हे बंध रेशमाचे - भाग 28
सकाळी सकाळी आनंद तयार होऊन कोल्हापूरला जायला निघाला. वृषालीताईंना फार आश्चर्य वाटतं होतं. 'हा अचानक कसा काय कोल्हापूरला जायला निघाला ' असा त्या विचार करत होत्या. मग त्यांच्या लक्षात आलं की काल 'नेहा गेलेय ना तिकडे...मग बरोबर... चालूदे चालूदे...चांगलं आहे..' त्या स्वतःशीच हसत मनात म्हणाल्या. त्यांना सांगून आनंद निघाला. गाडीत बसल्यावरही आपण तिकडे का जातोय ते त्याला कळेना.. 'इतक्या तडक्या फडकी आपण तिकडे जायचं ठरवलंय पण नेहाला आवडेल का आपण आलो ते ' तो विचार करत होता.. मुळात ती मला न सांगता कशी काय गेली याचा राग अजूनही त्याच्या मनात होता. विचारांच्या नादात तो कोल्हापूरला कधी आला त्याला कळलं देखील नाही. थोड्याच वेळात तो आप्पासाहेबांच्या वाड्यासमोर आला. तो आला तेव्हा नेहा झोपलेलीचं होती. आप्पासाहेबांना माईल्ड हार्ट अटॅक येऊन गेला होता. पण वेळेत उपचार झाल्याने त्यांची तब्येत आता बरी होती. रात्रभर नेहा त्यांच्या उशाशी बसून होती. त्यांना बर वाटायला लागल्यावर ती मग तिच्या खोलीत येऊन झोपली. साधारण सकाळचे दहा वाजत आले होते. आनंद आत आला. त्याला बसायला सांगून गंगा मावशी नेहाला उठवायला गेली.
"ताईसाब..... आव ताईसाब ....उठा.." गंगा मावशी नेहाला हलवून जागी करत होती.
"झोपू दे ग मावशी...." ती पुन्हा पांगरूण ओढून झोपली.
"आवं खाली कोन आलंय ते बगा चला..." गंगा मावशी तिला जोरजोरात उठवत होती.
"येऊदे गं कोण पण...मी काय उठत नाहीये...त्यांना सांग आप्पाना बरं नाहीये नंतर या..." ती अजूनही झोपेतच होती.
"बगा हा....मागून म्हनशीला सांगितलं न्हायी... मुंबई वरून पावने आल्याती..." असं म्हणून गंगा मावशी तिच्या जवळ गेली आणि नेहाच्या कानात सांगितलं " तुमचं खास मानुस आलया "
"काय.......????? " नेहा तिनताड उडल्यासारखी उठून बसली.
"खरं सांगतेयस तू.....??? अगं कसं शक्य आहे....?? " तिचा विश्वासच बसत नव्हता.
तशीच ती भरभर जिना उतरत खाली आली. आनंद हॉल मध्येच मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसला होता. ती हॉल मध्ये आली. तिनं पाहिलं तर खरंच सोफ्यावर आनंद बसला होता. त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलं.तिला पाहिल्यावर त्याचा राग कुठच्या कुठे पळाला. ती डोळे चोळून चोळून आनंदकडे आश्चर्याने बघत राहिली. मग आपण स्वप्नात आहोत की काय असं वाटून स्वतःलाच तिनं चिमटा काढला. आनंद तिच्याकडे पाहत हसत होता. ती त्याच्या समोर आली.
"तुम्ही ......??? तुम्ही इथे कसे....आणि ते ही इतक्या सकाळी ? " तिचा अजूनही तो आलाय यावर विश्वास बसत नव्हता.
"हो मीच.....का यायला नको होतं का...? " त्यानं हसून विचारलं
"नाही असं नाही.... पण अचानक कसे आलात...? फोन नाही मेसेज नाही..." ती म्हणाली.
"मी आप्पासाहेबांना भेटायला आलोय... त्यांना बरं नाहीये म्हणून...तुला आवडलं नाही का मी इथे आलो ते..." आनंद म्हणाला.
" नाही असं नाही...." ती जराशी लाजली.
त्यानं निरखून तिच्याकडे पाहिलं. केसांची घातलेली सैलसर वेणी...झोपेतून उठल्यामुळे विस्कटलेले केस.. बिस्कीट कलरचा टॉप आणि पायजमा.. धावत आल्यामुळे ओढणी घ्यायचंही तिला भान नव्हतं. 'किती छान दिसतेय अशी सुद्धा ' तो मनाशीच म्हणाला.
"अप्पा ...तिकडच्या बाजूच्या खोलीत आहेत. तुम्ही भेटा त्यांना..मी आवरून येते.." असं म्हणून नेहा गेली. तरीही मागे फिरून आनंदला बघत होती. तिच्या मनात फुलपाखरू उडत होते.
आनंद जाऊन आप्पासाहेबांना भेटला.त्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरनी दिलेले रिपोर्ट्स चेक केले आणि त्यांना औषध कशी घ्यायची ते नीट समजावून दिले.
" अरे पण आनंद ..एवढ्या घाई गडबडीत यायची काही गरज नव्हती...मी अगदी ठणठणीत आहे..." अप्पा हसत म्हणाले.
" हो तरी पण......" त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी नेहा आप्पांच्या खोलीत आली.
"अप्पा...खाऊन घ्या...नाश्ता आणलाय..." तिनं मग आप्पांचा नाश्ता ट्रे मधून बेडवर काढून ठेवला आणि दुसरी प्लेट आनंदला दिली. आप्पांचा नाश्ता ती त्यांना भरवू लागली. आनंद आणि नेहा चोरून एकमेकांकडे बघत होते. आप्पांच्या ते लक्षात आलं.
"अग मी काय लहान आहे का मला भरवायला...मी खाईन माझं...तू आनंदला काय हवं नको बघ ...एवढा प्रवास करून आलाय तो..." अप्पा म्हणाले. तसं नेहाने आनंदकडे बघत मान हलवली.
"आमची पोरगी घाबरट आहे अगदी...जरा मला बरं नाही असं कळलं तर पोर धावत आली...तिच्या मागे मागे तू आलास...." ते हसत म्हणाले
त्यांच्या शेवटच्या वाक्यावर मात्र आनंदला जोरात ठसका लागला. नेहाने पटकन उठून त्याला पाणी दिलं. पाठीवरून हात फिरवला. तसं त्याला बरं वाटू लागलं.
"आनंद अरे सावकाश खा...जायची घाई नाही ना मग..? आता आलायस तर राहा दोन दिवस मग एकत्रच जा दोघांनी...काय गं...? " अप्पा बोलले
" अं....?? हो हो..." एवढं बोलून नेहा प्लेट घेवून बाहेर जायला निघाली.
"अप्पा काका...मी म्हणत होतो की.....मी आणि नेहा आमच्या घरी गेलो संध्याकाळी तर चालेल का....? तेवढीच जरा साफसफाई होईल घराची..." आनंदच्या या बोलण्यावर मात्र बाहेर जाणाऱ्या नेहाचे पाय थबकले आणि ती तो काय बोलतोय ते ऐकू लागली.
" मग हे घरही तुमचंच आहे की..." ते हसून म्हणाले. " बरं जा जा...घर ही वाट बघत असतं आपल्या माणसाची...!!! जावून या...वाटल्यास आज राहा तिकडेच मी दामूला सांगतो रात्रीच जेवण आणून द्यायला..." अप्पा
"हो चालेल ...तुम्ही म्हणाल तसं..." त्याने हळूच नेहाकडे पाहिलं तशी ती लाजून खोलीबाहेर पळाली.
................................
संध्याकाळी आनंद आणि नेहा चालतच त्यांच्या घराच्या इथे जायला निघाले. गाडी त्यांनी वाड्याच्या इथेच ठेवली होती. पावसाचे दिवस होते. त्यामुळे संध्याकाळ जास्त झाली नसली तरी आकाशात काळे ढग जमले होते. त्यांच्या घरी जाण्यासाठी एका पायवाटेने ते दोघे निघाले होते. आनंदला त्या वातावरणात खूप छान वाटत होतं. सगळीकडे पाहत राहावी अशी हिरवळ.....झाडांना नवी पालवी फुटल्यामुळे ती टवटवीत दिसत होती.... पावसाचा ओलावा होता...वाटेवर बऱ्यापैकी चिखल झाला होता त्यामुळे पाऊल जपून टाकावं लागत होतं....आजूबाजूला असणाऱ्या शेतांमधून बायका लावणी लावत होत्या. येणारी जाणारी माणसं आनंद आणि नेहाकडे बघून गालात हसत होती. नेहाला सगळे ओळ्खत होते पण आनंदला सगळी पहिल्यांदाच पाहत होती त्यामुळे ती त्याच्याकडे कुतूहलाने पाहत हसत होती.आलेले ढग मधेच बाजूला होत होते तर पुन्हा काळोखी करत होते. पावसाचे टपोरे थेंब हळूहळू पडायला सुरुवात झाली. नेहा आणि आनंद भरभर चालू लागले. पण तोपर्यंत पावसाची मोठी सर आली आणि दोघेही भिजू लागले. आजूबाजूला वस्ती होती पण ती पाउलवाटेपासून जरा लांब होती. त्यामुळे त्यांना कुठेच आडोसा मिळेना..दोघेही तसेच भिजत घरी आले. आनंदने आपल्या जवळच्या किल्लीने घराचे दार उघडले. दोघेही चिंब भिजले होते. नेहा तर कुडकुडत होती. घरात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. अप्पा गडी माणसांकडून त्या घराची साफसफाई करून घेत..पण आता बऱ्याच दिवसात तिकडे कोण आलं नव्हतं त्यामुळे घरात जिकडे तिकडे धूळ साठली होती. आनंदने तात्पुरती हॉल मधली एक खुर्ची पुसली आणि त्यावर नेहाला बसायला सांगितलं आणि बाकीच्या घराची स्थिती बघायला आत गेला.बाहेर देखील चांगलंच अंधारून आलं होतं. पावसाचा जोर वाढला होता. विजा चमकत होत्या आणि गडगडाटही सुरू झाला. हॉल मध्ये बसलेली नेहा त्या आवाजाने घाबरत होती. इतक्यात लाईट गेले...त्यामुळे ती अजूनच घाबरली.
" आनंद आनंद .......कुठे आहात तुम्ही....मला फार भिती वाटतेय....प्लिज लवकर या..." ती ओरडत होती. आनंद होता त्याने तिचा आवाज ऐकला आणि काळोखातून चाचपडत तो बाहेर येऊ लागला.
"नेहा ...मी येतोय बाहेर थांब तिथेच....उठू नको तिथून .." तो बाहेर येता येता तिला सांगत होता.
"हो मी आहे इथेच...पण तुम्ही लवकर या..." ती घाबरून म्हणाली.
इतक्यात वाऱ्याच्या झोताने समोरचं दार उघडलं गेलं...आणि एक थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या अंगावरून गेली..तसा तिच्या अंगावर रोमांच उठले..आधीच भिजल्यामुळे ती थरथरत होती. तोपर्यंत आनंदही बाहेर आला. त्यानं अलगद तिचा हात पकडला.
"नेहा मी आहे इथे....घाबरू नको..आपण मेणबत्ती आहे का बघूया घरात कुठे... थांब मी मोबाईलची बॅटरी चालू करतो.." तो म्हणाला.
तेवढयात मोठा आवाज झाला आणि वीज चमकली. नेहाने घाबरून आनंदला घट्ट मिठी मारली. आनंदनेही तिला मिठीत घेतलं.
"नेहा मी आहे इथेच.... तुझ्या जवळ...घाबरू नको..." तो तिला शांत करत तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.
तरीही ती त्याला चिकटुनच उभी होती. भीतीने तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिचं असं लहान मुलांसारखं वागणं पाहून त्याला हसू आलं. तो तिला धीर देत शांत करत होता आणि हळूच तिला आपल्यापासून लांब करायचा प्रयन्त करत होता. खरंतर त्याला वाटत होतं..' इतक्या लांब ज्याच्यासाठी आलो ती नेहा आपल्या जवळ आहे. खरच आपण प्रेमात पडलोय तिच्या...' ही जाणीवच त्याला सुखावत होती. या अशा बेधुंद वातावरणात तिला आपल्या मनातलं सांगावं असं त्याला वाटलं पण आजपर्यंत आपण नेहाला कोणतंच सुख दिलं नाही पण तिनं मात्र आपली कायमच साथ दिली. त्यामुळे तिला प्रेमाची कबुलीही तिच्यासाठी छान सरप्राईज प्लॅन करून द्यायची असं त्यानं मनोमन ठरवलं..... तेवढ्यात पुन्हा एकदा मोठ्याने वीज कडाडली आणि आनंद पासून बाजूला होत असलेली नेहा त्याला अधिकच चिकटली..
"तुम्ही प्लिज जाऊ नका मला सोडून.... मला अंधाराची फार भीती वाटते.." ती म्हणाली
"हो डिअर.... मी कुठेही जात नाही तुला सोडून कधीच.... I like you Neha....Like u so much....Am always with u....Forever dear..."
असं बोलून आनंदने मिठी अधिकच घट्ट केली..
क्रमशः......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा