Login

हास्याचा भूकंप

कधी कधी कठीण परिस्थितीमध्ये पण अचानक विनोद निर्माण होतो आणि हास्याचे कारंजे फुलतात! ह्याचं आशयची एक हलकीफूलकि कथा

रमेश आणि तनुजा मस्त एव्हरग्रीन कपल होतं. लग्नाचा पंचविसाव्वा वाढदिवस एकदम स्पेशल साजरा करायचा म्हणुन मुलांनी त्यांना जपानच्या ट्रिपची तिकिटे गिफ्ट दिली होती. चांगल्याश्या टुरिस्ट कंपनीसोबत ते दोघे जपानला टूर ला गेले. दोघांची पहिली वहिली फॉरेन ट्रिप होती त्यामुळे ते दोघेही सुपर एक्सइसिटेड होते.


हॉटेलमध्ये रात्री निजानीज झाली आणि मध्यरात्री हे दोघेही गाढ झोपेत असताना, त्यांच्या टूर मॅनेजरच्या हाकेने तनुजाला जाग आली. भूकंपाचे सौम्य धक्के बसतायत तर सगळ्यांनी लवकरात लवकर हॉटेलच्या बाहेर पडायचे आहे आणि समोरच्या मोकळ्या मैदानावर यायचे आहे असा निरोप देऊन तो मॅनेजर पुढच्या रुम कडे धावला. त्याचा तो कापरा आवाज आणि ही भूकंपाची बातमी ऐकून तनुजाबाईंची तर पाचावर धारण बसली. कुठून आपला भारत देश सोडून इकडे कडमडलो असं त्यांना वाटून गेलं.

तिकडे भारतात किती ठिकाणं आहेत फिरायला जायला आणि आपण इथे आलो! आता हा भूकंप! कसं होणारे काय ठाऊक!! जाऊ का नाही आपल्या भारतात, आपली मुलं भेटतील न आपल्याला परत देवाला माहीत!असे टोकाचे विचार करत तनुजाने निवांत पणे निद्रादेवीच्या अधीन झालेल्या रमेशला हाक मारली,

"अहोsssss ऐकलं का?!!ss उठा लवकर इथे भूकंप आलाय आणि तुम्ही अजून घोरत पडलाय! उठा आहोss!!"

असं म्हणत तनुजाने रमेशला जवळपास बेडवरून खेचुन उठवून उभंच केलं.

"अगं काय झालं? एवढ्या रात्री कशाला ओरडते? स्वप्नंबीपन पडलं का काय गं? आपण रोजच्या रुटीनमधून चेंज म्हणून आलो न ट्रीपला इथे पण तुझं आहेच उठा उठा!! जरा उशिरापर्यंत झोपु दे मला निवांत!" इति रमेशभाऊ


"अहो भुकंप आलाय भुssकंsssपss! उठा आता तरी नाहीतर साखर झोपेच्या सुखासाठी आयुष्याची आहुती दयायला लागेल! चला लवकर खाली आपल्या ट्रिपच्या ग्रुप मधले सगळे एव्हाना रूम सोडून मैदानात पोहोचले सुद्धा असतील.आपण या भूकंपामुळे एकटेच रूम मध्ये अडकलो आणि ह्या जपानमध्ये आपल्याला काही झालं तर आपल्याला जपानी भाषा सुद्धा येत नाही आणि यांना आपली मायबोली मराठी कशी कळावी" एवढं ऐकल्यावर मात्र आता रमेशची पण झोप उडाली.


झोपेजलेल्या डोळे उघडून रमेश बघतो तर तनुजा आता खोलीच्या दरवाज्यात पोहोचली होती आणि तिथूनच रमेशला "चला चला लवकर" म्हणून हातवारे करत होती.

"आलो मी तू हो पुढे, मी आलो दोन मिनिटांत" म्हणत रमेशने अंगावरची चादर फेकली अन घाईघाईने उठला. तोपर्यंत तनुजा खाली मैदानावर पोहोचली सुदधा.

दहा मिनिटे झाली तरी रमेश खाली येत नाही पाहून तनुजा आपल्या टूर मॅनेजरला म्हणाली "आमचे आहो वरंच दहाव्या मजल्यावरच्या रूम मध्ये आहेत काहीतरी करा आणि त्यांना लवकर खाली घेऊन या! परत झोपले का काय हे काय माहिती?"

आधीची वस्तुस्थिती माहिती नसलेला मॅनेजर तनुजा कडे चमकून बघतो की ही बाई आपल्या नवऱ्याला सोडून एकटीच खाली आली आणि आता मला म्हणतेय की मदत करा. कसे कसे लोक असतात! असा विचार  करून मॅनेजर परत हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये जाऊन जिना चढणार एवड्यात रमेश जिन्याने खाली येऊन धापा टाकताना मॅनेजरच्या दृष्टीस पडला.

"अहो मिस्टर देसाई तुमच्या मिसेस तिथे काळजीत आहेत तुम्ही भूकंपाची कल्पना मिळून सुद्धा लवकर खाली येत नाही पाहून त्यांनी मला तुम्हाला घ्यायला हॉटेलमध्ये पाठवलंय!" इति मॅनेजर.

"सॉरी बरंका माझ्यामुळे तुम्हाला यावं लागलं परत, जाऊ चला हॉटेलच्या बाहेर आपण मग बोलू सविस्तरपणे" म्हणत दोघे हॉटेलच्या लॉबीतून बाहेर आले आणि तनुज्याच्या नजरेला रमेश दिसला आणि तिचा जीव भांड्यात पडला.

ती धावतच त्याच्यापाशी आली आणि त्याला म्हणाली,
"कुठे होतात अहो? मला म्हणालात आलो दोन मिनिटात आणि काय हे. मी भारतात फोन लावून मुलांना सांगितलं सुदधा की असं झालं तरी तुमचा पत्ता नाही. कुठे होतात कुठे?" इति तनुजा.

यावर रमेश अगदी निरागसपणे म्हणाला,"अगं ते मी, बाथरूमला गेलो होतो.. माहिती नाही ना या भूकंपाच्या धक्क्यात काय होतंय, परत लवकर जाता येईल न येईल त्या पेक्षा आपलं महत्वाचं काम उरकून आलो आणि येताना माझी कालची अर्धी संपलेली बिअरची बाटली तशीच टेबलावर दिसली ती पटकन फ्रीजमध्ये ठेऊन आलो. इथून जगलो वाचलो आणि परत हॉटेलच्या रूम मध्ये गेलोच तर मस्त गार बिअर तरी पिता येईल मला"इति रमेशभाऊ!!

हे सगळं ऐकून तनुजा त्याही अवस्थेत खो खो हसत सुटली आणि मैदानावर जमलेले सगळे टुरिस्ट त्यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले होते. तनुजा आणि रमेशच्या आयुष्यात हास्याचा भूकंप आला होता.

-©®सायली पराड कुलकर्णी.
वरील कथा काल्पनिक आहे. आवडल्यास नक्की कळवा आणि माझ्या नावासहित शेअर जरूर करा.
0