Login

हे बंध रेशमाचे पर्व 2 भाग 10

Love Story


आनंद आणि नेहा अमेरिकेतून भारतात परततात. त्यानंतर ते गावी आपल्या आईला म्हणजेच वृषालीताईंना भेटायला जातात. त्या दरम्यान परांजपे काका त्यांच्यापासून काहीतरी लपवत असल्याचं आनंदला वाटतं. आनंद आणि नेहा गावी जातात तेव्हा त्यांच्यासोबत परांजपे काका ,काकू आणि त्यांचा मुलगा आशिष देखील त्यांच्यासोबत येतो. तिथे गमतीजमती घडत असतात. तेव्हाच सर्वानुमते आनंद आणि नेहा यांचं धुमधडाक्यात पुन्हा एकदा लग्न लावायचं ठरतं. पण त्या आधी दोघांना भेटायला द्यायच नाही असं ठरवण्यात येतं. नेहाची मामेबहीण मेघना देखील त्या लग्नासाठी येते. वृषालीताई परांजपे काका , काकू मुंबईला परत यायला निघतात. पण आनंद , आशिष ,नेहा आणि मेघना थोडे दिवस गावी राहतात. सगळे मिळून डोंगरावर असलेल्या देवळात जायचं ठरवतात. ती वाट जंगलातून जात असते त्यामुळे आनंद आणि आशिषला खूप थ्रिलिंग वाटत असतं. त्यांच्यासोबत दोन वाटाडे देखील असतात. आता पुढे....
..............................

(9 व्या भागात आपण पाहिलं... \" लगेच येतो \" असं सांगुन तो वाटाड्या तिथून निसटला. नेहाने मग आणलेल्या खाऊतून सगळ्यांना थोडं थोडं खायला दिलं. पाणी पिऊन ते वाटाड्याची वाट बघू लागले पण त्याचा काही पत्ताच नव्हता. थोड्या वेळाने अंधार पडायला सुरुवात झाली असती. इतक्यात अचानक जोरात कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि सगळे तिकडे धावले..)


अंधार आता अधिकच गडद होऊ लागला. आवाज आला त्या दिशेने सगळे गेले. त्यांच्या सोबत जो वाट दाखवायला आला होता त्याला डुकराने ढुशी दिली होती आणि तो माणुस घाबरून जोरात ओरडला. काय झालं ते रात्रीच्या अंधारात त्याला दिसलच नाही तो तसाच खाली पडला. थोडं फार खरचटलं होतं. आनंद, नेहा, मेघना आणि आशिष सगळेच त्याच्याजवळ आले. आनंदने आपल्या बॅगेतून फर्स्ट एडचा बॉक्स आणायला आशिषला पाठवलं. आशिष बॉक्स घेऊन आला . आनंदने मग त्याला औषध लावलं आणि बँडेज केलं तरी देखील त्याच्या हातातून कळ येत होती. कदाचित तो पडल्यामुळे फ्रॅक्चर झालं असावं असा आनंदचा अंदाज होता. त्यामुळे त्याने मग त्याला शक्य झालं तर पुन्हा खाली गावात पाठवायचं ठरवलं. आनंदने सगळ्यांना मोबाईल चेक करायला सांगितले. कोणाच्या मोबाईलला रेंज असली तर गावातुन मदत मागवता आली असती. नेहाच्या मोबाईलला थोडी रेंज होती. त्या माणसाकडून नंबर घेऊन तिने गावात फोन केला आणि कोणाला तरी यायला सांगितलं. साधारण तासाभराने चार माणसं त्यांना शोधत आली. त्यातल्या दोघांनी त्या वाटाड्याला आपल्या सोबत नेलं आणि उरलेले दोघे आता बाकीच्यांना वाट दाखवणार होते.

" तुमी नेहा ताई काय...... ? " त्यातल्या एकाने नेहाच्या तोंडावर बॅटरी मारत विचारलं.


" हो.... " ती म्हणाली.


" म्हनजे आप्पासायबांची लेक ना..... " तिने मान डोलावली. " आवं ताईसाब आदी सांगितलं असतं तर समदी तयारी करून ठेवली असती. पर तुमी काय कालजी करू नका आमी राहाया तंबु आनले हायती... " ते म्हणाले तसं सगळ्यांनाच हायस वाटलं.

त्यांनी मग थोडी जागा मोकळी करून साफ केली आणि आणलेले तंबु उभारले. मग जवळच्याच काटक्या गोळा करून शेकोटी पेटवली. हवेत बऱ्यापैकी गारवा होता. मग शेकोटीभोवती सगळे मस्त गप्पा मारत बसले. आनंद त्याच्या हॉस्पिटलच्या गमती जमती सांगत होता. मग गाण्याच्या भेंड्या झाल्या थोडा वेळ. रात्रीची वेळ.. मस्त हवेतला गारवा यामुळे वातावरण अजूनच धुंद होत होतं. त्या वाटाड्यानी सगळ्यांसाठी जेवण आणलं होतं. गरमागरम झुणका भाकरी आणि ठेचा, कांदा....!!! नुसतं नाव ऐकूनच नेहाच्या तोंडाला पाणी सुटलं. पण खायचं कसं...?? कारण त्यांनी सोबत डिश वगरे काही नेल्या नव्हत्या. मग त्या भाऊंनी सगळ्यांसाठी छान पत्रावळ्या करून दिल्या. पळसाची , आंब्याची मोठी मोठी पानं जमवून त्यांनी पत्रावळ्या सांधल्या. आशिषला आणि आनंदला हे सगळंच नवीन होतं. त्या दोघांचंही बालपण मुंबईत गेलेलं त्यामुळे या गोष्टी त्यांना माहीतच नव्हत्या. आनंद तर हे सगळं खूप एन्जॉय करत होता. सगळ्यांसमोर एकेक पत्रावळी मांडली आणि शेकोटीच्या उजेडात त्यांना जेवायला वाढलं. भाकरी , सुका झुणका त्यावर हिरव्या मिरचीचा ठेचा.. झकास बेत..!! त्यांनी मुठीने कांदा फोडून एकेक फोड प्रत्येकाला दिली नि मग ते ही जेवायला बसले. जेवण झालं आणि सगळे झोपायला गेले. पण आनंदला काही केल्या झोप येत नव्हती. त्यात जंगलात असल्याने अजुनच भीती. कितीतरी वेळ तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. बाजूला पाहिलं तर आशिष मस्त तंगड्या पसरून घोरत पडला होता. शेवटी तो तंबूच्या बाहेर आला. बाहेर छान चांदणं पडलं होतं. आजूबाजूची झाडं त्या चांदण्यातून न्हाऊन निघाली होती. तो चालत चालत नेहाच्या टेंटजवळ आला. त्याने डोकावुन पाहिलं तर दोघीही झोपल्या होत्या.

" नेहा..... नेहा...." त्याने दबक्या आवाजात हाक मारली. पण तिकडून एक नाही की दोन नाही.

" नेहा.... उठ.... " त्याने पुन्हा हाक मारली. पण यावेळेस नेहा ऐवजी मेघनाच जागी झाली असती.


" झोपु दे ना यार...... " ती झोपेतच पुटपुटली. तिचं बडबडण ऐकून आनंदने कपाळावरच हात मारला.

त्याने मग नेहाच्या पायाला हात लावून तिला जाग करू लागला. पायाला कायतरी जाणवताच ती उठली. ती ओरडणार इतक्यात आनंदने तिच्या तोंडावर हात ठेवला. " मी आहे आनंद.. बाहेर ये जरा... " तो हळूच पुटपुटला. आणि तिला घेऊन बाहेर आला.

दोघेही मग तसेच पुढे चालत गेले आणि चांदण्यांच्या उजेडात तिथेच पाय मोकळे सोडून बसले.

" छान वाटतंय ना इथे....?? " तो म्हणाला.

" हम्म....... "

" तुला माहितेय.. मी चांदणं खूप वेळा बघितलंय पण अनुभवतोय पहिल्यांदाच... " त्याने एक हात तिच्या खांद्याभोवती लपेटला.

" हो का... थोडक्यात आता तू माणसात आलायस..." ती जोरात हसू लागली.


" मग आधी काय प्राण्यांमध्ये होतो का...?? " तो काहीसं चिडून म्हणाला.

" तसं नाही रे.. पण प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यांनी सांगून नाही समजत ती स्वतः अनुभवावी लागते. आम्ही लहान असताना नदीवर जायचो कंटाळा आला की... त्यातली काही मुलं पाण्याची भीती वाटून लांबच उभी राहायची , काही डुबक्या मारायची , काही वेगवेगळे दगड जमवायची.. काही नुसतीच पाय सोडून बसायची... प्रत्येकासाठी एक वेगळा अनुभव होता. त्यामुळे आपण काही गोष्टी स्वतः करून बघायच्या... " बोलता बोलताच तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.


समोरच्या तळ्यात चंद्राचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. अगदी गोष्टीत असतं तसं... !! तिला खूप मजा वाटत होती. चंद्राच्या त्या शीतल चांदण्यात दोघेही एकमेकांना नव्याने जाणुन घेत होते.


" तुला आठवतंय आनंद तू मला तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस तेव्हा आपण असेच जवळ होतो एकमेकांच्या... आणि बाहेर मस्त धुंद करणारा पाऊस....!!! ती रात्र कधी संपूच नये असं वाटत होतं मला.....!!! " ती त्याचा हात हातात घेत म्हणाली.


" हो का.... पण मी तर तुला आपल्या घरी मुंबईला प्रपोज केलं होतं. इथे नाही... " त्याने खांदे उडवले.


" हो. पण तू जेव्हा माझ्या मागे मागे ईकडे गावी आला होतास तेव्हाच तुझं प्रेम मला कळलं होतं.. " ती हसली.


" तेव्हा कळत होतं नि आता सांगून पण कळत नाही.... " तो मान फिरवून पुटपुटला पण तिने ऐकलच.


" हम्म..... मग काय तीन वर्षे आपण एकत्र असून पण तू मला कुठे फिरायला नेल नाहीस. कधी माझ्यासाठी वेळ दिला नाहीस. मग त्याची शिक्षा नको का तुला.... " ती त्याला वाकुल्या दाखवत होती.


" हो का....!! आता बघ तुला सोडणारच नाही.... " त्याने हलकेच तिला जवळ ओढलं तशी ती शहारली. गारव्यामुळे त्याचे थंड झालेले हात तिच्या चेहऱ्यावरून , मानेवरून फिरू लागले... त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर काटा फुलत होता.


" आनंद सोड... येईल कोणीतरी....." ती त्याचे हात बाजूला करत म्हणाली.


" हो का... येऊदेत. माझी बायको आहे. मी काहीही करेन.. अशी घट्ट माझ्या मिठीत बांधुन ठेवणारे तिला.... " त्याने तिला अधिकच जवळ घेतलं आणि तिच्याभोवती हातांच कड केलं.


" आनंद अरे काय चाललंय तुझं... खूप रात्र झालेय चल आपण झोपू... " ती त्याचे हात बाजूला सारत उठायला लागली.


" अजिबात नाही.. मी उठायला हवं असेल तर मला काहीतरी द्यावं लागेल....." तो मिश्किल हसला.


" हा बाबा देते..... तुला काय हवं ते देते पण चल इकडून.. मगाशी त्या माणसाला डुकराने धडक दिली बघितलीस ना... उठ चल.... " तिच्या बोलण्याचा त्याच्यावर थोडासा परिणाम झाला आणि तो उठला.


" पण तू विचारलं नाहीस मला काय हवंय ते.....?? " त्याने आपले हात तिच्या गळ्यात गुंफत विचारलं.


" काय हवंय......?? "


" बघ हा... मग नाही म्हणायचं नाहीस...."


" नाही... बोल.... "


" तुझ्या या गुलाबी ओठातली बर्फी हवी आहे मला... तेही रोज.... देणार....??? " त्याने तिच्याकडे बघत डोळा मारला. ती लाजुन त्याच्यापासून दूर पळाली. तो हळूहळू चालत तिच्यापाशी आला. लाजेने तिने आपलं तोंड लपवल. त्याने हळूच तिचे हात बाजूला केले आणि तिची हनुवटी हलकेच वर उचलली. भीतीने तिने डोळेच मिटले.


" नेहा..... आपल्या प्रेमाला फक्त किस , रोमान्स या गोष्टीची गरज नाही गं... ते प्रेम खूप सुंदर आणि गहिरं आहे.... " त्याच्या बोलण्यावर तिने डोळे उघडले.


" आणि गरज नाही असं पण नाही........" त्याने तिला पटकन डोळा मारला आणि तिच्या नाजूक गुलाबी ओठांचा कधी ताबा घेतला ते तिला कळलंच नाही.. त्याच्या प्रेमाच्या वर्षावात मात्र ती हळूहळू विरघळायला लागली.

..........................................


सूर्याची कोवळी किरणं झाडांतून डोकावू लागली आणि सगळ्यांचीच झोप चाळवली. तरीही सोबत आलेले वाटाडे आधी उठले. बाकीचे उठेपर्यंत त्यांनी छोटीशी चुल मांडली आणि त्यावर पाण्याचं आधण ठेवलं. एकेक करून सगळी उठू लागली. आनंद आणि नेहाने दोघांनी मिळून मग चहा केला. दूध नव्हतंच त्यामुळे ब्लॅक टी केला. आशिष आणि मेघना तर डाराडूर झोपले होते. दोघांनाही हलवून जागं केलं. मेघना लगेच उठली पण आशिष अजूनही लोळत होता. शेवटी आनंदने त्याच्या तोंडावर पाणी मारलं तसा तो उठला.


" आ..... आ...... गार गार...... " करत आशिष साहेब उठले.

त्याच्या सगळ्या अंगावर डासांनी सुंदर नक्षी काढली होती रात्रभर.. त्यामुळे तो लाल लाल फोड उठल्यामुळे कांजण्या आलेल्या माणसासारखा दिसत होता. त्याच्याकडे बघुन सगळेच हसायला लागले.


" का हसताय.....??? तुमच्या सगळ्यांच्यात मीच हँडसम आहे म्हणुन उगीचच चेष्टा करताय का माझी.... " केसांवरून हात फिरवत तो स्टाईल मध्ये म्हणाला.


" हो .. तूच सगळ्यात छान दिसतोस...... माकडा....." असं म्हणून आनंदने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि आशिष समोर धरला. आता शॉक लागायची वेळ आशिषची होती.


" आ..... आ........ बाप रे....!!! असं काय झालंय हे....?? " त्याने आपला चेहरा चाचपुन पाहिला.


" काही नाही. इथल्या डासांना तू खूपच आवडला आहेस.... !!! " मेघना हसली. तसं आशिषने रागाने तिच्याकडे पाहिलं.


" असुदे..... डॉक्टर आहे माझा दादा... असं असं बरं करेल तो मला.... " तो तिच्यासमोर चुटकी वाजवत होता.


" हो का.... पण आत्ता मेडिकल नाही इथे. मग कसं होणार बाळाचं.... चुचुचुककक्क......." मेघना त्याला चिडवायला लागली.


" मी नाव सांगीन दादाला तुझं......." तो रागावला.


" काय लहान आहेस का...?? नाव सांगीन म्हणे... रडक्या..... " मेघना


दोघे भांडत होते. कोणत्याही क्षणी त्यांची मारामारी चालू झाली असती...त्यांची मजा मस्ती बघत आनंद आणि नेहा मस्त चहाचे घुटके घेत बसले होते.....!! कारण दोघांच्याही डोक्यात त्यावेळी बहुदा एकच विषय घोळत होता..


क्रमशः.....

🎭 Series Post

View all