हवास मज तू! भाग -१०४

वाचा एक अनोखी प्रेमकथा
हवास मज तू!
भाग-१०४

मागील भागात :-
कृष्णा त्याच्याजवळ असलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांसमोर पंकज आणि मनीषाच्या नात्याचे बिंग फोडतो. त्यावरून शेखरला मनीषानेच ठार केले असावे अशी विहानला शंका येते.

आता पुढे.

"मी सबइन्स्पेक्टर कृष्णा, कोल्हापूर जिल्हा गुन्हेशाखा. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी खोटं कधीच बोलत नसतो." त्याची कॉलर गच्च आवळत तो म्हणाला.

"विहान, हा तोतया पोलीस तुला भरकटवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. या शशांकला आधी कायमचे संपवून टाक." मनीषा विहानजवळ येत म्हणाली.


"आई, खरं खरं सांग, बाबांना तूच मारलंस ना? का मारलंस?" विचारताना विहानचे डोळे भरून आले होते.


"विहान?" त्याच्या प्रश्नाने ती गांगरून त्याच्याकडे पाहू लागली.


"म्हणजे तूच मारलंस. का मारलंस त्यांना? सांग ना." तो जोराने ओरडला.


"हो. मी मारलं शेखरला. त्यालाच काय, शैली आणि मयंकला देखील मीच मारलंय." ती मोठ्या आवेशाने म्हणाली. तिची ती नजर जणू काही त्याच्यावर वज्रघात करत आहे असेच त्याला भासत होते.


ती बोलायला लागली आणि त्याच वेळी एकाएकी आकाशात अंधारून आले. काळे मळभ दाटीवाटीने मार्गक्रमण करत होते. केव्हाही मुसळधार जलधारा बरसतील असे चित्र उभे झाले होते.

तिने दिलेली कबुली ऐकून विहान हातपाय गळाल्याप्रमाणे खाली बसला. शरीरात काही त्राण उरले नव्हते. इतक्या वर्षापासून तो त्याच्या बाबाच्या खुनाचा बदला घ्यायला निघाला होता आणि आज त्याची जन्मदात्री तिच्या गुन्ह्याची कबुली देत होती.


"का केलंत असं? का मारलंत त्या निरपराध जीवांना?" कृष्णा तिच्याजवळ येत म्हणाला.


"निरपराध?" ती फिसकन हसली. "निरपराध नव्हे, माझे अपराधी आहेत ते. त्यांचं नुसतं नाव ऐकलं ना तरी अंगाचा तीळपापड होतो. लाही, लाही होते. नुसता राग राग येतो." तिच्या डोळ्यात आताही रागाचे धुमारे धूमसत होते.


"मला तर 'श' या अक्षराचाच राग येतो. शैली, शशांक, शेखर या तिघांनी माझे आयुष्य बरबाद करून टाकले. सर्वात दोषी तर हा शशांक आहे. त्याने शैलीला घरी आणले नसते तर मयंकसोबत मी सुखाने संसार केला असता. माझ्या मयंकला तिने माझ्या आयुष्यातून ओढून नेले आणि मी काहीच करू शकले नाही.

तो मयंक? तोसुद्धा मला समजू शकला नाही. काय तर म्हणे, माझे ते प्रेम नाही आकर्षण होते. आकर्षण तर आकर्षण, माझ्याशी लग्न केले असते तर एकत्र राहून सहवासाने प्रेमात पडले असतेच ना? पण त्याला मला संधी द्यायचीच नव्हती, मग का नाही मारणार मी त्याला?" बोलताना तिला धाप लागली.


"प्रेम असे नसते मॅडम, ते कोणाचा जीव घ्यायला शिकवत नाही." कृष्णा तिरस्काराने म्हणाला.


"प्रेम म्हणजे काय? ते तू मला नको सांगूस. खरं प्रेम काय असते ते पंकज माझ्या आयुष्यात आल्यावर कळले. पण तिथेही माझे दुर्दैव आड आले. त्याच्या बायकोने डिवोर्स दिला नव्हता म्हणून मी त्याच्याशी लग्न करू शकले नाही.

अशात मला शेखर भेटला. राणीसाठी मदत मागायला म्हणून मी मामाकडे येत होते तर मामाने हे जग सोडले हे शेखरकडून मला कळले. शैलीवर वेड्यासारखा तो प्रेम करायचा. मयंक आणि तिचा तडकाफडकी झालेला विवाह बघून तो दुःखी होता. मग मी त्याला माझ्या जाळ्यात ओढले.


कोल्हापूरला आल्यावर त्याची मला खूप मदत झाली. त्याच्याप्रमाणे मी समदुःखी आहे असे समजून तो माझी जास्तच काळजी घेऊ लागला. पंकज आणि मी तर लग्न करू शकत नव्हतो, मग त्याच्याच सांगण्यावरून मी शेखरला लग्नासाठी विचारले आणि काही दिवसात आमचे लग्न झाले.


इकडे एसके इंटरप्रायझेसचा चढता आलेख बघून माझ्या मनात लालसा निर्माण झाली. मी मुंबईत येण्याची गळ घातली. अचानक इथे कुठे काम मिळेना तेव्हा शैलीच्या ऑफिसमध्ये चौकशी करायला सांगितले.


आमचे दैव बहत्तर म्हणून शैलीने त्याला ठेवून घेतले. शेवटी तो तिचा मित्रच, तिने त्याला विशेषाधिकार बहाल केले. आपल्या ऑफिसच्या मॅनेजमेंट बोर्डात त्याला समावून घेतले.


दिवसभर शेखर ऑफिसमध्ये असायचा. मग मी पंकजला मुंबईत बोलावून घेतले. त्याला इथे काही काम नसले तरी शेखरच्या कमाईतून आमचे आरामात निभायचे. मी एकदा शेखरला शैलीबद्दलच्या भावनेविषयी पंकजशी बोलले असता त्यानेच हा प्लॅन सुचवला.


एसके इंटरप्रायझेस आपल्या हाती आल्यावर आपण करोडोपती होणार ही हाव मनावर चढत गेली आणि त्यासाठी शेखरला मारावे लागेल यावर आमचा शिक्कामोर्तब झाला."


"शी! मनीषा किती नीच आहेस गं तू? तुझ्या डोक्यात इतक्या विखारी भावना असतील असे मला कधीच वाटले नव्हते." शशांकचे डोळे वहायला लागले होते.


"श्श! तू तर काही बोलूच नकोस शशी. त्या दिवशी तू तिथे असतास ना तर तुलाली मी सोडले नसते, इतकी विखारी आहे मी.

शैलीचे मन जाणून घ्यायला मीच शेखरला तिच्यासमोर प्रेमभावना व्यक्त करायला लावल्या होत्या. खरं तर तो आता हे विसरला होता. माझ्याशी प्रामाणिकपणे संसार करू पाहत होता. मात्र मलाच तो नको होता.

माझ्या सांगण्यावरून शेखरने तिला सहजच पुन्हा प्रेमाची कबुली दिली आणि शैली चांगलीच खवळली. तिचे ते रूप बघून तो हे माझ्या सांगण्यावरून गमतीत बोलतो आहे हे कबूल करायला गेला पण तिने काही ऐकूनच घेतले नाही. उलट मयंक आणि शशीला याबद्दल सांगितले.

दोघे त्याच्यावर कमालीचे चिडले होते आणि याचा फायदा आम्ही घ्यायचे ठरवले. मला एकदाच मयंकला भेटायचे आहे अशी मी शेखरला गळ घातली. मला त्याची आणि शैलीची माफी मागायची आहे यावर विश्वास ठेवून शेखर तयार झाला.

त्या प्रकरणानंतर दोन दिवसांनीच ही संधी चालून आली. त्यांच्या प्रोजेक्टची मिटिंग होती. त्यानंतर ते तिघे इथले बांधकाम बघायला येणार होते. शेखर म्हणाला की मी मयंकला इथे भेटू शकते. त्यानेच या जागेविषयीची मला माहिती पुरवली आणि पंकजसह मी माझा प्लॅन तयार केला. पंकजने मला एक धारदार सूरी
आणून दिली.

ते असेच दिवस होते, पावसाळी. असेच आकाश काळेकुट्ट झाले होते. ते तिघे इथे येणार की नाहीत याची मी इथेच या भिंतीआड लपून वाट पाहत होते." ती बोलता बोलता क्षणभर थांबली.


"तिघांनाही एकाच वेळी संपवायचे अशा पूर्ण तयारीनीशी तुम्ही इथे आला होतात तर." कृष्णाने जळजळीतपणे पाहत विचारले.


"नाही. मला तर फक्त शेखरला संपवायचे होते आणि त्याचा आळ शैली आणि मयंकवर आणून त्यांना फसवायचे होते. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. त्या तिघांना हसतखेळत एकत्र येताना बघून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. बहूतेक त्यांची डील सक्सेस झाली होती आणि ते तिघे त्याच आनंदात धुंद होते.

शेखर आणि शैली चर्चा करताना जरा मागे थांबले. मयंक एकटाच पुढे आला आणि इथे पोहचताच मी त्याच्या पुढ्यात उभी राहिले. त्याला शैली सोबत इतके आनंदी बघून स्वतःच्या रागावरचे नियंत्रण मी गमावून बसले आणि माझ्या हातातील सूरीने त्याच्या पोटावर वार करू लागले.

त्याच्या किंकाळीने शैली आणि शेखर धावतच इथे आले ते मयंकला सावरत असताना मी शेखरवर घाव घातला. अगदी त्याच त्वेषाने आणि तितक्याच द्वेषाने.

मयंक एका बाजूला तर शेखर दुसरीकडे पडला होता. शैली अजूनही काय घडतेय या धक्क्यात होती तोच मी तिच्यावरही वार केला. तिनेच माझ्या मयंकला माझ्यापासून हिरावले होते मग मी तिला कशी जिवंत सोडले असते?

शैली खाली कोसळली तेव्हा तिच्या पोटातील सूरी बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होती, आणि त्यामुळे त्या सुरीवर तिच्या हाताचे ठसे उमटले.

निसर्गाला कदाचित हाच न्याय मान्य असावा. कारण मुसळधार पावसाने माझ्या कपड्यावरील रक्त धुवून निघाले होते. मी काही घडलेच नाही अशाप्रकारे घरी गेले. सायंकाळी केव्हातरी पोलिसांचा फोन आला तेव्हा काही ठाऊक नाही अशाप्रकारे मी सर्व प्रक्रियेला सामोरे गेले. विहानला मुद्दाम सोबत घेतले. त्याच्या वडीलाचा मृत चेहरा कायम त्याच्या लक्षात रहावे आणि आपल्याला न्याय मिळण्यासाठी मी म्हणेन ते त्याने ऐकावे एवढाच माझा हेतू होता." तिचे सांगून संपले होते.


"मनी, अगं स्वतःच्या लहान लेकरावर पण तुला दया नाही आली? शेखरच्या मृत्यूनंतर अचानक येऊन तू माझ्याकडे जी मागणी केलीस, त्यावरून या प्रकरणात कुठेतरी तूच जबाबदार आहेस याची मला जाणीव झाली होती. केस पुढे सुरु ठेवली असती ना, तर अलबत तुझ्यावरचे आरोप सिद्ध झाले असते. पण तुझ्या चिमुकल्या मुलाविषयी कणव वाटून तुझी मागणी मी पूर्ण केली आणि तू? तू तर माता असून वैरीन निघालीस. स्वतःच्या मुलाला पोरके केलेस. त्याच्याबद्दल तुला जरासुद्धा काही वाटले नाही का गं?" सुन्नपणे शशांकने विचारले.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
*****

🎭 Series Post

View all