Login

हॅव अ ब्रेक

Break For Self

कथेचे नाव - हॅव अ ब्रेक
विषय - आणि ती हसली
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


(प्रत्येक स्त्री ने वाचावी अशी कथा)

"अरे सुमित सकाळीच कुठं चालला आहेस एवढा आवरून? नाश्ता तरी करून जा. आत्ताच तर जिम करून आला आहेस... भूक लागली असेल ना" सकाळी १० वाजता कल्पना तिच्या मुलाला बोलते

"अगं आई... मी काही उपाशी मरत नाही... जिमवरून येताना डाएट फूड आणि ज्यूस घेऊन आलो आहे. बाहेर जाताना तू असे टोकत जाऊ नकोस गं... सगळा मूड बिघडतो. मी एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला जातोय... निदान आज तरी टोकायला नको होतंस" असे म्हणत सुमित चिडक्या चेहऱ्यानेच घराबाहेर पडतो.

सकाळी नवरा आणि मुलगा घराबाहेर गेल्यानंतर कल्पना घरातील सर्व कामं करते आणि त्यानंतर स्वयंपाक बनवते तोपर्यंत दुपार झालेली असते. मग ती तिच्या मुलीच्या बेडरूममध्ये जाते आणि जेवण करण्यासाठी तिला आवाज देते.

"रश्मी चल जेवायला, सतत काय करत असते मोबाईल मध्ये देव जाणे" कल्पना

"अगं मम्मे तुला अजिबातच कसं कळंत नाही गं, माझे ऑनलाईन लेक्चर चालू आहे आणि तू काय मधे मधे येऊन जेवण करण्यासाठी हट्ट करत आहेस. मला भूक लागली की मी माझं मला समजेलच ना... मी काय आता लहान बाळ आहे का?" रश्मी रागातच आईसोबत बोलते

कल्पना बोलते "बरं बाई चुकलं माझं... मला काही समजत नाही बघ तुमचं ऑनलाईन बिनलाईन का काय असतं ते; जेवणाची वेळ झाली म्हणून मी तुला बोलवायला आले होते. तुझं हे उरकलं की जेवून घे... मी जाते कपाट आवरायला."

कपाट आवरून झाल्यावर कल्पना तिचा नवरा सतिशला फोन करते,
"हॅलो... आज घरी जरा लवकर यायला जमेल का? मला दवाखान्यात जायचं आहे, डॉक्टरांनी पंधरा दिवसांनी पुन्हा बोलावले होते. तुम्ही या ना... आणि मला घेऊन चला."

"या एवढ्या शुल्लक कारणासाठी मी ऑफिसचे काम सोडून तुझ्यासोबत दवाखान्यात येवू का? तू काय या शहरात नवीन आहेस का? रिक्षा करून जा ना तू एकटी. माझी महत्वाची कामं पेंडींग आहेत त्यामुळे मला यायला जमणार नाही." असे बोलून तिचा नवरा सतिश तावतावानेच फोन कट करतो.

कल्पना दवाखान्यात जायचा आजचा बेत उद्यावर ढकलते तेवढ्यात सुमित घरात येतो. त्याला पाहून त्याला आजच्या इंटरव्ह्यूबद्दल काय झालं विचारते. त्यावर सुमित तुटक उत्तर देतो,
"काही नाही... मेल करून कळवतो असे म्हणाले आहेत." असे बोलून तो त्याच्या बेडरूममध्ये जातो.

थोड्या वेळाने रश्मी स्पोर्ट क्लब वरून येते आणि घरात इकडे तिकडे न पाहता सरळ तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. सतिश ही त्याच्या नेहमीच्या वेळेला घरी येतो आणि चहा घेत टिव्ही न्यूज पाहत बसतो.

त्यानंतर सर्वजण रात्रीचे जेवण करण्याकरीता एकत्र डायनिंग टेबलवर जमतात. कल्पना जेवण आणून सर्वांना वाढते आणि स्वतः पण जेवायला बसते. सतिशला काहीतरी आठवते तेव्हा तो कल्पनाला विचारतो,
"अगं... तू आज गेली होतीस का दवाखान्यात?"

"नाही" कल्पना उत्तर देते

"का...? मी सांगितले होते ना की तू रिक्षा करून एकटी जाऊन ये. सर्व कामं सोडून तुझ्यासोबत दरवेळी यायला मला कसे जमेल? आणि आता काय ठरवले आहेस?"

"अहो... घरातील कामं उरकताना मलाच वेळ झाला म्हणून मी उद्या जायचे ठरवले आहे" कल्पना स्पष्टीकरण देते

सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या बेडरूममध्ये निघून जातात. त्यानंतर कल्पना भांडी वगैरे सर्व आवरून झोपायला जाते. तशी तिची ही दिनचर्या वर्षानुवर्षे चालत आलेली असते पण आज ती सकाळपासून घडल्या घटनांमुळे अस्वस्थ असते. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही तिला झोप येत नाही. ती लग्न करून आल्यानंतर ते आजपर्यंतची सर्व कारकीर्द तिच्या डोळ्यासमोर उभी राहते. या घरात आल्यानंतर तिने कसे सर्वांना आपलेसे केले. सासू-सासऱ्यांची सेवा, त्यांचे आजारपण, त्यांचे मरणानंतर संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन ती यशस्वीरीत्या पेललेली असते. एका बाजूने पूर्ण घर सांभाळाल्यामुळे तिच्या नवऱ्याला कामामध्ये लक्ष देता येऊन प्रगती करता आली. दोन मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचे शिक्षण, बालपण, संगोपण वगैरे गोष्टी तिने कशा प्रकारे हाताळले त्यामुळे ते आज स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सज्ज झालेले आहेत. असे अनेक विचार करत करत कल्पना स्वतः सोबतच बोलू लागते.

"घरादाराचे सर्व करता करता मी आज कुठे आहे? आज कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व त्यांच्या कामात काही ना काही करत आहे आणि त्यात माझा कुठेच सहभाग दिसत नाही. मी आजवर केलेल्या कष्टाचे, संसाराला दिलेल्या योगदानाचे कौतुक तर लांबच पण कोणी साधी विचारपूस देखील करत नाही. सर्वजण जगासोबत पुढे जात आहेत. तसे माझेही आयुष्य काही वाईट चालू आहे असे नाही... घर, गाडी, घरात सर्व सुखवस्तू, समाजात मोठे नाव वगैरे भौतिक सर्व सुख मी उपभोगत आहे पण; स्वतःसाठी मी काय करते? स्वतःचे छंद जोपासणे, आवडीनिवडी जोपासणे, स्वतःचे मत व्यक्त करणे आणि स्वतःसाठी जगणे असे काही माझ्या हातून अद्यापपर्यंत घडलेले नाही. मी सर्वांची सेवा करून, जबाबदारी पार पाडून देखील माझी कोणी किंमत करत नाही अशी धारणा माझी आता होत आहे. मला माझे अस्तित्व टिकवण्यासाठी आता काहीतरी केलेच पाहिजे त्याशिवाय मला हक्काचा मान काही मिळणार नाही. तसेच माझा आत्मसंम्मान देखील जागृत होणार नाही."

असा बराच वेळ स्वतःशीच बोलत शेवटी मनाशी एक निश्चय करत कल्पना झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दैनंदिन कामे आटोपून ती दुपारी घराबाहेर पडते. काल रात्री केलेल्या निश्चयाबाबत कृती करते त्यानंतर दवाखान्यात जाते व सायंकाळपर्यंत पुन्हा घरी येते.

सर्वांसोबत रात्रीचे जेवण चालू असताना ती मनाशी हिम्मत करून बोलते,
"मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे; मी पुढच्या आठवड्यात पाच दिवस ट्रिपला जाणार आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात मी घरी नसेल. कामवाल्या मावशींना घरकामासोबत स्वयंपाकाचे काम सांगितले आहे... ती दोन्ही वेळेचे जेवण बनवून देईल."

हे ऐकून सतिश रागावूनच बोलतो, "हे काय मध्येच काढले आहेस ट्रिपचे? कोणासोबत जाणार आहेस? माहेरची लोकं आहेत का? कुठे जाणार आहेस?"

कल्पना सांगते, "मी एकटीच जाणार आहे. एकूण पाच दिवसांची केरळ ट्रिप आहे; त्यामध्ये निसर्ग पर्यटन, जंगल सफारी, बोटिंग, देवदर्शन या गोष्टी आहेत."

सुमित म्हणतो, "तू याचे बुकिंग वगैरे केले आहेस का? तुला एकटीला एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग कळणार आहे का? यापूर्वी तर तू कधीच असे एकटीने प्रवास केला नव्हता."

कल्पना म्हणते, "पवार काकांची ट्रॅव्हलिंग एजन्सी आहे ना... त्यात ही ट्रिप आहे. आज दुपारी मी जाऊन तिथे नाव नोंदवून पैसेदेखील भरून आले आहे."

रश्मी आश्चर्यचकित होऊन बोलते, "मम्मे हे काय बोलतेस... तू ट्रिपला चक्क एकटी जाणार आहेस? हे ऐकून मला तर आता तुझी काळजी वाटू लागली आहे. तू कसे काय मॅनेज करणार आहेस सर्व? आणि घराकडे कोण पाहणार एवढे दिवस?"

कल्पना हसत बोलते, "अगं वेडाबाई मी काही लहान आहे का आता? व्यवस्थित जाऊन येईन मी, तेवढी तरी शिकलेली आहे मी बरं... तुम्ही सर्व विसरलात वाटते ही गोष्ट."

सतिश आता चिडूनच बोलतो, "अगं हसतेस काय? इकडे आम्ही तुला काळजीने बोलतोय आणि तू...? कमाल आहे बुवा... मला तर हे तुझे वागणे अजिबातच पटलेलं नाहीये. काय तर म्हणे केरळ ट्रिपला जाणार... ते पण एकटी. या अश्या काही फॅडसाठी माझी बिलकूल संमती नाही."

कल्पना थोडे बिचकतच बोलते, "खुशाल फॅड म्हणताय तुम्ही. फक्त पाच दिवस ट्रिपला जाणार आहे असे म्हणतेय मी. आजपर्यंत तुम्ही सर्व जातच आलात की शाळा, कॉलेज, ऑफिस ट्रिपला वगैरे; मग मी पण तशीच जाणार आहे की, त्यात वेगळे असे काय आहे संमती न देण्यासारखे?"

सुमित, "अगं आई पण निदान पप्पांसोबत तरी जायचे ठरवायचे होतेस ना. तू एकटीच का म्हणून जात आहेस? अचानक हे खुळ तुझ्या डोक्यात आलं कुठून?"

आता कल्पना ठामपणे बोलते, "हे पहा तुम्ही सर्वजण माझी काळजी करू नका. मी तेवढी सक्षम आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे मी आता माझा निर्णय बदलणार नाही त्यामुळे हा विषय आता इथेच संपून टाका."

आईचे हे बोलणे ऐकून रश्मी आणि सुमित पुन्हा काही बोलतच नाहीत. सतिश जेवणाच्या ताटावरून अर्ध्यातूनच उठून जातो आणि जाताना म्हणतो,
"तुला काय करायचे ते कर... पण काही गोंधळ झाला की मला सांगायला येऊ नकोस."

कल्पना पुन्हा निश्चयी स्वरात बोलते, "अहो काही गोंधळ वगैरे होत नाही, मी करेल सर्व नीट मॅनेज. तुम्ही उगाच काही निगेटिव्ह विचार नका करू."

पुढील आठवड्यात कल्पना तिची बॅग भरते. सोबत औषधे, ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, डेबिट कार्ड, थोडे रोख पैसे अशी सर्व तयारीनिशी घरातून बाहेर पडते. पिकअप पॉईंटपर्यंत रिक्षा करून जाते व तिकडून सर्व मेंबर्ससोबत ट्रिपसाठी रवाना होते.

पुढचे पाच दिवस ती घरचा काहीही विचार न करता स्वतःसाठी जगायचं आहे असे ठरवते पण कितीही ठरवले तरी शेवटी एक स्त्रीच ती; पहिल्याच दिवशी तीचं सर्व लक्ष नवरा, मुले यांच्या विचारात गुरफटते. थोड्या वेळाने ती पुन्हा भानावर येते तेव्हा त्यांची बस एका डोंगर वळणावर आलेली असते तिकडून मनमोहक असा हिरवागार निसर्ग पाहून तिला बाकी सर्व विषयाची भूल पडते. असाच निसर्गाचा आस्वाद घेत तिचा पुढचा प्रवास होतो.

दिवसा पर्यटन व रात्री हॉटेलमध्ये रेस्ट अशी ट्रिपची रूपरेषा असते त्यामुळे या पाच दिवसात ती वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जेवणासाठी व रेस्टसाठी थांबते. असे आयते जेवण ती पहिल्यांदाच जेवत असते. डोंगरदऱ्या, चहाचे मळे, मसाल्याचे कारखाने, जंगल सफारी, बोटिंग, वन्यजीव दर्शन, आयुर्वेदिक मसाज, वेगवेगळी मंदिरे, व्हिडीओ गेम्स अश्या बऱ्याच गोष्टींचा ती मनभरून आनंद घेत असते. वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख करून घेते. नवनवीन लोकांना भेटते आणि त्यांचे विचार, राहणीमान, त्यांची मते जाणून घेते. प्रत्येक व्यक्तीची वेगळी अशी खासियत पाहून ती स्वतःमध्ये असलेल्या गुणांकडे, विशेष बाबींकडे लक्ष केंद्रित करते आणि आपल्यामध्ये काय स्पेशल आहे याचा शोध घेऊ लागते. यामुळे तिला स्वतःची नव्याने ओळख होते.

ट्रिपच्या शेवटच्या दिवशी ती हॉटेलच्या रूममध्ये निवांत टिव्ही लावून जुने गाणे पाहत बसलेली असते तेव्हा आवाज वाढवण्यासाठी ती रिमोट हातात घेते, रिमोट हातात घेतल्यानंतर त्याकडे पाहत विचार करते की,
"आपल्याला घरी असताना कधीच या रिमोटचा ताबा मिळाला नाही कायम नवऱ्याने किंवा मुलांनी जे चॅनेल लावलेले आहे तेच पहिले. मला काय आवडते किंवा काय पहायचे आहे हे कोणी कधी विचारलेच नाही. रिमोटचा ताबा या इतक्या छोट्याश्या गोष्टीचेदेखील मला किती अप्रुप वाटत आहे" असा विचार करून ती स्वतःवरच हसते.

तिचा पती, मुले खूप छान आहेत. एक कुटुंब म्हणून ती फार सुखी आहे. फक्त तिची एकच खंत आहे की तिने स्वतःची विशेष अशी काही ओळख निर्माण केलेली नाही आणि याचमुळे तिच्यावर कोणाचे लक्ष न गेल्यामुळे आजवर तिला कोणी खूप महत्व दिलेले नसते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ती एका निर्णयापर्यंत पोहोचते. तिच्या डोळ्यामध्ये आता एक वेगळीच चमक दिसू लागते. हॉटेमधून चेक आऊट करून ती एका वेगळ्याच अविर्भावात बाहेर पडते. आता ती यापुढे फक्त घरातील एक व्यक्ती एवढीच ओळख नसून काही विशेष गुण असलेली, स्वतंत्र विचारांची, स्वतःचे असे मत असलेली, आत्मविश्वास भरलेली एक विशेष व्यक्ती असते. तिचा एक नवा जन्म झालेला असतो. यापुढे ती आता स्वतःचे आयुष्य आनंदाने व कुटुंबासह स्वतःला वेळ देऊन स्वतःसाठी जगणार असते.

घरी परतल्यानंतर सर्वजण तिची आनंदाने चौकशी करतात. तिची ट्रिप कशी झाली व तब्येतीविषयी आपुलकीने विचारपूस करतात. पाच दिवस तिच्याविना राहिल्याने तिची किंमत सर्वांनाच समजलेली असते. त्यांच्या बोलण्यात व हावभावात प्रेम, आपुलकी, काळजी, आदर अश्या अनेक प्रकारच्या छटा तिला जाणवू लागतात. कल्पना हे सर्व पाहून घरच्यांविषयी आपण केलेल्या निगेटिव्ह विचारांवर मनातून थोडी खजिल होते. तिला आता समजून चूकते की आपण जरी कुटुंबातील सर्वांच्या आयुष्यात वरवर कुठे दिसत नसलो तरी प्रत्येकाच्या मनात तिच्याविषयी किती मोठे स्थान आहे. आजचे घरातील सर्व वातावरण पाहून ती मनातून हुरळून जाते.

घरातील सर्व सदस्यांना संबोधून ती म्हणते, "मी खरंतर या रोजच्या रुटीनला कंटाळले होते म्हणून ब्रेक घेतला होता. गेले पाच दिवस ट्रिपला गेल्यापासून माझ्या विचारात फार पॉजिटिव्ह बदल घडलेले आहेत. घरी राहून मी कुटुंबाकडे लक्ष दिले पण स्वतःकडे माझे दुर्लक्ष झाले. मीच जर स्वतःकडे लक्ष देत नसेल तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा ठेवणार ना... आता तुमची नोकरी संपत आलेली आहे, मुलांचेसुद्धा शिक्षण झालेले आहे, आता ते आपल्या पायावर उभे राहून पुढे जाऊन आपापल्या संसाराला लागतील. तेव्हा मी असा विचार केला आहे की, मी आता या सर्वातून थोडा ब्रेक घेणार आहे मी आता माझे छंद जोपासणार, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार, नवनवीन लोकांना भेटून काहीतरी नवे शिकणार, मला वाचन आवडते तर मी वाचन करणार, पर्यावरण संवर्धनाविषयी मला काहीतरी कार्य करायचे आहे ते करणार. अजून बरेच काही ठरवले आहे ते आता नंतर सांगेल. त्यासाठी मी आता अधेमधे असे ब्रेक घेत राहणार आहे. मी आशा करते की तुम्ही सर्व मला माझ्या "हॅव अ ब्रेक" या संकल्पनेला साथ देणार आहात."

यावर घरातील सर्वजण कल्पनाकडे फार कौतुकाने पाहतात आणि तिला हाताने थम करत एकत्रच बोलतात "हॅव अ ब्रेक"... आणि ती हसते...!


लेखक - ✍️ © प्रशांत भावसार
जिल्हा - पुणे