जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026
भाग ५ ( अंतिम )
त्यांनी जाऊन, दबावा नंतरही त्यांची तक्रार नोंदवली. त्यांची तक्रार नोंदवली गेली. त्यांनी समोर येणाऱ्या संकटांसाठी आपल्या मनाची तयारी केली. तक्रार केल्यानंतर त्यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यांना अनामिक फोनवरून धमक्या येऊ लागल्या. त्यांच्या जीवाला धोका जाणवू लागला. त्यांना घरातून बाहेर निघणं मुश्किल झालं. कामं सोडून त्यांना घरातच बसायला लागलं होतं. त्यांना आता ओळखीचे किंवा आजूबाजूचे कोणी मदत करायला तयार नव्हते. ते पूर्णपणे एकटे पडले होते. पण त्यांनी हार मानली नाही.
बघता बघता कोर्टाची तारीख उजाडली. ते तिघेही कसेबसे जीव मुठीत घेऊन कोर्टाच्या आवारात पोहोचले. तिथे त्यांनी नेमलेला वकील त्यांची आधीपासून वाट पाहत उभा होता. ते तिथे पोहोचल्यावर त्याने त्यांना जिंकण्याचे आश्वासन दिले. त्यांची बाजू उत्तम रित्या मांडण्याची त्याने तयारी केली असल्याचं सांगितलं. त्याचा आत्मविश्वास बघून त्यांना धीर आला.
ते सगळे बाहेरून आत कोर्टात जात असताना त्यांना बाहेरून दोन गाड्या आत आलेल्या दिसल्या. त्या गाडीतून तो संबंधित व्यक्ती, त्याची माणसे आणि त्याचा वकील बाहेर उतरला. त्याच्या वकिलाला बघून ह्यांच्या वकिलाच्या चेहऱ्याचे भाव बदलले. पण, त्याने ते त्यांना दिसू न देता त्यांना आत चलण्यास सांगितले.
कोर्टरूम संबंधित लोकांनी भरला. सगळ्या लोकांची कुजबुज सुरू झाली. ती आणि तिचा परिवार शांत बसून देवाकडे प्रार्थना करू लागले. पुढच्या काही क्षणात न्यायाधीश येण्याची घोषणा झाली.
न्यायाधीश येऊन आपल्या जागेवर बसले. सगळीकडे शांतता पसरली. कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. तिला साक्ष देण्यासाठी उभं केलं. आरोप प्रत्यारोप झाले. तिला वाटलं तिचं सगळं काही ऐकून घेण्यात येईल, तिला लगेच न्याय मिळेल. पण, तिची समज चुकीची ठरली. तिला मिळाली ती फक्त पुढची तारीख.
पुढे त्यांना अश्याच तारखांवर तारखा मिळत गेल्या. न्याय मिळण्याचा तिचा विश्वास कमी होत गेला. पण, तरी ती थांबली नाही. ते तसेच न्याय मिळवण्याच्या आशेने कोर्टाच्या चकरा मारत राहिले.
आणि एके दिवशी, आरोप प्रत्यारोप अगदी शिगेला पोहोचले. समोरच्या वकिलाच्या प्रश्नांनी तीच आरोपी असल्याचं तिला भासू लागलं. सगळ्यांसमोर ती निशब्द झाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना झाले.
तिने अश्रूंनी भरलेले आपले डोळे मिटले. तिच्या कानावर, पुराव्याअभावी तो आरोपी निर्दोष सुटल्याचे ऐकू आले. आणि तिच्या बंद डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वाहू लागले.
" महाराज... तुम्ही स्थापित केलेले, स्त्रियांना आई समजणारे हे तुमचे स्वराज्य राहिलेले नाही. हे आमचे स्वराज्य नव्हे...!"
बंद डोळ्यांसमोर महाराजांची प्रतिमा आणून ती म्हणाली.
बंद डोळ्यांसमोर महाराजांची प्रतिमा आणून ती म्हणाली.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा