हवास मज तू! भाग -१०३

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग -१०३

मागील भागात :-
जिथे विहान आणि शशांक पोहचले असतात तिथेच यश मनीषा आणि पंकजला घेऊन येतो. तिथे त्यांची भेट कृष्णाशी होते. विहान आणि शशांकला एकत्र बघून त्याला ठार करायचा आदेश ती विहानला देते.
आता पुढे.


"तुझ्या अपघाताचा मेसेज मी तेव्हाच डिलीट केला. पाठवलाच नव्हता. मिस्टर दासची जी अवस्था करून तू पळून गेलास ना, म्हणून मग दुसरा प्लॅन करून तुझ्या आईला बोलावून घेतले." त्याच्या कानाशी येऊन यश हलकेच पुटपुटला.


"विहान, ते सोड. मला सांग, आपले स्वप्न पूर्ण झाल्यावरही या माणसासोबत तू इथे काय करतो आहेस? याला एकदाचे संपवून टाक. याच्या संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त कर. त्याशिवाय मला चैन पडणार नाही." ती डोळ्यात अंगार घेऊन म्हणाली.

*******


"आई, झोपलात का?" ललिताच्या खोलीचे दार लोटून सुनंदा आत आली.


"जराशी पडले होते गं. काय म्हणतेस?" उठून बसत ललिताने विचारले.


"आई, मला खूप अस्वस्थ झाल्यासारखे वाटते आहे हो. छातीत अचानक धडधडायला लागले. श्वास जड झाल्यासारखे वाटले म्हणून तुमच्याकडे आलेय." छोटासा चेहरा करून सुनंदा म्हणाली.


"वेंधळीच आहेस. अगं, तुझी ऍसिडिटी वाढली असेल म्हणून असे वाटतेय. चल तुला लिंबूपाणी करून देते. घेतलेस की बरं वाटेल." ललिता तिला म्हणाली.


"नाही आई, हे काहीतरी वेगळेच आहे. एक अनामिक भीती दाटून आलीय. शशी ठीक तर असेल ना?" तिच्या डोळ्यात गंगायमुना जमा झाल्या होत्या.


"सुनंदा, भलते विचार का गं डोक्यात आणतेस? शशी एकदम ठीक आहे आणि तो एकटा नाहीय तर त्याच्यासोबत त्याची शौर्यासुद्धा आहे. ती असल्यावर तू का टेंशन घेतेस?" ललिता हसून म्हणाली.


"माहित नाही का? पण मन ऐकायला तयार नाही. आपण देवाजवळ दिवा लावायचा का?" तिची तगमग वाढली होती.


"हो, चल आणि त्यापूर्वी शशीला कॉल करुन बघ. तो उचलत नसेल तर शौर्याला ट्राय कर. उगीचच त्रास करून घेऊ नकोस." तिच्यासोबत देवघरात येताना ललिता म्हणाली.


"शशीचा नंबर लागत नाहीये आणि शौर्या तर कॉलच उचलत नाहीये. काय करू?" ती रडकुंडीला आली होती.


"अगं, इतक्या दिवसांनी शशी ऑफिसला गेलाय ना, तेव्हा एखादी मिटिंग वगैरे आयोजित केली असेल. तू उगाच घाबरू नकोस. ये, देवाजवळ हात जोड." तिला धीर देत असली तरी आता ललितादेखील मनातून थोडीशी घाबरली होती.


"आई, बघितलंत ना? बाहेर कसे अंधारून आलेय. माझी भीती आणखी वाढतेय हो." देवाजवळ जप केल्यानंतर खिडकीपाशी येत सुनंदा म्हणाली.


"सुनंदा, अगं ही मुंबई आहे. इथे पाऊस काय कधीही पडतो. तुला आता हे नवीन आहे का?" शशांकचा नंबर डायल करत असलेल्या सुनंदाला ललिता समजावत म्हणाली.

"हम्म. या वातावरणामुळे नेटवर्क पण गायब झालेय. आता तर दोघांचेही नंबर लागत नाहीयेत." सुनंदाच्या स्वरात खिन्नपणा जाणवत होता.


"हाय गर्ल्स! कॉफी?" तेवढ्यात कॉफीचे तीन मग घेऊन नव्या तिथे आली.


"निवी, तू कॉफी का केलीस? मला सांगितलं असतंस ना?" सुनंदा तिला रागे भरत म्हणाली.


"मम्मा, का चिडतेस? अगं रूममध्ये मला सारखं बोअर होत होतं म्हणून मी बाहेर आले. तुम्ही दोघी इथे दिसल्यात त्यामुळे मग मीच कॉफी केली." सुनंदाची प्रतिक्रिया बघून तिचा चेहरा पडला.


"निवी, तू ठीक आहेस ना बाळा? तुझा त्रास बघवत नव्हता म्हणून सुनंदा रागे भरली. तू मनाला लावून घेऊ नकोस." तिला जवळ घेत ललिता म्हणाली.


"आजी, अगं मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आहे. एखाद्याला आपल्या आयुष्यातून एकदम वजा करणं हे इतकं सोप्पं नाहीये. पण मी आता निर्णय घेतलाय तर अंमलात आणेनच. तुमची साथ तेवढी मला हवी आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात ना गं?" हळवे होत तिने विचारले.

"ऑफ कोर्स डिअर. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. सॉरी निवी अँड थँक्स फॉर कॉफी." सुनंदा तिच्या गालाची पापी घेत म्हणाली.


बाहेरच्या दाटलेल्या आभाळाकडे बघून तिघीही कॉफीचा आस्वाद घेऊ लागल्या. तिघींची परिस्थिती वेगळी, त्याला सामोरे जाण्याची मनस्थितीही वेगळी. लेकाच्या काळजीने लगेच कॉफी संपवून ललिता देवघरात जाऊन बसली. जोपर्यंत त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत तिने देवच पाण्यात टाकले जणू.

सुनंदा तर हातात नुसता मग पकडून बाहेरचा अंदाज घेत उभी होती. बाहेरचे दाटलेले आभाळ तिच्याही डोळ्यात दाटायला सुरुवात झाली होती.

आपल्या हातातील कॉफीचा मग बाजूला ठेवून निवी हलकेच तिच्याजवळ सरकली.

"सर्व ठीक होईल गं मम्मा. मी बरी आहे, जास्त टेंशन घेऊ नकोस." सुनंदाला अलवारपणे मिठी मारत ती कुजबुजली.

*******


"मनी? तू इथे?" शशांक मनीषाकडे आश्चर्याने पाहत राहिला.


"हो, मी इथेच आहे. तुझ्या विनाशासाठी मी कुठेही येऊ शकते. विहान याला सोडू नकोस, एकदाचे संपवून टाक." ती परत कडाडली.


"आई, शांत हो अगं. मला वाटतं तुझा थोडा गैरसमज झाला असावा. एसके सर असं काही करणं शक्य नाही. त्यांना कसली सजा द्यायला सांगतेस?" तिच्याजवळ येत विहान सौम्य शब्दात म्हणाला.


"विहान, तू माझ्याशी उलटे बोलतोस? मला नकार देतोस? अरे, याच ठिकाणी तुझ्या बाबाने शेवटचा श्वास घेतला. मला आठवते ना, अगदी स्पष्ट आठवते. त्या कृत्यात याचाही समावेश नसेल कशावरून?"


"तुमची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. जर तुम्हाला ते स्पष्ट आठवत असेल तर डोक्याला जर थोडासा ताण दिलात तर आणखी बऱ्याच गोष्टी आठवतील." कृष्णा तिच्याजवळ येत म्हणाला.


"ए, जोहरी तू आमच्या मध्ये नाही हं पडायचं?" मनीषा त्याच्यावर चवताळून उठली.


"आठवायला लागले की हेही आठवेल की कसे याच भिंतीआड लपून तुम्ही सगळ्यांची वाट बघत होतात, त्यांना कसे मारायचे याचे बेत आखत होतात आणि आता काय बाबा? सगळं रानच मोकळे झालंय. एकदा का विहानला ढगात पोहचवले की मग एसके इंटरप्रायझेसची राणी म्हणून तुम्ही मिरवणार, बरोबर ना?" तिच्या नजरेत नजर घालून तो पुढे म्हणाला.


"ए, काही काय बोलतोस?" हॉटेलच्या खोलीमध्ये पंकजशी बोललेले तिचे वाक्य कृष्णाच्या तोंडून ऐकून ती बावरली.


"हा रत्नपारखी काहीही बोलत नसतो. जसे जागा बघून तो त्याबद्दल खडानखडा माहिती सांगू शकतो तसेच एखाद्या व्यक्तीला बघून त्याची पूर्ण कुंडली पुढे मांडू शकतो. त्याच्या भूतकाळापासून तर येणाऱ्या भविष्यकाळापर्यंत." आपली नजर न हटवता तो पुढे म्हणाला.


"जसे की हे मिस्टर पंकज. कोल्हापुरातील जनरल हॉस्पिटलमध्ये एक लॅब असिस्टंट म्हणून कामाला होते. सततच्या अत्याचारमुळे बायको सोडून गेली आणि अशात त्यांच्या आयुष्यात मनीषा इनामदार आली. तिच्या लग्नानंतरदेखील हे नाते कायम राहिले. इतके घट्ट की शेखरच्या मृत्यूनंतर सुद्धा तसुभरही कमी झाले नाही. उलट हे प्रेम वाढतच गेले. बरोबर ना मनीषा मॅडम?" पंकजवरची नजर मनीषावर स्थिरावत तो म्हणाला.


"मनाला वाटेल ते बोलू नकोस. तुझ्याकडे काय पुरावा आहे?" चेहऱ्यावरच्या उडालेल्या रंगाची पर्वा न करता मनीषाने त्याला विचारले.

"कृष्णा आहे मी, पुरावे गोळा करणे माझे कामच आहे. पुराव्याशिवाय मी कधी बोलतच नसतो. हातातील लॅपटॉपला पेनड्राईव्ह जोडत तो म्हणाला.


"हे एवढं पुरेसं आहे की आणखी काही हवं?" हॉटेलमधले त्या दोघांचे एकमेकांच्या मिठीतील व्हिडीओ दाखवत तो म्हणाला.

"नवरा गेल्यानंतर इतकी वर्ष एकटीने काढणं सोपं नसतं. पुरुषाप्रमाणे स्त्रियांच्या ही शारीरिक गरजा असतात हे का तुम्ही विसरताय?" स्वतःच्या वागण्याचे समर्थन करत तिने त्यालाच उलट सवाल केला.

"मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. पण तुमच्या या गरजा केवळ तुमचे पती गेल्यानंतरच्या नसून फार पूर्वीपासून आहेत. तुम्हीच ते कबूल केलं आहे. ऐकायचे आहे?" त्याने प्रश्न करत स्क्रीनवरचा व्हिडीओ सुरु केला.

"तुझा तो मातृभक्त विहान? त्याचे काय करायचे?" व्हिडीओमध्ये पंकज तिला विचारत होता.

"त्याचे काय करायचे? त्यालाही त्याच्या बाबाजवळ पाठवून द्यायचे. डायरेक्ट ढगात." ती हसून उत्तरली होती.

"शेखरसारखे यालाही सुरा खुपसून की आणखी कसे?" तिच्या केसांशी चाळा करत तो म्हणाला.


"तसे ऑप्शन तर खूप आहेत, पण बिचाऱ्याला मारणं त्याच्या वडिलांइतके कठीण नाही. माझे हे रूप बघून तर तो असाच अर्धमेला होईल. मग एखादे इंजेक्शन किंवा त्याचा गळा आवळला तरीही काम होऊन जाईल." ती मंद हसली.


"बिचारा मातृभक्त विहान!" तिला जवळ घेत पंकजदेखील हसायला लागला.

"आणखी पुरावे हवे असतील तर बरेच आहेत. आजचे हॉटेलमधले, कोल्हापूरचे तुमच्या घरातले. बघायचे आहेत?" व्हिडीओ बंद करत त्या दोघांकडे रागीट कटाक्ष टाकून कृष्णा म्हणाला.


"कोण आहेस तू? हे असे बनवट पुरावे सादर करून तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही." पंकज पुढे सरसावत म्हणाला.

"मी सबइन्स्पेक्टर कृष्णा, कोल्हापूर जिल्हा गुन्हेशाखा. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी खोटं कधीच बोलत नसतो." त्याची कॉलर गच्च आवडत तो म्हणाला.

"विहान, हा तोतया पोलीस तुला भरकटवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. या शशांकला आधी कायमचे संपवून टाक." मनीषा विहानजवळ येत म्हणाली.

"आई, खरं खरं सांग, बाबांना तूच मारलंस ना? का मारलंस?" विचारताना विहानचे डोळे भरून आले होते.


तिचा गुन्हा कबूल करेल का मनीषा? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all