाचा डबा उचलताना तो उचलायच्या ऐवजी स्वतःच घसरून पडल्या होत्या.

गोपाळरावांनी डोक्याला हात लावला आणि हॉटेलचं नाव सार्थ ठरलं.

गोपाळरावांना हॉटेल सुरू करून तीन दिवस झाले होते आणि या तीन दिवसांत त्यांनी असंख्य ग्राहक पळवले होते. पण अजूनही त्यांच्या आत्मविश्वासात तसूभरही फरक पडला नव्हता.

पण चौथ्या दिवशी एक नवा ट्विस्ट आला.

सकाळीच गावचे सरपंच भिकाजी पाटील आले आणि गोपाळरावांना थोडं बाजूला घेऊन म्हणाले,

"गोपाळराव तुमचं हॉटेल आता गावभर फेमस झालंय."

गोपाळरावांचा चेहरा आनंदाने फुलला,

"खरंच का? म्हणजे लोकांना आमच्या पदार्थांची चव आवडायला लागली."

सरपंचांनी खोचक हसत उत्तर दिलं,

"हो चव विसरणार नाही म्हणूनच लोकं अजूनही पाणी पितायत."

गोपाळरावांचा चेहरा पडला.

सरपंच पुढे म्हणाले,

"आज गावातले मान्यवर आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब गावात येतायत. त्यांना तुमच्या हॉटेलात जेवायचंय."

गोपाळरावांना क्षणभर शंका आली की त्यांनी ऐकण्याचा काहीतरी गोंधळ केला का?

"काय? खासदार साहेब? आमच्या हॉटेलात?"

सरपंचांनी मान डोलावली.

गोपाळराव तोंडातल्या तोंडात पुटपुटले,

"बापरे! आता हॉटेल सुधारायचं नाही तर वाचवायचं आहे."

किती हा गोंधळ... हसवणूक हॉटेल सुरू राहणार की बंद पडणार की अजुन काही गोंधळ उडणार बघूया पूढील भागात.


क्रमशः

ऋतुजा वैरागडकर