हे बंध रेशमाचे - भाग 25

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 25

आनंद आपल्या रूम मध्ये आला. नेहा जागीच होती. 

"गेली का स्नेहा ?" तिनं विचारलं

तसा तो विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.

"हो गेली " आनंद 

 "छान आहे ना ती...मला फार आवडली...!!" नेहा

"अं.... हो हो ..." आनंद म्हणाला. तो अजूनही त्याच विचारात होता.

"तुझ्या पायाचं कसं आहे ? लागलंय का फार ? " त्यानं विचारलं

"नाही एवढं . जरा ठेच लागलेय फक्त." ती म्हणाली

"बघू मला..."  असं म्हणून तो तिच्या पायाजवळ येऊन बसला. तो बघत होता तसं तिनं पाय मागे घेतले.

"अहो नको एवढं नाही काही लागलेलं..." ती त्याला थांबवत म्हणाली. 

"डॉक्टर आहे मी...बघू दे मला किती लागलंय ते.." आनंद
मग तिन हळूच पाय खाली सोडले. अंगठ्याला थोडं लागलं होतं. त्यामुळे त्यातून रक्तही येत होतं. त्यानं ते पाहिलं आणि त्याला लावायला तो औषध बघू लागला. त्याच्या बॅग मधून त्याने फर्स्ट एडचा बॉक्स आणला. त्यातलं क्रीम त्यानं हळुवार तिच्या पायाला लावलं.ती त्याच्याकडे बघतच राहिली.


"दुखत नाहीये ना.." त्यानं क्रीम लावता लावता विचारलं
तिनं मानेनंच नाही म्हटलं. ती एकटक त्याच्याकडे बघत होती.


"हमम झालं लावून औषध...झोपा आता .." तो बोलला पण तिचं लक्षच नव्हतं ती भारल्या सारखी त्याच्याकडेच पाहत होती. 

"ओहह हॅलो, लक्ष कुठाय.." त्यांन टिचकी वाजवत विचारलं...तशी ती भानावर आली


"अं....?? काही नाही.." नेहा


"झोपा आता " तो म्हणाला.

"हो..." नेहा म्हणाली.

दोघेही खूप दमले होते त्यामुळे पडल्या पडल्या दोघांनाही शांत झोप लागली.


..............................

दिवस हळूहळू सरत होते. जून महिना उजाडला होता. नेहा आणि आनंद दोघांचंही आपलं रुटीन आता पुन्हा पूर्वी प्रमाणे चालू झाला होतं. नेहा आता घरकुलच्या कार्यालयात जात होती. रोज नाही पण आठवड्यातून किमान चार दिवस तरी ती जात येत असे. एखाद्या वेळी काही जास्त काम असल्यास परब मॅडम तिला बोलवून घेत असत. आनंद देखील रेग्युलर हॉस्पिटलला जात होता. नेहा त्याची सगळी तयारी करून ठेवत असे.त्याचा पाकीट, रुमाल, गाडीची चावी, बॅग, शर्ट पॅन्ट सगळं ती एका जागी ठेवत असे. त्यामुळे आनंदलाही छान वाटत होतं. त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी सवांद वाढला होता. नेहाची त्याला हळूहळू सवय व्हायला लागली होती. लग्न झाल्यापासून नेहा माहेरी गेली नव्हती. आपण गेलो तर आप्पाना आपल्या चेहऱ्यावरून समजेल की आपलं काहीतरी बिनसलं आहे त्यामुळे तिनं घरी जाणं टाळलं होतं. आप्पासाहेब मात्र चार चार दिवसांनी लेकीला फोन करून तिची खुशाली विचारत. नेहा गेल्यापासून त्यांना घर खायला उठलं होतं. त्यामुळे आठवण आली की ते नेहाला फोन करत. आनंद सुद्धा त्यांना कधीकधी फोन करून त्यांची चौकशी करे.त्यामुळे मनासारखा जावई मिळाल्याने अप्पासाहेब देखील खुश होते. आनंद हॉस्पिटल आणि अभ्यास याकडे पुन्हा एकदा वळला होता. पार्टीनंतर त्याच्या स्वभावात थोडा बदल झाल्याचं नेहा आणि वृषालीताई दोघींना देखील जाणवत होतं. तो फार बोलत नसे तरी पूर्वीपेक्षा त्याची चिडचिड बऱ्यापैकी कमी झाली होती.

.......................

आनंदला कॉन्फरन्स साठीचा मेल आला होता. त्याला MS साठी लागणारा प्रबंध त्या कॉन्फरन्स मध्ये सादर करायचा होता. तो जर अप्रुड झाला तरच त्याला पुढील शिक्षण घेता येणार होते. दोन महिन्यांच्या रिसर्चने त्याने त्यासाठीचा प्रबंध तयार केला होता. चार दिवसांनी त्याला कॉन्फरन्स साठी दिल्लीला जायचं होतं. घरी आल्यावर त्यानं त्याप्रमाणे आई आणि नेहाला कळवलं. या गोष्टीची दोघींनाही कल्पना होती. कारण त्याला दिल्लीला जावं लागेल हे आधीच ठरलं होतं फक्त त्याच्या तारखा आता समजल्या होत्या. कॉन्फरन्स चार दिवसाची होणार होती. त्यामुळे सगळं पॅकिंग व्यवस्थित करावं लागणार होतं. 

" किती दिवसांची कॉन्फरन्स आहे तूझी ? " वृषालीताईनी विचारलं

" चार दिवसांची आहे. कदाचित दिवस वाढुही शकतात " आनंदने सांगितलं

" मग तू नेहाला घेऊन जा ना सोबत...तुम्ही दोघे असे कुठेच गेला नाहियात लग्न झाल्यापासून..." वृषालीताई

"आई तिला नेऊन काय करू ? दिवसभर मी बिझी असणार ती कंटाळेल. " तो म्हणाला. 

" तरी पण तिला घेवून गेला असतास तर........" वृषालीताई  बोलत होत्या.

"आई नको उगीच ...मला खरच वेळही मिळणार नाही तिच्याशी बोलायला पण..." एवढं बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. 

 लांबूनच नेहा त्या दोघांच बोलणं ऐकत होती. पण यावेळी तिला फारसं काही वाटलं नाही. कारण हॉस्पिटल आणि अभ्यासाचा स्ट्रेस त्याला किती होता हे तिला जाणवत होतं. ती तशीच चालत वृषालीताईंजवळ आली.

"आई ....कामात आहात का ? " नेहा

"नाही. बोल ना...आनंद कॉन्फरन्सला जातोय दिल्लीला चार दिवस...सांगितलं ना तुला ?" त्यांनी विचारलं

"हो मला माहितेय..." ती म्हणाली

"मी म्हटलं त्याला तुला घेवुन जा म्हणून पण.....नाही म्हणाला तो.." त्या बोलल्या.

"आई खरच त्यांना वेळ नसेल मिळणार म्हणून ते नेत नसतील मला सोबत....आणि मी मग एकटी काय करू ते बाहेर गेले की.....आई एक विचारायचं होतं " नेहा

"काय ग बोल ना "....वृषालीताई

"हे नाहीयेत तर मी दोन दिवस आप्पाना भेटून आले तर चालेल का ? " तिनं हळूच विचारलं

" का ग....मला म्हातारीला कंटाळलीस की काय ? " त्यांनी हसून विचारलं

"असं नाही काही...पण गेले नाही ना लग्न झाल्यापासून आठवण येतेय अप्पांची....जाऊ का ? " नेहा

"हो जा ना बाळा...काही हरकत नाही..." त्यांनी सांगितलं

 नेहा खुश झाली आणि मग आपल्या खोलीत निघून गेली.

....................................

" आत आलं तर चालेल का ? " रूमचं दार ढकलून तिनं विचारलं

"ही तुझीही रूम आहे " आनंद म्हणाला.

"हो.. पण अजून माझी झाली नाही.." ती आत येत हळुच पुटपुटली.

"काय " त्याला काहीच कळल नाही.

"काही नाही...काय शोधताय एवढं.." खोलीभर कागदपत्रांचा पसारा घातला होता त्याने...

"अगं त्या रिसर्चच्या हार्ड कॉपीज ठेवल्या होत्या इथे. त्या शोधतोय...सापडतच नाहीयेत...वैताग आला शोधून . दिल्लीला जाताना हव्यायत त्या मला..." तो काहीसा चिडून खाली बसत म्हणाला.

"मी शोधुन देऊ का ? " तिनं विचारलं. 

"मला नाही सापडल्या तर तुला काय सापडणार ..." तो रागात होता.

"प्रयन्त करून बघायला काय हरकत आहे. कसे होते पेपर्स आणि कोणत्या बॅगेत वगरे ठेवल्याचं आठवतंय का तुम्हाला ? " नेहा

" हा....काही प्रिंट केलेले आणि काही डायग्रामचे पेपर्स होते.....ब्लू कलरच्या फोल्डरमध्ये ठेवले होते सगळे......पण तोच सापडत नाहीये..." आनंद

" थांबा ...तुम्ही शांत व्हा आधी...सापडेल..मी बघते थांबा..." ती त्याला धीर देत म्हणाली.

मग तिनं थोडावेळ शोधाशोध केली. सगळे ड्रावर्स तपासले. वॉडरोब उघडले...त्यातही नीट सगळं शोधलं....मग त्याच्या शर्टच्या खाली तिला एक निळ्या रंगाचा फोल्डर दिसला. तिनं तो बाहेर काढला.

"हे आहेत का बघा ते पेपर्स.." ती फोल्डर त्याच्याकडे देत म्हणाली.

"बघू ..." त्याने सगळे पेपर्स चेक केले आणि त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आलं होतं..त्याला खूप आनंद झाला.

"हो हो हेच हेच...." तो आनंदाने ओरडला.

"तुझ्यामुळे मिळाले ...नाहीतर काही खरं नव्हतं..माझी सगळी मेहनत फुकट गेली असती..." तो खूप खुश झाला.  आनंदच्या भरात त्याने नेेहाला मिठी मारली. तीला तो क्षण तिथेच थांबावा असं वाटलं.


थोडया वेळाने त्याच्या लक्षात आलं की आनंदाच्या भरात आपण नेहाला मिठी मारली आहे. तसा तो बाजूला झाला.

"सॉरी ...ते चुकून ....." तो नजर दुसरीकडे वळवत म्हणाला.

"असुदे.......आता हा घातलेला पसारा आपण आवरायचा का ? " .....ती म्हणाली.

"हो....हो... " तो हसून म्हणाला. 

ती मग सगळे पसरलेले कागद आवरू लागली. त्याला विचारून प्रत्येक बंच तिनं वेगळा केला. 

"फ्रेंड्स ??" त्याने तिच्याकडे हात करत विचारलं. तिला खूप छान वाटलं.

"का नाही..." तिनं त्याच्या हातात हात मिळवत म्हटलं.

"आता हे सगळे कागद नीट ठेवा....दरवेळी मी इतका पसारा आवरणार नाही..." ती लटक्या रागाने म्हणाली तसं दोघेही हसायला लागले. 

मग दोघांनी मिळून सगळं आवरलं. जिथल्या वस्तू होत्या तिथे जागच्या जागी ठेवल्या आणि ते दोघे आपापल्या जागी झोपी गेले. 

................................

चार दिवसांनी आनंद दिल्लीला जायला निघाला. त्याचं सगळं पॅकिंग नेहा आणि त्याने मिळून केलं होतं. तिच्याशी बोलताना त्याला छान मोकळं वाटायला लागलं. दिवसभराचा त्याचा थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. रात्री दोघेही जेवून झाल्यावर लॉन वरती फिरायला जायचे. त्यामुळे हळूहळू आनंदला या सगळ्या गोष्टींची सवय होऊ लागली होती. त्यामुळे बाहेर पडताना त्याला सतत काहीतरी राहिलंय अस वाटतं होत. निघताना त्यानं आईला नमस्कार केला. नेहाला बाय म्हणायला तो तिच्याजवळ गेला.

"चल मी निघतो...काळजी घे आईची...आणि काहीही लागलं तरी मला फोन कर.." तो सगळ्या सूचना देत होता.

"तुम्ही काही काळजी करू नका....मी आहे इथे बघायला." नेहा म्हणाली

"हा....चला निघतो मी नाहीतर एअरपोर्टला निघायला उशीर होईल मला..." असं म्हणून तो जायला निघाला. तो जेमतेम दरवाज्यापर्यंत गेला असेल. पाठून नेहा हाक मारत आली.

"अहो तुमचा रुमाल...." ती त्याच्याकडे देत म्हणाली.

"हा थँक्स..." तो जायला वळला...तोच नेहाने त्याच्यासमोर हात करत म्हटलं

"All the best..." त्यानेही हात मिळवलं आणि तो छान हसला...

"Thank you..... याची गरज होती.." तो हसत म्हणाला

"काळजी घ्या..." ती दरवाज्याला टेकून त्याला सांगत

होती.

"अजून काही.....माझी कॉन्फरन्स दिल्लीला आहे..वेळेत गेलो तर पोहचेन... जाऊ ना ? " त्यानं विचारलं

ती मानेनंच हो म्हणाली. तो तिला बाय म्हणून गाडीत बसला. गाडी दिसेनाशी होईपर्यंत नेहा तिथेच उभी होती.

क्रमशः... 

🎭 Series Post

View all