हवास मज तू!भाग -९५

वाचा एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -९५

मागील भागात :-
शौनक पळून गेल्याचे शौर्याला कळते. यश शौनकच्या आईला मेसेज करून मुंबईत बोलावून घेण्याचा प्लॅन करतो.
आता पुढे.


"यश, तू मला आता एखाद्या बिझनेसमनपेक्षा डिटेक्टिव्ह वाटायला लागला आहेस. आज दिवसभरात एवढं काय काय केलेस ना की माझे डोके गरगरायला लागलेय. आय निड सम रेस्ट." ती तिच्या खोलीकडे जाण्यासाठी जिन्याकडे वळली.


"हो, मलाही झोपेची गरज आहे. उद्याची सकाळ बघायला मला आत्तापासून उत्सुकता लागून राहिली आहे. कदाचित स्वप्नात देखील मी हेच बघणार आहे." तो म्हणाला.


"स्वप्नातून बाहेर येणार असशील तर मला एक सांगायचे आहे." ती.


"बोल गं. मी ऐकायला तयारच आहे."


"मी उद्यापासून माझ्या घरी राहायला जाणार आहे. काकूने मला बोलावलंय." ती त्याच्याकडे वळून म्हणाली.

"ओके ठीक आहे." त्याने मान डोलावली.

"ए शौर्या, असे नाही चालणार यार. असं कोण जातो? किमान आणखी एक दिवस तरी थांब ना." ती काय बोलली हे उमगून तो पुढे म्हणाला.


"काही म्हणालास का?" ती गालात हसत म्हणाली.


"हो. म्हणजे तुझी इथे असण्याची मला सवय झाली आहे ना, म्हणून म्हणतोय." तो स्वतःला सावरत म्हणाला.


"मिस्टर यश पाटील, ही सवय मोडायला हवी ना? चला, गुडनाईट!" हलके हसू ओठावर आणून ती तिच्या खोलीत गेली.


"गुडनाईट." ती गेल्याच्या दिशेने बघत काही क्षण तो तिथेच उभा राहिला.

*******

"इतकी मोठी जखम? कुठे काही हाणामारी वगैरे केली का?" शौनकच्या हातावरची जखम स्वच्छ करत असलेल्या नर्सने त्याला विचारले. त्याच्या फ्लॅटवर जाण्यापूर्वी तो हॉस्पिटलला आला होता.


"नाही हो, मी का कोणाशी हाणामारी करेन? गाडीवरून तोल जाऊन पडलो तर त्याच्या काचा लागल्यात, बस." तो थाप मारत म्हणाला.


"चांगलीच जखम झाली आहे. मी ड्रेसिंग करून देते. सोबत डॉक्टरांनी दिलेले एक इंजेक्शन सुद्धा घ्यावे लागेल."


"इंजेक्शन?" त्याच्या अंगावर भीतीने काटा आला. लहानपणापासून इंजेक्शनला तो फार घाबरायचा.


"का? भीती वाटतेय का?" नर्सने हसून विचारले.


"अहं." त्याने नकारार्थी मान हलवली.

'नव्याच्या प्रेमाखातर इतक्या काचा रुतवून घेतल्यात त्यात आणखी एक इंजेक्शनची भर.' तो मनात म्हणाला.

दवाखान्यातील काम झाल्यानंतर तो रिक्षाने त्याच्या फ्लॅटकडे आला.


'मिस्टर दास, तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही नसता तर कदाचित मी आज माझ्या घरी परत देखील आलो असतो.' मंद हसून त्याने फ्लॅटचा दरवाजा उघडला.


मिस्टर दासशी झालेल्या झटपटीत ते बेशुद्ध झाले होते त्यावेळी त्यांना खुर्चीला बांधून ठेवत असताना त्यांच्या खिशातून पैशाचे पाकीट खाली पडले.

तिथून बाहेर निघताना शौनकने त्यातील काही पैसे आपल्या खिशात टाकले. त्याच पैशातून रिक्षाने तो आधी नव्याला भेटायला गेला, त्यानंतर दवाखाना आणि आता त्याच्या घररी परतला होता.

पैश्याअभावी तो काहीच करू शकला नसता; म्हणून आता घरी आल्याआल्या त्याने मनोमन मिस्टर दासचे आभार मानले.


दरवाजा उघडून आत प्रवेशल्यावर तिथली परिस्थिती बघून त्याने डोक्याला हात लावला. हॉलमध्ये सामान अस्त्याव्यस्त पडले होते. सकाळी यश सोबत झालेल्या भांडणात घराची ही अवस्था झाली होती.


तिकडे लक्ष न देता स्वयंपाकघरात जाऊन त्याने आधी तांब्याभर पाणी घशात रिचवले. मनाला थोडा तजेला मिळाला; पण पोटात उसळलेल्या भुकेच्या डोंबामुळे तो अधिकच कासावीस झाला होता.

फ्रिज उघडून त्याने आत नजर फिरवली. दुधाच्या पाकिटाशिवाय तिथे खायला असे काहीच नव्हते. आता स्वयंपाक करणाऱ्या काकू येऊ शकणार नव्हत्या आणि एका हाताने त्यालाही काही जमणार नव्हते.

दुसरा कसलाच पर्याय उरला नव्हता तेव्हा नाईलाजाने त्याने दूध तापवले आणि ते पिऊन घेतले.


दूध पोटात जाताच त्याला थोडी तरतरी आल्यासारखी वाटली. हाताची ठणकणारी जखम त्रास देऊ लागली तशी गोळी घ्यायची आहे हे त्याला आठवले. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन तो परत हॉलमध्ये आला.


मनात एक वेगळीच अस्वस्थता माजली होती. बाहेर आतापर्यंत थांबलेला पाऊस पुन्हा सुरु झाला होता. त्याच्या आवाजाने हॉल आवरायचे सोडून तो तसाच गॅलरीत आला.


मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा आवाज त्याच्या अंतर्मनाला हलवून सोडत होता. बाहेरच्या जलधारा डोळ्यात समावू लागल्या तसे त्याचे पाय आत जायला वळले.

कुंडीतील सुस्तावलेला गुलाब त्याच्याकडे बघून डौलाने डोलत होता, हे बघून क्षणभर तो तिथे थांबला. बाहेरच्या पावसाचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता उलट शौनकच्या अवस्थेवर जणू तो हसत होता.

शौनकचे पाय त्या कुंडीपाशी थबकले. त्याच्यावर रुबाब दाखवणाऱ्या गुलाबाला तोडून तो आत आला.


'शी लव्ह्ज मी, शी हेट्स मी..' म्हणत गुलाबाची एकेक पाकळी खुडण्याचा गेम इतक्यात त्याच्या अंगवळणी पडला होता. आताही त्याची बोटे त्या फुलावरून फिरली.

"स्सऽऽ"

बाजूचा काटा सर्रकन बोटाला रुतला. त्यासरशी त्याच्या तोंडून हुंकार बाहेर पडला.

'शी हेट्स मी, शी ओन्ली हेट्स मी. तिरस्कार करते ती माझा.' डोळ्यातील एक थेंब खळकन त्याच्या गालावर ओघळला.

पाकळ्या न खुडता त्याने तो गुलाब तसाच गालावरून फिरवला.

'आता कुठेतरी प्रेमाचा एक अंकुर उगवायला लागला होता आणि क्षणात सारं संपलंय. आजवर हे प्रेम बिम मला काहीच नको होतं. हवा होता तो केवळ बदला. नव्या तुला प्रेमात पाडून मला एसके सरांना शह द्यायचा होता पण तूच माझ्यापासून पाठ फिरवलीस. प्रेमात जळणाऱ्याचं दुःख काय असते ते आज मला जाणवतेय.'

तो तिथेच सोफ्याला रेलून खाली बसला आणि डोळे मिटून घेतले. नव्याच्या भेटीचे विविध रंग त्याच्या मिटल्या डोळ्यापुढे उधळत होते.

त्यांची झालेली पहिली भेट, मुद्दाम तिच्या गाडीला धडक देऊन तिलाच सहानुभूती दाखवण्याचा केलेला प्रयत्न. ऑफिसमध्ये ती डायबेटीक आहे हे ठाऊक असतानाही तिचे स्वतः खाल्लेले जेवण आणि नंतर काहीच ठाऊक नाही असे भासवून मागितलेली माफी, तिच्या गैरहजेरीत पूर्ण केलेला प्रोजेक्ट, फायनल झालेली डील, पार्टी.. त्याचा वाढदिवस, तिला दिलेली डायमंडची रिंग आणि केलेले प्रपोजल!

हे सर्व करताना आपण प्रेमात पडू अशी जरासुद्धा त्याला कल्पना नव्हती आणि जेव्हा जाणीव झाली तेव्हा वाट्याला विरह येऊन ठेपला.


'नव्या, आय एम सॉरी यार, तुला वाटतो तितका मी वाईट नाहीये गं. तूच आठव ना, इतक्या दिवसात एकदा तरी तुझा गैरफायदा घेण्याचा मी प्रयत्न केला का? तसा विचार देखील कधी मनाला शिवला नाही.

किती विश्वासाने तू माझ्यासोबत वावरायचीस. मी जवळ असताना तुला सुरक्षित वाटायचे आणि आता तुझा माझ्यावर विश्वास उरला नाही. मी तुझ्याशी चुकीचे वागलेलो नाही हे सिद्ध करायला तुला पुरावे हवेत, यासारखी दुसरी शोकांतिका ती काय गं?'

एक दीर्घ श्वास घेऊन त्याने डोळे उघडले. बाजूलाच मनीषाची उलटी फोटोफ्रेम पडली होती.

"आईऽऽ" फोटो सरळ पकडत त्याने साद घातली.

"नव्यावरच्या प्रेमात मी तुला विसरून गेलो का गं?" फोटो छातीशी घट्ट पकडत त्याने विचारले.

"की तुझ्या प्रेमापोटी मी माझे खरे प्रेम हरवायला निघालोय?" त्याच्या डोळ्यातील आभाळ रिते होऊ लागले होते.

'तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे गं. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अगदी माझे प्राण मागितलेस तरीही ते मी तुझ्या चरणी अर्पण करेन. कारण तू मला हवी आहेस. इतक्या वर्षापासून तुझ्या प्रेमासाठी मी आसूसलेला आहे. पण मला नव्यासुद्धा हवीय गं.

नकळत झालेल्या प्रेमाने ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, याची मला जाणीव झालीये. प्रेम हे असेच असते का गं? ते केवळ आपल्याला जाळत असते का? एक आई म्हणून माझ्यावर प्रेमाची पाखरण करावीस या एका हेतूपायी मी इतकी वर्ष जळत आलोय आणि आता नव्या हवी म्हणूनही जळतोय.

आई, मला तू हवीस. मला नव्या हवी. मला तुम्ही दोघीही हव्यात गं. तुझा मुलगा म्हणून एसके सर नव्यासाठी मला कधीच स्वीकारणार नाहीत. त्यांची मुलगी माझ्या आयुष्यात आलेली तुला तरी कुठे चालणार आहे?

याला कुठेच अंत नसेल का? बाबांच्या मृत्यूसाठी केळकर फॅमिली जबाबदार आहे हे लहान असल्यापासून तू मला सांगत आली आहेस; तू म्हणालीस ते खरे की खोटे? हा प्रश्न मला कधी पडलाच नाही. तू म्हणालीस ते शीरसावंद्य मानून मी तुझ्या स्वप्नांना साकार करायला निघालो.

आज मात्र पाय डगमगलेत गं. जशी आपली बाजू, तशी केळकर फॅमिलीची सुद्धा एक बाजू असेल असे वाटू लागलेय. नव्यावरच्या प्रेमापोटी असे वाटतेय की एसके सरांच्या डोळ्यातील भाव वाचायचा प्रयत्न केल्यामुळे असे होतेय, मलाच कळेनासे झाले आहे.'

त्याने हातातील फोटोवर परत नजर स्थिरावली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all