हे बंध रेशमाचे - भाग 19
आनंदच बोलणं ऐकून नेहाला धक्काच बसला. ज्या गोष्टीची तिला भीती होती तेच झालं होतं. काय करावं तिला कळेना.नव्या आयुष्याची , आपल्या संसाराची बघितलेली तिची सगळी स्वप्न एका मिनिटात उद्धवस्त झाली होती.. तिला वाटलं की जर यांना लग्नच करायचं नव्हतं तर यांनी लग्नालाच नकार का नाही दिला.ती मान खाली घालून रडू लागली.तिच्या डोळ्यांसमोर आप्पांचा चेहरा उभा राहीला. किती खुश होते आपल्या लग्नामुळे आणि आता जर त्यांना हे कळलं तर त्यांना काय वाटेल....? आणि वृषाली मावशी....?? त्या तर आई सारखी माया करतात आपल्यावर.....कसं सांगायचं त्यांना की तुमच्या मुलाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून....!!! याच विचारात तिला कधी झोप लागली कळलं नाही. रात्री बऱ्याच उशिरा आनंद खोलीत आला.खाली फरशीवर अंथरून घालुन तो तिथेच झोपला.. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाला जरा उशिराच जाग आली. त्या आधीच आनंद आवरून खोलीतून बाहेर गेला होता. तिनं पाहिलं तर फरशी वरती अंथरूण घातलं होतं. म्हणजे हे रात्री इकडे येऊन झोपले तर...इतक्यात दरवाज्यावर टकटक ऐकू आली. तिला उठवायला कोणतरी आलं होतं. तसं तिनं घातलेलं अंथरूण पटकन गुंडाळून बेड खाली टाकलं आणि दार उघडलं. दारात आनंदच्या काकू उभ्या होत्या.
" Good morning ....!!! झाली का सकाळ..? " त्यांनी विचारलं
"हो झाली..." तिनं चेहऱ्यावर कसनुस हसू आणून म्हटलं.
"झोप झाली नाही वाटतं नीट...." त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे बघत हसत विचारलं.
"नाही असं काही नाही..." रात्रभर रडून तिचे डोळे लाल झाले होते. चेहराही म्लान दिसत होता. तिनं नजर दुसरीकडे वळवली.
"आवरून बाहेर ये हा. आम्ही आता निघतोय सगळी...ये लवकर..." तिच्या खांद्यावर हलकेच थोपटत काकूंनी सांगितलं आणि त्या निघून गेल्या.
"बरं " म्हणून तिन खोलीचं दार लावुन घेतलं.
थोड्या वेळाने आवरून ती बाहेर हॉल मध्ये आली. घरातली नातेवाईक मंडळी त्यांच्या गावी जाण्यासाठी निघत होती. आनंद आणि नेहाने त्यांना वाकून नमस्कार केला.
" या आता दोघांनी वेळ काढून तिकडे..." मामांनी म्हटले
" हो...येऊ ना..." आनंद
"तुला कुठे वेळ असतो यायला..आता बायको आलेय तर वेळ काढ जरा..." त्यांनी हसून सांगितलं
" हो नक्की..." आनंद
लग्नासाठी जमलेली सगळी मंडळी एक एक करून निघून गेली. आता घरात फक्त वृषालीताई , आनंद , नेहा , मिताली ,गीता मावशी आणि दोन ड्रायव्हर एवढीच माणसं उरली होती. घर आवरून ती सर्वजण उद्या मुंबईला जायला निघणार होती. आत्ताच वृषालीताईंशी बोलून सगळं सांगण्यापेक्षा मुंबईला गेल्यावर बोलू असं ठरवून नेहा गप्प राहिली. तिला राहून राहून आनंदचा राग येत होता. पण तिन स्वतःला शांत केलं. दुसऱ्या दिवशी त्यांना निरोप द्यायला आप्पासाहेब , संगीता आत्या आणि घरची नोकर मंडळी देखील आली होती. निघायची सगळी तयारी झाली. दामू काका आणि गंगा मावशींनी मिळून सगळं सामान बॅगा दोन्ही गाड्यांमध्ये ठेवलं. नेहाने संगीता आत्याला नमस्कार केला आणि ती आप्पांजवळ आली.
" काळजी घ्या स्वतःची...आता मी नाहीये तर औषध आणि वेळेत घ्या..." डोळ्यातलं पाणी कसोशीने थांबवून ती बोलत होती. तिनं त्यांना वाकून नमस्कार केला.
" हो ग बाळा.. तू नको काळजी करू. आता आनंदराव आणि वहिनींची काळजी घे. त्यांना काय हवं नको बघत जा..." त्यांनी हलकेच तिच्या डोक्यावर थोपटलं.
नेहाला रडू आवरेना ती आप्पाना मिठी मारून रडू लागली. अप्पांचेही डोळे पाणावले होते. पण तरी त्यांनी तिला लांब केलं आणि तिचे डोळे पुसले. बाजूलाच दामू काका आणि गंगा मावशी उभ्या होत्या. ती जाऊन त्यांना नमस्कार करु लागली तस त्यांनी तिला उठवलं..
"ताईसाब आवं काय करतायसा.... आमचया नगं पाया पडाया..."
"का...तुम्ही ही मला याप्पांसारखेचं आहात..करु दे मला नमस्कार...तुमच्या लेकीला आशीर्वाद नाही देणार का..." असं म्हणून नेहा दामू काका आणि गंगा मावशीच्या पाया पडली..त्यांचेही डोळे भरून आले होते.
" सुखी राहा पोरी.." गंगा मावशींनी तिला आशीर्वाद दिला.
" आता मी नाहीये. तुम्हीचं जपा आप्पाना..त्यांची काळजी घ्या..काही वाटलं तर मला फोन करा कधीही..." ती रडत रडत गंगा मावशींना सांगत होती.
"तुमी बिनघोर जावा आम्ही अहोत समदी..." गंगा
नेहाने आपले डोळे पुसले. आनंदनेही आप्पाना नमस्कार केला आणि सगळी गाडीत जाऊन बसली. पाणावलेल्या डोळ्यांनी नेहा सर्वाना हात उंचावून निरोप देत होती..सर्वजण हळूहळू दृष्टीआड होऊ लागले...
......................
मुंबईला गेल्यानंतर आनंदच रुटीन चालू झाला. तो सकाळी आवरून लवकर हॉस्पिटलला जात असे. लग्नामुळे त्याचा खूप वेळ वाया गेला होता त्यामुळे आता अभ्यास आणि हॉस्पिटल यावर त्यानं लक्ष केंद्रीत केलं होतं. नेहाशी तो जेमतेम कामपुरतं बोलत असे. ती देखील त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. आपलं आवरून ती गीता मावशींना मदत करायला किचन मध्ये जायची. कधी कंटाळा आला तर पुस्तकं वाचायची. उरलेल्या वेळात इथेही एखाद्या अनाथ आश्रमासाठी काम करावं असं तिला वाटत होतं. पण त्या बाबतीत आनंदशी कसं बोलायचं हा तिला प्रश्न पडला होता. कारण तिला मुंबईची काहीच माहिती नव्हती.एकदा संध्याकाळचा तो लवकर घरी आला. हीच संधी साधून तिनं त्याच्याशी बोलायचं ठरवलं. ती त्याच्यासाठी चहा घेऊन गेली. तो हॉल मध्येच सोफ्यावर मोबाईल घेऊन बसला होता.
" चहा..." तिनं त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला. तसं आनंदच तिच्याकडे लक्ष गेलं.
"तू का आणलास...गीता मावशी कुठायत ? " त्यानं विचारलं.
"आहेत आत.." ती आत न जाता तिथेच घुटमळत राहिली. त्याच्या ते लक्षात आलं.
" बोलायचंय का काही " आनंद
"नाही.....म्हणजे हो..." ती बोटं एकमेकांशी चाळवत म्हणाली..."म्हणजे मला एखाद्या अनाथाश्रमाची माहिती हवी होती..." तसं त्यानं मोबाईल मधून लक्ष काढून घेतलं.
" का ? " त्यानं विचारलं
"मी आधी काम करत होते ना..मला घरी कंटाळा येतो दिवसभर त्यापेक्षा मग इकडेही एखादं अनाथाश्रम असलं तर मला जाता येईल..तुमच्या माहितीत आहे का कुठे ?" नेहा
" अनाथाश्रम नाही पण NGO आहे एक... आपल्या हॉस्पिटल मधून आपण दरवर्षी त्यांना फंड ट्रान्सफर करतो. तुला चालणार असेल तर मी दाखवेन..."
नेहाला खूप आनंद झाला.
"हो चालेल ना...पण कसं जायचं ते सांगाल का मला इथलं काहीच माहीत नाहीये..." तिनं आपली अडचण सांगितली.
"हो. मी हॉस्पिटलला जाताना तुला सोडत जाईन..." आनंद बोलला.
नेहाला खूप बरं वाटलं. त्या दोघांच्यात थोड्या का होईना पण संवादाला तरी सुरवात झाली होती.
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा