हवास मज तू!भाग -९७

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -९७

मागील भागात:-

शौर्या शशांकला फोन करून ऑफिस जॉईन करायला आग्रह करते. तो तिचे ऐकेल का? वाचा आजच्या भागात.


"नको गं. आता तू धुरा हाती घेतलीस ना, तूच ती सांभाळ. तसे मलाही कामातून ब्रेक हवा होताच, त्याला आता निमित्त मिळाले आहे." तो नकार देत म्हणाला.


"काका, असं नाही चालणार. तुझ्या प्रिय मैत्रिणीने हे साम्राज्य तुझ्या हाती सोपवले होते, ते तुलाच सांभाळायचे आहे. तू ऑफिसला लगेच निघून ये असा मी तुला आदेश देतेय." ती आदेशवजा आवाजात म्हणाली


"जो हुकूम मेरे आका. तुझा आदेश मानणार नाही असे कधी होईल का? मी अर्ध्या तासात पोहचतोय." तो हसत तिला म्हणाला.


"थँक्स डिअर एसके. खरं तर नव्यालादेखील बोलावून घ्यायचे होते आणि तिला तुझ्यासोबत एकत्र काम करायला लावायचे होते, पण सध्या तिला आरामाची गरज आहे म्हणून काही दिवस थांबूयात. तू लवकर ये. मी वाट बघतेय." कॉल बंद केल्यावर तिने सुस्कारा सोडला.


किती दिवसानंतर तिला इतके मोकळे वाटत होते. मनावरचा ताण पूर्णपणे निवळला नव्हता, विहानच्या प्रश्नाचे उत्तरदेखील मिळाले नव्हते, पण नव्या सत्याला सामोरी गेली होती आणि यातच अर्धी लढाई जिंकल्याची भावना शौर्याच्या मनात दाटून आली.


'निवी, यार मोठी झालीयेस गं. मी तुला माझी छोटीशी, नाजूक बहीण समजत आले. मात्र तू तर खूप कणखर निघालीस. माझ्यासाठी आणलेले विष स्वतः प्यायलेस. एका क्षणात शौनकशी नाते देखील तोडलेस. लव्ह यू रे निवी.' तिच्या डोळ्यात नव्यासाठी अभिमान दाटला होता.

******
"एसके सर? तुम्ही बरे आहात ना? ऑफिसमध्ये तुम्हाला परत बघून खूप आनंद झाला आहे." केबिनमध्ये जात असताना विनीतला शशांक दिसला तसा आनंदाने त्याचा चेहरा उजळला.


"येस, आय एम परफेक्टली फाईन." शशांक म्हणाला तसे त्याचे ओठ रुंदावले.


"आणि नव्या?" तितक्यात तिथे कीर्ती येऊन पोहचली.
तिच्या प्रश्नासरशी शशांकने आश्चर्याने पाहिले.


"नव्या तुमची मुलगी आहे हे आम्हाला कालच शौर्या मॅडमकडून कळले. ती बरी आहे ना? ती आमची मैत्रीण आहे, तेव्हा काळजी वाटतेय."


"हम्म. नव्यादेखील बरी आहे. थोडा अशक्तपणा आहे. डॉक्टरांनी आणखी दोन दिवस आराम करायला सांगितलाय. त्यानंतर ती जॉईन होईल.

कीर्ती आणि विनीत तुमचे दोघांचे खूप अभिनंदन. उत्तम कामगिरी केलीत. असेच कार्य करत रहा." त्यांना शुभेच्छा देत तो म्हणाला.

"ॲक्च्युली सर, या यशाची खरी मानकरी तर नव्या आहे. तुम्ही आजारी पडलात आणि आमच्या पदरात आयते यश मिळाले." विनीत खाली नजर करून म्हणाला.

"जे घडून गेले त्याबद्दल विचार करू नका. अंगावर आलेली जबाबदारी निभवण्याकडे लक्ष द्या. ऑल द बेस्ट." त्यांचे हित चिंतून तो त्याच्या केबिनमध्ये गेला.


"प्रिन्सेस." आत येताच शौर्याला बघून त्याने साद घातली.


"काका?" खुर्चीवरून उठत शौर्या धावतच शशांकला बिलगली.


"डिअर एसके, आय मिस यू लॉट." तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.


"ए प्रिन्सेस, आता रडू पुरे कर बघू. तू तर माझी शूर मुलगी आहेस ना?" तिचे अश्रू पुसत तो म्हणाला.


"मला हे असं सगळ्यांशी तोडून वागताना फार त्रास झाला रे. आता परत असं नाही वागू शकणार. काकू, आजी, निवी सगळ्यांना दुखावलंय."


"तुझ्या अशा वागण्यामागचं कारण सगळ्यांना कळलंय. आता काळजी करू नकोस."

"मला सगळ्यांना भेटायचे आहे." ती हुंदका देत म्हणाली.


"मग सायंकाळी माझ्यासोबत घरी चल. बाहेर राहणे तसेही पुरे झाले. सुनी तर काल रात्रीच माझ्या मागे लागली होती आणि आता येतानादेखील तुला सोबत घेऊन ये असे ठणकावून सांगितलेय."


"नाही रे काका, मला नाही येता येणार. आजीने मला शपथ घातली होती. ती शपथ मी कशी मोडू?" पाणावलेल्या डोळ्यांनी तिने विचारले.

"तुला मोडता येत नसेल तर मी मोडतेय. मीच शपथ घातली होती ना?"

केबिनच्या दरवाज्याच्या दिशेने आलेला आवाज ऐकून दोघांनीही तिकडे नजर वळवली.

"आजी?" शौर्याच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रित आश्चर्य उमटले.


"बाळा, मला माफ कर गं. मी तुझ्याशी खूप चुकीचे वागले. शैलीने आमच्या पदरात सोपवलेल्या या हिऱ्याला मी ओळखू नाही शकले." ललिता हळवी होत म्हणाली.

"आजी गं, असं नको ना बोलूस." तिच्या मिठीत शिरत शौर्या मोकळी झाली.

"आई, तू इथे कशी?" शशांकने प्रश्न केला.


"मी सकाळीच देवाजवळ माझ्या दोन्ही नातीसाठी प्रार्थना करायला गेले होते. येताना विचार केला की शौर्याला भेटूनच जावं. नाहीतर ही घरी परतायची नाही." ललिता डोळे पुसत म्हणाली.


"तू आलीस ते बरंच झालं. मी तुझी ही अमानत सायंकाळी घेऊन येईल. आता तू जा. सुनंदा वाट बघत असेल आणि हो, घरी पोहचलीस की त्या दोघींना ही खूषखबर दे." शशांक म्हणाला.


"काका, एक सांगायचे होते, आज मी घरी नाही येऊ शकणार." ललिता गेल्यावर शौर्या शशांकला म्हणाली.


"पण का? आत्ताच तू किती एक्साइटेड होतीस आणि घरातील महिला मंडळाला देखील तुझ्या भेटीची ओढ लागून आहे."


"ओढ तर मलासुद्धा आहे. पण ते.. तो यश आहे ना, ज्याच्याकडे मी राहतेय; तो बहुधा उद्या परत जातोय. म्हणून आज मी तिथेच थांबते आहे." ती नखाशी बोटाने चाळा करत म्हणाली.

"ओह! यश पाटील? मी हॉस्पिटलमध्ये त्याला भेटलोय. मुलगा तसा चांगला आहे. उद्या त्याला आपल्याकडे जेवायला घेऊन ये.

चल आता कामाला लागू या." तो खुर्चीवर बसत म्हणाला. ती मात्र तशीच एका जागेवर खिळून उभी होती.


"शौर्या.." तिला तसे उभे बघून तो परत उठून तिच्या कानाजवळ जात शशांकने हाक दिली.


"अं?"


"मिस्टर यश पाटीलांना मी निमंत्रण देऊ की तू सांगशील?" तिचा गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत त्याने विचारले.


"तू का त्रास घेतोस? मी सांगेन ना." त्याच्या प्रश्नावर लगेच ती उत्तरली.


"प्रिन्सेस, तुला तो आवडतो का?" तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून शशांकने विचारले.

"आवडतो का ते नेमकं नाही सांगू शकत. पण ओके आहे." बोलताना तिचे लाल झालेले गाल शशांकच्या नजरेतून सुटले नाही.

********

'घुर्रर्रऽऽ घुर्रर्र..' कानाजवळ व्हायब्रेट होणारा मोबाईल हातात घेत शिरीनने चेहऱ्यावरचे पांघरून बाजूला केले.


"हॅलोऽऽ" पेंगुळलेल्या आवाजात तिने कॉल रिसिव्ह केला.


"हॅलो, शिरीन."

पलीकडचा आवाज ऐकताच ती अंथरुणात ताडकन उठून बसली.


"हेय ब्रो. इतक्या सकाळी सकाळी कॉल केलाहेस? सगळं नीट आहे ना? आणि हा रे कुठला नंबर."


"अगं हो, सांगतो. पण काय गं सकाळ काय म्हणतेस?" शौनकने विचारले.
"अरे ब्रो, मी दोन दिवसापूर्वीच इंडियात परतलेय. त्यामुळे तुझ्याकडे सकाळ आहे तशी इथे गोव्यात सुद्धा सकाळच आहे." ती हसून म्हणाली.


"वेलकम बॅक डिअर सिस्टर. ऐक ना, मी फोन यासाठी केला होता की मला शौर्याचा नंबर हवाय. प्लीज जरा सांगतेस का?"


"तिचा नंबर तुझ्याकडे नाहीये? इट्स मिरॅकल."


"शिरीन, मी जरा टेन्शनमध्ये आहे. माझा मोबाईल चोरीला गेलाय. एका एसटीडी बूथ मधून मी तुला फोन केलाय." तो.


"सॉरी रे." ती त्याला नंबर देत म्हणाली.

"मी दोन तीनदा तिला कॉल केला होता पण तिने कधीच उचलला नाही. तेव्हा आताही उचलेल की नाही आय डोन्ट नो." अधिकची माहिती पुरवत ती म्हणाली.

नंबर लिहून घेतल्यावर त्याने फोन ठेवला. घरून कार घेऊन निघाला तेव्हा कुठे जायचे हा प्रश्न त्याला सतावत होता. शशांकला भेटायचे तर होते पण घरी जायचे की नाही हा संभ्रम होता; म्हणून मग त्याने शिरीनकडून शौर्याचा नंबर घेतला.

तिच्याशी बोलून शशांकचा नंबर मागण्याचा त्याचा विचार होता पण त्याने तूर्तास तो विचार बाजूला ठेवला.
बूथमधून बाहेर येत तो कारजवळ आला. क्षणभर विचार करून त्याने कार एसके इंटरप्रायझेसकडे वळवली.

******

"विहान सर? वेलकम बॅक." ऑफिसमध्ये पाय ठेवताच दिवाकरचे लक्ष विहानकडे गेले आणि तो आनंदून गेला.

"आजचा दिवस खूप खास आहे म्हणायचा. आजच एसके सरसुद्धा ऑफिसला जॉईन झालेत आणि आता तुम्ही. आपल्या ऑफिसची पूर्वीची बहार परत येईल." तो थांबता थांबेना.

"दिवाकर दादा.. एक मिनिट. एक मिनिट. जरा दम धरा. मी इथे जॉईन व्हायला नाही आलोय. सहज भेटायला आलोय आणि काय सांगताय, शशांक सर आले आहेत का? बरं झालं, त्यांचीही भेट होईल." तो स्मित करत म्हणाला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all