हवास मज तू!भाग -९२

वाचा एक अनोखी प्रेमकथा

हवास मज तू!
भाग-९२

मागील भागात विहानबद्दल सत्य कळल्यावर अस्वस्थ झालेली नव्या बाल्कनीत येते.
आता पुढे.

ग्लासभर पाणी पिऊनदेखील नव्याचा घसा सुकल्यासारखा झाला होता.

'ही कसली तहान आहे? बाहेर पडलेल्या पावसाने सगळी धरा तृषार्त झाली आहे आणि मी? मी मात्र अजूनही तशीच कोरडीठाक आहे. इतका वेळ अफूची गोळी घेतल्याप्रमाणे मी गुंगीत होते, तेव्हा किती खूष होते? आणि आता गुंगी उतरल्यावर कळतेय मला माझ्या दुःखाची धार, माझ्या वेदनेची किनार!

विहान, तू खरंच मला फसवले असशील तर तुझी शपथ, मी तुला कधीच माफ करणार नाही.'
हातातील ग्लास बाजूला फेकून तिने हुंदका दिला.


"मॅम, काय झाले?" ग्लास पडल्याचा आवाज ऐकून नर्स बाल्कनीत येत म्हणाली.


"काही नाही. मला काही वेळ एकटं राहायचं आहे. तू जा. आराम कर." तिच्याकडे न वळताच नव्या म्हणाली.


"पण मॅम.."


"जा गं. मी बरी आहे."

नव्याच्या आवाजातील जरब ऐकून नर्स आल्यापावली परत गेली.


'विहान.. माझ्या प्रेमाचा बाजार मांडलाहेस तू. तुझ्याशिवाय जगणं मला शक्य नव्हतं, नाहीये; तरी आपले नाते संपवण्याचा मी विचार करत होते. आता मात्र प्रश्न पडतोय की खरंच का आपल्यात काही नाते होते?'

डोळ्यापुढे अंधार दाटल्यासारखे झाले त्यासरशी तिने ग्रीलवरची पकड घट्ट केली.

'नव्या.. कूल डाऊन, कूल डाऊन.' लांब लांब श्वास घेत ती स्वतःला सावरत म्हणाली.

'मी इतकी स्वार्थी कशी झालेय? दीला जरासुद्धा समजून घेऊ शकले नाही. ती चुकीचे वागणार नाही हेही मला उमगले नाही. आताही तेच तर करतेय. स्वतःसाठी रडतेय. विहानने माझा विश्वासघात केला, मला फसवलं याचे वाईट वाटतेय. दी बद्दल एक विचारही मनात शिवला नाही.

सॉरी दी, रिअली व्हेरी सॉरी. तू माझा, डॅडचा,आपल्या फॅमिलीचा विचार करून हे पाऊल उचललेस आणि मी कायम तुझा तिरस्कार करत राहिले. आता मात्र असे होणार नाही. त्या विहानला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.' भरून आलेले डोळे अलगद पुसत ती म्हणाली.


'विहान! नको म्हणतानाही तुझे नाव ओठी आलेच. का सारखा छळतोस मला? आजवर झालेला छळवाद पुरेसा नाहीये का?'

खालचा ओठ दाताने गच्च दाबत तिने लांब श्वास सोडला. ग्रीलला पकडलेल्या उजव्या हातातील बोटावर तिची नजर पडली.

तिच्या तर्जनीवर विराजमान असलेली नाजूक अंगठी तिला वाकुल्या दाखवत हसत आहे असा तिला भास झाला. तिने हात आपल्या चेहऱ्यावरजवळ आणला. अंगठीकडे निरखून पाहू लागली. त्याच्या वाढदिवशी विहानने तिला प्रपोज केले, त्यावेळी त्याने ती अंगठी तिला गिफ्ट केली होती.

तेव्हा तिला किती भारी वाटले होते. सगळ्या सुखाचा विसर पडावा आणि तो एक क्षण तिथेच थांबावा असे तिला झाले होते.


'ही अंगठी, ते प्रपोजल.. हे सुद्धा तुझ्या प्लॅनचा भाग होता. तुझ्या जाळ्यात अलगद अडकले रे मी. मला वाटलं होतं की ते आपल्या प्रेमाचे सेलिब्रेशन आहे पण ते तर तुझ्या सक्सेस झालेल्या प्लॅनचा आनंदोत्सव होता.

आता नकोत मला त्या आठवणी आणि नकोय मला ही अंगठी. तुझे मला काहीच नकोय, माझ्या आयुष्यात तुझे अस्तित्वच नकोय.' बोटातील अंगठी काढून टाकण्याचा प्रयत्न करत ती स्वतःशी म्हणाली.


'टिंगटॉंगऽऽ टिंगटॉंगऽऽ'

अचानक मुख्य दरवाज्यावरची बेल वाजली आणि अंगठीवर फिरणारे तिचे बोट बाजूला झाले.

'इतक्या रात्री कोण आलं असेल? दी असेल का? मी किती स्टुपिड आहे, तिला साधा एक कॉल सुद्धा केलेला नाहीये.' घाईघाईने वळत ती खोलीत आली आणि तशीच पळत खाली जायला निघाली.


"नव्या मॅम, अशा पळत का निघालात? काही हवे असेल तर मी आणून देते ना?" नुकतीच डोळा लागलेली नर्स डोअरबेलच्या आवाजाने उठून बसत म्हणाली.


"नको, मी माझं बघेन."


"मॅम, गोळ्यांनी तुम्हाला थोडे सुस्तावल्यासारखे झाले आहे. असे धावत जाऊ नका. उगाचच धडपडाल. मी तुमच्या सोबत येतेय चला." तिच्या हाताला पकडून नर्सने तिला थांबवले.


"शशी, शौर्या आली असेल का रे? चल ना लगेच बाहेर." शशांकसोबत शौर्याबद्दलचे बोलणे चालू असताना दारावरची बेल वाजली आणि सुनंदाला तीच आली असावी असे वाटले.

"ती आली असेल तर चांगलेच आहे; पण येण्यापूर्वी ऍटलीस्ट तिने मला तरी कळवले असते. चल, बाहेर गेल्यावरच कोण ते कळेल." शशांक तिच्या मागे जात म्हणाला.


"तू? तू इथे काय करतोस?" ललिताच्या आवाजाने शशांक आणि सुनंदा घाईत दरवाज्याजवळ आले.

बेलचा आवाज ऐकून ललिता तिच्या खोलीतून बाहेर आली होती आणि दरवाजा देखील तिनेच उघडला होता. समोर दिसणाऱ्या व्यक्तीला बघून तिचा पारा चढला होता.


"आई, अगं कोण आहे?" जवळ येत शशांकने विचारले.


"तू?" दारात विहानला बघतच शशांकच्या चेहऱ्यावर राग उमटला.


"आजी, एसके सर, मला आत तर येऊ द्या. नव्याच्या काळजीने मी तिला भेटायला धावतपळत आलो आहे." धाप टाकत तो म्हणाला.


"विहान, खरंच का तू नव्याच्या काळजीने इथे आला आहेस? इतकीच काळजी होती तर दिवसभर कुठे होतास? माझी लेक मृत्यूशी झुंजत असताना साधा एक कॉल देखील करू शकला नाहीस आणि आता एवढ्या रात्री येतो आहेस, हीच का तुझी काळजी?" त्याला दारात अडवत सुनंदाने विचारले.


"आँटी, तुमचा प्रश्न रास्त आहे. आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग. पण त्याआधी मला एकदा नव्याला भेटू द्या ना." तो काकूळतीला येत म्हणाला.


"बट आय डजन्ट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन फ्रॉम यू मिस्टर विहान इनामदार.. सॉरी, सॉरी, मिस्टर शौनक कारखानीस." शेवटच्या पायरीवरून खाली पाय ठेवत नव्या म्हणाली.


"नव्या, तू खाली का आलीहेस? जा आणि आराम कर बघू." सुनंदा तिच्या जवळ येत म्हणाली.


"नाही गं आई, मला याला विचारायचंय. आत्ता इथे का आलाहेस? आणि कसला तुझा अवतार? कुणाचा खून बिन करून पळ काढलाहेस का? की माझ्या शौर्या दीलाच टपकावून आला आहेस?" सुनंदाला बाजूला करून नव्या समोर येत म्हणाली.


"नव्या, कशी आहेस तू? तुला काही झाले तर नाही ना?" त्याने तिचा हात हातात घेत विचारले.


"डोन्ट टच मी." त्याचा हात झिडकारत ती ओरडली. तिच्या श्वासाची गती वाढली होती.


"नव्या बाळा तू शांत हो. इथे बैस बरं आणि विहान तू इथून गेलास तरी चालेल." शशांक त्यांच्याकडे तिरका कटाक्ष टाकून म्हणाला.


"विहान नाही डॅड, तो तर शौनक आहे. शौनक कारखानीस. माझ्या दीला छळणारा, मला फसवणारा शौनक आहे हा." नव्या उसळून म्हणाली.


"ओह, म्हणजे माझ्याबद्दल तुला कळलं तर? शौर्याने तुला हे सारं सांगितलं असेल हो ना? तिच्यावर तुझा चटकन विश्वास देखील बसला असेल. पण मी कुठे होतो, माझी बाजू काय आहे? हे जाणून घेणे तुला महत्त्वाचे वाटले नाही का?" आत येत तो म्हणाला.


"हे बघ, तुला काही बोलायचे असेल तर आपण सकाळी बोलूया. आता तिला आराम करू दे." शशांक शांतपणे म्हणाला.


"नाही सर, इतकं सोपं नाहीये हे. नव्याने काय केलेय ते तुम्हाला माहिती नाहीये. तिने तडकाफडकी आमच्यातील नाते तोडून टाकले आहे. का? तर शौर्याने तिला माझ्याबद्दल भलतंच काहीतरी सांगितले म्हणून? हे असे कसे प्रेम? हिचा तर माझ्यावर विश्वासच नाहीये." तो अगतिक होऊन बोलत होता.


"प्रेम! प्रेम म्हणजे काय हे कळते तुला?" नव्या उपरोधाने म्हणाली. "विश्वासघात तर तू माझा केला आहेस आणि कसले नाते रे? नात्याची जाण तरी तुला आहे का? मुळात आपल्यात काही नाते होते का? हेच तर एक कोडे आहे."


"नव्या, विश्वासाबद्दल तू बोलते आहेस? तुझ्यावर माझा विश्वास नसेल पण माझा आहे गं. म्हणूनच तर तुला मी ती कामगिरी सोपवली होती. तू मात्र वेळेवर डगमगलीस आणि सगळं गणित चुकलं.

तुला वाटतेय की मी शौर्याला काहीतरी केलं, हो ना? पण तुला माहिती आहे का? की तिने मला किडनॅप करून ठेवले होते. माझा मोबाईल सुद्धा काढून घेतला. मग मी तुझ्याशी कसा कॉन्टॅक्ट करू?

माझा अवतार बघून तुला वाटलं की कोणाचातरी खून करून मी इथे आलोय. फॅक्ट तर हे आहे की तुला भेटण्यासाठी मी त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटून आलोय. हाताला काचा रुतल्यात पण त्याची पर्वा केली नाही आणि हा बंगला गाठला.

मला सांग, हे प्रेम नाही तर आणखी काय आहे गं? आणि तू माझ्याशी नाते तोडायला निघालीस?" त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all