हवास मज तू! भाग-१०६

वाचा एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग-१०६

मागील भागात :-
जखमी झालेल्या शौनकला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर शशांकला नव्याचा कॉल येतो. तो तिचा कॉल घेईल का? वाचा या भागात.


मम्मा, डॅडला कॉल करून बघू का?" ललिता गेल्यावर निवीने सुनंदाला विचारले.

"हो, कर बाई. मी केव्हाची ट्राय करतेय पण नेटवर्क मिळत नाहीये, किमान तुझा तरी कॉल लागेल." सुनंदाने होकार द्यायचा अवकाश की नव्याने नंबर देखील डायल केला.

'ट्रिंग.. ट्रिंग..'


"प्रिन्सेस, निवीचा कॉल येतोय. तिला काही कळले तर नाही ना? तिच्याशी बोलण्याची माझी हिंमत नाही गं होणार." इतका वेळ कणखरपणे वागत असलेला शशांक मोबाईलवर लेकीचा नंबर हळवा झाला होता.


"काका, अरे तिने सहज कॉल केला असेल. तू उगाच पॅनिक होतो आहेस. मी बघते." म्हणत तिने त्याच्या हातून मोबाईल घेतला.


"हॅलो डॅड, अरे कुठे आहेस? मम्मा तुला केव्हाची ट्राय करतेय?"

पलीकडून नव्याचा आवाज ऐकून शौर्याला एकदम भरून आले. कालच्या प्रसंगानंतर ती आज तिच्या लाडकीचा आवाज ऐकत होती. फोनवर ती आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत असलेला शौनक. तिच्या डोळ्यातून टचकन एक थेंब गालावर ओघळला.


"हॅलो, अरे काही तर बोल ना." समोरून काहीच रिस्पॉन्स येत नाही हे बघून ती परत म्हणाली.


"हॅलो, निवी.." शौर्याचा जड आवाज नव्याच्या कानावर पडला.

तिचा आवाज ऐकून नव्या एकदम स्तब्ध झाली. क्षणभर काय बोलावे हेच तिला समजले नाही.


"निवी.."


"दी, आय एम सॉरी. मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना?" ती भावनिक होत म्हणाली.


"नाही रे बच्चा, आता सोड ना तो विषय." शौर्या.


"दी, तुम्ही दोघे कुठे आहात? डॅड ठीक आहे ना? मम्मा त्याची काळजी करत बसलीय." नव्या सांगत होती.


"हो अगं. काका ठीक आहे. बरं, मी अर्ध्या तासाने तुला कॉल करते, चालेल ना?" तिच्या उत्तराची वाट न बघताच तिने कॉल डिस्कनेक्ट केला.

शौर्याचे बोलणे थांबताच शशांकने तिच्याकडे प्रश्नार्थक नजर टाकली. तिने खुणेनेच नव्याला काही ठाऊक नाही हे सांगत त्याला आश्वस्त केले.

******

ओटीतील बेडवर शौनक निपचित पडला होता. मनीषाने त्याला दिलेला मानसिक धक्का आणि शरीरावर झालेली जखम यामुळे तो अजूनही अर्धवट ग्लानीत होता.

शौर्याने त्याला त्याचे न्यूयार्कमधील दिवस आठवायला सांगितले होते. त्या आठवणीसरशी त्याच्या डोळ्यासमोर त्याचा तेथील शेवटचा दिवस आठवला. त्याने तिला किती हर्ट केले होते ते आठवले.

नव्यासोबत घालवलेले दिवस आठवताच त्याला त्याचे प्रपोजल आठवले. आनंदाने खुललेली नव्या आणि आपली पहिली चाल यशस्वीरित्या पार पडली या धुंदीत असणारा तो!

दोन्ही आठवणींनी त्याच्या मनावरची खोल जखम आणखीनच चिघळत गेली.

'का असे वागलो मी? का आईच्या मनसुब्याला समजू शकलो नाही? तिने मला कधी तिचा मानलेच नाही. का माझा इतका राग? का इतका दुस्वास? तिचाच मुलगा असूनदेखील आपलेपणापासून का मी कायम वंचित राहिलो?

प्रेम आंधळे असते म्हणतात, आईचे प्रेम इतके आंधळे होते का? की तिला तिच्या पोटच्या गोळ्याबद्दल देखील कधीच माया जाणवली नाही?' त्याच्या डोळ्याच्या कोनातून पाणी बाहेर पडायला लागले.


"मिस्टर शौनक, आता कसे वाटतेय?" त्याच्या मनाच्या जखमेवरच्या प्रतिसादाची खूण त्याच्या डोळ्याच्या माध्यमातून शरीरावर उमटली होती. ते बघून डॉक्टरांनी त्याला प्रश्न केला.

उत्तरादाखल त्याने पापण्यांची हालचाल केली.


"गुड, थोडक्यात निभावले म्हणायचे. तुमच्या पोटावरची जखम फार खोल नाहीये, पण मनावर जे घाव बसले आहेत त्याचा त्रास जास्त आहे. त्यातून बाहेर पडायला सुरुवात करा. तुमची तब्येत सुधारायला मदत होईल." त्याला रूम मध्ये शिफ्ट करायला सांगताना डॉक्टर त्याला एक मोलाचा सल्ला देऊन गेले.


"डॉक्टर, शौनक कसा आहे?" ओटीमधून डॉक्टर बाहेर येताच शौर्याने त्यांना प्रश्न केला.


"नाऊ ही इज आऊट ऑफ डेंजर. पण त्यांच्या मनाला जपावे लागेल. तेव्हाच ते सगळ्यातून लवकर बरे होतील." तिला दिलासा देत डॉक्टर निघून गेले.


"एसके, ऐकलेस ना? काळजी करण्यासारखे काही नाहीये." शौर्या शशांककडे बघून म्हणताच त्याच्या ओठावर पुसटसे स्मित उमटले.


"शौनक, आता तुला बरे वाटतेय ना?" त्याच्या खोलीत प्रवेश करत शौर्याने त्याला विचारले.


"मी बरा आहे. शौर्या, मला नव्याला भेटायचे आहे. सर तुमची परवानगी असेल तर तिला इथे बोलावून घ्या ना. प्लीज?" त्याने शशांककडे एक नजर टाकली.


"आजच्या दिवस थांब. उद्या डिस्चार्जनंतर घरीच चल. तिथे गेल्यावर बोलू." शशांक त्याला समजावत म्हणाला.

"नाही सर, मला आता आणखी वाट बघायची नाहीये. प्लीज, एकदा तिला बोलवा ना, शेवटचे. त्यानंतर मी कधीच तिच्या वाटेत येणार नाही." तो भरल्या डोळ्याने म्हणाला तसे शशांकने शौर्याकडे पाहिले. तिने नजरेनेच त्याला दुजोरा दिला.


"हॅलो, निवी.. बाळा तू सिटी केअर हॉस्पिटलला ये ना." बरोबर अर्ध्या तासाने शौर्याने नव्याला कॉल लावला.


"हॉस्पिटल? दी डॅड ठीक तर आहे ना? मला खरं खरं सांग. तुला माझी शपथ." हॉस्पिटलचे नाव ऐकून पॅनिक होत नव्या म्हणाली.


"हॉस्पिटल? शशी ठीक तर आहे ना?" नव्याच्या हातून मोबाईल घेत सुनंदाने तो कानाला लावला.


"काकू, अगं काका ठीक आहे. ते शौनक.." तिने थोडक्यात शौनकबद्दल तिला सांगितले. कॉल स्पीकरवर असल्याने तिघींनाही शौनक ऍडमिट असल्याचे समजले. वेळ न दवडता त्या तिघी हॉस्पिटलकडे रवाना झाल्या.

******

"हॅलो मिस्टर फायटर, बरा आहेस ना?" कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोहचला होता.


"येस सर. आय एम फाईन नाऊ." हलके स्मित करत शौनक उत्तरला.


"ओके देन. मला निघायला हवे. नाहीतर माझी फियान्सी माझी वाट लावेल. काळजी घे." त्याच्याशी भेटून कृष्णा बाहेर आला.


"एसके सर, तुमचे मी केवळ नाव ऐकून होतो. आज भेटायचा योग आला. नाईस टू मीट यू." शशांकला शेकहॅन्ड करत निघत असतानाच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.


"प्रीती, डिअर. अशी रागावू नकोस ना. मी बस मुंबईहून निघतोच आहे. अर्ध्या तासाने फ्लाईटमध्ये आणि नंतर मी तुझ्या पुढयात असेन. प्रॉमिस! बाय. लव्ह यू." फोन ठेवत त्याने एक सुस्कारा टाकला.

"प्रीती मॅडम?" त्याने मोबाईल ठेवताच शौर्याने स्मित करत विचारले.

"हम्म. माय फियान्सी. माझे आयपीएसचे ट्रेनिंग पूरे झाले को आम्ही लगेच लग्न करणार आहोत. तोपर्यंत हे असेच चालणार." मोकळे हसत तो म्हणाला.


यश, मित्रा तुला आता मला एअरपोर्टवर सोडून देण्याचे कष्ट घ्यावे लागतील." यशकडे बघून तो म्हणाला.


"अरे, काही काय? उलट हे माझेच काम आहे, चल." बाहेर कारकडे जायला निघत यश म्हणाला.

यशसोबत काही पावले चालल्यावर कृष्णा परत माघारी शौर्याजवळ आला. त्याचे सावळे रूप, त्यावर उठून दिसणारे काळेभोर डोळे तिला भुरळ घालत होते.


"शौर्या मॅडम, तुमच्या यशला मी घेऊन जातोय पण लवकरच परतदेखील पाठवेन. काय ना, पठ्ठा तुमच्या प्रेमात पार वेडा झालेला आहे. त्याला असे सहजासहजी सोडू नका." ती काही म्हणायच्या आत कृष्णा तिथून निघून गेला. तो गेल्याच्या दिशेने बघत शौर्या गालात हलकेच हसली.

******

"दी, विहान? कुठे आहे तो? कसा आहे?" नव्या सुनंदा आणि ललितासह हास्पिटलला पोहचली होती.


"तसा आता बरा आहे तो. फक्त त्याच्याशी बोलताना फारसे रुडली बोलू नकोस आणि रडू नकोस. आत जा
तो तुझी वाट बघत आहे." तिला आत पाठवत शौर्या म्हणाली.


"शौर्या, बाळा मला माफ कर गं. मी तुझ्यावर खूप ओरडले." सुनंदाने भरल्या डोळ्याने शौर्याला साद घातली.


"काकू, असे नको ना गं बोलूस. काकू असलीस तरी तूच माझी आई आहेस. माझ्यावर ओरडण्याचा तुला पूर्ण हक्क आहे." तिला मिठी मारत शौर्या म्हणाली. त्या दोघींना तसे मिठीत बघून शशांक आणि ललिताही त्यांच्यात सामिल झाले.


"विहान.." नव्याची प्रेमळ साद कानावर पडताच शौनकने डोळे उघडले.


"नव्या, तुझ्या त्या विहानचा अंत झालाय गं. तुझ्यासमोर विहान इनामदार नव्हे तर शौनक कारखानीस, शौनक शेखर कारखानीस आहे." किलकिली नजर करून तिच्याकडे पाहत तो म्हणाला. त्याचे डोळे भरून आले होते.


"मी तुला खूप त्रास दिला ना? आय एम सॉरी. यापुढे मात्र असे होणार नाही. मी तुझ्या आयुष्यातून कुठेतरी खूप दुरवर बिघून जाईन. कायमचा. आय प्रॉमिस." तिचा चेहरा नजरेत सामावत तो म्हणाला.


"विहान असू दे नाहीतर शौनक, खूप दुष्ट आहेत तू. मला तू खूप छळलेस रे. खूप त्रास दिलास. तुला यातून सहजासहजी मी सोडणार नाही. तुला सजा तर भोगावीच लागेल." ती डोळ्यात राग आणून म्हणाली.


"तुझ्या शिक्षेस मी पात्र आहे. तू म्हणशील ती सजा भोगायला मी तयार आहे. तू सांग तरी." कातर स्वरात तो म्हणाला.

नव्या विहानला कोणती सजा सुनावेल? वाचा पुढील अंतिम भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all