जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
भाग १
" आज तिला घरी यायला जास्तच उशीर झाला नाही?"
आई बाबांना चिंतेच्या स्वरात म्हणाली.
आई बाबांना चिंतेच्या स्वरात म्हणाली.
आई बाबा दोघे बसून त्यांच्या एकुलत्या एक मुलीची ऑफिसमधून येण्याची वाट पाहत बसले होते. रोजची संध्याकाळची आठची तिची वेळ पण, आज दहा वाजून गेले तरी ती काही घरी परतली नव्हती. त्यांनी किती तरी वेळा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण, ती तिचा फोनही उचलत नव्हती. दोघांना तिची काळजी वाटू लागली.
ते दोघेही काळजीत बुडालेले असताना अचानक दार वाजले. आईने लगेचच जाऊन दार उघडले. समोर त्यांची मुलगी उभी होती. शांत, स्तब्ध, निर्विकार चेहरा घेऊन ती तशीच समोर उभी असलेली आईला दिसली.
तिला बघताच आईचे प्रश्न सुरू झाले. पण, ती मात्र कोणत्याच प्रश्नाचे उत्तर न देता, तशीच दारातून आत आली. आत येताच आईने दार लावून घेतले. आणि आई बाबा काळजीने तिला प्रश्न विचारू लागले. पण, तिचे त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांचे बोलणे न ऐकल्या सारखे करून, ती जड पावलांनी तशीच तिच्या खोलीकडे जाण्यासाठी निघाली. खोलीत जाऊन तिने खोलीचा दरवाजा बंद करून घेतला.
आपल्या मुलीचं हे असं वागणं दोघांनाही समजेना झालं. ते दोघेही तिच्या खोलीच्या दरवाजा जवळ जाऊन तिला काय झाल्याचं विचारू लागले. पण, आतून त्यांना काहीच उत्तर येत नव्हते. आत जाऊन तिने तिच्या खोलीची लाईट देखील चालू केली नव्हती. कामाचा ताण जास्त असल्यामुळे बहुतेक, ती थकली असावी आणि खोलीत जाऊन थेट झोपी गेली असावी असा त्या दोघांनी समज करून घेतला आणि आता तिला आराम मिळावा, आणि जे असेल ते सकाळी बोलणे होईलच म्हणून ते आपल्या खोलीत निघून गेले.
ती मात्र खोलीत शिरून दरवाजा बंद करून तशीच अंधारात समोरच्या भिंतीला टेकून खाली जमिनीवर बसली. खाली बसून ती खोल कुठे तरी त्या अंधारात पाहता पाहता शून्यात हरवून गेली.
ती तशीच शांत बसून असताना तिच्या कानावर आई वडिलांचा आवाज येणं बंद झालं. बाहेर त्यांच्या आवाजाची कुजबुज ऐकू येणं बंद झालं. दरवाजाच्या फटीतून दिसणारी बाहेरची लाईट सुद्धा आता बंद झाली होती. आता त्या खोलीत पूर्णपणे अंधाराने ताबा घेतला होता. अगदी तिच्या मनासारखा...!
शेवटी तिच्या मनाचा बांध फुटला. तिच्या मनाला तो भयावह अंधार अनावर झाला, तिच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि तिने हंबरडा फोडला.
क्रमशः
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा