हवास मज तू!भाग -९९

वाचा एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -९९

मागील भागात :-
शौनक शैली आणि शशांकच्या नात्यावर आक्षेप घेतो. तिच्याबद्दल तो एवढा पजेसिव्ह का आहे असा प्रश्न विचारतो.
आता पुढे.


शौर्याने कॉलर ढिली करताच शौनकने स्वतःला थोडे सावरले. आपण काहीतरी चुकीचे बोललोय याची त्याला जाणीव झाली.

"सॉरी, मी कदाचित चुकीचे बोललोय. पण मुद्द्याचं हेच की तुमच्या वहिनीने माझ्या बाबांना का मारलं?" क्षणभर थांबून त्याने शौर्याकडे एक नजर टाकली आणि मग शशांकला प्रश्न केला.


"त्यावेळी एक नव्हे तर तीन बळी गेले होते. त्या तिघांचा मृत्यू म्हणजे न उलगडलेले कोडे आहे. पण एवढं मात्र खरं की शैली गुन्हेगार नव्हती." शशांकच्या स्वरातील सौम्यतेबरोबर ठामपणादेखील अधोरेखित होत होता.


शशांक बोलत होता तेवढ्यात शैलीच्या फोनची रिंग वाजली. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले; पण तरीही परत रिंग वाजली तेव्हा तिने शशांककडे बघून 'सॉरी' म्हणत कॉल रिसिव्ह केला.

"हॅलो."

"हॅलो मिस शौर्य केळकर, आपला 'प्लॅन मिशन मुंबई' सक्सेसफूल झालाय." पलीकडून यश बोलत होता.


"आता हा कुठला प्लॅन?" तिने आश्चर्याने विचारले.


"काय गं? कुणाचा फोन?" तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून शशांकने विचारले.

"कंपनी.. कंपनीचा फोन आहे. कसल्या तरी प्लानबद्दल सांगताहेत. एक्सक्यूज मी, मी जरा आलेच दोन मिनिटात." केबिनच्या बाहेर पडत ती म्हणाली.


"यश, काय बोलतोस? कसला प्लॅन मुंबई मिशन?"


"अगं वेडाबाई, मनीषा इनामदार आणि मिस्टर पंकज मुंबईत दाखल झालेत. आताच त्यांना हॉटेलवर पोहोचवून आलोय. तू म्हणत असशील त्यांना तुझ्याकडे घेऊन येऊ का?" तो म्हणाला.


"यश, वेट, वेट. मला जरा विचार करू दे आणि काय रे? तुझा तो इन्स्पेक्टर मित्र कृष्णा नाही का आला?"


"त्याच्याबद्दल सध्या काही विचारू नकोस. आधी यांचे काय करायचे ते सांग."


"अरे पण ते त्याच्या प्लॅनचा भाग होते ना? तरी थांब. मी थोड्यावेळाने तुला कॉल करते. ठीक आहे ना? चल, बाय." त्यानेही 'बाय' म्हणताच तिने कॉल कट केला.


यशने दिलेल्या बातमीने छातीत थोडी धडधड वाढली असली तरी एक दिलासादेखील मिळाला होता. तिलाही मनीषाला भेटायचे होतेच. तिला भेटून तिच्या वागण्याचा जाब विचारायचा होता.

'आता जाऊन तिला भेटावे का? माझ्या मम्माबद्दल तिने शौनकच्या मनात नाही नाही ते का भरवले ते सगळे स्पष्ट करून येऊ का?' तिच्या मनात प्रश्न डोकावला.

त्या प्रश्नावर तात्पुरते आवर घालून ती केबिनमध्ये परतली.

"एनीथिंग सिरीयस?" ती विचार करत आत आलेली बघताच शशांकने तिला विचारले.


"नो, नथिंग." ओठावर बळेच हसू आणत ती उत्तरली.


"सर, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत दिले नाहीय. हे कसले कोडे आहे?आणि त्याचा उलगडा का झालेला नाही?" विहानने त्याचा प्रश्न परत विचारला.


"तुला कसले एक्सप्लेनेशन द्यावे अशी माझी अजिबात इच्छा नाही पण या संदर्भात शेखरचा समावेश आहे म्हणून हे सांगायचे आहे. तुझा विश्वास बसेल की नाही माहित नाही, तरी ऐक. शैली, शेखर आणि मी खूप चांगले मित्र होतो. कॉलेजपासूनचे मित्र. आमचा ग्रुप होता.

शैलीच्या लग्नानंतर त्याचे लग्न झाले. त्यानंतर काही काळासाठी शेखर दूर गेला होता पण काही वर्षाने तो पुन्हा आमच्यात परतला. आमच्या कंपनीचा एक भाग झाला.

एका सक्सेसफूल मिटिंगनंतर घरी परतत असताना माझा दादा, शैली आणि शेखर यांचा मृत्यू झाला.. वार केलेला चाकू शैलीच्या हातात होता म्हणून तिच्यावर आळ घेतल्या गेला, पण हे नक्कीच खरं नव्हतं." शशांकने सांगायला सुरुवात केली.


"खोटं बोलताय. मिसेस शैली केळकर तुमच्या वहिनी होत्या. त्यांचे पती मयंक केळकर त्यांना पुरेसा वेळ देत नव्हते म्हणून त्या तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागल्या.

त्याच काळात माझे बाबा तुमच्या कपंनीत कामाला लागले. त्यांच्या हुशारीने शैलीमॅडम प्रभावीत झाल्या आणि तुम्हाला सोडून त्या माझ्या वडिलांना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन करू लागल्या. त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत. मात्र त्याची कुणकुण मयंक सरांना लागली आणि बदनामीच्या भीतीने शैली मॅडमने त्या दोघांना ठार केले. स्वतःवर आळ येऊ नये म्हणून स्वतःला संपवले.

या घटनेने तुम्हाला तर सगळं काही आयतं मिळालं. घर, कंपनी.. सारं काही. ते हातून जाऊ द्यायचे नव्हते म्हणून तुम्ही ती केस दडपून टाकली. आईला थोडे पैसे देवून तिलाही बेदखल केले." विहान तिरस्कारयुक्त स्वरात बोलत होता.


'सपाकऽऽ'

त्याचे बोलणे संपत नाही तोच शशांकने त्याच्या गालावर सनकन लगावली त्याचा आवाज झाला.

"मिस्टर विहान इनामदार, लहान आहेस, माझ्या मुलासारखा आहेस म्हणून मी तुला आतापर्यंत सहन करत आलो. पण शैलीबद्दल चुकीचे बोललेले मी कधीच ऐकून घेणार नाही. तिचं नि माझं नातं काय होतं ते मी तुला आधीच स्पष्ट केलं आहे. तरीही तिच्याबद्दल तू असे बोलावेस ही तुझ्या कोत्या मनाची शोकांतिका आहे.


शैलीने आयुष्यात केवळ एकाच पुरुषावर प्रेम केले आणि तो पुरुष म्हणजे माझा दादा होता, मयंक केळकर. त्याच्याव्यतिरिक्त तिने दुसऱ्या कुठल्याच पुरुषाकडे त्या दृष्टीने बघितले नाही.


तुझ्या डोक्यात हे सगळं कोणी भरवलं असेल ते मला ठाऊक आहे. मनीषा! अगदी खालच्या पातळीची ती स्त्री आहे. दादाबरोबर तिला लग्न करायचे होते पण दादाने तिला वगळून शैलीला निवडले त्याचा ती बदला घेतेय. जा, जाऊन सांग तिला, म्हणावं शशांक अजून तरी जिवंत आहे, तो तुझे असले चाळे खपवून घेणार नाही.


खरे तर ही थापड तुला आधीच द्यायला हवी होती. माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य तुझ्यामुळे पणाला लागले. माझी निवी तर मृत्युच्या जाळ्यात अडकली. शौर्याचे करिअर बिघडवलेस. या एका थापडेपेक्षा आणखी तुला कडक शिक्षा व्हायला हवी." त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता.


"काका, शांत हो. सांभाळ स्वतःला. रागावर नियंत्रण ठेव. नाहीतर तुलाच त्रास होईल." त्याला सावरण्याचा प्रयत्न करत शौर्या म्हणाली.

"शैलीबद्दल अपशब्द मी नाही गं ऐकू शकत. मनीषा नात्यातील असून सुद्धा कधीच नाते निभावू शकली नाही. जे होते नव्हते सारे लुबाडले. उलट तीच आमचं घर बसवणाऱ्या शैलीबद्दल याच्या मनात असे भरवते याचा मला त्रास होतोय गं. हिच्यापेक्षा शेखर तरी बरा होता. जे मनात होते ते तो स्पष्ट तरी बोलायचा." शशांकचा गळा दाटून आला.

गालावरच्या थापडीमुळे विहानच्या डोक्यात झिणझिण्या आल्या होत्या. शशांक काय बोलतोय हेही त्याला नीट उमजत नव्हते, पण त्याने केलेला मनीषा आणि नात्याचा उच्चार त्याने ऐकला आणि काही वेळासाठी तो सुन्न झाला.


"नाते? आईचे तुमच्याशी कसले नाते होते?" त्याने गाल चोळत विचारले.


"का? मनीषाने तुला कधी सांगितलं नाही? ती माझ्या आत्याची मुलगी आहे. म्हणायला तेवढी आमची आतेबहिण आहे; मात्र कायम वैऱ्यासारखी वागत आलीय. आधी माझ्या दादाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, ते नाही जमलं तर तिच्या आईच्या मदतीने आमचे घर लुटले. इथून कोल्हापूरला निघून गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा माझ्या प्रिय मित्राला, शेखरला आपल्या पदराशी बांधून घेतलं होतं.

माझ्या जवळच्या व्यक्तींना मी तिच्यामुळे दुरावलो आणि आता तर वाटू लागलेय की तिच्यामुळेच मी सगळ्यांना गमावलेय."


शशांकच्या डोळ्यातील दुःख, बोलण्यातील त्याची तगमग विहानला जाणवत होती. त्याच्या आईचे कधीच न उगडलेले अनेक नवनवी रूपं त्याच्यासमोर येत होते.

'कशावर विश्वास ठेवायचा? ज्या व्यक्तीसोबत एक महिन्याचा काळ घालवला, त्याच्यावर? की जिने इतकी वर्ष मनात बदल्याची भावना रुजवली तिच्यावर?' त्याची निर्णयक्षमता जणू खुंटली होती.


"मला त्या जागेकडे घेऊन चालाल? जिथे माझ्या बाबांनी शेवटचा श्वास घेतला ती जागा मला बघायची आहे." डोळ्यातून बाहेर येऊ पाहणारे अश्रू रोखत त्याने विचारले.


"ते अशक्य आहे. इतक्या वर्षापासून मी तिकडे कधी फिरकलो सुद्धा नाही. शैलीने नव्या प्रोजेक्टसाठी म्हणून ती जागा खरेदी केली होती. ती गेल्यावर तिथे तो प्रोजेक्ट उभारण्याचे मला कधी धाडस झाले नाही." शशांक उत्तरला.


"प्लीज सर. एकदाच, फक्त एकदा. त्यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही." तो कळवळून म्हणाला.


"शौनक, आता हे पुरे झालं. काकाला त्रास होईल असे प्लीज तू वागू नकोस. तू देत असलेल्या स्ट्रेसमुळे त्यांना काही झालं तर तुला काहीही फरक पडणार नाहीये. पण आम्हाला मात्र नक्कीच पडेल. आमचा तो एकमेव आधार आहे; तेव्हा तुला माझी कळकळीची विनंती आहे की तू त्यांच्यापासून लांब राहावेस." शौर्या त्याला हात जोडून म्हणाली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all