हवास मज तू!भाग -९८

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -९८

मागील भागात :-

संभ्रमात पडलेला शौनक शिरीनकडून तो शौर्याचा नंबर मिळवतो सोबतच शशांकला भेटायचे ठरवतो.
आता पुढे.

"आजचा दिवस खूप खास आहे म्हणायचा. आजच एसके सरसुद्धा ऑफिसला जॉईन झालेत आणि आता तुम्ही. आपल्या ऑफिसची पूर्वीची बहार परत येईल." तो थांबता थांबेना.

"दिवाकर दादा.. एक मिनिट. एक मिनिट. जरा दम धरा. मी इथे जॉईन व्हायला नाही आलोय. सहज भेटायला आलोय आणि काय सांगताय, शशांक सर आले आहेत का? बरं झालं, त्यांचीही भेट होईल." तो स्मित करत म्हणाला.

******

"वेलकम मॅम, वेलकम सर. मी यश पाटील तुम्हा दोघांचे मुंबईनगरीत स्वागत करतो."

विमानतळावर मनीषा आणि पंकजला घ्यायला आलेला यश अदबीने म्हणाला.


"तुला विहानने पाठवलंय का? आणि तो का नाही आला?" मनीषाने त्याला प्रश्न केला.


"ते मिटिंगमध्ये आहेत, त्यामुळे मला पाठवलेय. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सेवेत हजर आहे." त्यांना पार्किंगमध्ये घेऊन येत तो उत्तरला.

मनीषाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. पंकजदेखील खूष दिसत होता.


"मॅम, राग येणार नसेल तर गोष्ट बोलू?" कार चालवताना आरशातून मागे असलेल्या मनीषाकडे बघून यशने विचारले.


"हं, बोल." ती म्हणाली.


"तुम्ही ना विहान सरांच्या आई अजिबात वाटत नाही." तो हसून म्हणाला.


"म्हणजे?" तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


"म्हणजे असं वाटतं की तुम्ही त्यांची मोठी बहीण आहात. हार्डली चार ते पाच वर्षांनी मोठी असणार." तो मंद हसून म्हणाला. ते ऐकून मनीषाचे ओठ रुंदावले.


"खूप सुंदर आहात हो तुम्ही. सर, तुम्ही देखील खूप हॅन्डसम आहात. तुमची आणि मॅडमची जोडी तर किती भारी दिसतेय. अगदी मेड फॉर इच अदर." त्याने आपला मोर्चा पंकजकडे वळवला.


"थँक यू." त्याच्या स्तुतीने पंकजदेखील वाहवत गेला.


"मॅम, तुम्ही दोघांच्या लग्नाला किती वर्ष झाली असावीत हो? विहान सरांचे वय बघता किमान एकोणतीस तीस तरी नक्कीच झाले असतील, पण तुम्हा दोघांना बघून अजिबात जाणवत नाही हं." तो हसून म्हणाला.


"मिस्टर पाटील, तुम्ही आमच्या पर्सनल स्पेस मध्ये जरा जास्तच शिरत आहात. तुमच्या बॉसने जेवढे आदेश दिले आहेत तेवढेच काम केले तर बरं होईल." पंकजने त्याला ठणकावले.

"सॉरी सर." म्हणत त्याने कार पार्क केली.

"आपल्याला इथे उतरावं लागेल." एका आलिशान हॉटेलपूढे त्यांना उतरवत तो म्हणाला.


"इथे? पण आपण तर विहानकडे जाणार होतो ना?" मनीषाचा प्रश्न.


"हो. तुमची राहण्याची संपूर्ण व्यवस्था इथे केली आहे. मिटिंग आटोपली की विहान सर तुम्हाला घ्यायला येतील." रिसेप्शनिस्टकडून रूमची चावी घेत तो म्हणाला.


"ही तुमची रूम. सर्व सोयीने परिपूर्ण आहे. फ्रेश व्हा, जेवण करा आणि आराम करा. मी काही वेळाने येईनच." तो दारातून बाहेर पडत म्हणाला.


"वॉव! पंकज बघितलेस? ही आपली रूम तेही मुंबईमधल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये. माझ्या मुलाची कमाल पाहिलीस ना." यश गेला तसे स्वतःला बेडवर झोकून देत ती म्हणाली.


"त्याची कमाल तर आहेच; पण खरी कमाल तर आपली आहे." तिच्या बाजूला पडत तो म्हणाला.


"हम्म, हे मात्र खरं. आपण दोघांनी डोके लढवले नसते तर असं काही घडलं नसतं. पंकज, आज मी खूप खूष आहे." त्याच्या गळ्यात हात गुंफत ती म्हणाली.


"जेव्हा एसके इंटरप्रायझेस आपल्या हाती येईल त्यासाठी साजरा करायला थोडा आनंद उरवून ठेव." तिच्या गालावरून बोट फिरवत तो म्हणाला.


"तेव्हा तर खूप मोठा जल्लोष साजरा होईल. फक्त तू आणि मी, मी आणि तू. बस्स! इतर कुणीच नाही." त्याला मिठी मारत ती म्हणाली.


"आणि तुझा तो मातृभक्त विहान?" उपरोधिक हसून पंकजने विचारले.


"विहान! या वेड्या मुलाचे काय करायचे तेच कळत नव्हते. पण आता ठरलंय. शेखरसारखी त्यालाही सुट्टीवर पाठवायचे. डायरेक्ट ढगात. बिचाऱ्याला बाबाची फार आठवण येतेय ना?" त्याच्या हास्यात तिचेही हसू मिसळले.

******

"मे आय कम इन?" केबिनच्या दारातून आत डोकावत विहान उत्तराच्या प्रतीक्षेत उभा होता.

"विहान?"

"शौनक?"

शशांक आणि शौर्याच्या तोंडून एकत्रच शब्द बाहेर पडले.


"तू इथे काय करतो आहेस?" शौर्याने दरडावून विचारले.


"मी आत येऊ?" विहानने अर्जव करत पुन्हा विचारले.


"शौर्या, शांत हो." तिला शांत करत त्यांनी त्याला इशाऱ्याने आत बोलावले.


"सर, खरं तर मी तुम्हालाच भेटायला आलो आहे. बंगल्यावर जाणार होतो, पण ते योग्य वाटले नाही म्हणून मग मी इकडेच.."


"प्रहसन नकोय, मुद्याचे बोल." त्याला मध्ये अडवत शशांक म्हणाला.


"नव्या मला का टाळतेय? तुम्ही तिला माझ्या विषयी असं काय सांगितलंय?" आवाजावर नियंत्रण ठेवत त्याने प्रश्न केला.


"कदाचित याचे उत्तर तुलाच ठाऊक असावे असे मला वाटते." शशांक शांतपणे म्हणाला.

"सर.. "


"शौनक, तू इथून जाऊ शकतोस. कारण आता कितीही प्रयत्न केले तरी निवी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही हे लक्षात घे." शौर्या त्याला स्पष्टपणे म्हणाली.


"या सर्वांचे मूळ तू आहेस हे मला माहितीये, पण तू आमचे प्रेम असे तोडण्यात यशस्वी होऊ शकणार नाहीस."


"विहान, माझ्यासमोर माझ्या मुलीशी अशा भाषेत बोललेले मी खपवून घेणार नाही. तुला बोलायचे असेल तर शांतपणे बोल किंवा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल तर निघून जा, प्लीज." शशांक त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाला.


"तुम्ही सुरुवातीपासून हेच करत आलात ना मिस्टर शशांक केळकर? फक्त भेदभाव आणि पक्षपातीपणा. स्वतःच्या भावाचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलीला शानशौकीनीचे आयुष्य दिलेत आणि शेखर कारखानीसच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोला काही पैसे देऊन तिची बोळवण केलीत.

आपल्या लहानग्या लेकराला घेऊन ती स्त्री कशी जगेल याची जरासुद्धा काळजी तुम्हाला वाटली नाही, हो ना?" विहानने त्याच्यावर तोफ डागली.


"मला पक्षपातीपणा करायचा असता तर निवी काम करत असलेले प्रोजेक्ट मी तुझ्याकडे सोपवले नसते. तुझी लायकी तिच्यापेक्षा काकणभर जास्त आहे हे ओळखून स्वतःच्या मुलीला डावलून मी तुला पुढे आणलं आणि तू मला पक्षपातीपणा, भेदभाव या गोष्टी शिकवतोस? मला जाब विचारतोस?"


"जाब तर मला विचारायचाच आहे. मला जाब हवाय माझ्या वडिलांच्या मृत्यूचा. माझ्या अजाणत्या वयात आलेल्या पोरकेपणाचा. का वागलात तुम्ही असे? आरोपीला पाठीशी का घातलंत? माझ्यावर आणि माझ्या आईवर का अन्याय केला? देताय मला माझ्या या प्रश्नांचा जाब?" तो नजरेत नजर मिळवत म्हणाला.


"शौनक, तू माझ्या काकावर असे आरोप करू शकत नाहीस. तुला जी उत्तरं हवी आहेत ती तुझ्या आईकडून मिळव."


"तिच्याकडून मी सगळंच ऐकत मोठा झालो. तुझ्या आईने माझ्या बाबांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी काय काय केले आणि त्याची परिणती म्हणून शेवटी तिनेच कसे नवऱ्याला आणि प्रियकराला संपवले हे मला चांगलेच ठाऊक आहे.

मला आता हे सारं यांच्याकडून ऐकायचे आहे. हे कधीच खोटे बोलत नाहीत ना? मग त्यांनी मला सांगावं की त्यांच्या वहिनीने शेखर कारखानीसला का मारलं?" त्याने जळजळीतपणे प्रश्न केला.


"तू जे बोलतो आहेस ते ऐकून तुझ्या गालावर पाच बोटे उमटवावीत असे वाटायला लागले आहे. पण तुझ्यासारखे ताळतंत्र सोडून मला वागता येत नाही म्हणून मी गप्प आहे." शशांकचा स्वर अजूनही सौम्य होता.


"स्वतःच्या वाहिनीबद्दल इतका पजेसीव्हनेस? ती खरंच तुमची वहिनीच होती ना?" तो खोचकपणे हसला.


"शौनकऽऽ, तू जिच्याविषयी बोलत आहेस ना ती माझी आई होती. काका काही बोलत नसला तरी मी तिच्याबद्दल असलं बोलणं खपवून घेणार नाही." त्याची कॉलर घट्ट पकडत शौर्या म्हणाली. रागाने तिचे डोळे लाल झाले होते.

"हो, तिच्याबद्दल मी खूप पजेसिव्ह आहे." शशांक म्हणाला तसे शौर्याच्या हाताची पकड ढिली झाली.

"कारण तू म्हणतोस तसे ती माझी केवळ वहिनीच नव्हती. मैत्रीण होती ती माझी. माझी सखी, गाईड, फिलॉसॉफर, या कपंनीची मालकीण, शून्यातून विश्व साकारणारी एक साम्राज्ञी होती. तू लहान आहेस रे. तिच्याबद्दल बोलण्याची तुझी लायकीसुद्धा नाहीय." त्याच्याकडे तुच्छतेने बघत तो म्हणाला.

शौर्याने कॉलर ढिली करताच शौनकने स्वतःला थोडे सावरले. आपण काहीतरी चुकीचे बोललोय याची त्याला जाणीव झाली.

"सॉरी, मी कदाचित चुकीचे बोललोय. पण मुद्द्याचं हेच की तुमच्या वहिनीने माझ्या बाबांना का मारलं?" क्षणभर थांबून त्याने शौर्याकडे एक नजर टाकली आणि मग शशांकला प्रश्न केला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all