हवास मज तू!भाग-१०५

वाचा एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -१०५

मागील भागात :-

कृष्णाने आपला इंगा दाखवताच मनीषा शेखर, शैली आणि मयंकच्या मृत्यूचे सत्य सर्वासमोर आणते.

आता पुढे.

"मनी, अगं स्वतःच्या लहान लेकरावर पण तुला दया नाही आली? शेखरच्या मृत्यूनंतर अचानक येऊन तू माझ्याकडे जी मागणी केलीस, त्यावरून या प्रकरणात कुठेतरी तूच जबाबदार आहेस याची मला जाणीव झाली होती. केस पुढे सुरु ठेवली असती ना, तर अलबत तुझ्यावरचे आरोप सिद्ध झाले असते. पण तुझ्या चिमुकल्या मुलाविषयी कणव वाटून तुझी मागणी मी पूर्ण केली आणि तू? तू तर माता असून वैरीन निघालीस. स्वतःच्या मुलाला पोरके केलेस. त्याच्याबद्दल तुला जरासुद्धा काही वाटले नाही का गं?" सुन्न होत शशांकने विचारले.


"छ्या! त्याच्याबद्दल मला कधीच काही वाटले नाही. त्याचा जन्म म्हणजे एक नैसर्गिक प्रक्रिया होती. त्याचा ना मला कधी आनंद झाला ना कधी कौतुक वाटले.

शेखरने मोठया प्रेमाने त्याचे नाव शौनक ठेवले. पुन्हा आयुष्यात तोच 'श'. हे नाव ऐकूनच मला तिटकारा यायचा. शेखर असताना याचा खोटे खोटे लाड तरी करायचे. नंतर मात्र त्याला मी कधी जवळही घेतले नाही. डायरेक्ट होस्टेलला टाकून दिले. शाळेतील नाव तेच असले तरी मी माझ्या मुखातून 'शौनक' नाव कधीचेच हद्दपार केले होते.

मी तर यालाही केव्हाच आयुष्यातून वजा केले असते पण पंकजने मला रोखले. 'विहान इनामदार" नावाची हुकुमाची सोंगाटी मला माझे राज्य मिळवून देऊ शकते हे त्याने ध्यानात आणून दिले; म्हणून हा आजवर जिवंत आहे.

आता मात्र याचा मला काहीच उपयोग नाही तेव्हा याला जगायचा काहीच अधिकार नाही." असे म्हणत ती विहानवर झेपावली आणि कोणाला काही कळण्यापूर्वी क्षणार्धात पर्समधून धारदार सूरी बाहेर काढून त्याच्या पोटावर जोरात वार केला.


"आँऽऽ" विहानच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. तिचे बोलणे ऐकून तो आधीच अर्धग्लानीत गेला होता. त्यात तिने केलेला हा वार मर्मस्थानी लागून तो तसाच कोसळला.

"शौनकऽऽ" शौर्या जोरात ओरडली.


काय घडले हे एक क्षणभर कोणालाच कळले नव्हते. जेव्हा कळले तेव्हा कृष्णाने मनीषाला ताब्यात घेतले होते. तर शशांकने शौनकला त्याच्या कवेत पकडले होते.


"यू बिच, स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या मम्मापपांना मारलेस, स्वतःच्या नवऱ्याला ठार केलेस आणि आता मुलाच्यादेखील जीवावर उठलीस? कुठे फेडशील हे पाप? तू तर या जगात जिवंत राहण्याच्या लायकीची सुद्धा उरली नाहीयेस." कृष्णाने पकडून ठेवलेल्या मनीषाच्या गालावर चपराक हाणत शौर्या बोलत होती. एक, दोन, तीन.. बेभान होऊन कितीतरी थप्पड ती मनीषाच्या गालावर उमटवत राहिली.


"शौर्या, प्लीज तुम्ही कायदा हातात घेऊ नका. इथली पोलीसयंत्रणा आणि न्यायव्यवस्था या दोघांवर योग्य ती कारवाई करण्यास सज्ज आहे." तिला रोखण्याचा प्रयत्न करत कृष्णा म्हणाला.

त्याच्या बोलण्याचा तिच्यावर तसुभरदेखील परिणाम झाला नाही. मनीषाच्या चेहऱ्यावर तिच्या हाताची बोटे उमटतच होती तसे कृष्णाने यशला इशारा केला.


"शौर्या, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ." तिला स्वतःकडे ओढत यश म्हणाला.


"यश, कसे कंट्रोल करू? केवळ या स्त्रीमुळे मी माझ्या पेरेंट्सना गमावलेय." त्याच्या मिठीत शिरून ती रडत रडत म्हणाली.

"आय नो द्याट. म्हणून तर मी कृष्णाला इथे बोलावून घेतलेय ना? या दोघांनाही कडक शिक्षा होईल. तू काळजी करू नकोस." तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला. त्याच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले होते.


"मिस्टर पाटील, मला वाटते विहानला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवे." शशांकचा आवाज कानावर येताच यश आणि शौर्या दोघेही शौनकजवळ आले.


"शौनक, तुला काहीही होणार नाही. तू धीर सोडू नकोस. आपण हॉस्पिटलला जात आहोत." कारमध्ये शौनकचे डोके मांडीवर घेऊन बसलेली शौर्या त्याला धीर देत होती.


"शौर्या, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो.. तू माझ्यासाठी का एवढं करते आहेस..? मला जगायचे नाही आहे गं. कदाचित माझ्या कृत्याची हीच शिक्षा असेल.."


"शौनक, प्लीज तू जास्त बोलू नकोस ना. तुला निवीची शपथ." त्याचा हात घट्ट पकडत ते म्हणाली.


"नाही.. मला बोलू दे." तिच्या हातावर दाब देत तो म्हणाला. "मी जगेन की नाही मला ठाऊक नाही. मृत्यूच्या जबड्यात सध्या अडकलोय गं. तेव्हा मला एक कन्फेन्स करायचं आहे.." तो लांब लांब श्वास घेत म्हणाला.

"माझे नव्यावर खरंच खूप.. खूप.. प्रेम आहे.. जमलं तर तिला माफ करायला सांगशील.. आय एम सॉरी.. तुला सुद्धा सॉरी.."त्याचा आवाज खोल खोल जात होता.


"शौनक, असा वेड्यासारखा नको ना बोलूस. हे बघ माझी मम्मा आणि तुझे बाबा एकमेकांचे फ्रेंड्स होते. कदाचित त्यामुळे आपल्यात वैर निर्माण होण्यापूर्वी फ्रेंडशिप झाली होती. आपण फ्रेंड्स आहोत स्टुपिड, खूप चांगले फ्रेंड्स आहोत. न्यूयार्कमधले आपले दिवस आठव ना, आपण किती धमाल केली होती?

ते जाऊ दे, तू निवीसोबत घालवलेले तुझे सुंदर क्षण आठव. तिला तू प्रपोज केलेस ते आठव. डोन्ट लूज द होप स्टुपिड." तो काहीच प्रतिसाद देत नाही हे बघून ती रडायला लागली.


"शौर्या, रडू नकोस. आपण हॉस्पिटलला पोहचतो आहोत. एव्हरीथिंग विल बी फाईन डिअर. सगळं काही ठीक होईल." शशांक तिचे अश्रू पुसत म्हणाला.


"एसके, याला ठीक तर व्हावेच लागेल. हा जर का बरा झाला नाही तर मी निवीला कसे तोंड दाखवू? ती हा धक्का नाही रे पचवू शकणार. तिने नाते तोडायचे ठरवले असले तरी तिचे या मुर्खावर खूप प्रेम आहे. तिच्यासाठी तरी याला बरे व्हावे लागेल." तिचा उमाळा दाटून आला.

******

"सर, या दोघांना स्टेशनला घेऊन जातोय, पण तुम्हाला देखील यावे लागेल. सोबत शशांक सर किंवा शौर्या मॅम यांनाही फिर्याद नोंदवायला स्टेशनला येणं भाग आहे." मनीषा आणि पंकजला ताब्यात घेतल्यावर तिथला कॉन्स्टेबल कृष्णाला म्हणाला.


"हो, मी येतोय. एसके सर आणि शौर्या मॅडम विहानला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. तो थोडा स्टेबल झाल्यावरच तुम्ही त्यांच्याशी बोलणे करा. ही एक हाय प्रोफाइल केस आहे हे विसरू नका." कृष्णा त्याला म्हणाला.


यशची कार तिथेच होती. तो शशांक आणि शौर्यासोबत त्यांच्या कारने हॉस्पिटलला गेला होता. कृष्णा यशची कार घेऊन स्टेशनला गेला. तिथे ज्या फॉर्मॅलिटिज करायच्या होत्या त्या त्याने पूर्ण केल्या आणि तोदेखील हॉस्पिटलकडे निघाला.

******

"सुनंदा, बघ आभाळ निवळलेय. इतके काळे ढग भरून आले होते पण पाण्याचा एक टिपूस देखील पडला नाही. असं वाटतंय खूप मोठे संकट टळून गेले असावे." ललिता सुनंदाजवळ येत म्हणाली.

"हो आई, आकाश निरभ्र झाले आणि मलाही थोडे हलके झाल्यासारखे वाटतेय." तिच्याकडे बघून ती हलके हसली.


"शशीचा कॉल आला होता का?"


"अजुनपर्यंत नाही. नेटवर्क नसल्यामुळे माझाही लागत नव्हता. आता परत प्रयत्न करते." ती उत्तरली.


"निवी, तू का गप्प बसली आहेस? काही त्रास तर होत नाहीये ना?" ललिताने विचारले.


"आजी, शरीरावरच्या जखमा आपल्याला दिसून येतात पण मनाच्या जखमेचे काय गं? त्या कधीच भरून येत नाहीत का?" तिच्या डोळ्यात पाणी तरळले. विहानच्या आठवणीने ती कासावीस झाली होती.


"निवी, काळ हे प्रत्येक दुखण्याचे औषध असते. मग ते शरीराचे असो वा मनाचे. काही वेळ जाऊ दे म्हणजे तू या दुखण्यातून बाहेर पडू शकशील." ललिता तिचा हात हातात घेत म्हणाली.

"आणि असं झालं नाही तर?" तिचा हळवा प्रश्न.

"का होणार नाही? माझी मुलगी खूप स्ट्रॉंग आहे. ती यातून नक्कीच बाहेर पडेल. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत ना? मग कसली काळजी करतेस? आणि तरीही नाहीच झालं तर विहानला माफ करून त्याला परत एक चान्स देऊन बघ. कदाचित त्याचेही तुझ्यावर खरेच प्रेम असू शकते." सुनंदा तिला जवळ घेत म्हणाली.


"नाही, त्याला मी कधीच माफ करणार नाही. तो खूप दुष्टपणे वागलाय. दीला त्याने खूप त्रास दिलाय. मी माझा त्रास सहन करेन पण त्याला कधीच माफ करू शकणार नाही." ती हुंदका देत म्हणाली.

"बरं बाळा, तुला वाटेल तसं. फक्त तू अशी रडू नकोस गं राणी. आमच्याने तुझे अश्रू नाही बघवत." तिचे डोळे पुसत सुनंदा म्हणाली.

"आणि हे काय? तुझी कॉफी तशीच गार झालीय. थांब मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणि दुसरी कॉफी घेऊन येते."

"सुनंदा, अगं तुझी कॉफीदेखील तशीच आहे. तुम्ही दोघींनीही प्यायली नाहीये. तू निवीजवळ थांब. मीच तुमच्यासाठी काहीतरी गरमागरम खायला आणते." दोघींचे मग आत घेऊन जात ललिता म्हणाली.

"मम्मा, डॅडला कॉल करून बघू का?" ललिता गेल्यावर निवीने सुनंदाला विचारले.

"हो, कर बाई. मी केव्हाची ट्राय करतेय पण नेटवर्क मिळत नाहीये, किमान तुझा तरी कॉल लागेल." सुनंदाने होकार द्यायचा अवकाश की नव्याने नंबर देखील डायल केला.

'ट्रिंग.. ट्रिंग..'

शशांकच्या मोबाईलची रिंग वाजायला तर लागली, तो कॉल उचलेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
******


🎭 Series Post

View all