हवास मज तू!भाग -९४

वाचा नव्या आणि शौर्याची कथा
हवास मज तू!
भाग -९४

मागील भागात :-

शौनक यशच्या ताब्यातून पळून गेल्याचे शौर्याला कळते. यशच्या सांगण्यावरून ती शशांकला कॉल करते.

आता पुढे.


"हॅलोऽऽ, मिस्टर पाटील." मोबाईलची रिंग वाजताच शशांकने कॉल रिसिव्ह केला. इतक्या रात्री यशचा कॉल बघून त्याला आश्चर्य वाटले.


"काका, मी शौर्या बोलतेय. निवी ठीक आहे ना?" तिने खालच्या स्वरात विचारले.


"हो, ती बरी आहे. नुकतीच झोपलीय. तू ठीक आहेस ना? आणि मिस्टर पाटीलच्या मोबाईलवरून का कॉल केला आहेस? तुम्ही दोघं एकत्र आहात काय?" त्याच्या आवाजात तिच्याबद्दल काळजी होती.


"शशी, शौर्या आहे का? मला बोलायचे आहे." त्याचे बोलणे ऐकून सुनंदाने मोबाईल हातात घेतला.

"शौर्या.."


"काकू, आय एम सॉरी. मी कॉल करणार नव्हते पण निवीची काळजी वाटली म्हणून.." सुनंदाचा आवाज ऐकून शौर्या थोडीशी गडबडली.


"शौर्या, तू का सॉरी म्हणतेस? सॉरी तर मला म्हणायला हवे. आम्ही तुझ्याशी खूप चुकीचे वागलो गं." सुनंदा भावुक होत म्हणाली.

"काकू?"


"आम्हाला सत्य कळले आहे. निवीला सुद्धा कळलेय. तिला तर विहानशी नाते सुद्धा ठेवायचे नाहीये. त्याने दिलेली रिंग तिने त्याला परत केली. सगळं नीट झालंय. तू आता आपल्या घरी परत ये ना." सुनंदा तिला विनवत म्हणाली.

"रिंग परत केली म्हणजे? विहान घरी आला होता?" तिने आश्चर्याने विचारले.


"हो. तो तर तुझ्यावरच ब्लेम करत होता. तू त्याला किडनॅप करून ठेवले होतेस असे सांगत होता. त्याचा मोबाईल देखील तुझ्याकडे आहे म्हणाला. पण निवीने त्याचे काहीच ऐकले नाही, त्यामुळे तो इथून निघून गेला." सुनंदाने तिथे काय घडले हे तिला थोडक्यात सांगितले.


"ठीक आहे काकू, मी फोन ठेवते. बाय." काहीसा विचार करून तिने कॉल कट केला.


"हॅलो, शौर्या? शौर्या? हॅलो.. बहुतेक फोनला रेंज नाहीये." शशांकच्या हातात मोबाईल ठेवत सुनंदा म्हणाली.

******

"यश, शौनक घरी गेला होता. निवीने त्याने दिलेली रिंग परत केली आहे. ती खरेच नाते तोडतेय." कॉल कट केल्यावर शौर्या यशला सांगू लागली.

"भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला हा निर्णय आहे. पण त्यांच्यातील प्रेम तुटणार नाही. खरं प्रेम आपली प्रत्येक कसोटी यशस्वीपणे पार पाडत असते. यांचेही प्रेम यशस्वी होईल." तो स्वतःमध्ये मग्न होत म्हणाला.


"ओ लव्हगुरु, तुम्ही प्रेमात पीएचडी केली आहे हे मला ठाऊक आहे; पण सध्या विषय तो नाहीये. तू विहानच्या प्रेमाच्या बाजूने आहेस की तो जो गनिमी कावा खेळतोय तो रोखण्याच्या बाजूने?" त्याला धारेवर धरत तिने विचारले.


"मी सत्याच्या बाजूने आहे." तो उत्तरला.

"म्हणजे?"


"म्हणजे? म्हणजे त्याचे प्रेम खरे आहे म्हणून मी प्रेमाच्या बाजूने आहे आणि तो चुकीचे वागतोय तेव्हा ते वागणे चुकू नये म्हणून ती चूक दुरुस्त करण्याच्या बाजूने सुद्धा आहे." तो म्हणाला.

"यश, जरा मला कळेल असे बोलशील का?" त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत ती म्हणाली.


"आता बोलणार नाहीच. डायरेक्ट करूनच दाखवतो." शौनकचा मोबाईल ऑन करत तो म्हणाला.


"काय करणार आहेस?"


"मेसेज. ते पण शौनकच्या आईला." तो स्मित करून म्हणाला.


"ए, असं काही करू नकोस. ती बाई इथे येईल तर नुसता तांडव होईल."


"नाही होणार. उलट दूध का दूध आणि पाणी का पाणी सगळं स्पष्ट होईल. हे ऐक,

'प्रिय आई. मी तुला वचन दिल्याप्रमाणे तुझ्या स्वप्नपूर्ततेची वेळ आली आहे. एसके कंपनी माझ्या ताब्यात घेतली आहे. ती मला उद्या तुझ्या नावाने करायची आहे. तेव्हा पंकज अंकल आणि तू दोघेही सकाळच्या फ्लाईटने इथे या. मी माझा पर्सनल असिस्टंट यश पाटील याला तुम्हाला घ्यायला पाठवेन.'

मेसेज सेंड." शौनकच्या मोबाईलवरून मनीषाला मेसेज पाठवत तो म्हणाला.


"यश, हे काय आता?" त्याच्या हातून मोबाईल ओढत ती म्हणाली.

"कूल डाऊन. मनीषा इनामदार यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण पाठवले आहे. थोड्याच वेळात तिचा कॉल येतो की नाही बघ." तो बोलायचा अवकाश की खरंच शौर्याच्या हातातील मोबाईल व्हायब्रेट झाला.


"आई कॉलिंग? यश, शौनकच्या आईचा कॉल आहे." ती.


"हम्म. येऊ दे. दोनदा कॉल कट झाला की तिसऱ्यांदा आपण रिसिव्ह करूया." तिच्या हातून मोबाईल घेत तो म्हणाला.


"तू वेडा झाला आहेस का?" तिने रागाने विचारले.


"अजिबात नाही." तो मंद हसला.


"मिस्टर दास, मी रघुकाकांना पाठवतो. तुम्ही दोघे दवाखान्यात जाऊन या. शौर्या आपण बंगल्यात जाऊया." तो बाहेर येत म्हणाला. सोबतच त्याने रघूकाकाला फोन करून मिस्टर दासबद्दल सांगितले.


"यश, तुझे काय चाललेय? तू शौनकच्या आईला का मेसेज केलाहेस? आणि मुळात माझ्या पर्सनल मॅटर मध्ये का इंटरफियर करतो आहेस?" त्याच्या मागोमाग बंगल्यात प्रवेश करत ती म्हणाली.


"मिस शौर्या केळकर, मी कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये इंटरफियर करत नाहीये, इनफॅक्ट माझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करू पाहणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवतो आहे."


"व्हॉट डू यू मिन?"


"शौनक कारखानीस.. त्याच्याशी माझे कसलेच वैर नाहीये. तो शौनक असू दे नाहीतर विहान, मला कसलाच फरक पडत नाही."


"हो ना? मग तरीही?"

"तरीही मी आज असा वागलोय. कारण तो माझ्या पर्सनल लाईफमध्ये घुसला. तुला मारण्याचा प्रयत्न केला. शौर्या एक लक्षात घे, तुला माझ्याबद्दल काही फीलिंग्स आहेत की नाही, मला माहित नाही पण माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे आणि असे असताना जर कोणी तुझ्या वाटेला जात असेल तर त्याला मी सोडणार नाही." तो तिच्या नजरेत नजर भिडवून म्हणाला.


"ओव्हरपजेसिव्हनेस?" तिच्या ओठावर स्मित उमटले.


"नाही. हे प्रेम आहे. फक्त आणि फक्त प्रेम. तुला नाही कळायचे." तिच्यावरची नजर हटवत तो उत्तरला.


"बहुतेक हा तिसऱ्यांदा कॉल येतोय. घ्यायचा आहे का?" त्याच्या हातातील मोबाईलकडे लक्ष वेधत ती म्हणाली.


"ऑफकोर्स! यू एंजॉय." रिसिव्हची बटण दाबत तो म्हणाला.


"हॅलो, विहान. अरे तू कॉल का घेत नाहीयेस?" पलीकडे मनीषा होती.


"हॅलो मॅम, मी यश बोलतोय. विहान सरांचा पर्सनल असिस्टंट. सर सध्या मिटिंगमध्ये बिझी आहेत म्हणून ते तुमचा कॉल घेऊ शकत नाहीत." फोन स्पीकरवर टाकत यश म्हणाला.


"मिटिंग? या वेळेला?" मनीषाने आश्चर्याने विचारले.


"येस मॅम. सरांनी एसके इंटरप्रायझेस आपल्या ताब्यात घेतली आहे, तुम्हाला त्यांनी कळवले असेलच. त्याबद्दल त्यांची मिटिंग सुरु आहे. आज रात्रभर ते बिझी आहेत त्यामुळे उद्या मीच तुम्हाला रिसिव्ह करायला येतोय." तो मनीषाला सांगत होता आणि मनीषाचा ऊर अभिमानाने भरून आला.


"मॅम, आता मला आत गेलं पाहिजे. आपण उद्या भेटूच. गुडनाईट." मनीषा पुढे काही बोलणार तोच त्याने कॉल कट केला.


"यश, तुझ्या डोक्यात नक्की काय आहे? कसला प्लॅन आखतो आहेस?" त्याने कॉल ठेवल्यावर शौर्याने विचारले.


"ॲक्च्युली, हा प्लॅन माझा नाहीये."


"मग?"

"तुला मी माझ्या मित्राबद्दल बोललो होतो ना? कृष्णा? ज्याने मला मनीषा इनामदाराविषयी इत्यंभूत माहिती दिली, त्याचा हा प्लॅन आहे." तो हसून म्हणाला.


"मला या प्रकरणात पोलीस नको आहेत. पोलिसांची मदत घ्यायची असती तर मी सरळ मम्मा, पप्पा आणि शेखरच्या मृत्यूची फाईल ओपन केली असती. पण मला ते नकोय आणि तुलाही हे ठाऊक आहे." शौर्या दुखावली होती.


"रिलॅक्स. कृष्णा मला पोलीस म्हणून नाही तर माझा मित्र म्हणून हेल्प करतोय. तो किती हुशार आहे याचा तुला अंदाज नाहीये. उद्या त्याला प्रत्यक्षात भेटशील तेव्हाच तुझा विश्वास बसेल."


"तो इथे का येतोय?" डोळे मोठे करत तिने विचारले.


"मनीषा इनामदार आणि तिच्या प्रियकराचा पर्दाफाश करायला." तो पुन्हा हसला.

"काय?"


"तू थोडीशी वेडी आहेस का यार? माझा मित्र म्हणून तो येतोय. दोन दिवसांनी हैद्राबादला निघणार आहे. पुण्याला त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला जायचे आहे, तर जाता जाता मुंबईहून जातोय, एवढचं." तिला उत्तर देत तो म्हणाला.


"यश, तू मला आता एखाद्या बिझनेसमनपेक्षा डिटेक्टिव्ह वाटायला लागला आहेस. आज दिवसभरात एवढं काय काय केलेस ना की माझे ना डोके गरगरायला लागलेय. आय निड सम रेस्ट." ती तिच्या खोलीकडे जाण्यासाठी जिन्याकडे वळली.


"हो, मलाही झोपेची गरज आहे. उद्याची सकाळ बघायला मला आत्तापासून उत्सुकता लागून राहिली आहे. कदाचित स्वप्नात देखील मी हेच बघणार आहे." तो म्हणाला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all