हे बंध रेशमाचे - भाग 37

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 37

ती गाडी आनंदच्या समोरूनच गेली. त्या पाठोपाठ त्याला मिताली देखील रेस्टॉरंट मधून बाहेर येताना दिसली. तसं तो तिला दिसणार नाही अशा पध्दतीने त्याच्या गाडीच्या मागे येऊन लपला. नेहा तोपर्यंत गाडीतून खाली उतरली नव्हती. तिला तेवढ्यात आप्पासाहेबांचा फोन आल्यामुळे ती गाडीतच त्यांच्याशी फोनवर बोलत होती. मिताली निघून गेल्यावर आनंद पुढे आला. नेहा सोबत असताना मिताली त्यांच्या मध्ये येणं त्याला नको होतं. त्यामुळे ती गेल्यावर तो समोर आला तोपर्यंत नेहाचा देखील फोन झाला होता. ती गाडीतून खाली उतरली. दोघेही आत रेस्टॉरंटमध्ये गेले. मिताली आणि ती आपण पाहिलेली गाडी यांचं काही कनेक्शन आहे का याचा विचार तो करायला लागला. नेहाने त्याला हाक मारली तसा तो भानावर आला. दोघेही कॉफी पिउन तिथून बाहेर पडले. नेहाच्या गाडी शिकण्याच्या निमित्ताने का होईना त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन थोडं तरी कमी झाल्याचं तिला जाणवलं. रोजच्या सरावामुळे नेहा महिनाभरातच गाडी चालवायला शिकली. तिला खूप भारी वाटत होतं....!!!

.................................

गेल्या महिनाभरात विशेष अशा कोणत्याच घटना हॉस्पिटलमध्ये घडल्या नव्हत्या. पण तरीही काही वेळेला आनंद रात्री घरी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये काहीतरी हालचाली सुरू आहेत असं त्याला जाणवलं. त्याने असिस्टंट म्हणून ठेवलेला विश्वासु माणूस मात्र त्याचं काम चोख पार पाडत असे. रात्री एक दोन वेळा त्याच्या हॉस्पिटलच्या इकडे असणाऱ्या स्टोअररुमच्या दिशेने त्याने एका वोर्डबॉयला जाताना पाहिलं. पण हॉस्पिटलचच काहीतरी काम असेल असं समजून पहिल्या दोन तीन वेळेला त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तरीही तो माणूस त्या वोर्डबॉय वरती नजर ठेवून असायचा. आनंदच्या ही बाबतीत काही वेगळं होत नव्हतं. तो काय करतो, कुठे जातो ते बघायला त्याच्याही पाळतीवर माणसं ठेवलेली होती. त्यामुळे आनंद सावध होता. डॉ. परांजपे दहा दिवस होऊन गेले तरी अजून हॉस्पिटलला यायला लागले नव्हते. काहीतरी गडबड आहे असं वाटून तो एकदा संध्याकाळी डॉ. परांजपेंच्या घरी गेला. त्याने दारावरची बेल वाजवली. डॉक्टरांच्या पत्नीने दार उघडलं.

" कोण आनंद...?.....ये ये....आज अचानक कसा काय वाट चुकलास इकडे..." त्या आनंदला आत घेत म्हणाल्या. समोरच त्याला त्यांनी हातानेच खुर्चीवर बसायला सांगितले. तो खुर्चीत जाऊन बसला. तोपर्यंत त्या त्याच्यासाठी पाणी घेवून आल्या.

" घे पाणी घे.....काय म्हणतोस....?? कसे आहेत घरी सगळे....?? " त्यांनी आपुलकीने विचारलं. त्या आनंदच्या समोरच सोफ्यावर बसल्या. तो पाणी प्याला आणि ग्लास समोरच्या टेबलवर ठेवला. तो अजूनही गप्प होता. 

" हा....बरे आहेत सगळे...तुम्ही कशा आहात ? " तो इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाला.

" माझं काय...चाललेयत घरातली कामं आपली...तू काय नेहाला आणू नकोस हो घर वगैरे दाखवायला.." त्या उगीचच रागावल्यासारखं करत म्हणाल्या.

" हम्म...आणेन हो कधीतरी....वेळच नाही मला सध्या..." तो म्हणाला.

" हो ...तू तरी काय करशील म्हणा...बाबा गेल्यापासून तुझ्यावरच तर पडलंय सगळं..." त्या उसासा टाकत म्हणाल्या.

" हम्मम ...व्हायचं होतं ते झालं....तुम्ही नि काका होतात म्हणून मी सावरलो...काकांनी खूप सांभाळून घेतलं मला...." एवढं बोलून तो काहीसा थांबला...बोटांशी खेळ करत काकांबद्दल विचारू की नको विचारू असं त्याच्या मनांत चालू झालं. पण विचारणं आवश्यक होतं.

" काकू......काका नाही दिसत कुठे....?? " त्याने इकडे तिकडे बघितलं.

" म्हणजे....???........अरे तूच त्यांना कॉन्फरन्स साठी बंगलोरला पाठवलंयस ना....??? " त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. 

" .....अं...??? ......हो हो मीच पाठवलंय...सॉरी हा माझ्या लक्षातच राहत नाही हल्ली...हॉस्पिटलच्या गडबडीत..." त्याने वेळ मारून नेली. 

" अरे घाबरलेच मी...... म्हटलं असं का बोलतोयस...." त्या जरा रिलॅक्स झाल्या.

" हा ते पटकन लक्षात आलं नाही.... त्यांचा फोन नाही लागते सो मी दुसरा नंबर वगरे आहे का ते विचारायला आलो होतो खरंतर...." त्याला काय बोलावं सुचेना.

" अरे दोन दिवसाआड फोन येतो त्यांचा...त्यांचा मोबाईल काहीतरी बंद पडलाय म्हणालेत....म्हणून दुसऱ्या नंबर वरून ते कॉल करतात...." त्यांनी सांगितलं.

" okk..... मला देता का तो नंबर....?? ....माझं जरा काम होतं...." आनंद 

" थांब हा....आशिषच्या मोबाईलवर येतो फोन.."  असं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच आशिषला हाक मारली. आशिष आईचा आवाज ऐकून खाली हॉलमध्ये आला. तो जवळपास आनंदच्याच वयाचा होता. त्याने आनंदला हाक हाय केलं. आईने सांगितल्यावर त्याने आनंदला परांजपे काका ज्या नंबर वरून फोन करायचे तो नंबर दिला. मग आनंदही तिथे फ़ार वेळ न थांबता त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडला आणि गाडी त्याने आपल्या घराच्या दिशेने वळवली. 

.........................


परांजपे काकांच्या विचारातच तो घरी आला. त्याने आल्या आल्याच नेहाला सगळं सांगितलं.

" आनंद तुझ्या लक्षात येतंय का....तू त्यांना कुठेच पाठवलं नाहीयेस तरीही ते त्यांनी तू त्यांना कॉन्फरन्स साठी पाठवलंयस असं सांगितलं..." नेहा 

" हो ना....मी पण तोच विचार करतोय. आणि त्यांना फोनही दुसऱ्या नंबर वरून येतायत...काकू आणि आशिष दोघेही मला डिस्टर्ब वाटले नाहीत. याचा अर्थ काका निट आहेत असं त्यांना भासवलं जातंय ...मला काहीतरी गडबड वाटतेय..." तो खूप गोंधळला होता.

" हो तेच ना....काकांना कोणी काय केलं तर नसेल ? " तिने आपली शंका बोलून दाखवली.

" काकांचा लवकरात लवकर शोध घ्यायला हवाय...त्या शिवाय आपल्या हाती काहीही लागणार नाही..." तो हताशपणे म्हणाला.

" सगळं नीट होईल आनंद....नको काळजी करू...." ती काहीशा आत्मविश्वासाने म्हणाली.

..............................

आनंदने ठेवलेला विश्वासु माणूस आपलं काम चोख बजावत होता. त्याने एका वोर्डबॉयला स्टोअररुम मध्ये चार पाच वेळा जाताना पाहिलं. त्याला काहीतरी संशय वाटला.त्यामुळे एका रात्री त्याने स्टोअर रुम मध्ये जाऊन बघायचं ठरवलं. पण त्यातही खूप मोठी रिस्क होती. रात्री तो एका वोर्डबॉयचया वेषात तो स्टोअर रूम कडे गेला. ती बाकीच्या रूम्स पासून थोडी एका बाजूला होती. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेवून त्याने रूमचं दार उघडलं. आत जावून त्याने पाहिलं तर सगळीकडे हॉस्पिटलचच समान पडलं होतं. त्यावर धूळ पसरली होती. कोळ्यांनी ठिकठिकाणी आपली घर बांधली होती. त्याने सगळीकडे नजर फिरवली पण त्याला काहीच सापडलं नाही. खोलीच्या दाराच्या मागे एक कपात होतं. चुकून त्याचा धक्का त्या कपाटाला लागला. तसं ते हलल. त्याने थोडा जोर लावून ते बाजूला सरकवलं. भिंतीत त्याला एक दरवाजा दिसला. त्याला लॅशलॉक होतं. त्याला त्याच आश्चर्य वाटलं. नक्की या दरवाजाच्या पलीकडे काहीतरी असणार असं वाटलं. पण लॉक असल्यामुळे त्याला ते काय असेल कळेना. शेवटी त्याने कपाट होतं तसं पुन्हा सरकवून ठेवलं. तो स्टोअर रूम मधून बाहेर पडणार इतक्यात त्याला बाहेर कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. 

" परवा रात्रीचं आपलं काम झालं पाहिजे..पण कोणाला काही संशय नाही ना आलेला...?? " पहिली व्यक्ती

" कशाला संशय येतोय....तो आनंद रात्री आठ पर्यंतच हॉस्पिटलला असतो मग तो घरी निघून जातो. त्याच्यानंतर कोण आहे आपल्याकडे लक्ष द्यायला. " दुसरी व्यक्ती हसत म्हणाली.

" हमम....ते झालंच पण त्याच हल्ली लक्ष असत सगळीकडे बारीक.....त्यामुळे परवाच आपलं काम उरकून टाकू..." पहिली व्यक्ती.

" हो....सगळी तयारी आहे की नाही ते बघायला हवं.....आयत्या वेळी घाई नको.....परवाच ऑपरेशन करुन टाकू....." दुसरी व्यक्ती

" शशशशशश......... भिंतीला सुद्धा कान असतात...जरा जपून....." असं म्हणून दोघेही स्टोअर रूमचा दरवाजा उघडू लागले. 

आत बसलेल्या आनंदच्या माणसाला त्याचा अंदाज आला. तो लागलीच अडगळीच्या वस्तू होत्या त्याच्या मागे होऊन ललपला. त्या दोन्ही व्यक्ती आत आल्या आणि त्यांनी कपाट सरकवलं. त्याच्या मागच्या त्या दरवाज्याला किल्ली लावून ते दोघेही आत गेले. त्या माणसाने सुटकेचा निश्वास टाकला..आणि हीच संधी साधून तो माणूस हळूच स्टोअर रूम मधून बाहेर आला..आणि आनंदच्या केबिनमध्ये येऊन थांबला.

............................

रात्र खूप झाल्यामुळे त्या माणसाने आनंदला फोन करायचं टाळलं आणि तो झोपी गेला. दुसरा दिवस उजाडला. आनंदला बाहेरगावी एका दुसऱ्या हॉस्पिटलला गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे सकाळी लवकरच तयार होऊन तो बाहेर पडला. दोन ते तीन दिवसांचा हॉस्पिटलचा कार्यक्रम होता. त्यामुळे आनंदची तिकडेच राहण्याची वगरे व्यवस्था करण्यात आली होती. त्याला बाहेर पाठवायला नेहाचं मन तयार होईना. कारण आधीच त्याच्यावर पाळत ठेवली जात होती. तरीही 'मी स्वतःची काळजी घेईन 'असं सांगून आनंद तिकडे जायला निघाला. आनंद बाहेर पडून गेल्यानंतर सुमारे दोन तासांनी त्याच्या माणसाचा घरी फोन आला. आनंदचा फोन लागत नसल्यामुळे त्याने शेवटी घरी फोन केला होता. नेहाने फोन उचलला. त्यामुळे तो माणूस गोंधळला. पण तिला या सगळ्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती त्यामुळे तिने जे असेल ते मला सांगा असं त्याला सांगितलं. त्यावर त्याने रात्री घडलेला प्रसंग , स्टोअर रूम मध्ये असणारा दरवाजा याबाबत तिला सगळं सांगितलं. तिने त्याचं बोलणं ऐकून फोन ठेवून दिला. आनंद तर दोन दिवसांनी येणार होता. त्यामुळे काय करायचं हे तिला कळेना. आनंद नसेल तेव्हा हॉस्पिटल ही आपली जबाबदारी आहे असं तिला वाटलं.. शेवटी आपणच या प्रकरणाचा छडा लावायचा तिनं ठरवलं आणि तिच्या डोक्यात त्यासाठीचा एक प्लॅन तयार होऊ लागला.


क्रमशः.....

🎭 Series Post

View all