Login

हसवणूक हॉटेल...भाग 2

जेवणे आणि हसणे एकत्र
हसवणूक हॉटेल...भाग 2

गोपाळरावांनी गिरीजा मावशींना परिस्थिती सांगितली. त्या पण घाबरल्या.

"गोपाळराव आपण खरोखर काहीतरी सुधारणा केली नाही तर हे हॉटेल बंदच करायला लावतील."

गोपाळरावांनी विचार केला आणि ठरवलं
"आजपासून हॉटेलमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही."

पण हे ते ठरवले आणि त्याच वेळी आतून "धडाम...." आवाज आला.
गोपाळराव आणि गिरीजा मावशी धावत आत गेले. तिथे गणपा हात चोळत उभा होता आणि समोर एक मोठा कढईतला उकळता तेलकट रस्सा जमिनीवर सांडलेला होता.

"गणपा हे काय केलंस?" गोपाळरावांनी डोक्याला हात लावला.

"अहो तुमच्या हॉटेलात पहिल्यांदा काहीतरी साधं बनवत होतं म्हणून पाय घसरून पडलो."

गोपाळराव काहीतरी उपाय शोधायच्या आधीच हॉटेलबाहेर मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून खासदार साहेब, सरपंच, आणि काही प्रतिष्ठित लोक बाहेर पडले.

गोपाळरावांनी हसत स्वागत केलं पण आतून त्यांचं पोट ढवळत होतं.

"साहेब हॉटेलमध्ये आपलं स्वागत आहे."

खासदार साहेब खुर्चीत बसले आणि म्हणाले,
"बहोत तारीफ सुनी है इस हॉटेल की. आज कुछ झकास स्पेशल दे दो."

गोपाळराव आणि गिरीजा मावशींनी जीव मुठीत धरून ऑर्डर घेतली, पुरी-भाजी आणि गुलाबजामून.

गिरीजा मावशींनी अर्ध्या तासात सगळं तयार केलं.

"अतिशय सावधगिरीने करा." गोपाळरावांनी एक शेवटचा इशारा दिला.

सर्व पदार्थ समोर ठेवण्यात आले आणि खासदार साहेबांनी गुलाबजामून उचलून तोंडात टाकला…

...आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हावभाव उमटला.

"क्या बात है! इतना क्रिस्पी गुलाबजामून पहली बार खा रहा हूँ."

गोपाळराव आणि गिरीजा मावशींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
पण तो आनंद पाच सेकंद टिकला.

कारण खासदार साहेबांनी गुलाबजामून तोडून पाहिलं आणि म्हणाले,
"अरे भाई, ये अंदर से इतना कडक क्या है?"

संपूर्ण हॉटेल स्तब्ध झालं.

गोपाळराव घाबरून आत धावले आणि पाहिलं तर गिरीजा मावशींनी गुलाबजामूनच्या ऐवजी चुकून बटाटेवडे पाकात टाकले होते.
गावकऱ्यांनी हसून हसून पोट धरलं.

खासदार साहेबांनीही मोठ्याने हसत गोपाळरावांचा हात धरला आणि म्हणाले,

"हॉटेल बंद करू नका इथे लोक फक्त जेवायला नाही, हसायला पण येतील."

आणि त्याच क्षणी, "हसवणूक हॉटेल" खरंच लोकप्रिय झालं.

खासदार साहेबांनी हॉटेलाचं कौतुक केल्यामुळे हसवणूक हॉटेल आता खरोखरच प्रसिद्ध झालं. गावभर त्याची चर्चा सुरू झाली. "इथं जेवलं की हसून हसून पोट दुखतं." असं गावकरी म्हणायला लागले.

गोपाळरावांना वाटलं आता व्यवसाय जोरात चालेल पण खरी परीक्षा अजून बाकी होती.

गिरीजा मावशींनी स्पष्ट सांगितलं,
"गोपाळराव आता हे काम आपल्या दोघांचं नाही अजून काही मदत लागेल."

गोपाळरावांनी गावात सगळीकडे चौकशी केली आणि दोन मदतनीस ठेवले  चंग्या आणि मंग्या.


चंग्या – स्वयंपाकघरात मदत करणार पण त्याची खासियत म्हणजे त्याने कधीच स्वयंपाक केला नव्हता.

मंग्या – ऑर्डर घेणार पण तो अल्फाबेटीच्या एफ ते एस पर्यंतचे सगळे शब्द गडबड करायचा.

पहिल्याच दिवशी एक गृहस्थ आले आणि त्यांनी ऑर्डर दिली,
"एक चहा आणि दोन वडापाव"

मंग्याने हसत आत सांगितलं,
"साहेब एक चहा आणि दोन बटाटे उकडून द्या"

गोपाळरावांनी कपाळाला हात लावला.
"अरे वडापाव मागितला होता उकडलेले बटाटे नाही"

"सॉरी साहेब, थोडं चुकलं."

गोपाळरावांना कळलं हे दोघं मिळून हॉटेलचं काहीतरी वेगळंच करण्याच्या मार्गावर आहेत.
दुसऱ्या दिवशी एक मोठा गोंधळ झाला. गिरीजा मावशी चहा करत होत्या आणि चंग्या भजी तळत होता.

गोपाळराव बाहेर पाहत होते तितक्यात किचनमधून मोठा "धडाम.." आवाज आला.

गोपाळराव धावत गेले. तिथे काय दृश्य होतं?


चंग्या गॅसजवळ उभा हाताला पीठ लावलेलं.

गिरीजा मावशींनी डोक्यावर पदर घेतला आणि कपाळावर हात मारला.

शेगडीवर भांडं फुटलेलं आणि सगळीकडे उडालेलं गरम तेल.

गोपाळरावांनी चंग्याला विचारलं,
"हे काय केलंस?"

चंग्या चाचरत म्हणाला,

"मी तुमचं बोलणं ऐकलं होतं की वडा फुलला पाहिजे म्हणून मी त्यात बेकिंग सोडा घातला."

गोपाळराव कपाळावर हात मारत बसले.

"अरे वडा फुलला पाहिजे म्हणजे चांगला तळला पाहिजे  त्यात केमिकल नाही टाकायचं."

गावकऱ्यांनी बाहेरून हा गोंधळ पाहिला आणि हसून हसून हॉटेलबाहेर गर्दी जमवली.

या सगळ्या गोंधळात गावातल्या एका मोठ्या गाडीतून एक गबाळ्या दिसणारा माणूस उतरला. सगळे त्याच्याकडे बघायला लागले.

"अरे हा तर आपला मोट्या मल्हारकर."

मोठया गावात जन्मलेला पण शहरात मोठा झालेला एक श्रीमंत माणूस. त्याने गाडी पार्क केली आणि हॉटेलमध्ये येऊन बसला.

"गोपाळराव तुमचं हॉटेल प्रसिद्ध झालंय म्हणे?"

गोपाळराव हसले,
"हो लोक हसवणूक अनुभवायला येतात."

"चला तर मग काहीतरी मस्त खायला द्या."

गोपाळरावांनी घाईघाईने खास थाळी बनवायला सांगितली. पण मंग्याने आत चुकून वेगळीच ऑर्डर दिली.