हवास मज तू!भाग-१००

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग-१००

मागील भागात :-

ज्या ठिकाणी शेखरचा मृत्यू झाला होता तिथे घेऊन जाण्यासाठी शौनक शशांकला विनंती करतो. शशांक त्याचे म्हणणे ऐकेल का? वाचा आजच्या भागात.


"प्लीज सर. एकदाच, फक्त एकदा. त्यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही." तो कळवळून म्हणाला.


"शौनक, आता हे पुरे झालं. काकाला त्रास होईल असे प्लीज तू वागू नकोस. तू देत असलेल्या स्ट्रेसमुळे त्यांना काही झालं तर तुला काहीही फरक पडणार नाहीये. पण आम्हाला मात्र नक्कीच पडेल. आमचा तो एकमेव आधार आहे; तेव्हा तुला माझी कळकळीची विनंती आहे की तू त्यांच्यापासून लांब राहावेस." शौर्या त्याला हात जोडून म्हणाली.


"शौर्या, प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड. एकदा समजून घे ना मला. शेवटचं." त्याच्या डोळ्यात अर्जव होते.

"माझी मनस्थिती काय झालीय याचा तू विचारदेखील करू शकत नाहीस. आईवर माझे खूप प्रेम आहे. आजवर मी जे करत आलो ते केवळ आईसाठी.

मी माझ्या बळावर जगातील सगळी सुखं तिच्या पायाशी लोळण घालू शकतो असा स्वतःवर मला विश्वास आहे. तेवढे कॅलिबर माझ्यात आहेत हे मला ठाऊक आहे; तरी मी सरळमार्गाने न जाता हा आडमार्ग पत्कारला. केवळ आईसाठीच.

एसके इंटरप्रायझेसची तिला मालकीण व्हायचे होते, कारण या कंपनीच्या मालकीणीने आमचे कुटुंब उध्वस्त केलेय, हेच ती कायम मला सांगत आली. मलाही ते सगळं पटत गेलं. त्यात काहीच गैर वाटत नव्हतं. नकळत तिचे स्वप्न मी जगायला लागलो होतो. माझे एकच ध्येय होते की एसकेच्या कुटुंबाला उध्वस्त करून ती कपंनी स्वतःच्या अंमलाखाली आणायची आणि आईची इच्छा पूर्ण करायची.

पण आता मात्र मला आई कुठेतरी चुकतेय असं वाटू लागलंय. बाबाच्या आयुष्याची, शैली मॅडमची ही बाजू मला ठाऊकच नव्हती. अप्रत्यक्षपणे मी देखील तुमच्या कुटुंबाशी जुळलोय हेही मला माहित नव्हते. माझे जग म्हणजे माझी आई, माझे दैवत म्हणजे माझी आई! पण आता ती प्रतिमा मला कुठेतरी डगमगल्यासारखी वाटतेय.

सर, मला एकदा त्या जागेवर घेऊन चला. प्लीज? त्यानंतर मी इथून निघून जाईन. कायमचा. आईला घेऊन कुठेतरी दूर जाईन." तो डोळ्यातील पाणी टिपत म्हणाला.


"शौनक, हे तुझे बोलणे सुद्धा कशावरून तुझ्या प्लॅनचा भाग नसेल? तुझ्यावर विश्वास ठेवून विश्वासघाताचा जो धसका मी घेतलाय ना त्यामुळे आता पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवायला मन धजावत नाही." शौर्याचा नकार स्प्ष्ट दिसत होता.


"शौर्या म्हणते ते मला पटतेय. आगीतून निघाल्यावर पुन्हा कोण फुफाट्यात जाण्याचा धोका पत्कारेल?" शशांक तिची री ओढत म्हणाला.


"मी तुमच्या विश्वासाच पात्र उरलो नाही ही खूप मोठी खंत आहे. ठीक आहे, मी निघतो." त्यांचा नकार ऐकून दुखावलेला विहान परत जायला निघाला.


"विहान, एक मिनिट. खरं तर तुझ्यावर माझाही विश्वास उरला नाहीये आणि तुझे काही ऐकायची इच्छासुद्धा उरली नाहीय. पण तुझ्यात शेखरचा अंश उतरला आहे, माझ्या मित्रासाठी, शेखरसाठी म्हणून मी तुला त्या ठिकाणी घेऊन जायला तयार आहे." त्याला जाण्यापासून रोखत शशांक म्हणाला.


"काका? जे झालं ते पुरे नाहीये का? तुला पुन्हा विषाची परीक्षा का घ्यायची आहे?"


"विषाची परीक्षा तर विषाची परीक्षा. फार फार तर काय होईल? मी मारल्याच जाईन ना? ते चालेल मला. किमान आयुष्यभर शेखर आणि शैलीला न्याय मिळवून दिला नाही हा गिल्ट तर मनात नसेल ना?" तिच्याकडे पाहत शशांक म्हणाला.


"डिअर एसके, असं नको ना रे बोलूस." ती हळवी झाली होती.

"ॲक्च्युली शौर्या, मला वाटतं तुसुद्धा सोबत यावीस. तुझ्या मम्माने जिथे एक वेगळे स्वप्न साकार करण्याचे ठरवले होते, त्या जागेवर तू आपले पाय टेकवावेत." तिचा हात हातात घेत शशांक म्हणाला.

*****

"हॅलो यश.." तिथून निघण्यापूर्वी शौर्याने यशला एक कॉल केला.


"हाय. मी केव्हाचा तुझ्या कॉलची वाट बघत आहे. त्या मनीषाबाईंना घेऊन डोक्यात एक मस्त प्लॅन तयार आहे." तो उत्साहात बोलत होता.


"ऐक ना, तुझा तो प्लॅन बाजूला राहू दे. आम्ही एका जुन्या प्रोजेक्टच्या ठिकाणी जात आहोत. शौनक आमच्या सोबत आहे. माहित नाही का, पण माझं मन फार अस्वस्थ होत आहे."


"तो शौनक तुमच्यासोबत काय करतोय? तो तर खूप धूर्त मुलगा आहे. त्याने त्याचा हा नंबर पर्मनंटली बंद करून टाकलाय. आता त्याच्या आईला कसा कॉन्टॅक्ट करायचा तेही कळत नाहीये." तो त्याच्याविषयी सांगू लागला.

"ते सध्या सोड ना. मी काय म्हणतेय, मी तुला लोकेशन सेंड करतेय. तू तिथे ये ना. मला फार भिती वाटतेय, तेव्हा तू तरी सोबत असावेस अशी आशा आहे. येशील ना?"


"नेकी और पूछपूछ? तुझ्यासाठी काय पण. मी लगेच तिथे पोहचतो बघ. आणि माझ्या डोक्यात पुन्हा एक नवी कल्पना आलीय, ती म्हणजे.."

"तुझे प्लॅन्स आणि तुझ्या कल्पना तात्पुरत्या बाजूला ठेव. तू लगेच निघून ये. बाय." त्याचे म्हणणे पूर्ण ऐकून न घेताच तिने कॉल कट केला.

*******


"वॉव! किती मज्जा आली. इथली सर्विस खूप भारी आहे. स्पा, बॉडी मसाज.. आहाहा! संपूर्ण शरीर असे हलके हलके वाटत आहे." मनीषा बेडवर लोळत म्हणाली.


"हो अगं आणि लंचसाठी असलेला मेनू तर किती स्वादिष्ट होता? पोट भरलं पण मन नाही; शेवटी मला आवरत घ्यावं लागलं." पंकजसुद्धा बेहद खूष झाला होता.

"पण काय गं? तुझा तो मातृभक्त पुत्र कुठे आहे? अजुनपर्यंत त्याचा काहीच पत्ता कसा नाहीय?" तिला मिठीत घेत त्याने विचारले.


"येईल रे. तो नाहीतर त्याचा तो येडपट पीए तरी येईल. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे." ती.


"आणि माझा तुझ्यावर." तो हसून म्हणाला.

त्यांची अशीच मौजमजा सुरु असताना तिच्या मोबाईलची रिंग वाजली.


"हॅलो.." अनोळखी नंबर बघून तिने पंकजला गप्प करत कॉल रिसिव्ह केला.


"हॅलो मनीषा मॅडम, मी यश बोलतोय. तुमच्यासाठी एक गुडन्युज आहे. लगेच तयार होऊन खाली या. आपल्याला बाहेर जायचे आहे." रिसेप्शनवरून यश तिच्याशी बोलत होता.


"माझ्या मुलाची म्हणजे तुझ्या बॉसची मिटिंग आटोपली का? आपण त्यांच्याकडे जात आहोत ना?" तिची उत्सुकता शिगेला पोहचली होती.


"मॅम, अशा गोष्टी असे मी फोनवर नाही सांगू शकत. आमच्या कपंनीच्या नियमांच्या हे विरुद्ध आहे. तुम्ही आलात की आपण परस्पर बोलूया. एक क्लू मात्र देऊ शकतो की तुमच्यासाठी एक गुडन्युज आहे." त्याच्या ओठावर मिश्किल हसू उमटले होते.


"ठीक आहे, दहा मिनिटात आम्ही खाली येतोय." कॉल बंद करत ती म्हणाली.

"पंकज, फायनली आज तो दिवस उजाडला आहे ज्याची मी इतकी वर्ष वाट बघत होते ते माझे स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आली आहे. आय लव्ह यू सो मच." त्याच्या गालावर ओठ टेकवत ती म्हणाली.


"म्हणजे आता आनंदोत्सव साजरा करायचा आहे तर?" तिला मिठीत घट्ट पकडत तो म्हणाला.


"हे करायचे आहेच, पण नंतर. आधी आपल्याला बाहेर जायचे आहे. तो यश आपल्याला घ्यायला आला आहे. तू छान रेडी हो. मी पण तयारीला लागते." त्याच्या मिठीतून बाहेर येत ती म्हणाली.

आपले आवरून दोघेही पंधरा मिनिटात खाली आले. यश क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला. महागडी रेशमी साडी, त्यावर माफक ज्वेलरी. तिचे सौंदर्य उठून दिसत होते. आनंदाने चेहरा उजळून निघाला होता.

क्षणभरासाठी त्याला शौनकबद्दल फार वाईट वाटले. एका स्वार्थी स्त्रीसाठी तो आपले आयुष्य पणाला लावायला निघाला याची त्याला खंत वाटत होती.


"खूप सुंदर! ब्युटीफूल! माफ करा, मघाशी उगाचच मी तुम्हाला विहान सरांची मोठी बहीण समजलो." तो तिच्याकडे बघून लहानसा चेहरा करत म्हणाला.


"म्हणजे?" ती.


"अहो, तुम्हीतर त्यांच्यापेक्षा लहान वाटताय. सरांची छोटी बहीण जणू." तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडत तो म्हणाला.

स्तुतीने हुरळून जाऊन ती आत बसली. पंकज तिच्या बाजूला बसताच यशने कार चालवायला सुरुवात केली.


"यश, आपण कुठे जात आहोत?" वाटेत पंकजने प्रश्न केला.


"कुठे म्हणजे काय? आपण आपल्या कंपनीकडे जात आहोत. विहान तिथे आपली वाट बघत आहे, हो ना रे यश?" मनीषा हसून म्हणाली.


"यू आर राईट मॅम. आपण कंपनीच्या मेन ऑफिसला निघालो आहोत पण त्यापूर्वी एका नयनरम्य ठिकाणी जायचे आहे. विहान सर आपल्याला तिथेच भेटतील." ती माहिती पुरवत म्हणाला.


"नयनरम्य ठिकाण? म्हणजे नेमके कुठे? नरिमन पॉईंट, चौपाटी की आणखी दुसरे?"


"तुम्ही जास्त ताण घेऊ नका मॅडम. जस्ट वेट अँड वॉच. अशा ठिकाणी घेऊन जातोय की जिथे तुम्ही अजिबात निराश होणार नाही." यशच्या ओठावर एक गूढ हास्य पसरले होते.

मनीषा आणि पंकजला यश कुठे घेऊन जात असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all