Login

हसवणूक हॉटेल... भाग 3 अंतिम

जेवणे आणि हसणे एकत्र
हसवणूक हॉटेल...भाग 3 अंतिम

"गोपाळराव तुमचं हॉटेल प्रसिद्ध झालंय म्हणे?"

गोपाळराव हसले,
"हो लोक हसवणूक अनुभवायला येतात."

"चला तर मग काहीतरी मस्त खायला द्या."

गोपाळरावांनी घाईघाईने खास थाळी बनवायला सांगितली. पण मंग्याने आत चुकून वेगळीच ऑर्डर दिली.

गोपाळरावांनी मोठ्या थाटात मोट्याला एक थाळी समोर ठेवली आणि म्हणाले,
"हे घ्या स्पेशल जेवण."

मोट्याने पहिला घास घेतला आणि क्षणभर थांबला. सगळे शांत झाले.

"गोपाळराव ही भाजी एवढी चटकदार का?"

गोपाळराव गोंधळले. त्यांनी आत जाऊन पाहिलं तर तिखटाच्या डब्यात लाल रंगाचा बारूद पडला होता.
गोपाळराव आणि गिरीजा मावशींनी घाम पुसला. मोट्याने पाण्याचा मोठा घोट घेतला आणि म्हणाला,
"काय स्वाद आहे इतकी झणझणीत भाजी मी पहिल्यांदाच खाल्ली."

गोपाळराव आणि गिरीजा मावशी चकित.... चुकून झालेलं नवीन प्रकारचं जेवण लोकांना आवडत होतं.


गावातल्या इतर लोकांनीही ती भाजी मागितली. तेव्हापासून "भोसले स्पेशल तिखट भाजी" ही हॉटेलची खासियत बनली.
गावभर हॉटेलाचा गवगवा होऊ लागला. लोक मुद्दाम हसण्यासाठी आणि गोंधळ अनुभवण्यासाठी हॉटेलात येऊ लागले.

गोपाळराव आणि गिरीजा मावशींनी गोंधळ सुधारण्याचा प्रयत्न केला पण हसवणूक हॉटेलचं वेगळेपण हेच होतं की इथे काहीतरी विचित्र घडायचं.

गावातल्या प्रत्येक गोंधळाची गोष्ट इथे ऐकायला मिळे आणि शेवटी लोक म्हणायचे,

"पोटाला अन्न मिळो न मिळो पण हसवणूक हॉटेलमध्ये पोटभर हसू मिळतं."

हसवणूक हॉटेल सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झालं. गोपाळरावांनी ठरवलं की हा आनंद साजरा करायचा.

"मग गिरीजा मावशी आपण काहीतरी खास करायला पाहिजे."

गिरीजा मावशींनी तोंडातल्या तोंडात पुटपुटलं,
"हॉटेल चालवणं हेच मोठं विशेष आहे. अजून काय करणार?"

पण गोपाळरावांनी जाहीर केलं –

“हसवणूक हॉटेलचा पहिला वाढदिवस मोफत जिलेबी आणि वडा-पाव."

गावभर बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांच्या भुकेपेक्षा उत्सुकता जास्त होती कारण हॉटेलचा वाढदिवस म्हणजे नवीन काहीतरी गोंधळ व्हायचाच.
गोपाळरावांनी खास तयारी केली. मोठ्या कढईत जिलेबीचं सरबत तापत होतं तर चंग्या आणि मंग्या वडा-पाव बनवत होते.

गोपाळरावांनी समोर गर्दी पाहून आनंदाने ओरडून सांगितलं,
"सर्वांना गरमागरम वडा-पाव आणि जिलेबी मिळेल."

पण पहिल्याच ताटातल्या जिलब्या पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या.

"अरे वा! कधीच न पाहिलेल्या चौकोनी जिलेबी."

गोपाळरावांचा चेहरा पडला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं आणि धक्काच बसला.

गिरीजा मावशींनी हळूच सांगितलं,
"गोपाळराव मंग्यानं चुकून जिलेबीच्या पिठात बटाट्याचं पीठ टाकलं त्यामुळे त्या चपटा झाल्या."
गोपाळरावांनी कपाळावर हात मारला.

त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक मोठा गोंधळ सुरू झाला.

चंग्याने एका ग्राहकाला वडा-पाव दिला. तो पाव तोडताच आतून खडखडाट झाला.

ग्राहकाने तोंड वाकडं करून विचारलं,
"अहो ह्या वडा-पावमध्ये काय टाकलंय?"

गोपाळरावांनी घाबरून पाहिलं आणि त्यांना सत्य समजलं  चंग्याने चुकून उकडलेल्या बटाट्यांऐवजी खोबरं वाटून वड्यात टाकलं होतं.

गोंधळात अजून भर घालायला त्या दिवशी गावात नवीन डॉक्टर आले होते डॉ. कुलकर्णी..

गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांना हसवणूक हॉटेलची खास चव अनुभवायची आहे.

गोपाळरावांनी त्यांना एकदम खास मिसळ-पाव द्यायचं ठरवलं.

गिरीजा मावशींनी खास तिखट मिसळ बनवली. पण मंग्याने ऑर्डर नीट ऐकली नाही आणि भलतंच वाढून दिलं.

डॉक्टरांनी पहिला घास घेतला आणि डोळे मोठे केले.
"अहो ही मिसळ का इतकी गोडसर लागते"

गोपाळरावांनी घाईघाईने आत पाहिलं आणि तिथे चंग्या आणि मंग्या उभे होते.

"अरेरे! ह्यांनी मटकीच्या जागी चुकून गोड शेंगदाण्याचा चिवडा टाकलाय."

डॉक्टर शांत बसले आणि म्हणाले,

"वा.. मिसळीत असा वेगळा ट्विस्ट कधीच खाल्ला नव्हता."

गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि गोपाळराव सुटकेचा श्वास सोडत बसले.
त्या दिवसानंतर हसवणूक हॉटेल अजून प्रसिद्ध झालं.


इथं काहीही खाल्लं तरी आश्चर्य नक्की मिळतं.

कधी तिखट, कधी गोड, कधी खडखडीत  पण जेवण हसत-हसत संपतं.


गोपाळरावांनी हॉटेलचं नाव बदलून
"हसवणूक हॉटेल – अजब स्वादाची चव." असं ठेवलं.

गावकऱ्यांनी विचारलं, “आता पुढे काय प्लॅन?”

गोपाळराव हसून म्हणाले, "आता 'हसवणूक हॉटेलची शहरात शाखा उघडायची."

गिरीजा मावशींनी डोक्याला हात लावला.

"गोपाळराव आधी ह्या गावाचं हॉटेल नीट सांभाळा."

गोपाळरावांनी खो खो हसत टाळी दिली आणि हसवणूक हॉटेलचा गोंधळ अजून पुढे सुरू राहिला.

हसवणूक हॉटेल आता गावातलं एक "विचित्र पण हिट" ठिकाण झालं होतं. लोक मुद्दाम हॉटेलात नवीन काय गोंधळ होतोय हे बघायला यायचे.

गोपाळरावांना वाटलं आता आपलं हॉटेल खऱ्या अर्थाने यशस्वी झालंय. पण मग त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली.

"आपलं हॉटेल आता ‘हाय-फाय’ बनवायचं."

गिरीजा मावशींनी डोक्याला हात लावला,
"आता काय नवीन?"


गोपाळरावांनी गावातील शाळा सोडलेला गंगू वेटर म्हणून नेमला आणि त्याला इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.

"वेलकम टू हसवणूक हॉटेल.. वॉट वुड यू लाईक टू इट?"

गंगूची भाषा ऐकून लोक दंगच झाले. पण खरी मजा तर नंतरच होती.
एका मोठ्या शहरातून काही पर्यटक गावात आले. त्यांनी गोपाळरावांच्या हॉटेलाचं नाव ऐकून मुद्दाम जेवायला यायचं ठरवलं.

गंगूने त्यांना पाहताच जोरात हाक मारली,
"हॅलो मॅडम सर प्लीज सिट डाउन. वेलकम टू हसवणूक हॉटेल."

गोपाळराव खूप खूश झाले. शेवटी आपलं हॉटेल आता आधुनिक झालं.

त्या पर्यटकांनी विचारलं,
"व्हॉट इज द बेस्ट आयटम हियर?"
गंगूने आत्मविश्वासाने उत्तर दिलं,
"मॅडम अवर स्पेशल डीश इज इंडियन बर्गर.

पर्यटक खूश झाले, त्यांनी ऑर्डर दिली.

पण त्यांना समोर आलं ते… वडा-पाव.

एका पर्यटकाने वड्याचा पहिला घास घेतला आणि मोठ्याने ओरडला,
"ओह गॉड दिस इज नॉट बर्गर."

गोपाळराव हसत म्हणाले,
"अहो हा भारतीय बर्गरच आहे, फक्त आमच्या स्टाईलने."

गावकरी हसून लोटपोट झाले.
त्या दिवसानंतर गोपाळराव आणि गिरीजा मावशींनी ठरवलं,

"आपण काहीही केलं तरी गोंधळ चुकणार नाही मग तेच आपण आपली खास पद्धत बनवूया."

आता हसवणूक हॉटेलचं नवीन घोषवाक्य होतं,

"इथे केवळ जेवण नाही, हसणंही फ्री आहे."

आणि गावकऱ्यांना माहित होतं, "हसवणूक हॉटेल" बंद होणं अशक्य होतं कारण हसणं कधीच थांबत नव्हतं."