हे बंध रेशमाचे - भाग 29

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 29

मुसळधार पडणाऱ्या पावसाने आणि त्यामुळे आलेल्या गारव्याने नेहा आणि आनंदला अधिकच जवळ आणलं. 'हा क्षण इथेच थांबावा ' असं दोघांनाही वाटत होतं. थंडीने कुडकूडणारी नेहा आनंदच्या मिठीत शांत झाली होती. पण तरीही बाहेर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दोघांच्याही अंगावर शहारे येत होते. आनंदने तिला हलकेच बाजूला केलं आणि मोबाईलच्या उजेडात जाऊन आधी दार लावून घेतलं. दोघेही मगाशी भिजले होते त्यात लाईट नाहीत त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कशीबशी मोबाईलच्या उजेडात त्याने मेणबत्ती शोधली. तोपर्यंत त्याने नेहाला हॉल मध्येच खुर्चीवर बसवून ठेवलं. या अशा पावसात आल्याचा चहा मिळाला तर काय बहार येईल असा आनंद विचार करत होता..तर दुसरीकडे नेहा लाईट लवकर येउदेत म्हणून देवाकडे विनवण्या करत होती. मेणबत्ती लावून आनंदने नेहाच्या समोरच्या टेबलवर ठेवली आणि तोही तिच्या बाजूला येऊन बसला. 

" काय मस्त वाटतंय ना.....या अशा वातावरणात.... बाहेर मस्त पाऊस.... हा गारवा.....आणि फक्त आपण दोघेच..." तो म्हणाला. त्यावर ती लाजली. 

" ए आपण मस्त चहा करायचा का...?  आम्ही कॉलेजला असताना अशा पावसात मुद्दाम भिजायचो...आणि कॉलेजच्या टपरीवरचा फर्स्टक्लास चहा आणि कांदा भजी....अहहहा ..!!!!! "  आनंद 

" हो केला असताना पण सामान कुठाय चहाचं...? इथे काय शिल्लक असेल असं वाटत नाही..." ती म्हणाली

त्यावर आनंदला आठवलं लग्नाच्या वेळी घरात बऱ्यापैकी किराणा सामान भरलं होतं.नेहाची इकडे जेवण वगरे करायची वेळच आली नाही कारण लग्नानंतर दोन दिवसातच सगळे मुंबईला गेले त्यामुळे तिला काहीच माहीत नव्हतं.

" अग लग्नाच्या वेळी थोडं सामान आणलं होतं त्यामुळे चहा पावडर ,साखर तरी घरात असेलच. आपण आप्पाना घरी फोन करून सांगुया की जेवणा सोबत दूध आणि आपल्याला बदलायला कपडे पाठवा म्हणून..." तो म्हणाला

" हो चालेल....पण तुमची बॅग कुठाय ? तुम्ही येताना कपडे आणले नाहीत का..? कारण तुम्ही आलात तेव्हा तुमच्या सोबत बॅग नव्हती कुठलीच... " तिनं विचारलं

तिच्या या बोलण्यावर मात्र त्याची ट्यूब पेटली. नेहाला भेटायच्या नाटकात तो बॅग वगरे न घेताच आला होता. तिला भेटून परत जायचं असं त्यानं ठरवलं होतं त्यामुळे कपडे वगरे लागतील असा विचारच त्याने केला नव्हता. 

" मी काहीच कपडे आणले नाहीयेत....हे घातलेत तेच...एखादा ड्रेस गाडीत असेल फार तर एमर्जन्सीचा..." तो काकुळतीला येऊन म्हणाला.त्यावर ती जोरात हसू लागली....

" ए तू हसू नको हा.....मी काय राहायचं ठरवून आलो नव्हतो...मी फक्त तुला........." त्याने वाक्य अर्धवटच सोडलं.

" मला काय......." एवढं बोलून ती पुन्हा हसू लागली. नेहमी सगळं टापटीप असणारा माणूस बॅग न घेता येतो याच तिला आश्चर्य वाटत होतं आणि हसूही येत होतं.

" काही नाही....." तो लटका राग दाखवत तिच्यापासून दूर सरकला.

" बाप रे रागावलं वाटतं एक माणूस आमच्यावर..." ती त्याच्या जवळ जात म्हणाली. मगाशी आनंदने व्यक्त केलेल्या त्याच्या भावना तिनं ऐकल्या होत्या. त्यामुळे आपण निदान त्यांना आवडायला तरी लागलोय याचं तिला समाधान होतं. 

" आपण असं करूया मी गंगा मावशीला सांगते आप्पांचे कपडे तुमच्यासाठी आणायला...असे ओल्या कपड्यात राहिलात तर सर्दी होईल...आणि बाकीचंही सामान आणायला सांगते..." ती म्हणाली

" हो चालेल हा डॉक्टरीण बाई...अग डॉक्टर कोण मी का तू...?? मला पण कळतं." तो हसून म्हणाला

"तुमचा मोबाईल द्या.  मी घरी विसरलेय माझा फोन..." नेहा

" छान.... घ्या बाईसाहेब.." त्याने फोन काढून तिच्याकडे दिला.

पाऊस देखील आता ओसरला होता. तिनं घरी फोन करून बदलायला उकपडे, दूध आणि जेवण आणायला सांगितलं. पाऊस कमी झाल्यामुळे लाईट देखील आले..त्यामुळे दोघांचाही जीव भांड्यात पडला. थोड्या वेळात गंगा मावशी आणि दामू काका जेवण घेऊन आले. गंगा मावशींनी कपडे नेहाकडे दिले आणि दूध आत नेऊन ठेवलं.
मग तिनं आनंद आणि नेहाला कपडे बदलायला पाठवलं आणि घराचा सगळा केर काढला. ओटा साफसूफ केला. भांडी पुसली. त्यात दूध ओतून ठेवलं. आणलेलं जेवण भांड्यांमध्ये काढुन ठेवलं आणि ती घरी जायला निघाली. नेहा तोपर्यंत कपडे बदलून आली. गंगा मावशी आणि दामू काका दोघेही निघून गेले. जाताना मावशीने ' दार घट्ट लावा हा ' असं सांगून हसत बाहेर पडली. ती गेल्यावर नेहाने दरवाजा लावून घेतला आणि ती मागे वळली. तेवढ्यात कपडे बदलून आनंद बाहेर हॉल मध्ये आला. त्याने त्याच्यासाठी आणलेले आप्पांचे कपडे घातले होते. त्याच्याकडे बघून नेहा हसत सुटली. कारण आप्पांचा सदरा पायजमा त्याला ढगळ होतं होता. अप्पा त्याच्यापेक्षा उंच आणि धिप्पाड होते त्यामानाने आनंद लहान होता. त्यामुळे त्यांचे कपडे त्याला खूपच सैल होत होते. नेहाला हसताना पाहून त्याला राग आला.

" काय हसतेस..." तो लटक्या रागाने विचारत होता.

" तुम्हाला माहितेय आमच्याकडच्या शेतात की नाही तुमच्यासारखच आम्ही एकाला उभं करून ठेवतो.....आम्ही बुजगावण म्हणतो त्याला...." असं म्हणून ती पुन्हा हसत सुटली.

"मी बुजगावण काय.... थांब बघतोच तुला..." तो तिला पकडायला तिच्या मागून धावू लागला. तशी तीही पळाली. 

" पकडा पकडा...." ती त्याला चिडवत होती. त्यामुळे तो अजूनच जोरात तिच्या मागे धावू लागला. 

ती पळत पळत आत आली आणि दाराआड लपून राहिली. आनंद तिला शोधत होता. कुठे दिसतेय का ...शेवटी ती लपली होती त्या दाराजवळ तो आला. त्याचं लक्ष नसताना तिनं पटकन त्याला मोठयाने लहान मुलं करतात तसं भों केलं. तो चांगलाच दचकला. दुसऱ्याच क्षणी त्यानं तिला बाहेर ओढली आणि आपल्या हातानी विळखा घालून तिला जवळ ओढलं..तशी ती बावरली..

" आता कुठे जाशील पळून...." तो हसत म्हणाला

" अहो , सोडा ना...."  ती लाजून म्हणाली. 

" सोडण्यासाठी धरलं नाही...इतके दिवस फार त्रास दिला ना मी तुला...मग आता तरी तुझ्याशी प्रेमाने वागतो जरा..."  तो बोलत होता.

" असं काही नाही....मी ही किती वेंधळी होते तेव्हा....म्हणूनच तुम्हाला आवडले नाही..." नेहा

" हो का....मग आता काय बदल झालाय तुझ्यात बघू तरी..." तो एका हाताने तिचा चेहरा आपल्याकडे वळवत म्हणाला. ती लाजून चुर झाली. त्यानं मग अलगद तिला बाजूला केलं तशी ती आत पळाली. 

गंगा मावशीने आणलेलं जेवण नेहाने गरम केलं. दोघही मस्तपैकी जेवले. कारण लाईट पुन्हा जाईल याची भीती होती. जेऊन झाल्यावर दोघेही बाहेरच्या झोपाळ्यावर जाऊन बसले. पाऊस कमी झाला तरी अजूनही हवेत गारवा होता. तिथेच दोघेही गप्पा मारत बसले. रात्र हळूहळू वाढत होती. पुन्हा एक हलकी पावसाची सर आली. वाऱ्याच्या झोतामुळे ते बसले होते तिथे पाणी येउ लागलं तस मग दोघेही उठून आत आले. रात्र बरीच झाली होती तरी त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या. मग आनंदने दोघांसाठी मस्त चहा करून आणला. त्याने तिला आपल्या कॉलेजच्या वेळच्या गमतीजमती सांगितल्या. तो खूप दिवसांनी असा मोकळेपणाने तिच्याशी बोलत होता. ती त्याच्याकडे बघत त्याचं बोलणं ऐकत होती. पहाटेपर्यंत त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्यानंतर दोघेही तिथेच झोपी गेले. एका नव्या सुरवातीची ती पहाट साक्ष देत उभी होती......!!!! 

.....…......................

दुसऱ्या दिवशी दोघांनाही जरा उशिराच जाग आली. नेहाने पाहिलं तर आनंद तिच्या बाजूलाच तिच्या हातावर हात ठेवून झोपला होता. तिनं अलगद आपला हात काढून घेतला नि ती उठली. दोघांसाठी तिनं मस्त चहा केला. चहा घेऊन ती बाहेर आली आनंद तिथेच झोपला होता. कालचे ओले कपडे तिनं खुर्चीवर वाळत टाकले होते ते सुकलेत का ते पाहिलं. तोपर्यंत आनंदला ही जाग आली. त्याने डोळे किलकिले करून पाहिलं तर नेहा वाळलेले कपडे हातात घेवुन उभी होती.

" good morning...." ती छान हसुन म्हणाली.

" अहहहा.....किती मस्त वाटतंय तुझ्या तोंडून गुड मॉर्निंग ऐकताना ..अंगावर गुलाबपाणी शिंपडल्या सारख वाटतयं..." तो म्हणाला.

" हो का....उठा आता आपल्याला आवरून घरी जायचंय..... आणि संध्याकाळी मुंबईला..." नेहा

" म्हणजे आपण आज मुंबईला जायचं परत..." त्याच्या बोलण्यात आनंद दिसत होता. तो तिथेच उठून बसला. 

" मग कामं नाहीयेत का...? आणि तुम्ही हॉस्पिटलला काहीच कळवलं नाहीत वाटत...आईंचा फोन आला होता सकाळी त्या विचारत होत्या.....त्यांना फोन आले हॉस्पिटल मधून ...."  नेहा म्हणाली

" हा ते मी तू मला सांगून आली नाहीस त्या रागात आलो निघून तुला भेटायला......." तो पटकन बोलला. आणि मग सारवासारव करत म्हणाला..." म्हणजे आप्पाना भेटायला आलो ना ....त्यात राहील कळवायचं.."

" हमम कळलं....उठा आता आवरा..." ती हसून म्हणाली. 


मग दोघांनी पटापट आपलं आवरलं. वाळलेले कपडे घालून दोघेही आप्पांकडे आले. नेहाने घरी आल्यावर आपली बॅग भरली. खरतर ती चार दिवस राहणार होती पण आनंद आल्यामुळे त्यांच्यासोबतच जावं असा तिने विचार केला. आनंदने आप्पाना सगळं पथ्य पाण्याचं सांगितलं. त्यानुसार गंगा मावशीला ही सूचना दिल्या. दुपारची जेवणं झाल्यावर ती दोघ मुंबईला जायला निघाले. ज्या गाडीने नेहा कोल्हापूरला आली होती ती गाडी घेऊन ड्रायव्हर दादा त्याच रात्री पुन्हा मुंबईला गेले. त्यामुळे आनंद सोबतच परत जायचं तीन ठरवलं. तिनं आप्पाना गोळ्या औषध वेळेवर घ्यायला बजावलं..आणि गंगा मावशीलाही त्यांच्या खण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सांगून ती बाहेर पडली. गाडीत बसेपर्यंत तिच्या सूचना संपत नव्हत्या. खरतर तिचा पाय निघत नव्हता. पण आता अप्पांचीही तब्येत बरी होती आणि सगळी जिवाभावाची माणसं त्यांच्या जवळ होती म्हणून ती जायला निघाली. निघताना दोघांनीही आप्पाना वाकून नमस्कार केला आणि ते गाडीत बसले. मुंबईत देखील खूप कामं त्यांची वाट बघत होती. दोघेही एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करत होते. पण एकमेकांच्या प्लॅनबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. दोघेही आनंदच्या बर्थडे च्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागले.....


.......................

मुंबईत परतल्यावर दोघांचीही कामं चालू झाली. आनंद हॉस्पिटलला तर नेहा NGO मध्ये जाऊ लागली. कोल्हापूर वरून आल्यावर आनंद मध्ये बराच बदल झालाय हे वृषालीताईंच्या लक्षात आलं..कारण तो आता पुन्हा पहिल्यासारखा हसून खेळून राहत असे. सगळ्यांमध्ये तो पुन्हा मिक्सअप होऊ लागला. त्यांच्यासाठी खरचं ही खूप समाधानाची बाब होती. नेहा देखील आपल्या कामाला लागली. आनंदच्या वाढदिवसाला अजून पंधरा दिवस बाकी होते. तिनं तिच्यासाठी इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स चालु केला. परब मॅडम तिला वेळोवेळी मार्गदर्शन करतच होत्या. त्यामुळे आधीची घाबरट, सतत गोंधळलेली नेहा आता बदलू लागली होती. तिच्यामध्ये काम करताना आत्मविश्वास दिसू लागला. 'घरकुल ' मध्ये तिनं परब मॅडमच्या साहाय्याने लायब्ररी सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी तिने आनंदच्या मागे लागून वेगवेगळ्या प्रकारची सगळी पुस्तक मागवून घेतली. आजी आजोबांना वाचण्यासाठी आणि तिथे असलेल्या मुलांना पुढेशिक्षणासाठी सुद्धा उपयोग होईल अशी सगळी पुस्तकं तिथे ठेवण्यात आली. आनंदच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या हस्ते लायब्ररीचं उदघाटन करायचं असं ठरलं..त्यानुसार त्याला रीतसर आमंत्रण देखील पाठवलं गेलं.  उदघाटनाच्या तयारी सोबतच त्याच्या बर्थडे चं प्लॅनिंग ही ' घरकुल ' मध्ये शिजत होतं. आनंदला मात्र त्याची काहीच कल्पना नव्हती...


क्रमशः....

🎭 Series Post

View all