हाय हाय ये मजबुरी...

Hum Tum..
तेरी दो टकीया की नौकरी..
मेरा लाखो का सावन जाए रे..
हाय हाय ये मजबुरी..
ये मौसम ओर ये दुरी…….

संध्याकाळच्या त्या विलोभनीय गारव्यात तो बाल्कनीच्या दारात उभा कधी बाहेर पडणारा पाऊस तर कधी आतमध्ये फाईलमध्ये तोंड खुपसून बसलेल्या आपल्या बायकोला बघत त्याच्या भेसूर आवाजात गाणे गात होता.

हाय हाय ये मजबुरी..
हाय हाय ये मजबुरी sssss… मजबूरीssssss

तिचे त्याच्याकडे लक्ष नाहीये बघून तो परत परत मजबुरी शब्दावर जोर देत ओरडत होता.
पण ती तिच्या ऑफीसच्या कामात एवढी मग्न होती की तिचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते की तिला काहीही ऐकू जात नव्हते.

“रमा, बाहेर मस्त पाऊस पडतोय. वातावरण पण गारठलेय. अंगात जाम थंडी भरलीय.” तो तिच्या जवळ येत, थोडा खाली झुकत, तिच्या गळ्याभोवती आपल्या हात गुंफत, तिच्या कानाजवळ जात म्हणाला.

“अजिबात नाही हा, मी परत चहा बनवणार नाही.”
ते ऐकून त्याने मनातच डोक्यावर हात मारला. तो बिचाऱ्या नजरेने तिला बघत होता. “मला ते..”

“उद्या ऑफिसमध्ये माझे खूप महतावाचे प्रेझेंटेशन आहे, अजून खूप काम बाकी आहे. आणि प्लीज हळू बोला आईंना ऐकू जाईल तर..”

“रमाssss, जरा कांदाभजी तळायला घे, तुझ्या सासऱ्यांना हवे आहेत अन् थोडा आल्याचा चहा पण टाक, घसा जरा खवखवत आहे.” रमा बोलतच होती की बाहेरून सासूबाईंचा आवाज आला.

“सत्यानाश..” तिने डोळे मोठे करत त्याच्याकडे बघितले अन् आपली फाईल गुंडाळत तनतन करत स्वयंपाकघरात गेली. वैतागून तो पण बाहेर हॉलमध्ये येऊन बसला.

“त्या चार पैशांच्या नोकरीसाठी एवढा रविवार सारखा सुट्टीचा दिवस घालवला हिने.. काय ते मेलं आपलं काम काम.. काम.. आपल्याला पैशांची गरज नाही, नोकरी सोड म्हटले तरी सोडत नाही. घरात मोठ्यांचे काही ऐकायचेच नसते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी हीची वाट बघत बसावं लागते. स्वतःहून म्हणून काही करायला नको..” सासूबाईंची बडबड सुरू झाली होती. “त्यात थोडा ओवा आणि तेलाचे मोहन टाक, छान खुसखुशीत होतात. आणि हो थोडे पालकाचे अन् दोन चार मिरचीचे पण काढ, किरणला आवडतात.”

“किरणला आवडतात म्हणे, यांना खायचेय, ते नाही सांगत. आणि यांचा किरण, त्यांना माहिती माझे खुप काम अजून बाकी आहे, खायला नकार नाही देता येत? पण नाही, त्यांना पण त्या बोअर न्यूज बघत काही खायला हवेच..” ती त्यांची बडबड ऐकत, अधूनमधून घड्याळात कटाक्ष टाकत चरचर कांदे चिरत होती.

“हा पाऊस पण.. जिथे गरज आहे तिथे नाही पडणार अन् इथेच कलमडणार ते पण सुट्रीच्याच दिवशी..“ वैतागलेली ती पावसावर पण राग काढत होती.

रात्री जेवण आटोपून, स्वयंपाकघर आवरून, पिहूला झोपवून ती परत आपले काम करत बसली.

“रमा, रात्र झालिये...” किरण घड्याळाकडे बघत तिला पाठीमागून आपल्या मिठीत घेत म्हणाला.

“झोपा ना मग, झोपवून द्यायला तुम्ही काय लहान बाळ आहात काय?” ती आपले काम करताकरता म्हणाली.

“खूप उशीर झालाय रमा..”

“तुमच्यामुळेच झाला.. नाहीतर संध्याकाळीच आटोपले असते. भजे खायला नकार नाही देता आला? सांगायचं ना आता या वयात तेलकट कमी खायचं.. काही पण सांगू शकले असता, तुमचं त्यांनी ऐकले असते. पण नाही, तुम्हाला पण तेच हवे.. माझ्या नोकरीचेच दुश्मन सारे..” काम पूर्ण झाले नव्हते, त्यात सगळे तिला डिस्टर्ब करत होते त्यामुळे ती वैतागली होती.

“बंद कर आता ती फाईल.. बस झालं. एकतर तू फारच स्लो आहेस अन् मेंदू जेवढा असेल तेवढेच घुसणार डोक्यात.” आता तो थोडा चिडला होता.
तिला त्याच्या अशा बोलण्याचा रागच आला होता.

“मला तुमच्यासोबत वाद घालायला वेळ नाही..” म्हणत ती परत आपले काम करत बसली. तो रागात झोपून गेला.

तिला झोपायला रात्री जवळपास दोन वाजले होते.

सकाळी दोघांमध्ये जरा अबोलाच होता. तिने आंघोळ आटोपून पटापट पिहूसाठी सँडविच बनवून तिचा शाळेचा डब्बा भरला आणि तिला शाळेला पाठवले. नंतर कणीक मळली, वरन भाताचा कुकर लावला. भाजी चिरायला घेतली. एव्हाना सगळे हॉलमध्ये जमले होते. ते बघून तिने गॅसवर चहाचे आधन ठेवले. एका बाजूला कढी बनवली. काकडी किसून त्याची दह्याची कोशिंबीर बनवली. भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. त्यात तेल घेतले , भाजी फोडणी घालण्याआधी त्यातील थोडी खमंग फोडणी कोशिंबिरीवर टाकली आणि मग भाजी फोडणीला घातली. एका प्लेटमध्ये थोडे टोस्ट ठेवले. कपात चहा ओतला आणि सर्वांना आणून दिला. नंतर शिरा करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात वाटीभर कणीक परतायला घेतली.

“आज गुरुपौर्णिमा, वर्षाचा पहिला सण; आपल्याकडे पुरणपोळीचाच नैवैद्य असतो. आम्ही पहाटेच उठून लवकर लवकर कामं करत. १० वाजेपर्यंत पुरणाचा स्वयंपाक आटोपत. आता काय आजकालच्या सुनांना लवकर उठायला नको, सणवार नको.. असा शॉर्टकट नैवैद्य आम्ही नाही बाई कधी दाखवला. आम्हाला ते जमलेच नाही.” सासूबाई चहा पिता पिता, आतून कणीक भाजण्याचा आवाज ऐकून बोलत होत्या.

ती मात्र आपल्या कामात मग्न होती, सोबत प्रेझेंटेशनची उजळणी सुरू होती. भिंतीवरील घड्याळ बघत हातांची गती वाढत होती. डब्बे भरून ती स्वतःच्या तयारीला लागली.

“माझे सॉक्स सापडत नाहीये.. एक वस्तू जागेवर नसते..” किरण आपली ऑफिसची तयारी करत होता. तिने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि त्याच्या हातात मोजे दिले.

“माझा चष्मा..” तो मोजे घालत म्हणाला. तिने त्याच्याकडे वैतागून बघितले.

“हे.. नेहमीच… शेविंग करतांना बेसिन समोर सोडून आलात..” तिने तो चष्मा त्याच्या बाजूला ठेवला. त्याने परत काही मागायच्या आत तिने बॅग उचलली अन् बस पकडायला बाहेर पळाली.

आज तिला थोडा उशीरच झाला होता. बस केव्हाचीच सुटली होती. ऑटोरिक्षाने ऑफीसला पोहचली. पुढल्या पंधरा मिनिटात तिचे प्रेझेंटेशन होते. ती थोडी रिलॅक्स झाली आणि बॅग उघडली तर आता तिच्या डोळ्यात अश्रू जमायला सुरुवात झाली. रातभर मेहनतीने फाईल बनवली होती, तीच ती घरी विसरली होती. संपलं आता सगळं.

“मॅडम, बाहेर एक सर ही फाईल देऊन गेले.” पिऊन तिला एक फाईल देऊन गेला.

ते बघून ती आनंदली. ओठांवर हसू उमलले. भरभर आवरून हॉलमध्ये जाऊन प्रेझेंटेशन दिले. तिचे प्रेझेंटेशन खूप छान झाले होते. प्रमोशनसाठी तिचे नाव पुढे गेले होते. आता मात्र तिला घरी जायची घाई झाली होती पण नेमके आजच तिला नवीन काम मिळाले होते त्यामुळे परत थोडा उशीरच झाला होता.

ती घाईघाईने घरी पोहचली. फ्रेश होण्यासाठी सरळ तिच्या खोलीत गेली तर खोलीत अंधार होता. लाईट लावायला हात वर करणार तोच तिच्या कंबरेभोवती हातांचा विळखा घट्ट झाला, “ it's celebration time..!” तिच्या कानात आवाज आला.

“तुम्हाला कसे माहिती?” ती मागे वळली.

“अम्म.. असेच माहिती ..” तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

ती हसली.

“आई म्हणत होती आज वर्षाचा पहिला सण आहे तर..”

“हट, कुठे काय.. ते तर चैत्र महिन्यात..”

“ह म्हणजे अकॅडमीक वर्षाचा पहिला सण म्हणायचं असेल तिला..” त्याने खिशातून नाजूक फुलांचा गजरा काढला.

त्यावर तिला हसू आले..

“आणि पहिला पाऊस पण..” तो तिच्याकडे टकमक बघत खूप हळूवारपणे म्हणाला.

“कालच झाला पाऊस..”

“अम्म.. आजचा पहिला पाऊस..” गजरा तिच्या केसांत माळत म्हणाला.

ती लाजली. त्याने तिच्या गालावर किस केले.

“जेवायचं बघायचं..” ती लजून गोरीमोरी झाली होती.

“आईने खिचडी केली.. तिला सांगितले पावसाळ्यात रात्री जेवण जड नको..” तो डोळे मिचकावत म्हणाला.

“पिहू?”

“तिला जेवण करवून झोपवले..” त्याने तिच्या भोवती आपले हात गुंफले.

“तुम्ही सगळीच तयारी करून ठेवलीय ना..” ती हसत म्हणाली.

“सगळ्यांची काळजी घेऊन तू तुझं प्रेम व्यक्त करतेस.. प्रेम व्यक्त करायला माझ्याकडे जास्त ऑप्शन्स नाहीत ना..” तो तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक बट हळूवारपणे तिच्या कानांमागे अडकवत म्हणाला. त्याच्या त्या तेवढयाशा स्पर्शाने सुद्धा तिचा चेहरा गुलाबी झाला होता आणि अंग शहारून आले होते.

“तुम्हाला हेच हवे असते ना…” ती खुद्कन हसली.

“हो..” तो खट्याळपणे हसत म्हणाला.


“तेरी दो टकिया दी नोकरी.. मेरा लाखो का मौसम जाये..”

त्याचे गाणे ऐकून ती खळखळून हसली आणि त्याच्या भोवती आपल्या हातांची गुंफण घट्ट करत, तिने त्याच्या ओठांना आपल्या ताब्यात घेतले.

“हे ठीक होतं?” श्वास जड झाले तसे ती थोडी दूर झाली.

तो स्वतःशीच लाजत हसला. तिने त्याच्या गालावर किस केले आणि त्याच्या मिठीत विसावली.

*****

समाप्त


©️®️ मेघा अमोल


कथा काल्पनिक आहे.