हवास मज तू!भाग -९६

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -९६

मागील भागात :-
विहान त्याच्या घरी परत जातो. मनीषाचा फोटो बघत असताना त्याला यशच्या बोलण्याची आठवण होते.
आता पुढे.

'याला कुठेच अंत नसेल का? बाबांच्या मृत्यूसाठी केळकर फॅमिली जबाबदार आहे हे लहान असल्यापासून तू मला सांगत आली आहेस; तू म्हणालीस ते खरे की खोटे? हा प्रश्न मला कधी पडलाच नाही. तू म्हणालीस ते शीरसावंद्य मानून मी तुझ्या स्वप्नांना साकार करायला निघालो.

आज मात्र पाय डगमगलेत गं. जशी आपली बाजू, तशी केळकर फॅमिलीची सुद्धा एक बाजू असेल असे वाटू लागलेय. नव्यावरच्या प्रेमापोटी असे वाटतेय की एसके सरांच्या डोळ्यातील भाव वाचायचा प्रयत्न केल्यामुळे असे होतेय, मलाच कळेनासे झाले आहे.'

त्याने हातातील फोटोवर परत नजर स्थिरावली


'..तू इतके दिवस आमच्यासोबत घालवलेस. मला सांग, तुला खरंच असं वाटतं का की तुझ्या बालपणी जे काही घडले त्याला मी जबाबदार असेन?' नव्याला भेटायला गेला तेव्हा शशांकने त्याला प्रश्न केला होता हे त्याला आठवले.


'त्यांच्या डोळ्यात मला कधीच कपटी भाव दिसले नाहीत. त्यांची नजर नेहमी प्रेमाने ओतप्रोत भरलेली असते. मला त्यांना ओळखण्यात गफलत तर होत नाहीये ना?' त्याने परत डोळे मिटून घेतले.


"यांना ओळखतोस?" यशने पंकजचा फोटो त्याला दाखवला होता, ते त्याला आठवले.


"पंकज अंकल?" तो उत्तरला होता.


"आता हे बघ." मनीषा आणि पंकजचा एकत्र असलेला फोटो यशने त्याच्या समोर ठेवले.

"ज्या स्त्रीने स्वतःच्या नवऱ्याशी प्रतारणा केली. परपूरषाशी संबंध ठेवले, ती तुला सुद्धा धोका देत आहे.." ते फोटो दाखवून यश काहीसा असाच म्हणाला. होता. तेव्हा शौनक किती भांडला होता. त्या भांडणाची परिणती म्हणूनच तर घराची ही अवस्था झाली होती.

आता मात्र ते सगळे आठवून शौनकला राग येत नव्हता. तर सगळ्या गोष्टींचा अगदी थंडपणे विचार करत तो बसला होता.


"आई, पंकज अंकल तुझी पापी का घेत होते?" लहानपणीचा विस्मृतीत गेलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला.

"विहान.." त्याला अनपेक्षितपणे समोर बघून मनीषा पंकजपासून दूर झाली.


"आई सांग ना?" त्याच्या बालमनाला प्रश्न पडला होता.


"अरे, बाबा कसे तुझी पापी घेऊन तुझे लाड करतात, तसेच यांनी सुद्धा घेतली." काहीशी गडबडून ती उत्तरली.


"म्हणजे तू त्यांना पोयम म्हणून दाखवली होती का? मी पोयम म्हटली की बाबांना खूप आवडते आणि ते खूष होऊन माझी पापी घेतात." तो लहानगा निरागसपणे म्हणाला.


"हां, तसेच काहीसे. पण हे आपले सिक्रेट बरं का? बाबांना अजिबात सांगू नकोस." त्याला जवळ घेत ती म्हणाली.

"शौनकऽऽ" तेवढ्यात मित्राने त्याला हाक दिली.


"आई गं, हे आपले सिक्रेट आहे तर अजिबात सांगणार नाही." तो खेळायला जात म्हणाला.


यशने दाखवलेला फोटो आठवला तसा विस्मृतीत गेलेला बालपणीचा किस्सा पुन्हा आठवला. त्या प्रसंगानंतर त्याने असे काही पाहिले नव्हते पण पंकजचे वारंवार घरी येणे मात्र वाढले होते. शेखर असताना आणि नसतानादेखील तो आवर्जून हजेरी लावत होता.


शेखर गेला आणि मदतीच्या बहाण्याने त्याचे येणे चालूच राहिले. त्याला त्याचा खूप आधार वाटायचा. अगदी आईला सोडून परदेशात जाताना आणि आत्ता इथे मुंबईत सेटल होतानादेखील तिथे आईची काळजी घ्यायला पंकज आहे हे त्याला ठाऊक होते.


'म्हणजे आईबद्दल यश म्हणाला ते खरे होते? आईने बाबाला फसवले? छे! मी स्वतःच्या आईविषयी कसा विचार करतोय?

आई असे वागणे शक्य नाही. पण मग ते फोटोज? आणि मी लहान असताना त्या दोघांना एकत्र पाहिले होते, त्याचे काय? कदाचित यश खोटे बोलत असेल, पण मी पाहिलेले खोटे नव्हते.'

प्रश्न, प्रश्न आणि नुसते प्रश्न! त्याची उकल मात्र होत नव्हती.

'असे वाटतेय की आत्ता आईला कॉल करावा आणि पंकज अंकलबद्दल विचारावे. पण काय आणि कसं विचारू? बाबाविषयी आणखी काही माहिती मिळू शकेल का? कोणाकडून मिळवू? एसके सर? त्यांना भेटू का? त्यांच्याशी बोलून बघू? मुख्य म्हणजे ते का मला भेटतील? का बोलतील माझ्याशी?' पुन्हा नवे प्रश्न त्याच्यासमोर उभे ठाकले.


'यश, माझा मोबाईल घेऊन तू खूप चुकी केली आहेस. आता किमान आईला तरी कॉल केला असता. खूप अस्वस्थ फिलिंग येत आहे. काहीतरी भयानक घडणार असे वाटते आहे. या विचारांना कसे रोखू? कसे थोपवून धरू?' त्याचे डोके जड येऊ लागले होते. तो तिथेच आडवा पडला. दिवसभराच्या शिणाने केव्हा झोप लागली त्याला कळले नाही.

*******

"विहान साहेब? तुम्ही असे का झोपून आहात? आणि काय हा पसारा? घराची काय हालत करून ठेवलीय?" कामवाल्या काकू लॅच उघडून आत आल्या आणि समोरचे दृश्य बघून त्यांनी डोक्याला हात लावला.


"अहो साहेब, उठा ना. घर आवरायचे आहे." थोडया जोराने ती म्हणाली. इकडे उशीर झाला तर दुसरीकडे पुन्हा उशीर झाला असता.


"आई गं." डोळे किलकीले करत विहान उठून बसला. "काकू, तुम्ही आलात का? जरा मस्तपैकी चहा करा ना."


"कोरा चहा हवाय का? की लिंबूपाणी घेऊन येऊ?" त्याचा अवतार बघून तिने विचारले.


"ते कशाला? मला फक्त एक फक्कड चहा हवाय. आँऽऽ.." बोलता बोलता तो उठायला गेला आणि हातावर दाब पडताच वेदनेने कळवळला.


"साहेब, काय झाले?" हातावरचे बँडेज बघून तिने प्रश्न केला.


"काही नाही. थोडं हाताला लागलंय, बस." सोफ्यावर बसत तो उत्तरला.


"साहेब, रागावणार नसाल तर एक विचारू?" त्याचा हातात चहाचा कप देत ती.

"हम्म."

"काल रात्री तुम्ही काही नशा वगैरे तर केला नाही ना? म्हणजे घरातील सामान असे विखूरलेले, हाताला मार लागलेला, तुम्ही इथे खाली झोपलेले म्हणून शंका आली. तुम्ही तरुण आहात. या वयात वाईट सवयी लवकर लागतात, म्हणून बोलतेय."

"काकू, अहो तसं काहीच नाहीये. मुळात हे ड्रिंक वगैरे मलाच आवडत नाही. काल छोटासा अपघात झाला म्हणून माझे हे हाल आहेत." तो हलके हसून म्हणाला.

"बरं, तुम्ही हे सर्व आवरून घ्या. मला जरा बाहेर जायचे आहे, त्याची तयारी करतो." म्हणून तो त्याच्या बेडरूममध्ये गेला.


तासाभरात आपले आवरून, नाश्ता करून तो त्याच्या बिल्डिंगच्या खाली आला. शशांकला भेटायला जायचे हे त्याच्या मनात पक्के बसले होते; पण घरी जाऊन परत अपमान करून घ्यायचा की कुठे बाहेर भेटायचे याचा विचार करत तो कारमध्ये बसला.

******

"शौर्या, तू खरंच का आज इथून कायमची जाणार आहेस?" सकाळी नाश्ता करताना यश तिला विचारत होता. ती जाणार या विचाराने रात्रभर त्याला झोप आली नाही आणि आतादेखील घशाखाली घास उतरत नव्हता.


"असं कोण म्हणालं?" चमचाभर उपमा तोंडात टाकत ती म्हणाली.


"असं काय करतेस? तूच रात्री म्हणालीस ना?" तिच्याकडे टक लावून पाहत यश म्हणाला.

"हम्म. पण कोणीतरी म्हणालं होतं की आणखी एक
दिवस थांब, सो मी माझा विचार बदललाय." ती गालात हसली.


"खरंच सांगतेस? थँक यू सो मच. कालपासून तर माझा प्राण कंठाशी आला होता. आत्ता कुठे जरासा दिलासा मिळाला." एक मोकळा श्वास घेत तो आनंदाने म्हणाला.


"चल, मी तुला ऑफिसला सोडतोय." तिचे खाऊन झाले तसे तो म्हणाला.

"नको, मी कॅबने जाईन. नकार देत ती म्हणाली.

"का?"

"अरे, तुला मनीषा इनामदार आणि मिस्टर पंकजला घ्यायला जायचे आहे ना? तुझ्या बॉसचे पाहुणे आहेत ते." ती.


"मी जाणार आहेच; पण तुझे काहीतरी वेगळे कारण आहे. मी तुला सोडायला आलेले तुला चालणार नाही का?"


"यश, काल पार्टीमध्ये सर्वांनी तुला पाहिले आहे. तू कोण आहेस हे माझ्या स्टॉफला माहितीय. इतकी मोठी व्यक्ती स्पेशली मला सोडायला येतेय, याबद्दल ऑफिसमध्ये उगाचच गॉसिप्स सुरु व्हायला नको." मुद्याचे बोलत ती म्हणाली.


"ओह आय सी. पण आजचा दिवस येऊ दे ना. उद्यापासून तर तू तुझ्या घरी असशील." त्याने गळ घातली.


"तू खूप हट्टी आहेस, चल." त्याच्यासोबत बाहेर येत शौर्या म्हणाली.


"थँक यू." तिने होकार देताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

*****


"एसके, प्लीज नाही म्हणू नकोस ना. तू ये ऑफिसला. हे असे ऑफिस सांभाळणे, मिटींग्स, डील वगैरे मला आवडत नाही रे. इतके दिवस नाईलाज होता म्हणून मी मॅनेज केलं; पण आता नको. तुझे काम तूच कर."
ऑफिसला पोहचल्याबरोबर शौर्याने शशांकला कॉल केला.


"नको गं. आता तू धुरा हाती घेतलीस ना, तूच ती सांभाळ. तसे मलाही कामातून ब्रेक हवा होताच, त्याला आता निमित्त मिळाले आहे." तो नकार देत म्हणाला.


"काका, असं नाही चालणार. तुझ्या प्रिय मैत्रिणीने हे साम्राज्य तुझ्या हाती सोपवले होते, ते तुलाच सांभाळायचे. तू ऑफिसला लगेच निघून ये असा मी तुला आदेश देतेय." ती आदेशवजा आवाजात म्हणाली.

शशांक ऑफिसला परत येईल का? त्याची नि विहानची भेट होईल का? वाचा पुढील भागात.
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all