Login

हसरा श्रावण

नातेसंबंधातील सकारात्मक विचार
हसरा श्रावण.


‘ चला, आज श्रावण सुरू झाला! आता खूप वर्षांनी ह्या घरात मंगळागौर होणार. हळदी कुंकू होणार. मला तर खूपच आनंद झालाय. अरे पण अमित, आज सकाळी मी वृंदाला हे सांगत होते तेव्हा तिचा चेहरा जरा वैतागलेला वाटला. म्हणजे म्हणाली ती मला नंतर, की ऑफिसमध्ये खूप काम आहे. त्याचा जरा ताण आहे. मी म्हटलं तिला अगं नको एवढा ताण घेऊ आणि खरं सांगू का? हे असे सण साजरे करताना आपण आपला सगळा ताण अगदी विसरून जातो. तू सुद्धा जरा समजाव हो तिला. सांग तिला होईल सगळ नीट नको काळजी करुस.’, सुमती ताई अंगणातल्या झाडांना पाणी घालताना तिथेच चहा पीत असलेल्या अमितला सांगत होत्या.
अमितला आता जरा काळजी वाटायला लागली. लग्नानंतर अगदी छान सुरळीत चाललेल्या नात्यात बहुतेक ह्या गोष्टीवरून पहिला खटका उडणार असं त्याला वाटत होतं. खर तरं सुमती ताई आणि वृंदा ह्या दोघींचं एकमेकींशी खूप छान पटत असे. अगदी कोणत्याही गोष्टीवरून त्यांचा वाद किंवा अगदी छोटी कुरबुर सुद्धा आजपर्यंत झाली नव्हती. पण वृंदा जरा आधुनिक विचारांची होती. तिला पूजा किंवा असे काही सण साजरे करायला आवडायचे नाही. ती नास्तिक नव्हती पण तिला सणांच्या निमित्ताने होणाऱ्या पूजा त्यासाठी सजणे नटणे हे मान्य होत नसे. लग्नानंतर तसे काही सण किंवा पूजा घरात झालेल्या नसल्यामुळे आपले हे विचार तिने कधीच सुमती ताईंना सांगितले नव्हते. आणि आज सकाळी त्यांनी जेव्हा हा विषय काढला तेव्हा आपण आधी अमितला सांगू आणि अमितलाच सुमती ताईंना हे सांगायला सांगू हा विचार करून ती गप्प बसली असणार हे अमितने लगेच ओळखले. आणि सुमती ताईंना मात्र प्रत्येक सण अगदी छान सुंदर असा साजरा करायला आवडत असे. त्यांच असं म्हणणं होतं की प्रत्येक सण आपल्याला छान नटवतो, सजवतो त्यामुळे प्रत्येक सण अगदी मस्त साजरा झाला पाहिजे.
अमित चहा पिऊन झाल्यावर आवरायला खोलीत गेला. त्याने बघितलं तर वृंदा आवरून ऑफिससाठी बाहेर निघत होती. ती अमितला म्हणाली, ‘ मला तुझ्याशी बोलायचं आहे पण आत्ता मला ऑफिसला जायला उशीर होईल. आपण दुपारी कॉलवर बोलू.’ अमित तिला म्हणाला, ‘ मला माहिती आहे तुला कोणत्या विषयावर बोलायचं आहे ते. काळजी करू नको दोघे मिळून मार्ग काढूया.’ वृंदा ऑफिसला जायला निघाली. तिने जाताना सुमती ताईंना हाक मारली आणि म्हणाली, ‘ आई, मी ऑफिसला निघाले आहे. संध्याकाळी काही आणायचं असेल तर सांगा.’ सुमती ताई म्हणाल्या, ‘ विशेष काही नाही आणायचं. फक्त आता श्रावण सुरू झालाय ना, तर थोडी पूजेसाठी फुलं वगैरे आण. आणि तसा मंगळागौरीला वेळ आहे पण थोडी तयारी आधीच करायला हवी. त्या सामानाची यादी लिहून ठेवते संध्याकाळी आलीस की एकत्रच जाऊया.’ हे ऐकून वृंदा काही बोलली नाही. ती फक्त म्हणाली, ‘ येते आई.’ हे तिचं थोड लगेच विषय टाळून ऑफिसला जाणं सुमती ताईंना थोडं खटकलं. पण त्यांना वाटलं ऑफिसच्या कामाचा ताण असेल.
ऑफिसमध्ये गेल्यावर थोडं काम कमी झाल्यावर वृंदाने अमितला कॉल केला. सकाळी सुमती ताईंनी वृंदाला जे सांगितलं होतं ते अमितच्या कानावर घालून ती म्हणाली, ‘ तुला मी लग्नाच्या आधीच सांगितलं होतं की मला पूजा वगैरे गोष्टी करायला आवडत नाहीत. तू प्लीज आईंना हे समजाव.’ त्यावर अमित शांतपणे म्हणाला, ‘ हे बघ वृंदा, ह्या गोष्टी आईला समजावून सांगणं हे माझ्यासाठी जरा अवघड आहे. मी प्रयत्न करतो पण तूपण जरा मला मदत केलीस तर बरं होईल. आणि तिने हा विषय काढल्यावर जरा चेहरा वेगळा करण्यापेक्षा आपण तिला शांतपणे नीट समजावून सांगू.’ वृंदाला अमितचं म्हणणं पटलं. तिने नेहमीचे बोलून फोन ठेवला. ती जेव्हा तिच्या खुर्चीवर बसायला आली तेव्हा तिचं लक्ष शेजारी गेलं. आणि तिच्या लक्षात आलं की राधा नुकतीच आली होती. तिने राधाला विचारलं, ‘ काय गं? आज एवढा उशीर का झाला? घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना?’ राधा म्हणाली, ‘ नाही गं, काहीच अडचण नाही. अगं परवा घरात सत्यनारायणाची पूजा आहे. त्यामुळे जरा तयारी करायची होती.’ वृंदा तिला म्हणाली, ‘ अगं राधा, तुला तर आधी हे सगळं आवडायचं नाही. आणि आता एवढा उत्साहात सगळं करते आहेस.’ राधा तिला म्हणाली, ‘ खरं सांगू का? खरंच मला अजूनही ह्या गोष्टी आवडत नाहीत. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा नवीन घरी गेले. तेव्हा सासूबाई मला खूप समजून घ्यायच्या. अगदी आपलं ऑफिसचं काम सुद्धा त्यांनी खूप समजून घेतलं. पहिल्या श्रावण महिन्यात मला सुद्धा आवडलं नव्हतं त्यांच हे म्हणणं पण नंतर मी विचार केला की ह्या आपल्यासाठी एवढं काही करतात. आपल्याला खूप समजून घेतात आपण पण त्यांच्या मनासाठी काही करायला काय हरकत आहे. म्हणून मग मी पहिल्या वर्षी त्यांना हवी तशी पूजा वगैरे केली. त्यांना खूप आनंद झाला. आणि खरं सांगू का? मला सुद्धा खूप प्रसन्न वाटलं.’ हे ऐकून वृंदाला खूप आश्चर्य वाटलं. तिने असा विचार कधीच केला नव्हता. तिच्या मनात विचार आला. खरंच आपल्या आई पण आपली खूप मदत करतात. आपण त्यांच्यासाठी एवढं तर करूच शकतो. करून तर बघुया कदाचित आपल्याला खूप छान वाटेल. आणि तिने तिच्या सरांकडे घरी लवकर जाण्यासाठी परवानगी मागितली. तिच्या सरांनी पण तिला लवकर घरी जाण्यासाठी परवानगी दिली. तिने अमितला कॉल केला आणि म्हणाली, ‘ तू काही करू नकोस. मी बघते काय करायचं ते.’ अमितला थोडी काळजी वाटली. तो लवकर घरी आला आणि बघितलं तर घरी सुमती ताई नव्हत्या. त्याला वाटलं चला आईच घरी नाही म्हणजे जे काही होईल ते आपल्यासमोर ती आल्यावर होईल आणि त्यामुळे अगदीच वाद झाला तर आपण सांभाळून घेऊ शकतो.
थोड्यावेळाने सुमती ताई आणि वृंदा दोघी हसत हसत घरी आल्या. त्यांच्या हातात पूजेचं सामान होतं. अमितला आश्चर्य वाटलं. अमितला सुमती ताई म्हणाल्या, ‘ अरे अमित, आज लवकर आलास का? चला बरं झालं. अरे आम्ही बाहेर पूजेचं सामान आणायला गेलो होतो. आज वृंदापण लवकर घरी आली आहे. चला छान चहा करून आणते. बसा तुम्ही.’ सुमती ताई आत गेल्यावर अमितने वृंदाला विचारलं, ‘ काय गं? तुला तर मान्य नव्हतं ना हे सगळं? तू तुला मान्य नसताना हे सगळं करू नको. आपण आईला समजावून सांगूया.’ त्यावर वृंदा म्हणाली, ‘ अरे खरंच नको. आपण आईंसाठी एवढं करूच शकतो ना? त्या मला खूप समजून घेतात. खरतर त्यांना पारंपरिक गोष्टी खूप आवडतात. पण आपल्या कामामुळे आपल्याला जमत नाही पण म्हणून त्या बाकी कधीही तक्रार करत नाहीत. एवढं जर त्या आपल्याला समजून घेतात. तर आपण पण त्यांचा उत्साह समजून घेतला पाहिजे. आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण त्यांच्यासाठी करूया.’ अमितला हे ऐकून आनंद झाला आणि तो तिला म्हणाला, ‘ गुणाची गं माझी वृंदा.’ तेवढ्यात सुमती ताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, ‘ अर्थात आहेच गुणाची माझी सून. मी तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं. मला खरंच कौतुक वाटलं वृंदा तुझं. हल्ली कोणीही आपली तत्व मोडायला तयार नसतं. पण तरीही तू तयार झालीस ह्याचा मला खूप आनंद झाला.’ हे ऐकून वृंदा आणि अमितला खूप आनंद झाला. तिघांनीही चहा घेतला. वृंदा आणि अमित एकमेकांकडे बघून हसले. वृंदा आणि सुमती ताईंनी एकमेकांना मिठी मारली.

0