हवास मज तू!भाग-१०२

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -१०२

मागील भागात :-

शशांक विहान आणि शौर्याला घेऊन जुन्या जागेकडे जातो. ज्या ठिकाणी शेखर मृत्यूमुखी पडला होता, ती जागा बघून विहानला रडू कोसळते.

आता पुढे.

शौनकने उठून शशांकला एक गच्च मिठी मारली आणि तो हमसून हमसून रडायला लागला.

"मी माझ्या बाबांना गमावले, माझे बालपण हरवले. बाबाशिवाय माझ्या आयुष्यात एक रितेपण आलेय. ज्याच्यामुळे हे घडलेय त्याला मी कधीच कधीच सोडणार नाही." शशांकच्या खांद्यावर अश्रूभिषेक करत तो बोलत होता.

*******

"यश, आपण कुठे आलोय?" यशने कारचा ब्रेक लावताच मनीषाने विचारले. तिच्या मनात उगीचच हुरहूर दाटून आली होती.


"थोडासा डोक्याला ताण द्या की. तुम्हाला सगळं आठवेल." उत्तरादाखल यश हलकेच पुटपुटला.


"काही म्हणालास?" ती.


"अहो मॅडम, विहान सरांच्या नव्या प्रोजेक्टसाठी ही जागा बघायला आलोय. घाबरू नका, खाली उतरा." कारचा दरवाजा उघडत तो म्हणाला.


"विहान? तो कुठे आहे? तो इथे येईल असे तू म्हणाला होतास ना?" पंकज.


"हम्म. सर आले असतीलच. आपण मागच्या गेटने आत आलोय ना म्हणून ते दिसले नाहीत. चला आपण समोर जाऊया." गवतातून वाट काढत तो त्यांना घेऊन जात होता.


"ही कसली जागा? इथे किती गवत आणि कचरा वाढलाय. ही जागा तो का घेतोय?"


"वीस वर्षापासून ही जागा पडीक आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. एकदा का इथे नवी बिल्डिंग तयार झाली की मग तुमचा इथून पाय निघणार नाही." तो हसून म्हणाला.


"मुंबईसारख्या शहराला लागून असणारी ही जागा पडीक कशी? काही भानगड तर नाहीये ना?" पंकजच्या मनात शंकेची पाल चुकचूकली.


"कारण आजपर्यंत एकाही पारखी जोहऱ्याची नजर या जागेवर पडली नसावी." एक अनोळखी आवाज कानावर पडला तसे पंकज आणि मनीषाने वळून समोर पाहिले.


"आपण कोण?" मनीषाने त्याला विचारले.

"मी एक जोहरी, रत्नपारखी. माझ्या नजरेतून काहीच सुटत नाही. मग माणसं असोत की जागा." मनीषावर नजर रोखत तो म्हणाला.

त्याच्या उत्तराने ती जराशी चपापली. चेहऱ्यावर एका क्षणासाठी वेगळेच भाव उलटून गेले.


"मिस्टर जोहरी की रत्नपारखी? नेमके कोण आहात तुम्ही?" पंकजने थोड्या कडकपणे विचारले.


"हे मिस्टर कृष्णा. एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. कुठली जागा कशासाठी उपयोगी पडेल, कुठे कोणता प्रोजेक्ट उभारला तर त्याला भाव मिळेल हे सगळं त्यांना कळते म्हणून ते स्वतःला रत्नपारखी म्हणवून घेतात." त्यांचा गोंधळ दूर करत यशने कृष्णाची ओळख करून दिली.


"पण हे इथे अचानक कुठून आले?" मनीषा अजूनही गोंधळली होती.

"मी इथेच जागेचे निरीक्षण करत होतो. तब्बल वीस वर्षांपूर्वी एसके इंटरप्रायझेसने या जागेत इन्व्हेस्टमेंट केले होते; त्यानंतर आता परत एकदा त्यांचा इथे इंटरेस्ट वाढतोय हे बघून आनंद होतोय.

शैलीमॅडम बद्दल मी खूप ऐकून आहे. आता विहानसाहेब सुद्धा त्यांच्याच दिशेने वाटचाल करत आहेत. ते खूप यशस्वी उद्योजक होतील यात काहीच शंका नाही." कृष्णा ओठ रुंदावून म्हणाला.


"तू भेटलास विहानला?" मनीषाने अधीरतेने विचारले.


"ते तिकडे जागेचे निरीक्षण करत आहेत. सोबत पुन्हा एक मोठे साहेब आणि मॅडम आहेत म्हणून मी डिस्टर्ब केले नाही. तसेही आमच्या मीटिंगला अजून दहा मिनिटे बाकी आहेत." त्याने पुन्हा आपली बत्तीशी दाखवली.


"मला तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कुठे ते नेमके आठवत नाहीये. आपण पूर्वी कधी भेटलो होतो का?" मनीषाने त्यांच्याकडे एकटक बघत म्हणाली.


"हो. आत्ताच दोन तासापूर्वी. हॉटेलमध्ये."

त्याने सांगितल्यावर तिने डोक्याला ताण दिला, तसे तिला आठवले, पंकजसोबत दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेत असताना बाजूच्या टेबलवरची एक नजर तिच्याकडे बघत आहे हे तिला जाणवत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ती पंकजला घास भरवण्यात मग्न झाली होती.


"अच्छा, म्हणजे आम्ही जिथे उतरलोय तिथेच तू सुद्धा थांबला आहेस होय?" ती.


"हम्म! आणि तुम्ही जिथून आलेले आहात तिथूनच मी सुद्धा आलोय. इव्हन आपण एकाच फ्लाईटमध्ये होतो." तिला अधिकची माहिती पुरवत तो म्हणाला.


"बरं, ते सोडा. मी तुम्हाला इथली माहिती सांगतो. या माझ्याबरोबर." ती त्याच्याकडे बारकाईने बघतेय हे जाणवताच कृष्णा पुढे जात म्हणाला.

"वीस वर्षांपूर्वी शैली केळकरांनी या ठिकाणी एक नवा प्रोजेक्ट करायचे ठरवले होते. त्या काळी अशा ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करणे यातच त्यांची दूरदृष्टी दिसून येते. बाई खूप हुशार होती. आहे त्या परिस्थितीत राहण्याऐवजी समोरचा विचार त्या करायच्या."


"काय सांगता?" यश त्याला म्हणाला.


"हो तर. पण एवढी हुशार असलेली बाई समोर असलेला आपला मृत्यू पाहू शकली नाही हे केवढे दुर्दैव! असं म्हणतात की त्यांचा याच ठिकाणी मृत्यू झाला. त्यांचा नवरा आणि एक सहकारी देखील मारल्या गेला. तेव्हापासून इथे पुन्हा कोणी फिरकले नाही आणि त्या प्रोजेक्टचा गाशा गुंडाळला." कृष्णा पुढे म्हणाला.


"अरेरे! कोणी मारलं असेल बिचाऱ्या शैली मॅडमना? त्यांचं नावच किती भारी आहे ना? शैली! त्यांच्या कामाची एक निराळीच शैली होती म्हणतात. त्यांच्या कामावर प्रेम करणारे खूप जण असतील नाही?" मनीषाकडे एक तिरपा कटाक्ष टाकत यश म्हणाला.


"शैली नाव मलाही भारी आवडलंय. तुम्हाला सांगू? खरं तर मीसुद्धा त्यांच्या प्रेमात पडलोय. एक मात्र खरं, जेवढं व्यक्तिमत्व मोठं तेवढा त्यांचा व्याप मोठा आणि ज्याच्यावर प्रेम करणारी माणसं फार; तेवढीच द्वेष आणि राग करणारी मंडळीसुद्धा जास्तच. मला तर वाटते असेच त्यांच्या एखाद्या वैऱ्याने किंवा जुन्या प्रियकराने शैली मॅडमला मारले असावे." गप्प राहील तो कृष्णा कसला?"


"शैली, शैली, शैली.. पुरे झाले. तुम्ही दोघे त्या नावाचा किती जप करताय, तुम्हाला ठाऊक तरी आहे का?" मनीषा रागाने म्हणाली.


"काय झालं मॅडम? तुम्ही का चिडलात? शैली मॅडमना तुम्ही ओळखत होतात काय?" साधेपणाचा आव आणून कृष्णाने विचारले.


"हो, ओळखत होते. तुम्हाला वाटते तेवढी साधी स्त्री नव्हती ती. स्वतःच्या नवऱ्यासोबत माझ्या नवऱ्यालादेखील त्या बाईने गिळलेय." ती उत्तरली.


"तुमचा नवरा? मग हे कोण आहेत? म्हणजे सॉरी.. पण मला वाटलं होतं की मिस्टर पंकज तुमचे पती आहेत. असं नाहीये का?" यश भोळेपणाने म्हणाला.


"तुला काय करायचंय? तू आपल्या कामाशी काम ठेव. विहानचा तू पीए आहेस ना? मग माझ्या पर्सनल लाईफमध्ये का शिरतोस?" ती चांगलीच खवळली होती.


"ओह, तिकडे बघा. विहान सर तिकडे आहेत. सोबत दुसरे सर देखील आहेत. चला आपण तिथेच जाऊया." तिच्या चिडण्याकडे दुर्लक्ष करत त्याने विहानकडे नजर वेधली.

मनीषाने पाहिले, तर विहान आणि शशांक एकमेकांशी बोलत होते. त्यांच्यासोबत एक मुलगी होती.

'कोण असेल ही? शशांकची लेक की शैलीची? आणि विहान त्याच्याशी एवढं काय बोलतोय?' प्रश्नांच्या कल्लोळात तिचे पाय वेगाने त्यांच्या दिशेने वळले.


'विहान खाली बसून काय करतोय? रडतोय का तो? आणि त्याने शशीला का मिठी मारली?' त्याला शशांकच्या मिठीत बघून मनीषा पुढे सरली.


"मी माझ्या बाबांना गमावले, माझे बालपण हरवले. बाबाशिवाय माझ्या आयुष्यात एक रितेपण आलेय. ज्याच्यामुळे हे घडलेय त्याला मी कधीच कधीच सोडणार नाही." विहान शशांकच्या खांद्यावर डोके ठेवून बोलत होता ते शब्द त्याच्या मागे उभे असलेल्या मनीषाच्या कानावर पडले.


"विहानऽऽ, याला सोडू नकोस. हाच मुख्य दोषी आहे. याच्यामुळेच मी शेखरला गमावले. मार याला. ठार कर. ठार कर एकदाचे."मनीषा ओरडून म्हणाली.


"आई?" तिचा आवाज ऐकून तो शशांकपासून दचकून दूर झाला.


"तू इथे कशी? आणि कधी आलीस?"


"असा काय करतोस? मला तूच बोलावून घेतलेस ना? तुझा मेसेज वाचूनच तर मी आले."


"अगं माझा कुठलाही अपघात झालेला नाहीये. यश तू.."

"अपघात नाही रे. एसके इंटरप्रायझेस आपल्या हाती आले. आपले स्वप्न पूर्ण झाले असा तूच मेसेज केलास ना? तुझ्या या असिस्टंटसोबत माझे बोलणे देखील झाले. तोच तर मला घ्यायला आला होता." ती स्पष्टीकरण देत म्हणाली.


"तुझ्या अपघाताचा मेसेज मी तेव्हाच डिलीट केला. पाठवलाच नव्हता. मिस्टर दासची जी अवस्था करून तू पळून गेलास ना, म्हणून मग दुसरा प्लॅन करून तुझ्या आईला बोलावून घेतले." त्याच्या कानाशी येऊन यश हलकेच पुटपुटला.


"विहान, ते सोड. मला सांग, आपले स्वप्न पूर्ण झाल्यावरही या माणसासोबत तू इथे काय करतो आहेस? याला एकदाचे संपवून टाक. याच्या संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त कर. त्याशिवाय मला चैन पडणार नाही." ती डोळ्यात अंगार घेऊन म्हणाली.

काय करेल विहान? मनीषाचे तो ऐकेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
*******

🎭 Series Post

View all