हे बंध रेशमाचे - भाग 18

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 18

लग्न व्यवस्थित पार पडलं. पाठवणीची वेळ आली. नेहा आप्पासाहेबांच्या गळ्यात पडून खूप रडली.आजवर कधीही ती त्यांच्यापासून लांब राहिली नव्हती पण आता कायमसाठीच ती घर आणि त्यांना सोडून जात होती. संगीता आत्याचे देखील अश्रु थांबत नव्हते. पोटच्या मुलीप्रमाणे तिन नेहाला जपलं होतं. आप्पा नेहाला घेऊन आनंद जवळ आले तिचा हात त्यांनी त्याच्या हातात दिला.

" सांभाळा तिला...." अप्पा बोलले. त्यावर त्यानं हलकेच त्यांच्या हातावर थोपटलं.

"काही चुकलं पोरीचं तर आईच्या मायेने पोटात घाला..." आप्पासाहेबांनी वृषालीताईंना हात जोडून विनंती केली.

" अहो , काय करताय हे ....आता ती आमची लेक आहे तुम्ही मुळीच काळजी करू नका..."  वृषालीताई

फुलांनी सजवलेल्या गाडीत आनंद आणि नेहा बसले. गाडीची काच खाली करून नेहाने पुन्हा एकवार मागे वळून पाहिलं आपलं घर, माणसं तिनं डोळ्यात साठवून घेतली. इतक्यात काहीतरी आठवल्या सारखं आप्पानी त्यांना हातानेच थांबायला सांगितलं आणि ते घरात गेले. घरातून एक छोटी बाळकृष्णाची मूर्ती आणून त्यांनी नेहाकडे दिली. लोणी खाणाऱ्या नटखट बाळकृष्णाची ती सुरेख मूर्ती होती....!!!! 

"तुझी आई घेवून आली होती सासरी येताना...तिची आठवण आहे ही एवढी वर्षं मी ती सांभाळून ठेवली होती.. आता ही तू सांभाळ..." असं म्हणून त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

"कधी काही वाटलं तर हा आहे याच्यावर सगळं सोपवायचं"  एवढंच ते बोलले आणि बाजूला झाले.

गाडी हळुहळु पुढे जाऊ लागली तस घर दृष्टीआड होऊ लागलं. नेहाने बाळकृष्णची मूर्ती आपल्या हृदयाशी कवटाळली..आप्पा , संगीता आत्या आणि बाकी माणसं हात उंचावत तिथेच उभी होती. वाड्यातलं हसतं खेळतं घरपण आज कायमसाठी लांब गेलं होतं...!!! उरलं होतं ते फक्त आपासाहेबांचं एकटेपण...!! त्यांच्या लाडक्या लेकीशिवायचं......!!!

.....................

गावातल्याच नवीन घरात नेहाचा गृहप्रवेश करायचा असं ठरलं होतं त्यानुसार वृषालीताईंनी आणि बाकी मंडळींनी मिळून तिच्या स्वागताची तयारी केली. गाडी आवारातून पुढे आली . तसं आनंद आणि नेहा दोघेही खाली उतरले. अंगणातलं तुळशी वृंदावन तिच्याकडे पाहून छान हसल. तिनं सांगितल्या प्रमाणे घरासमोर तुळशी वृंदावन बांधलं होतं. ते बघून ती खुश झाली. घरा समोरील पॅसेज मध्ये छान फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. दोघेही त्यावरून चालत दाराजवळ आले. आनंदच्या एका काकूने त्या दोघांना ओवळलं आणि माप ओलांडून नेहाला घरात यायला सांगितलं. 

"अ हं असं नाही नाव घ्यायचं नि मगच यायचं घरात " जमलेल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी बोललं. फुलांच्या पायघड्या , नातेवाईकांची चाललेली थट्टा मस्करी बघून सगळ्यांनी तिला आपलं म्हणून स्विकारलंय हि जाणीवच तिला सुखावत होती. 

"घेतेस ना नाव....तुला जमेल तसं घे.." वृषालीताईंनी तिला म्हटलं. तशी तिनं होकारार्थी मान हलवली.

नवी नाती, नवी माणसं
पदर हे सुखाचे
आनंदरावांशी जुळले
 बंध हे रेशमाचे....!!!!

सर्वांनी टाळ्या वाजवल्या...नेहाने माप ओलांडून आनंदच्या घरात गृहप्रवेश केला.वृषालीताईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसत होतं...

..........................

दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे वृषालीताईंनी सगळ्यांना लवकर झोपायला पाठवलं.आनंद आणि नेहा देखील दमले होते. त्यामुळे त्यांनी मितालीला नेहा सोबत झोपायला पाठवलं आणि आनंदला दुसऱ्या खोलीत झोपायला सांगून त्या हॉल मध्ये आल्या. आलेले पाहुणे हॉल मध्ये झोपले होते. सगळं नीट आवरलेल आहे की नाही ते पाहून त्या देखील झोपायला गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच पूजा होती. वृषालीताईंनी नेहाला उठवलं आणि आवरून बाहेर यायला सांगितलं. बाहेर पूजेची सगळी तयारी झाली होती. गुरुजी देखील आले होते.आनंदही आणि नेहा दोघेही तयार होऊन आले. विधीवत पुजा पार पडली.आप्पासाहेब संगिता आत्या आणि बाकी नोकर मंडळी देखील पूजेला येऊन गेली.जमलेले नातेवाईक आपापल्या गावी गेले. घरातली आणि जवळची अशी मोजकीच माणसं आता घरी होती. 


................................

रात्री सगळ्यांनी मिळून आनंद आणि नेहासाठी एक खोली सजवली. बेडवरती फुलांच्या माळा..गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगऱ्याची फुलं सगळीकडे पसरली होती. आनंदच्या एका बहिणीने नेहाला खोलीत आणून सोडले. डेकोरेशन बघून ती फार खुश झाली.ती जाऊन बेड वरती बसली. दिवसभराच्या आणि लग्नाच्या गोष्टी आठवून ती स्वतःशीच लाजत होती. इतक्यात आनंद खोलीचं दार उघडून आत आला आणि त्यानं खोलीचं दार लावून घेतलं. ती थोडीशी बावरली आणि खाली मान घालुन बसली. आनंद तिच्या जवळ आला आणि म्हणाला

"नेहा...आज आपलं लग्न झालं. फार खुश असशील ना तू की माझ्या सारखा मुलगा तुला नवरा म्हणून मिळाला ते..." तशी तिनं लाजून मान हलवली.

" पण माझ्या कडून तू नवरा म्हणून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस..." दिवसभर सगळ्यांशी हसत वागणाऱ्या आनंदचा नूर आता पालटला होता. तिनं चमकून वर पाहिलं. 

"म्हणजे....? "  नेहा

"मला हे लग्न मान्य नाही..मी केवळ आई आणि बाबांच्या इच्छेसाठी हे लग्न केलंय....तू माझी लाईफ पार्टनर कधीही होऊ शकत नाहीस..." एवढं बोलून तो खोलीतून निघून गेला.


क्रमशः.....

🎭 Series Post

View all