हवास मज तू!भाग -१०१

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -१०१

मागील भागात :-
मनीषा आणि पंकज हॉटेलमधील सुखसुविधेचा आनंद लुटत असतात. यश त्यांना बाहेर फिरायला न्यायला येतो.
आता पुढे.


"नयनरम्य ठिकाण? म्हणजे नेमके कुठे? नरिमन पॉईंट, चौपाटी की आणखी दुसरे?"


"तुम्ही जास्त ताण घेऊ नका मॅडम. जस्ट वेट अँड वॉच. अशा ठिकाणी घेऊन जातोय की जिथे तुम्ही अजिबात निराश होणार नाही." यशच्या ओठावर एक गूढ हास्य पसरले होते.

*******

"...आजवर मी मिसेस शैली केळकर यांना दोषी मानत होतो. माझ्या बाबांचा खून त्यांनी केला असा माझा समज होता. आता मात्र पटलंय ते सगळे खोटे होते. जे काही घडले त्याला कारणीभूत म्हणजे एकच व्यक्ती होती आणि ती व्यक्ती म्हणजे तू होतास. तू म्हणजेच शशांक केळकर.


ही तीच जागा ना? इथेच माझ्या वडिलांचा खात्मा केलास ना? मीही तुला इथेच संपवेन. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा मी बदला घेईन." डोळ्यात खूनशी भाव घेऊन शौनक शशांकच्या दिशेने सरकत होता.


"शौनक, तू वेडा आहेस का? माझ्या काकाने काहीही केले नाहीये. तो निर्दोष आहे. प्लीज त्याला सोड. प्लीज." त्याच्याजवळ उभी असलेली शौर्या गयावया करत होती.

"बाजूला हो शौर्या, तुला नाही कळायचे. अगं हा माणूस तुझ्याही आईवडिलांचा खुनी आहे. माझ्या वडिलांना तुझी आई आवडत होती तर कशाला याने मोडता घातला? का तुझ्या आईला तो घरी घेऊन यायचा? याच्यामुळेच माझ्या बाबापासून तुझी आई दुरावली. हाच सगळ्यांना कारणीभूत आहे, हाच खुनी आहे. मी सोडणार नाही." हातात धारदार सुरा घेऊन तो शशांकवर धावून आला.


"विहान, विहान अरे, मला बोलायला एक संधी तरी दे.."


"नाही, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही."

शशांकचे बोलणे मध्येच तोडत शौनकने त्याच्या पोटावर पूर्ण शक्तिनीशी वार केले. सप,सप, सप.. एक, दोन, तीन.. त्याचे वार सुरूच होते. रक्ताच्या थारोळ्यातील शशांक खाली कोसळला आणि शौर्याने जोरात किंकाळी फोडली..

"काकाऽऽ" तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या.


"प्रिन्सेस, काय झाले? तू इतकी का घाबरली आहेस?" करकचून ब्रेक दाबून कार थांबवत शशांकने विचारले.


"काका..माय डिअर एसके.. तू ठीक आहेस?" त्यांच्याकडे त्याच्या चेहऱ्यावून हात फिरवत तिने आश्चर्याने विचारले.


"हो, मी बरा आहे. हे घे. पाणी पी." तिला आश्वस्त करत तो म्हणाला.


"प्रिन्सेस, बहुधा तुला काहीतरी वाईट स्वप्न पडलं असावं. इथे येताना तुझा डोळा लागला होता." तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला.


"चल, उतरूया आता."


"आपण कुठे आलो आहोत?" तिच्या डोळ्यातील गोंधळ, आश्चर्य कायम होते.


"असं काय करतेस? आपण आपल्या जुन्या जागेकडे नाही का आलोत? उतर आता." तो.


"आणि शौनक?" तिचा प्रश्न.


"तो सुद्धा आलाय की. कारबाहेर थांबलाय."

तिने काच खाली सरकावून बाहेर नजरे टाकली. शौनक आपले दोन्ही हात पँटच्या खिशात घालून कुठेतरी दुरवर पाहत होता.


"तुला काही स्वप्न पडलं होतं का?" ती खाली उतरली तेव्हा शशांकने काळजीने विचारले.


"हम्म. स्वप्नच होतं." स्वतःला सावरत ती म्हणाली.


ऑफिसमधून ते इकडे यायला निघाले तेव्हा ती बॅकसीटला डोके टेकवून बसली होती. वाटेत तिचा डोळा कधी लागला तिला कळलेच नाही. जाग आली तेव्हा एका भयानक स्वप्नाची ती बळी पडली होती.


बाहेरच्या वाऱ्यात तिने एक मोकळा श्वास घेतला. आता कुठे तिला थोडेसे बरे वाटू लागले होते.


शशांक तिचा हात पकडून पुढे जाऊ लागला. किमान पाच एकरात वसलेली ती जागा अजूनही तशीच होती. संपूर्ण जागेवर वाढलेल्या गवताने वेढा घातला होता. त्या काळात सुरु करण्यात आलेले बांधकाम अजूनही तेवढेच होते उलटपक्षी त्याची तुटफूट झाली होती.

कालच्या पावसाने कुठे पाणी साचले होते तर कुठे ओलसर जमीन होते. बघायला गेले तर तिथे वावगे असे काहीच नव्हते आणि तरीही शौर्याच्या मनात परत भीती दाटली.


"काका, आपण आत जायलाच हवे का? बघ ना तिकडे किती गवत आहे?" चेहऱ्यावर कसले भाव न दाखवता ती म्हणाली.


"सर, तिला यायचे नसेल तर ती थांबू शकते. आपण दोघे जाऊया." वॉल कंपाउंडजवळ पोहचत तो म्हणाला.


"नाही नको, मी तुम्हा दोघांनाच एकटे जावू देणार नाही." ती तशीच त्यांच्याकडे जात म्हणाली.

काही वेळापूर्वी पाहिलेले स्वप्न डोक्यात तळ ठोकून बसले होते. तिच्या लाडक्या एसकेसाठी आता तिला कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती.


ती जवळ आल्यावर शशांकने तिथले लोखंडी फाटक उघडले. इतक्या वर्षांपासून त्या फाटकावर गंज चढला होता. ते उघडताच कर्रकर्र असा आवाज झाला. त्याकडे लक्ष न देता शौनक आणि शशांकने आत पाऊल टाकले.


ती मात्र तिथेच उभी होती. नजर रस्त्याकडे वळलेली. 'यशला लोकेशन पाठवून कितीतरी वेळ झालाय. तो अजूनपर्यंत कसा पोहचला नाही?' तिचे मन त्याच्यात गुंतले होते. तिच्यामते तो एव्हाना यायला हवा होता.


"शौर्या येतेस ना?" शशांकच्या हाकेने ती विचारातून बाहेर आली. पुन्हा एकवार नजर रस्त्याकडे फिरवून ती आत जायला निघाली.


'मूर्ख शौर्या, अशी एसकेला त्या शौनकजवळ एकटे कसे सोडू शकतेस? तो किती डेंजर आहे हे तुला माहितीये ना?' मनातल्या मनात स्वतःवर आगपाखड करत ती त्यांच्याजवळ येऊन पोहचली.


"खूप विस्तृत जागा आहे." कोणी काही बोलत नाहीय हे बघून शौनक म्हणाला.


"हम्म. शैलीला इथे एक मोठा प्लांट उभारायचा होता. त्यावेळी त्याचे बांधकाम सुरु केले होते. नंतर मात्र माझी हिंमत धजावली नाही."

बोलता बोलता तिघे एका पडक्या भिंतीपाशी येऊन ठेपले आणि शशांकचे पाय तिथेच अडकले.


"सर, काय झाले?" त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून शौनक जवळ येत म्हणाला.


"ही.. ही तीच जागा." शशांकच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.


"सर?"


"त्या दिवशी असाच मी त्यांना शोधत इथे आलो होतो. माझ्यासोबत एक स्टॉफ मेंबरसुद्धा होता. तिघांना हाका मारून मारून मी थकलो होतो आणि इथेच.. इथेच मला माझा दादा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला."


"एसके.. नको ना रे काही आठवू. तुला त्रास होतोय." त्याचा हात घट्ट पकडत शौर्या म्हणाली.


"त्याला तसे बघून माझा थरकाप उडाला होता. पुढे गेलो तर तिथे शेखर आणि त्याच्या बाजूला शैली खाली कोसळली होती.


शौर्या, विहान..इतक्या वर्षानंतर सुद्धा ते चित्र माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतेय रे. माझ्या आयुष्यातील तीन व्यक्तींना मी एकाच दिवशी गमावले. माझा दादा, शैली मला सोडून गेले होते. माझ्या प्रिय मित्राने इथेच शेवटचा श्वास घेतला होता.


शैलीच्या हातातील सुऱ्याने तिघांचा मृत्यू झाला हे पोस्टमार्टम मध्ये सिद्ध झाले. ते वार एका स्त्रीच्या हातून झाले असे त्यांचे म्हणणे होते आणि सुरा शैलीच्या हातात होता त्यामुळे तीच दोषी म्हणून ठरवल्या गेली.

पण माझं मन सांगतेय, माझी शैली दोषी नव्हती. ती कणखर असली तरी मनाने खूप हळवी होती. ती असे काही करणे शक्य नव्हते." त्याच्या डोळ्याचा बांध फुटला.

शशांकच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शौर्या त्याचा हात घट्ट पकडून त्याला सावरत होती. तिच्या काकाची अवस्था तिला बघवत नव्हती. तिच्या डोळ्यातील आभाळ भरून आले होते.

आणि शौनक? त्याची अवस्था त्याहून बिकट होती. जड पावलाने तो एकटाच पुढे सरकत होता. ज्या ठिकाणी शेखरने प्राण सोडला तिथे तो गुडघ्यावर बसला. तिथल्या ओलसर जमिनीवर त्याने अलगद हात फिरवला. जणू काही खाली शेखरचे कलेवर ठेवले आहे असे त्याला भासत होते.

त्याच्या डोळ्यासमोर वीस वर्षापूर्वीचा काळ उभा राहिला. आईचा हात पकडून, तिच्या पदराआडून शेखरच्या पार्थिवाकडे पाहत असलेला सहा वर्षाचा चिमुरडा त्याला दिसत होता. त्यावेळचे तेच भाव आजही त्याच्या डोळ्यात उतरले होते.

"बाबाऽऽ.." म्हणत त्याने मोठ्याने हंबरडा फोडला. जमिनीवरची ओलसर माती हातात घेऊन तो तसाच बसून रडत होता.


"विहान, बाळा सावर स्वतःला. जे घडून गेले ते खूप वेदनादायी होते. ती जखम अजुनपर्यंत सुकलेली नाहीये. त्यावरची खपली जर वारंवार आपण काढत राहिलो तर जखम सुकण्याऐवजी आणखी चिघळत जाईल आणि त्याचा त्रास आपल्यालाच होईल." त्याच्याजवळ येऊन त्याला उठवत शशांक म्हणाला.

शौनकने उठून शशांकला एक गच्च मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडायला लागला.

"मी माझ्या बाबांना गमावले, माझे बालपण हरवले. बाबाशिवाय माझ्या आयुष्यात एक रितेपण आलेय. ज्याच्यामुळे हे घडलेय त्याला मी कधीच कधीच सोडणार नाही." शशांकच्या खांद्यावर अश्रूभिषेक करत तो बोलत होता.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all