हे बंध रेशमाचे - भाग 27
दिवस हळुहळु पुढे सरकत होते. जून महिना अर्धा होवून गेला. पावसाला देखील बऱ्यापैकी सुरवात झाली होती. बदलत्या ऋतुसोबत आनंद आणि नेहाची मैत्री सुद्धा छान फुलू लागली होती. नेहाचं आपल्या सोबत असणं.. तिचं हसणं ..वागणं बोलणं आनंदला आवडू लागलं होतं. खरतर त्या दिवशीच्या पार्टी नंतर स्नेहाने त्याला जे समजावलं होत त्याचा हा परिणाम होता. तो नेहाकडे एक व्यक्ती म्हणून बघायला लागला. आपल्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीलाही मतं आहेत, त्याच्याही काही आवडी निवडी आहेत हे समजून घेतलं की नात्यातले बरेसचे प्रश्न आपोआप सुटतात. आनंद देखील नेहाला समजून घ्यायचा प्रयन्त करत होता. तिच्या सोबत बोलताना त्याच्या लक्षात यायचं की मुळातच ती खूप साधी होती. ना तिला मिरवायची हौस होती ना कोणताही बेफिकीरपणा...तिचं प्रत्येक काम नीटनेटकं आणि चांगलं होतं. मग ती घरातली कामं असोत किंवा ती करत असलेले घरकुल मधलं काम असो. तिच्या याच गुणांमुळे आनंदला ती नकळत आवडू लागली होती. आता कोणतीही गोष्ट त्याला सांगावीशी वाटली तर तो ती सगळ्यात आधी नेहाला येऊन सांगत असे. त्यामुळे मितालीशी त्याच बोलणं , भेटणं आता कमी झालं होतं. पण मिताली मात्र आनंदच्या मागेपुढे करायला एक संधी सोडत नसे. एका संध्याकाळी ती अशीच आनंदच्या घरी आली होती. आनंद बाहेर जाण्याच्या तयारीत होता...
" हाय...... आनंद कसा आहेस ? " मिताली आत येत म्हणाली
"कोण मितु तू....?? आज अचानक कशी काय इकडे ?" त्यानं विचारलं.
" का ....? नको होतं का यायला...तुला आवडलं नाही का मी आले ते..." मिताली बोलली.
"अग असं काय....बस की काय म्हणतेस..." तिला सोफ्यावर बसायला सांगून तो ही बाजूच्या खुर्चीत बसला.
"काही नाही....सहज आले. आपण भेटलो नाही ना यार खूप दिवसात...ए चल ना बाहेर फिरून येऊ कुठेतरी मस्त..." ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. तस आनंदने आपला हात बाजूला केला.
" मितु आपण नंतर जाऊ कधीतरी....एवढं काय.. तू आलेयस तर बस आईशी बोलत ..आम्ही जरा जाऊन येतो...तू बस तोपर्यत..." तो उठत म्हणाला.
"आम्ही म्हणजे कोण ? " तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
"मी आणि नेहा बाहेर जातोय जरा..." त्यानं सांगितलं
" नेहा...??" तिच्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपत नव्हते. 'हा
नेहासोबत फिरायला जातोय..??' ती मनात म्हणाली.
"ए मी पण येऊ...?? मला पण खूप कंटाळा आलाय यार..प्लिज ना...." मिताली आनंदला म्हणत होती. ते दोघे एकत्र जाणार हे ऐकूनच तिच्या पोटात गोळा आला होता.
" मितु आपण नंतर जाऊ ना निवांत...प्लिज.." आनंद बोलला. त्याला आता मितु सोबत असणं नको होतं.
"आनंद प्लिज ना....खरंच खूप कंटालेय मी...प्लिज प्लिज प्लिज...." मितु त्याला विनवण्या करत होती.
" Ok चल..." तो नाईलाजाने म्हणाला.
इतक्यात आनंदचं लक्ष जिन्याकडे गेलं. पायऱ्या उतरत नेहा खाली येत होती. तो तिच्याकडे बघतच राहिला. आनंदने दिल्लीवरून आणलेला रेडिमेड ड्रेस नेहाने घातला होता. यलो कलरचा टॉप त्यावर नेटेड फुलांची डिझाइन...पिंक कलरचा चुणीदार पायजमा आणि एम्ब्रॉडरी केलेली पिंक कलरची ओढणी वन साईड घेऊन नेहा जिना उतरत होती. तिच्या मोठ्या केसांची वेणी न घालता आज तिने केस छोटी क्लिप लावून मोकळे सोडले होते. ती खाली आनंदजवळ आली. मितालीला तिनं हाय हॅलो केलं.
"अहो... निघायचं ना..." नेहाने विचारलं तरी आनंद वेड्यासारखा तिच्याकडेच पाहत होता.
"आनंद यार....चल लवकर..." मीतूच्या ओरडण्याने तो भानावर आला.
तिघेही बाहेर आले. थांबा मी गाडी घेवुन येतो असं सांगून आनंद पार्कींग मध्ये गेला. त्याची गाडी घेऊन तो त्या दोघींजवळ आला. सवयीप्रमाणे मिताली फ्रंट सीट वर बसायला दरवाजा उघडत होती..पण मग आनंद गाडीतून उतरून खाली आला.
"मितु तू प्लिज मागच्या सीटवर बस ना..." त्यानं सांगितलं
तशी ती दरवाजा आपटून मागच्या सीटवर जाऊन बसली.
मग त्याने नेहासाठी दरवाजा उघडला आणि तिला बसायला सांगितलं. ती बसल्यावर त्याने दरवाजा लावला आणि तो ड्रायविंग सीट वरती येऊन बसला. त्याने गाडी स्टार्ट केली. आणि बीचच्या दिशेने गाडी वळवली.
...............................
गाडीत बसल्यावर कोणीच बोलत नव्हतं. आनंदच लक्ष मात्र राहून राहून नेहाकडे जात होता. तिचे मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर उडत होते त्यामुळे ती अजूनच छान दिसत होती. ते केस मागे सारताना तिची चाललेली धांदल पाहून त्याला हसू येत होतं. मिताली त्या दोघांकडेही बघत होती. आनंदच नक्की काय चाललंय तिला कळेना. 'हा हिच्या प्रेमात वगरे पडलाय की काय ?? ' ती मनातच म्हणाली. थोड्याच वेळात त्यांची गाडी बीच जवळ आली.
आनंद , नेहा आणि मिताली तिघेही खाली उतरले. बीचवर तुरळक गर्दी होती. कोणी आपल्या फॅमिली सोबत समुद्रात जाऊन मजा मस्ती करत होते. तर काही कपल्स वाळूत बसून समुद्राच्या उसळत्या लाटांकडे पाहत होते. काही जोडपी आपल्यात मश्गुल होती आजूबाजूच्या गोष्टीचं गोंधळाच जणू त्यांना भानच नव्हतं. एका बाजूला पाणीपुरी, भेळीचा स्टॉल होता. त्यालाच जोडून बाकीचीही दुकाने होती. आनंद , नेहा आणि मिताली तिघेही वाळूवरून चालत होते. मावळत्या सूर्याची किरणं सगळीकडे पसरली होती. त्यामुळे तो क्षण अगदी कॅमेरात कैद करावा इतका सुंदर दिसत होता....!!!
"छान वाटतंय नाही....इथे समुद्रा जवळ आलं की फार शांत वाटतं.... मनातलं सगळं ओझं याच्या सोबतीत हलकं होतं....!!! " नेहा आनंदला सांगत होती.
तो भान हरपून ती काय बोलतेय ते ऐकत होता. खरतर खूप दिवसांनी तो असा बीचवर आला होता.पुर्वी बाबा असताना तो , वृषालीताई ,श्रीकांतराव सगळे मिळून बीचवर यायचे आणि खूप धमाल करायचे ते त्याला आठवलं..
"ए चल पाणीपुरी खाऊया..." मिताली म्हणाली तसं तो भानावर आला.
"हा चल जाऊया..." त्याने मागे नेहाकडे पाहिलं ती शांतपणे समुद्र न्याहाळत होती. मितालीला पुढे व्हायला सांगून तो नेहाजवळ आला. सूर्याची कोवळी किरणं तिच्या चेहऱ्यावर पडली होती. त्यामुळे तिच्याकडे बघतच राहावंसं आनंदला वाटलं.
"काय एवढं हितगुज चालू आहे....समुद्राशी...?" त्यानं विचारलं
"काही नाही....शांत वाटतंय मस्त....कामाच्या आणि रोजच्या व्यापात अशी शांतता आपल्याला कधीच मिळत नाही.. त्यामुळे अशा पाण्याच्या कोणत्याही ठिकाणी गेलं तरी मनाला फार छान वाटत....!!! असं वाटतं ही शांतता साठवून घ्यावी मनात कायमस्वरूपी...!!! " नेहा बोलली.
"अस्स....! मग आता बरं वाटतंय ना ....चल पाणीपुरी खायला जाऊया " आनंद म्हणाला
"मला नकोय पाणीपुरी....आपण कणीस खाऊया का...मला फार आवडत...." ती म्हणाली
"चालेल...मितु तिकडे पाणीपुरी खायला गेलेय. मी तिला सांगतो तू खा. आम्ही कणीस खाऊन येतो तिथे...." तो म्हणाला. त्यानं तसं फोन करून तिला कळवलं.
"अस काही नाही....तुम्हाला हवी तर तुम्ही खा ना पाणीपुरी काहीच हरकत नाही.." ती म्हणाली.
"नाही.. आज मलाही कणीसाची चव बघायचेय.. चल जाऊ..." दोघेही हसत कणीसवाल्याच्या इथे गेले.
मिताली मात्र लांबूनच त्या दोघांना बघत होती. आनंद मध्ये एवढा बदल बघून तिला आश्चर्य वाटत होतं. तिचा नुसता जळफळाट होत होता.
...................................
त्यानंतर दोन तीन दिवसांनी दुपारी गंगा मावशींचा नेहाला फोन आला. आप्पासाहेबांची तब्येत थोडी बिघडली आहे असं त्यांनी सांगितलं. नेहाला अप्पांची काळजी वाटू लागली. मग वृषालीताईंनी नेहाला 'आप्पाना भेटून ये मग तुलाही बर वाटेल असं सांगितलं.' त्यामुळे मग नेहाने गावी जाण्याची तयारी केली.ड्रायव्हर दादांना नीट सूचना देऊन नेहाला घरी व्यवस्थित सोडा आणि मग गाडी घेऊन परत या असं वृषालीताईंनी सांगितलं. आनंद त्यावेळी हॉस्पिटलला होता त्यामुळे त्याला या सगळ्याची काहिचं कल्पना नव्हती. नेहाने त्याला कळण्यासाठी एक दोनदा फोन केला पण तो ऑपरेशन थेटर मध्ये असल्याचं नर्सने सांगितलं. तिनं फक्त नर्सला आनंद सरांना सांगा की 'मी गावी जात आहे' असा निरोप द्यायला सांगितला. ऑपरेशन थेटर मधून आनंद बाहेर आला त्यावेळी बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती. थोड्या वेळाने तो फ्रेश वगरे होऊन आपल्या केबिन मध्ये बसला. त्याने मोबाईल पाहिला तर त्यावर नेहाचे मिसकॉल होते. म्हणून त्याने तिला फोन लावला पण तिचा फोन लागत नव्हता. त्याने दोन तीन वेळेला ट्राय केला पण तेच उत्तर त्याला मिळालं. 'गेली कुठेही फोन टाकून ' असा तो विचार करत होता. फोन लागला नाही त्यामुळे त्याला राग आला होता. तेवढ्यात नर्सने येऊन नेहाने सांगितलेला निरोप दिला. त्याला प्रचंड राग आला होता. ' नेहा मला न सांगता जाऊच कशी शकते ' असं त्याला वाटलं. त्याच रागात तो घरी आला. घरी आल्यावर वृषालीताईंनी त्याला सगळं नीट सांगितलं आणि नेहा सुखरूप घरी पोहचल्याचंही त्याला सांगितलं. तसा त्याचा जीव भांड्यात पडला. रात्र झाली होती. नेहा शिवाय आनंदला चैन पडत नव्हतं आणि ती न सांगता गेली याचा रागही होता. आपल्याला एवढं अस्वस्थ का वाटतंय ते त्याला कळेना. 'खरचं आपण नेहाच्या प्रेमात पडलोय का ?? ' तो स्वतःशीच बोलत होता. त्याने ती रात्र जवळजवळ जागून काढली. उद्या आपण तिला भेटायचाच त्या शिवाय आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही असं त्यानं ठरवलं.. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो नेहाला भेटायला कोल्हापूरला जायला निघाला...!!!
क्रमशः..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा