हे बंध रेशमाचे - भाग 30

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 30


आनंद आणि नेहाचं रेग्युलर रुटीन चालू असत. आनंद आता नेहाच्या अवती भवती राहण्यासाठी संधी शोधत असे. वेळ मिळाला तर तिला कधी कामात मदत कर, ती दमली असली आणि तो जर घरी लवकर आला असेल तर तिच्यासाठी स्वतःहून चहा करणं , तिच्या अभ्यासात मदत करणं. हे सगळं तो मनापासून करू लागला. तिच्यावर असणारं प्रेम तो तिला त्याच्या वागण्यातून दाखवत होता. आपल्या प्रेमाची कबुली देण्याआधी तो तिला आपण सोबत असल्याची जाणीव करून देत होता. तिचा विश्वास जिंकत होता. नेहाला त्याच्या या बदलत्या वागण्याचं अप्रूप होतं. पण त्याही पेक्षा त्याने आपल्याला आपली पत्नी म्हणून स्विकारलंय याचा तिला जास्त आनंद होता. नेहाच्या वागण्या बोलण्यातही कमालीचा फरक पडला होता. लग्न ठरलं तेव्हा गावंढळ , बावळट समजणाऱ्या नेहाला आता कोणी पाहिलं असतं तर ती नेहा हिचं का असा प्रश्न पडला असता. तिचं राहणीमान अजूनही साधंच होतं. पंजाबी ड्रेस, लांबसडक वेणी, गळ्यात मंगळसुत्र, हातात बांगड्या...कधीतरी साडी सुद्धा ती नेसत होती. बदलला होता तो तिचा स्वतःकडे बघायचा दृष्टीकोन....!!! परब मॅडमच्या मदतीने , त्यांच्या मार्गदर्शनामुळे तिनं स्वतःमध्ये बदल केला. कोणतही काम आपण करू शकतो हा आत्मविश्वास तिच्यात आला.. तिच्या वागण्या बोलण्यातही कमालीचा बदल होत होता. आनंदला तिचं हेच बदलेल रूप भुरळ पाडत होतं...

...................................

आनंदच्या वाढदिवसाला आता फक्त दोनच दिवस उरले. 'घरकुल' मध्येही सेलिब्रेशनची जोरदार तयारी चालू होती. आनंदच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना , त्याच्या सोबत काम करणाऱ्या डॉक्टर्सना देखील बोलावलं होतं. आनंद देखील नेहाला त्याच दिवशी आपल्या मनातलं सांगणार होता. तिच्यासाठी तो क्षण खूप स्पेशल असावा असं त्यानं ठरवलं आणि त्यानुसार तो तयारीला लागला. वाढदिवसाचा दिवस उगवला. आनंदला त्या दिवशी जरा उशिराच जाग आली. कारण रात्री त्याच्या फ्रेंड्सनी फोन करून मेसेज करून बारा वाजताच त्याला विश केलं होतं. त्यामुळे त्याला सकाळी उठायला उशीर झाला. खिडकीतून सूर्य आत डोकावू लागला आणि त्यानं आनंदची झोप चाळवली. तो उठून बसला. बाजूला पाहिलं तर नेहा कधीच उठून गेली होती. कोल्हापूर वरून आल्यानंतर तो नेहाच्या बाजूलाच बेड वर झोपत होता. पण तरीही त्याने तिला जवळ घ्यायचं जाणून बुजून टाळलं होतं. त्यामुळे रोज सकाळी तिच्या प्रसन्न चेहऱ्याने तिचं ते गुड मॉर्निंग ऐकणं त्याला आवडे. तो मुद्दाम त्यासाठी झोपून राहायचा आणि ती उठवायला आल्यानंतरच उठायचा. पण आज ती बाजूला नाही आणि आपल्याला उठवायला कशी आली नाही याचं त्याला नवल वाटलं. आपल्यासाठी काय ग्रीटिंग कार्ड वगरे ठेवलंय का ते  त्यांन पाहिलं...पण तिने काहीच मेसेज ठेवला नव्हता की त्याला ती विश करायलाही आली नव्हती. त्याचं मन खट्टू झालं...ही माझा वाढदिवस विसरली की काय.. अस त्याच्या मनात येऊन गेलं. तो आपलं आवरून नाश्ता साठी खाली आला. तर तिथेही त्याला ती दिसली नाही. वृषालीताई पेपर वाचत बसल्या होत्या. गीता मावशी त्या दोघांसाठी नाश्ता घेवून आल्या. बघितलं तर नाश्त्याला पण काही स्पेशल दिसेना. त्याच्या बर्थडे च्या दिवशी सकाळपासून त्याच्या सगळं आवडीचं करत असत. पण आज फक्त पोहे....!! 

" हे काय आज नाश्त्याला पोहे...." तो तोंड वाकड करत म्हणाला.

" अरे आज गीता मावशींची तब्येत बरी नाही म्हणून मीच त्यांना म्हटलं, पटकन काहितरी होईल असं करा फार घाट घालत नका राहू .." त्यांनी समजवणीच्या सुरात त्याला म्हटलं.

"हमम..... " तो मुकाट्याने खावू लागला. " आई नेहा कुठाय....? "  त्यानं विचारलं

" अरे घरकुल मधून फोन आला सकाळी म्हणून मग गेली लवकर... तू झोपला होतास म्हणून मला सांगून गेली.."

" एवढा काही झोपलो नव्हतो...उठवून सांगितलं असतं तरी चाललं असतं..." तो काहीसा रागावून पुटपुटला.

" अं.... काही म्हणालास का ? बरं तू येणारेस ना दुपारी उदघाटनाला  ??......लक्षात आहे ना तुझ्या..." वृषालीताई म्हणाल्या

" अं..... हो हो....येणारे ...." नेहा नव्हती त्यामुळे त्याचं कशातच लक्ष नव्हतं. त्याने नाश्ता आटपला आणि तो जायला निघाला. निघताना आईला त्याने वाकून नमस्कार केला.

" सुखी भव..... का रे आज काही विशेष...?? नमस्कार वगरे...." वृषालीताई

'म्हणजे....?? आई पण विसरली माझा वाढदिवस..' तो मनात म्हणाला. 

" काही नाही सहजच..." तो एवढुसं तोंड करून तिथून निघून गेला.


आनंद हॉस्पिटलला पोहचला. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी रांगोळी काढली होती. सगळा स्टाफ  डॉक्टर्स, नर्सेस, वोर्डबॉय सगळे आनंदची वाट पाहत होते. तो आल्यावर सगळ्यांनी एकच गलका केला. सर्वांनी त्याला जोरात बर्थडे विश केलं. कोणी बुके दिले तर कोणी छोटंसं फ़ुल देवून त्याला विश करत होतं. त्या सगळ्यांच्या प्रेमाने तो भारावून गेला. सर्वांचे आभार मानून तो आपल्या केबिन मध्ये आला.त्याची केबिन सुद्धा आलेल्या बुकेज आणि फ्लॉवर्सनी भरून गेली होती. तो श्रीकांतरावांच्या फोटो समोर येवुन उभा राहिला आणि  त्याने फोटोला नमस्कार केला. आलेले सगळे बुके त्याने पाहिले. आणि पुन्हा येऊन आपल्या खुर्ची वरती बसला. सारखं त्याचं मोबाईलकडे लक्ष जात होतं. नेहाचा एखादा मेसेज येईल याकडे आशा लावून बसला होता. त्याच्या सगळ्या फ्रेंड्सनी त्याच्यासाठी विशेस पाठवल्या होत्या. एका रेड रोज आणि त्या सोबतच्या ग्रीटिंग कार्डने त्याचं लक्ष वेधलं. त्यावर लिहलं होतं.

" To 
    Dear Anand 
        Wish you many many happy returns of the day..All your wishes comes true.. god bless you dear. 
                                                      From , 
                                                       Mitali.

" Thank you , Mitu.."  आनंद मनातच म्हणाला.

.............................................


दुपारी बाराच्या दरम्यान तो 'घरकुल' मध्ये आला. घरकुल मधली सगळी मंडळी जमली. परब मॅडमनी आनंदच स्वागत केलं. संस्थेचे अन्य सभासद आणि मान्यवर मंडळी देखील जमली होती. आनंदची नजर मात्र नेहाला शोधत होती. पण त्याला ती कुठेच दिसेना. शेवटी न राहवून त्याने परब मॅडमना तिच्याबद्दल विचारलंच. ती आहे.. आतमध्ये तयार होतेय असं त्यांनी सांगितलं. थोड्याच वेळात वाचनालयाच्या उदघाटनाला सुरवात केली. दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत केले गेले. त्याच्या स्वागताची जबाबदारी नेहावर होती. ती बाहेर आली आणि आनंदच तिच्याकडे लक्ष गेलं. डार्क पिंक कलरची साडी नेसून नेहा सगळ्यांना पुष्पगुच्छ देत आनंदपर्यंत आली. तो बघतच राहिला. तिने दिलेला बुके घ्यायचंही भान त्याला नव्हतं. तिनं हाक मारून त्याच्या हातात बुके दिला आणि ती पुन्हा आत गेली. मग सर्वजण वाचनालयाच्या इथे आले. आनंदच्या हस्ते त्याच उदघाटन झालं आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. बरीचशी मंडळी आली होती. आज त्याला 'घरकुल ' मधल्या कोणीही विश केलं नव्हतं. त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं. तो त्या माणसांमध्ये नेहाला शोधत होता पण त्याला ती परत दिसलीच नाही. आलेल्या मान्यवर पाहुण्यांसोबत तो जेवला. त्याला नेहाचा प्रचंड राग आला होता. तो तिची वाट बघून पुन्हा हॉस्पिटलला निघून गेला. 

.........................................

संध्याकाळी त्याला घरकुल मधून परब मॅडमचा फोफोन आला.

" हॅलो.....हॅलो आनंद सर..." त्यांचा आवाज काहीसा घाबरल्यासारखा होता.

" हॅलो .....हा मॅडम बोला...तुमचा आवाज का असा येतोय..." आनंदने विचारलं.

" सर.........सर.....नेहा....नेहा.." त्या एवढचं बोलल्या.

" नेहाचं काय....?? मॅडम बोला लवकर....काय झालंय..." त्यालाही आता काळजी वाटू लागली 

" सर.....सर... नेहा पायऱ्यांवरून पडलेय...तुम्ही प्लिज लवकर इकडे या..." त्यांनी घाबऱ्या स्वरात सांगितलं.

" काय.....??? मी....मी येतोय लगेच...तुम्ही थांबा.." त्याने फोन जवळजवळ आपटला आणि तो पळतच बाहेर आला.

गाडी घेऊन तो घरकुलच्या दिशेने निघाला. थोड्या वेळात तो घरकुलच्या दारात उभा होता. त्यानं पाहिलं तर आतमध्ये फक्त काळोख दिसत होता. नेहा......नेहा....परब मॅडम ....त्याने हाका मारल्या....पण कोणीच उत्तर दिलं नाही. इतक्यात त्याच्या समोरचे सगळे लाईट पेटले. त्यानं पाहिलं तर तो संपूर्ण हॉल लायटिंग करून सजवला होता. भिंतीवरती कागदी माळा आणि फुगे लावले होते. समोरच्या भिंतीवर डिझाइन मध्ये मोठ्या अक्षरात ' Happy Birthday Anand ' असं लिहलं होतं. वृषालीताई,  परब मॅडम , बर्वे आजी आजोबा सगळी पुढे आली आणि सगळ्यांनी त्याला जोरात हॅपी बर्थडे विश केलं...ते सगळं बघून तो खूप भारावून गेला. त्याच्या चेहऱ्यावरून आनंदाश्रू ओघळले. तो हसत आत आला. ते सरप्राईज बघून तो खूप खुश झाला. मग त्याला परब मॅडमनी केलेला फोन आठवला. त्यानं त्याबद्दल त्यांना विचारलं त्यावर त्या हसून 'she is safe...Don't worry '  इतकंच म्हणाल्या आणि बाकीच्या तयारीसाठी आत गेल्या. सगळेजण येऊन त्याला विश करत होते. आजी आजोबा , मुलं सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. मग कोणीतरी जाऊन मोठा केक घेऊन आले. तो टेबलवर नीट ठेवण्यात आला. पण केक कापण्या आधी त्याला नेहाला भेटायचं होतं. त्यानं येऊन आईला तिच्याबद्दल विचारलं पण त्यांनी माहीत नाही म्हणून विषय टाळला. इतक्यात मागून त्याला परब मॅडमचा आवाज आला. 

" सर.......या मॅडम आल्यायत तुम्हाला भेटायला..." परब मॅडम म्हणाल्या तसं त्यानं मागे वळून पाहिलं.

नेव्ही ब्लू कलरचा अँकल लेंथ वन पीस ...त्याला गळ्यापासून हातापर्यंत त्याच कलरची नेटेड डिझाईन....दोन्ही बाजूला हेअरकट करून मोकळे सोडलेले केस...मोठे एअर रिंग्स...हातात डायमंड ब्रेसलेट आणि एका हातात मोबाईल...लिमिटेड हाय हिल्स....घालून एक मुलगी उभी होती.

" Hello.... Anand..."  ती हात पुढे करून म्हणाली.


क्रमशः.......


सर्व वाचकांचे मनापासून आभार. तुमच्या कंमेंटस खूप छान आहेत. तरीही तुम्हाला या कथेतील कोणत्या पात्रांना भेटावस वाटतंय आणि या कथेतला तुम्हाला आवडलेला पार्ट कोणता ते मला कमेंट्स मधून नक्की सांगा...या कथेच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. कथा इतरत्र कोठेही आढल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. तरी कथा आवडल्यास नावसाहित शेअर करावी. 

पुढील भाग उद्या रात्री पोस्ट करण्यात येईल. 

🎭 Series Post

View all