हवास मज तू!भाग -९३

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग-९३

मागील भागात :-
मिस्टर दासच्या तावडीतून सुटून शौनक नव्याला भेटायला येतो. तिथे तो त्याचे तिच्यावर असलेले प्रेम पटवून द्यायचा प्रयत्न करतो.

आता पुढे.

"माझा अवतार बघून तुला वाटलं की कोणाचातरी खून करून मी इथे आलोय. फॅक्ट तर हे आहे की तुला भेटण्यासाठी मी त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटून आलोय. हाताला काचा रुतल्यात पण त्याची पर्वा केली नाही आणि हा बंगला गाठला.

मला सांग, हे प्रेम नाही तर आणखी काय आहे गं? आणि तू माझ्याशी नाते तोडायला निघालीस?" त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.


"दीने तुला किडनॅप केले? काहीतरी काय बोलतोस? ती तर माझ्यापूर्वी पार्टीला आली होती. मग हे कसे शक्य आहे?"


"पुन्हा अविश्वास ना? तुझा विश्वास बसणार नाही हे मला माहित होते, पण काय करू? हे सिद्ध माझ्याकडे दुसरा कुठलाच पुरावा नाहीये." तो खिन्नपणे म्हणाला.


"ते जाऊ दे, मला सांग, तू खरंच मनीषाचा मुलगा आहेस?" ललिताने त्याच्याकडे निरखून बघत म्हणाले.


"हो." दीर्घ श्वास घेत तो म्हणाला.


"मग आमच्यापासून का लपवून ठेवलेस?"


"लपवले नव्हते. लग्नाचे पक्के झाल्यावर मी सगळ्यांना आईशी भेटवणार होतो; पण त्यापूर्वी शौर्याने घोळ घातला आणि आता तर नव्या आमचे नातेच तोडायला निघालीय." तो स्पष्टीकरण देत म्हणाला.


"तुझ्या हातातून रक्त येतेय. शशी, नर्सकडून याला ड्रेसिंग करून घे." त्याच्या हाताची जखम बघून ललिता म्हणाली.


"आजी नको ना. त्याला इथून जाऊ दे. दीला मारायला निघालेल्या मुलाला मी माझ्या नजरेसमोर नाही बघू शकत."


"नव्या आपण माणुसकी सोडायला नको." ललिता तिला समजावत म्हणाली.

"आजी, तिला मी नकोय तर मी निघतोय. पण एवढं खरं की नव्यावर माझं खूप, खूप प्रेम आहे आणि ते कधीच कमी होणार नाही." तिथून जायला वळत तो म्हणाला.


"विहान.." नव्याने त्याला हाक दिली तसा तो थबकला.

"जातोच आहेस तर हे सुद्धा घेऊन जा. मला आता तुझ्या कुठल्याच बंधनात राहायचे नाहीये." त्याच्या हातात बोटातील अंगठी काढून ठेवत ती म्हणाली.


"नव्या, असे नको ना बोलू." तो भावनाविवश होत म्हणाला.


"मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. तू जाऊ शकतोस." हातात चेहरा लपवून ती तिच्या खोलीकडे निघून गेली.


"इथे बस, मी तुझ्या हाताला ड्रेसिंग करून देतो." सोफ्याकडे इशारा करत शशांक त्याला म्हणाला.

"नाही नको. मी माझं मॅनेज करेन. थँक यू." तो बाहेर जायला वळला.

"विहान.." त्याला हाक देत शशांक त्याच्याजवळ आला.

"तू इतके दिवस आमच्यासोबत घालवलेस. मला सांग,तुला खरंच असं वाटतं का की तुझ्या बालपणी जे काही घडले त्याला मी जबाबदार असेन?" त्याच्या डोळ्यात डोळे घालून शशांकने विचारले.

क्षणभर विहानदेखील त्याच्या डोळ्यात काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत राहिला.

"एक्सक्युज मी." शशांकच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे नं कळून तो आल्या पावली माघारी वळला.


"शशी, तू त्याच्याशी इतका शांतपणे कसा बोलू शकतोस? आपल्या मुलीशी तो कसा वागतोय ते तुला दिसत आहे ना? मला तर हा मुलगा म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा धोका वाटतो आहे." तो गेल्यावर सुनंदा शशांकला जाब विचारू लागली.

"सुनी, विहानसुद्धा मला मुलासारखा आहे गं. आपल्या शौर्यापेक्षा फार फार तर दोन वर्षांनी मोठा आहे. त्याच्या डोळे वाचलेत मी. स्पष्ट, आणि दृढनिश्चयी भाव मला दिसले.

लहानपणापासून त्याच्यावर कसा अन्याय झाला आहे हेच मनीषाने त्याच्या बालमनावर बिंबवले. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. जसे आकार द्याल तसे तो वळतो. त्याच्या बाबतीत देखील तेच झालेय. मनीषामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल एक तिरस्कार आणि सुडाची भावना तेवढी निर्माण झाली.

पण एक खरंय, त्याच्या हृदयात निवीबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. मला तर वाटतेय की तो खरंच निवीच्या प्रेमात पडलाय. बघितलेस ना, कसा स्वतःला त्रास करून घेत तो तिला भेटायला आला."


"शशी, मला तर हे भयंकर वाटते रे. त्याच्याशी नाते तोडून निवीने योग्य निर्णय घेतलाय. तो मुलगा मला तिच्या आयुष्यात नकोय." नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर भीतीने काटा आला.


"मला तर एक वेगळीच भीती वाटतेय. आपल्याला त्याच्याबद्दल सर्व कळले आहे हे त्याला माहिती आहे, मग आता पुढे तो काय करेल? आपल्या जीवावर वगैरे उठणार नाही ना?" ललिताने भीती व्यक्त केली.


"असं काही होणार नाही. शेखरच्या मृत्यूमागे आपला काहीच स्वार्थ नव्हता हे कदाचित त्याला लवकरच पटेल. चला, आता जास्त विचार करू नका. झोपून घ्या." त्यांना धीर शशांक म्हणाला खरा, मनात मात्र त्यालाही धास्ती वाटत होती.

*******

"यश.." दारावर थाप देत शौर्याने हाक दिली.

नुकताच बेडवर अंग टेकलेल्या यशने तिचा आवाज ऐकून दार उघडले.

"काय गं? आज अचानक माझ्या रूममध्ये? एकटीला भीती वाटते आहे का?" तिला चिडवत त्याने विचारले.


"हम्म, भीती तर वाटते आहे. मिस्टर दासचा काही फोन आला होता का?" ती.


"नाही. शौनकसाठी ते जेवण घेऊन गेले होते. त्यानंतर काही फोन वगैरे आला नाही. तसा शौनक म्हणजे जरा ॲटीट्युड वाला मुलगा आहे, त्यामुळे त्याला समजवायला वेळ लागला असेल." तो स्मित करून म्हणाला.


"ऐक ना, शौनकला असे बंधिस्त करून ठेवणे तुला कितपत योग्य वाटते? आपण त्याला सोडून देऊया का?" ती मनातले बोलली.


"अरे इतक्यातच?आपण तर त्याला काही केले सुद्धा नाही. तुझ्यावरचा विषप्रयोग यशस्वी झाला नाही हे बघून तो खवळेल आणि तुला पुन्हा इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल या हेतूनेच मी त्याला इथे घेऊन आलो होतो. बाकी तू म्हणत असशील तर त्याला सोडून द्यायला मला काही हरकत नाही." तो तिच्याकडे पाहत म्हणाला.


"थँक्स फॉर केअरिंग. मला वाटतं आपण एकदा मिस्टर दासशी बोलून बघावे. तू त्यांना कॉल कर ना."

शौर्याचे म्हणणे पटवून यशने मिस्टर दासला फोन लावला. तीन वेळा रिंग जाऊनदेखील ते फोन उचलत नव्हते, तेव्हा त्यांना काळजी वाटली.


"यश, मला वाटते आपण गोडावूनमध्ये जाऊन बघायला हवे. मिस्टर दासला त्याने काही केले नसेल तर बरं. माझं मन मात्र सांगतेय की नक्की काहीतरी गडबड झाली आहे."


"तू म्हणतेस तर जाऊन बघायला हरकत नाही. तुझे मन सांगतेय म्हणजे मलाही ते ऐकावेच लागेल." तिच्याकडे बघून तो हसत म्हणाला.


"मिस्टर दासऽऽ मिस्टर दासऽऽ"

खोलीचे दार लोटून यश आवाज देत होता; पण आटून आतून काहीच प्रतिसाद आला नाही, तसा तोसुद्धा मनातून घाबरला.


"मिस्टर दासऽऽ" शौर्या देखील त्यांना साद घालू लागली.

"सर.." एका कोपऱ्यातून बारीक आवाज ऐकू आला तसे लाईट लावत दोघेही पळतच तिकडे गेले.


मिस्टर दास खुर्चीसकट खाली पडले होते. लागल्यामुळे डोक्यातून रक्त येऊन ते सुकले होते.


"मिस्टर दास, तुमची ही अवस्था कशी झाली? आणि शौनक कुठे आहे?" त्यांचे बंध सोडत यशने विचारले.


"त्यानेच तर माझी ही अवस्था करून ठेवलीय. तो इथून पसार झालाय." दास कसेबसे बोलले.


"मिस्टर दास, तुम्ही शांत व्हा. हे पाणी प्या." तिथे असलेल्या बाटलीमधील पाणी त्याला देत शौर्या म्हणाली.

"यश, बघितलेस ना? शौनक अगदी क्रिमिनल माईंड असलेला मुलगा आहे. तुला वाटतो तितका तो साधा नाहीय. तो असे काही करेल याची कल्पना आधीच मला आली होती." शौर्या अस्वस्थ होत म्हणाली.


"ठीक आहे, तू पॅनिक होऊ नकोस ना. मलाच हे प्रकरण थोडे जास्त सिरीयसली घ्यायला हवे होते." तिला शांत करत तो म्हणाला.


"यश, तो कुठे गेला असेल? कोल्हापूरला निघून गेला असेल का?"

"कदाचित नव्याला भेटायला गेला असेल? तू एसके सरांना कॉल करून बघ ना." त्याने तिला सुचवले.


"काकाला कॉल करू? आणि काकू आणि आजी माझ्यावर चिडल्या तर?" तिला ललिताची शपथ आठवली.


"काही होणार नाही. माझ्या मोबाईलवरून कॉल कर म्हणजे घरच्यांना कळणार नाही." तिच्या हातात स्वतःचा मोबाईल देत तो म्हणाला.


"हॅलोऽऽ, मिस्टर पाटील." मोबाईलची रिंग वाजताच शशांकने कॉल रिसिव्ह केला. इतक्या रात्री यशचा कॉल बघून त्याला आश्चर्य वाटले.


"काका, मी शौर्या बोलतेय. निवी ठीक आहे ना?" तिने खालच्या स्वरात विचारले.


"हो, ती बरी आहे. नुकतीच झोपलीय. तू ठीक आहेस ना? आणि मिस्टर पाटीलच्या मोबाईलवरून का कॉल केला आहेस? तुम्ही दोघं एकत्र आहात काय?" त्याच्या आवाजात तिच्याबद्दल काळजी होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all