हवास मज तू!भाग -१०७(अंतिम भाग)

वाचा एका अनोख्या प्रेमकथेचा अंतिम भाग
हवास मज तू!
भाग -१०७(अंतिम भाग)


मागील भागात :-
शौर्याकडून नव्याला शौनक हॉस्पिटलमध्ये असल्याचे कळते. त्याला भेटायला त्या तिघी तिथे जातात. आपला गुन्हा कबूल करून शौनक तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जायचे ठरवतो.

आता पुढे.


"मी तुला खूप त्रास दिला ना? आय एम सॉरी. यापुढे मात्र असे होणार नाही. मी तुझ्या आयुष्यातून कुठेतरी खूप दुरवर निघून जाईन. कायमचा. आय प्रॉमिस." तिचा चेहरा नजरेत सामावत तो म्हणाला.


"विहान असू दे नाहीतर शौनक, खूप दुष्ट आहेत तू. मला तू खूप छळलेस रे. खूप त्रास दिलास. तुला यातून सहजासहजी मी सोडणार नाही. तुला सजा तर भोगावीच लागेल." ती डोळ्यात राग आणून म्हणाली.


"तुझ्या शिक्षेस मी पात्र आहे. तू म्हणशील ती सजा भोगायला मी तयार आहे. तू सांग तरी." कातर स्वरात तो म्हणाला.


"मग ऐक तर." ती आवंढा गिळून म्हणाली. "तुला सजेमार्फत एवढचे विचारते की या क्षणापासून, आजीवन कायमस्वरूपी तू माझ्यासोबत राहशील? माझा सखा, प्रियकर, लाईफ पार्टनर म्हणून भूमिका पार पाडशील? तुझ्यापासून दूर होण्याची मी कधी कल्पनाही करू शकत नाही रे. मला तू कायमचा माझा म्हणून हवा आहेस. तू माझ्याशी लग्न करशील?"

काही वेळापूर्वी कृष्णाने आणलेल्या पुष्पगुच्छातील लाल गुलाबाचे फूल त्याच्यासमोर धरत नव्या त्याला विचारत म्हणाली.


"नव्या.. आय लव्ह यू." उत्तरादाखल तो एवढेच बोलू शकला.


"आय लव्ह यू टू आणि यापुढे मला असे सोडून जायचे
चुकून सुद्धा डोक्यात आणू नकोस. आय कॅन्ट लिव्ह विदाउट यू." त्याला आवेगाने मिठी मारत ती त्याला बिलगली.


"मी सुद्धा." तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला.


"तूर्तास जरा बाजूला सरशील? पोटाला त्रास होतोय म्हणून." तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले तसे स्पष्टीकरण देत तो म्हणाला. त्यासरशी त्याच्या गालावर ओठ टेकवून ती बाजूला बसली.


आता सगळे वाद मिटले होते, गैरसमजावर पडदा पडला होता. त्यांना पुन्हा असे एकत्र आलेले बघून दारात उभे असलेल्या शशांक, सुनंदा आणि ललिताच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

*******

"टेक केअर ब्रो. काळजी घे आणि लवकर बरा हो." कृष्णाला सोडून आल्यानंतर यश शौनकला भेटत होता.


"यश, थँक यू सो मच. तुझ्यामुळेच मी सत्य जाणून घेऊ शकलो, नाहीतर.."

"फरगेट द्याट! जे घडलेच नाही त्याचा विचार करून आता त्रास करून घेऊ नकोस." त्याच्या केसात हात फिरवत तो म्हणाला.


"आणि हो, हा तुझा मोबाईल. सॉरी हं. मोबाईलशिवाय तू कालचा अख्खा दिवस कसा जगला असशील ते मी समजू शकतो; पण तुझा मोबाईल काढून घेणे तेव्हा गरजेचे होते." त्याला मोबाईल परत करत यश मिश्किल हसला.


"यश, हे पैसे." खिशातून काही नोटा काढत शौनक म्हणाला.


"हे कशाला?" काही न कळून यशने विचारले.


"मिस्टर दास. आता कसे आहेत ते? त्यांना इजा केल्याबद्दल सॉरी. मी तुझ्या गोडावूनमधून पसार होण्यापूर्वी त्यांच्या खिशातून काही रक्कम घेतली होती. त्यामुळेच तर मी स्पेशल रिक्षाने माझ्या फ्लॅटवर जाऊ शकलो. त्यांना त्यांचे पैसे परत करशील प्लीज?" त्याने अशाप्रकारे म्हटले की यशला नकार देता आला नाही.


"एसके सर, मी आता निघतो. उद्या मला बंगलोरला जावे लागेल. तेव्हा आता निघायला हवे. ही डील तर सक्सेस झालीय. भविष्यात मला तुमच्यासोबत काम करायला नक्की आवडेल." शशांकशी हात मिळवून तो बाहेर आला. नव्या, सुनंदा, ललिताला भेटून तो बाहेर पार्किंग मध्ये गेला.


"दी, मिस्टर पाटील गेलेत." जाताना आपल्याशी एका शब्दानेही तो बोलला नाही या विचाराने खट्टू झाली असतानाच नव्याने तिला धक्का देत म्हटले.


"तर मी काय करू?" खांदे उडवत शौर्या म्हणाली.


"त्यांना थांबव, त्यांच्यावरच्या प्रेमाचा इजहार कर. पाटील सर खूप छान आहेत. जीजू म्हणून मला चालतील." नव्या हसून म्हणाली.


"काही काय गं? असं काहीच नाहीये." शौर्या लटक्या रागाने म्हणाली.


"दी, तू स्वतःशी खोटे बोलत असलीस तरी माझ्याशी नाही बोलू शकत. तुझ्या डोळ्यात त्यांच्याबद्दलचे प्रेम मला अगदी स्पष्ट दिसत आहे. जा, ते बंगलोरला परत जाण्यापूर्वी त्यांना एकदा तुझ्या प्रेमाची कबुली देऊन टाक. इतका चांगला मुलगा सहजासहजी मिळत नसतो." नव्या तिला म्हणाली.


"निवी, जर त्याला मी हवी असेल, तर तो स्वतःच परत येईल. तसे झाले तर मी कबुली द्यायची की नाही ते ठरवेन." शौर्याचे ओठ रुंदावले.


"एक्सक्युज मी सर, मी शौर्याला सोबत घेऊन जायला आलोय. त्याचे काय ना, तिचे सामान बंगल्यावर आहे आणि जर आता तिला तुमच्याकडे परत यायचे असेल तर उद्या ती तिचे सामान घेऊन येईल तेव्हा आत्ता मी तिला घेऊन जाऊ? शौर्या प्लीज चलतेस ना?" एकच वाक्य गोल गोल फिरवत तो म्हणाला.

त्याला नेमके काय म्हणायचे आहे हे शशांकला कळले नाही; पण सकाळी शौर्या आजच्याऐवजी उद्या घरी परतण्याविषयी बोलली होती हे आठवले. त्याने लगेच शौर्याला परवानगी दिली आणि तीही एखाद्या चुंबकीय शक्तीने ओढल्यासारखे त्याच्या मागोमाग गेली.


"थँक्स. मला वाटलं तू येणारच नाहीस." ती कारमध्ये बाजूला बसली तसा यश म्हणाला.


"मी तुला शब्द दिला होता." ती हसून म्हणाली.

"यश, रिअली थँक यू." थोडयावेळाने ती गंभीर होत म्हणाली.


आता हे कशासाठी?" तो.


"आज तू जे केलेस त्यासाठी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुझ्यामुळे इतक्या वर्षानंतर माझ्या मम्मापपांना न्याय मिळाला. शौनकला त्याच्या आईचे खरे रूप कळाले. निवी आणि शौनक परत एकत्र आले. सगळ्यासाठी तुझे आभार मानायचे आहेत." ती भावनिक होत म्हणाली.


"आभारप्रदर्शनाचा हा सोहळा आणखी लांबला असता पण, घर आलंय. आपल्याला उतरावे लागेल." तो म्हणाला तशी ती बाहेर आली.


"सगुणामावशी, मस्तपैकी कडक कॉफी करा ना. आज खूप आवश्यकता आहे." आत आल्या आल्या तिने फर्मान सोडले.


"मॅडम तुम्ही वॉश घेऊन या. मी कॉफी तयार ठेवते." सगुणा म्हणाली.


तिला होकार देत शौर्या तिच्या खोलीत आली. आंघोळीनंतर थोडे फ्रेश वाटत होते. त्या फ्रेशनेसच्या जादूमुळे रेग्युलर कपड्याऐवजी तिने एक सुंदरसा काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला. चेहऱ्यावर हलकासा कॉम्पॅक्ट फिरवून तिने ओठावर लिपस्टिक फिरवली. जरासे ओलसर असलेले केस मोकळे सोडून ती हॉलमध्ये आली.

"वॉव! ताईसाहेब खूप भारी दिसत आहात. यशदादाची तर आज विकेट पडेल असे दिसतेय." तिला बघून गीताने कॉम्प्लिमेंट दिली आणि काय बोलून गेले असे वाटून खालचा ओठ दाबला.


"थँक्स. माझी कॉफी?" शौर्या तिला म्हणाली.


"आईने केलीय. दादा बोलले की कॉफीसाठी ते तुमची गच्चीवर वाट बघत आहेत. तुम्ही वर जा. मी लगेच घेऊन येते." ती.


आश्चर्य वाटून शौर्या गच्चीवर जायला निघाली. त्याच्यासोबत कॉफी घ्यायची असा कुठलाच प्लॅन ठरला नव्हता. उलट तिला असे ब्लॅक ड्रेसमध्ये बघून तो सरप्राईज्ड होईल असे तिला वाटले होते; तर इकडे तीच सरप्राईज्ड झाली होती.

पायऱ्या चढताना तिथे लाल आणि काळ्या फुग्यांची सजावट केलेली होती. हे बघून तिला काहीच अंदाज येत नव्हता. ती गच्चीवर पोहचली, तेव्हा तिथे देखील खूप सारे फुगे खाली सोडले होते. एका जागेत छानशी सजावट केलेली होती. एक टेबल आणि बाजूला दोन खुर्च्या लावल्या होत्या.

एवढी सगळी जय्यत तयारी बघून तिच्या ओठावर अलगद स्मित उमटले.

"हाय गॉर्जीअस! वेलकम फॉर अवर फर्स्ट कॉफी डेट एट अवर टेरेस." तिच्यापुढे लाल गुलाबाचे फूल पकडत यश समोर आला.

त्याला असे अचानक समोर बघून ती बावरली. त्याच्या शब्दाने किंचित लाजली. नंतर नजर वर करून त्याच्याकडे पाहिले तर पाहतच राहिली.

त्याला सूट होणारा गडद निळ्या रंगाचा शर्ट, सेट केलेले केस, ओठावरचे नेहमीचे मिश्किल हसू आणि त्याच्या नजरेत अगदी हरवून जावे असे वाटणारे घारे डोळे..

पापण्या न हलवता ती त्याच्याकडे एकटक बघत होती. 'हा इतका हँडसम आहे, हे यापूर्वी मला कधी जाणवले नव्हते का?' ती स्वतःला विचारत होती.


"बसुयात?" काळ्या रंगाचा ड्रेस, त्यातून उठून दिसणारे तिचे सोज्वळ सौंदर्य.. हरवायला तर तोदेखील लागला होता; पण स्वतःवर त्याने नियंत्रण ठेवले.


"हम्म." त्याच्यावरची नजर न हलवता ती खुर्चीवर बसली. तोवर गीता कॉफी ठेवून गेली.


"सो मिस शौर्या केळकर.." ती आपल्यावरून काही नजर हटवत नाही हे बघून त्याने बोलायला सुरुवात केली.


"टॉल, डार्क, हँडसम.." त्याचे वाक्य मध्येच तोडत ती म्हणाली.


"एक मिनिट, कोणाबद्दल बोलतेस?"


"कृष्णाबद्दल. काय सॉलिड आहे तो. मला भारी आवडलाय आणि त्याचे काळेभोर डोळे? उफ्फ! एकदम किलर." त्याच्याबद्दल बोलताना तिचा चेहरा फुलला होता.


"ए, हॅलो. कृष्णा ऑलरेडी प्रीतीसोबत बुक आहे हे विसरू नकोस. त्यांची ऑलरेडी एंगेजमेंट झाली आहे." आपल्या घाऱ्या डोळ्यात काय कमी आहे असा तिला लुक देत तो म्हणाला.


"तेच तर, एवढया हँडसम माणसाने तुला वेडा म्हणावं?" त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली

"काय? मी वेडा?"


"हम्म. कृष्णा म्हणतो की तू वेडा आहेस आणि निवी म्हणते की तू खूप चांगला आहेस. दोघांनी मला कन्फ्यूज्ड करून पार वेडी केले आहे." ती निरागसपणे म्हणाली.


"आता वेडी झालेच आहे तर या वेडेपणात आणखी एक वेडेपणा करण्याचे धाडस मला करायचे आहे." निर्विकार चेहरा ठेवून ती पुढे म्हणाली.


"काय?" त्याने न उमजून विचारले.


"मिस्टर यश पाटील, तुम्ही मला मिसेस पाटील होण्याचे सौभाग्य द्याल? अग्नीकुंडाभोवती तुमच्या सोबतीने सात फेरे घेण्याचे भाग्य द्याल? तुमच्यासोबत हे आयुष्य घालवण्याची मला संधी द्याल?" ती खरेच त्याला वेड्यासारखी विचारत होती.


"काय, काय, काय?" तो हसू आवरत म्हणाला.


"वेल, लेट मी एक्सप्लेन. यश, मी तुझ्या प्रेमात कधी पडले माझे मलाच कळले नाही. तू सोबत असतोस तेव्हा मला कसलेच भय उरत नाही. तुझ्याजवळ मला अगदी सेफ वाटते. तुझी मिठी जगातील सर्वात सुरक्षित जागा भासते. तू नसलास की काहीतरी हरवल्यासारखे वाटते आणि आणखी बरंच काही.

इन शॉर्ट, मला असे वाटायला लागलेय की मी तुझ्या प्रेमात पडलेय. यश, आय लव्ह यू!" त्याच्या घाऱ्या नजरेत नजर मिळवत ती म्हणाली.


"ते सगळं ठीक आहे. पण तू ते एनजीओ वगैरे जॉईन करणार होतीस त्याचं काय?" तो मिश्किलपणे म्हणाला.


"तू जर मला नकार देशील तर मग मी तिथे जाणार आहेच."

"ए, असे चुकूनही होणार नाही हं. तू तर माझ्या हृदयाची राणी आहेस. तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पना देखील करू शकत नाही. तू मला हवी आहेस. हवीस मज तू." ती आता खरेच सोडून जाते की काय असे वाटून तो आवेगाने म्हणाला.

"सेम हिअर. हवास मज तू!"

त्याच्या गालावर ओठांची मोहर उमटवत शौर्या झकास लाजली आणि तिच्या अनपेक्षित कृतीने यश धक्का बसल्यागत आ वासून बघत राहिला.

निवी आणि विहानप्रमाणे यांच्याही प्रेमाचे इंजिन सुरु झाले होते.

**समाप्त**
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

कथेबद्दल थोडेसे!
'हवास मज तू' हे कथेसाठी अचानक एक नाव सुचले आणि आपोआप डोक्यात कथा गुंफत गेली आणि चक्क शंभर भागाहून अधिक भाग लिहिल्या गेले. इतक्या भागाची माझी ही पहिलीच कथा. त्यामुळे माझ्यासाठी ही नक्कीच खास आहे.

खास तर तुमच्यासाठीही आहे. जवळपास सहा महिन्याचा हा प्रवास माझ्यासोबत तुम्हीही केलात. कथेतील निवी, विहान, यश, शौर्या या पात्रात तुम्हीही गुंतत गेलात.

आता कथेला पूर्णविराम द्यायची वेळ आलीय. इतके दिवस कथेतील प्रत्येक पात्र जगताना कथेच्या शेवटी क्रमश: ऐवजी समाप्त लिहिताना मनात एक वेगळीच भावना दाटून येत आहे. हे नेहमीचेच. याला पर्याय नाही.

कथेचे इतके भाग यशस्वीपणे लिहू शकले याचे श्रेय संपूर्णपणे तुम्हा वाचकांचे आहे. तुमचे वाचन, आणि सुंदर सुंदर कमेंट्स पुढे लिहायला नेहमीच प्रवृत्त करत असतात. असेच वाचत रहा आनंदी रहा.

आणि हो, एक राहिलेच. कथेच्या शेवटच्या काही भागात कृष्णा आणि प्रीतीचा उल्लेख आलाय. जे माझे नेहमीचे वाचक आहेत ते या दोघांना ओळखतातच पण जर तुम्ही पहिल्यांदा यांना भेटत असाल तर माझी 'प्रीती' या कादंबरीचे दोन्ही पर्व नक्की वाचा. कृष्णा आणि प्रीतीला भेटून तुम्हाला आनंद होईल यात शंका नाही.
धन्यवाद!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all