हे बंध रेशमाचे - भाग 36

Love story

हे बंध रेशमाचे - भाग 36

नेहा धावतच गाडीपाशी आली. ती माणसं मोबाईलचा आवाज ऐकून धावतच बाहेर आली. जरा पुढे जाऊन त्यांनी कोण आहे का ते देखील बघितलं.पण त्या आधीच नेहा पळत गाडीजवळ आली.घाईने गाडीचा दरवाजा उघडून ती आत बसली आणि ड्रायव्हर काकांना गाडी लवकर घरी न्यायला सांगितली. ती घरी येईपर्यत रात्रीचे अकरा वाजले. आनंद आणि वृषालीताई दोघेही काळजीत होते. गाडी येऊन त्यांच्या बंगल्यापाशी थांबली तशी ती पळतच आत हॉल मध्ये आली. घाबरल्यामुळे आणि पळत आल्यामुळे तिला जोराचा दम लागला होता. ती नुसती घामाघूम झाली होती. नेहाला असं पाहून आनंद आणि वृषालीताईंना काही कळेना. आनंदने नेहाला आधी शांत बसवलं आणि गीता मावशींना तिच्यासाठी पाणी आणायला सांगितले. त्यांनी पाणी आणून दिल्यावर तिनं गटागटा ग्लासमधलं पाणी संपवलं. 

" नेहा......अग शांत हो...काय झालंय..." तो तिच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.

" बाळा काय झालं ग....इतकी घाबरली का आहेस..." वृषालीताई तिच्याजवळ येऊन बसल्या आणि मायेने तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. 

" नेहा बोल प्लिज....कुठे होतीस तू एवढा वेळ ...?? आम्ही कधीची वाट बघतोय...? " तो काळजीनं म्हणाला.

त्यावर नेहाने त्याला सगळं सांगितलं. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये तिनं ऐकलेलं माणसांचं बोलणंही तिनं त्याला सांगितलं. त्यावर आनंद काहीसा विचारात पडला. 'कोण करत असेल हे सगळं..हॉस्पिटलचा आपला स्टाफ किती जुना आहे. बाबांच्या वेळेपासून सगळे जण हॉस्पिटल सांभाळतायत. नवीन कोणी असं काहीतरी करेल असं वाटतं नाही.' 

" आनंद कसला विचार करतोयस....?" नेहा बोलली.

" काही नाही ग....बाबांनी किती कष्टाने बांधलंय ग हॉस्पिटल आणि आज त्याच हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडताना मी नाही बघू शकत. आपल्याला काहीतरी करायला हवं आणि ते ही लवकरात लवकर..." तो काहीसं निश्चयाने म्हणाला. 

" हो....आपण पोलिसांची मदत घेऊया का..? " नेहा

" नको...मग ते लोक सावध होतील आणि आपल्या हॉस्पिटलच नावही पणाला लागेल. " आनंद

" मग आपण करायचं काय...?? त्यांना कसं पकडायच ?? " ती म्हणाली.

" आपण ठरवू काहीतरी...सध्या तरी माझं सगळीकडे लक्ष आहे. बघु काही हाती लागतंय का.." आनंद 

" हा.....मी खूपच घाबरले होते त्या माणसांचं बोलणं ऐकून ....तुला काही व्हायला नको..." तिच्या डोळ्यात पाणी आलं.

" ए वेडाबाई ....काही होत नाही मला...आपण लवकरच शोधून काढू सगळं...चल झोपुया आत्ता आधी...तू पण खुप दमलेयस ना..?" तो म्हणाला.

"आनंद तिची काळजी घे....आणि जाऊन झोपा शांतपणे.." वृषालीताई देखील एवढं बोलून झोपायला गेल्या. 

त्या गेल्यानंतर थोडा वेळ आनंद आणि नेहा तिथेच बसले. आनंदने तिच्यासाठी कॉफी करून आणली. दोघेही कॉफी प्याले आणि मग दोघेही आपल्या खोलीत जाऊन झोपले.

...................................

आनंद नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला जात होता. जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने तो वागायचा. मात्र त्याची संगळ्यांकडे बघण्याची नजर बदलली होती. तो सगलीकडे लक्ष ठेवून होता पण हॉस्पिटल मोठं असल्यामुळे प्रत्येक व्यवहारांवर तो तितक्या काटेकोरपणे लक्ष देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने आपला असिस्टंट म्हणून एका विश्वासातल्या माणसाची निवड केली. तो कायम आनंदच्या आसपास असे. त्याने आनंदच्या केबिन मध्ये सगळे सीसीटीव्ही नीट ऑपरेट होतात की नाही ते पाहायला सुरवात केली..काही दिवसांनी आनंदच्या असं लक्षात आलं की डॉ. परांजपे गेले पाच सहा दिवस हॉस्पिटलला आलेच नाहीयेत. डॉ. परांजपे हे श्रीकांतरावांचे चांगले मित्र होते.श्रीकांत गेल्यानंतर त्यांनीच हॉस्पिटल सांभाळलं होतं. आनंदला धीर दिला. कधी ही रजेवर न जाणारे परांजपे काका अचानक कसे यायचे बंद झाले त्याला कळेना., त्याने फोन करून त्यांचा काही रजेचा वगरे अर्ज आलाय का ते विचारलं. पण त्यांनी कोणताच अर्ज केला नव्हता. त्याने मग दोन दिवस वाट पाहायची ठरवली. दोन दिवसात जर काका नाही आले तर घरी जाऊन यायचं असं त्यानं ठरवलं.थोड्या वेळात आपलं काम आटपून तो घरी जायला निघाला. पण  हॉस्पिटलला गेल्यापासून आपल्यावर कोणतरी नजर ठेवून आहे असं त्याला वाटलं. म्हणजे नेहाने त्या दिवशी ऐकलेली गोष्ट खरी आहे तर. पण तो सावध होताच. कोणतीही गोष्ट तो विचार केल्याशिवाय करत नसे.सध्या तरी तो आपल्याला काहीच कळलं नाहीये असं दाखवत होताच. त्या सगळ्या विचारातच तो घरी आला. नेहा हॉल मध्येच काहीतरी काम करत बसली होती. 

" अरे ....आज लवकर कसा काय तू...? बस मी पाणी आणते.." नेहा उठत म्हणाली.

" जास्त पेशंट नव्हते आज. मग आलो घरी. नेहा चहा कर गं छान आलं टाकून..." तो सोफ्यावर डोकं टेकत म्हणाला.

" हो....हे पाणी घे आधी...पडतोस का जरा वेळ ? मी आणते चहा करून..." असं म्हणून ती पाणी देवुन पुन्हा किचन मध्ये गेली.

" नाही...बसतो जरा इथेच...." तो डोळे मिटून तिथेच जरा मान मागे करून बसला.

थोड्या वेळाने नेहा चहा घेऊन आली. खरतर आल्याच्या वासानेच त्याने डोळे उघडले. तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला. चहाच्या पहिल्या घोटा सोबतच त्याला फ्रेश वाटलं.

" काही कळलं का त्या लोकांबदल....?? " तिने सोफ्यावर बसत विचारलं.

" नाही अजून....माझं लक्ष आहे सगळीकडे...आणि काही माझ्या विश्वासातल्या लोकांना पण सांगितलं आहे नजर ठेवायला...बघू काही ना काही नक्की हाती लागेल.." आनंद 

" हा...नको काळजी करू...सगळं नीट होईल..मी कायम सोबत आहे तुझ्या." ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

त्याही परिस्तिथीत ती त्याच्या मागे खंबीरपणे उभी असलेली पाहून त्याला बरं वाटलं. त्यानेही हलकेच तिच्या हातावर थोपटलं. 

.........................

आनंद असताना हॉस्पिटलमध्ये सगळं सुरळीत चालू होतं. रोजच्या रोज तो त्याने नेमलेल्या माणसाकडून अपडेट घेत असायचा. अगदी छोट्यातली छोटी गोष्टही ते येऊन आनंदला सांगायचे. आनंद वरही कोणाची तरी पाळत असायची त्यामुळे तो त्या लोकांना कळू न देता माहिती मिळवत होता. नेहाने ही गोष्ट परब मॅडमच्या कानावर घातली. त्यांनाही हे ऐकून धक्काच बसला. उद्या गरज पडली तर त्यांची मदत घेता येईल या विचाराने तिने त्यांच्यापाशी आपलं मन मोकळं केलं. त्या नेहाला आपल्या मुलीप्रमाणे वागवायच्या. आजच्या काळात स्त्रीने कायम सक्षम असलं पाहिजे असं त्याचं मत होतं. त्यामुळे त्यांच्या हाताखाली नेहा चांगलीच तयार झाली होती. एकदा बोलता बोलता त्यांच्यात गाडीचा विषय निघाला. त्यावर परब मॅडमनी नेहाला तू गाडी शिकून घे. कधी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडेल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्या तिला प्रत्येक गोष्ट करून बघ आणि नंतरच नाही म्हण असं सांगायच्या. त्यामुळे नेहाचं त्यांच्यासमोर काहीच चालेना. शेवटी त्यांच्या आग्रहामुळे तिने आनंदजवळ गाडी शिकण्याचा विषय काढला. 

" आनंद एक बोलायचं होतं...." नेहा 

" नेहा पटकन बोल काय असेल ते....मला alredy उशीर झालाय. " तो हातात घड्याळ अडकवत म्हणाला.

" मला......मला गाडी शिकायची आहे...." ती अडखळत म्हणाली. त्यावर त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

" गाडी....???  हे काय मधेच....?? " आनंद 

" ते परब मॅडम कधीच्या मागे लागल्यायत...गाडी शिकून घे उपयोगी पडेल म्हणून...." ती म्हणाली

" हा म्हणजे ...त्या म्हणतायत म्हणून तुला शिकायची आहे..स्वतःसाठी नाही ?? " आनंद

"नाही तसं नाही...मलाही पटतंय त्यांचं म्हणणं....मला पण शिकायचेय गाडी.... उद्या गरज पडली तर आपल्याला येत असावी.." नेहा

" मी आहे ना ....घरात दोन दोन गाड्या आहेत. ड्रायव्हर आहेत..कशाला अजून गरज पडणारे.... "  तो म्हणाला. 

" हो पण तू काय कायम माझ्या बरोबर नसशील ना...आणि माझी इच्छा आहे गाडी शिकायची प्लिज ...." नेहा

" नाही....मी तुला गाडी शिकायची परमिशन देणार नाही...".एवढं बोलून तो रागाने हॉस्पिटलला निघून गेला.

................................

रात्री तो हॉस्पिटल मधुन घरी आला. सगळं आवरल्यावर नेहाने पुन्हा एकदा त्याच्याजवळ गाडीचा विषय काढला.

" आनंद......" ती एवढुस तोंड करत म्हणाली.

" काय.....??? " तो दमला होता.

" प्लिज मला शिकायचेय रे गाडी.....प्लिज ना..." ती म्हणाली.

खरंतर बाबा अक्सिडेंटमध्ये गेल्यापासून त्याला आपल्या कोणी गाडी चालवायची भीतीच वाटायची. गाडी म्हटलं की नको नको ते विचार त्याच्या डोक्यात यायचे. त्यामुळे नेहाला गाडी शिकायला तो परमिशन देत नव्हता. आधीच त्याला हॉस्पिटलचं टेन्शन होतं त्यात त्याला अजून नेहाची काळजी नको होती . पण तिचंही बरोबर होतं उद्या गरज पडली तर तिला या गोष्टी येणं आवश्यक होतं. शेवटी हो नाही करता त्याने तिला परवानगी दिली. पण एका अटीवर ते म्हणजे तो स्वतः तिला शिकवणार होता. त्यासाठी हॉस्पिटल मधून लवकर यायचं त्यानं ठरवलं. दुसऱ्या दिवशी तो तिला गाडी शिकवायला म्हणून लवकर घरी आला.

"नेहा....आवरलं का तुझं....चल लवकर..." तो बाहेरूनच ओरडत म्हणाला.

" आले आले...." असं म्हणत ती पंजाबी ड्रेसमध्ये तयार होऊन आली. 

" चला निघायचं का...??  Am ready...!!! " ती उत्साहात म्हणाली.

" हो मॅडम चला...तुमचा सेवक तुमच्या सेवेसाठी हजर आहे..." त्याने किंचित वाकून तिच्यासाठी गाडीचं दार उघडलं आणि तिच्या कानात हळुच 'छान दिसतेस' असं म्हंटलं. त्यावर ती गोड लाजली.

तो आधी ड्रायविंग सीटवर बसला. कारण आज नेहाचा गाडी शिकायचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे त्याने मेन रोड पासून थोडं आतल्या रस्त्याला गाडी आणली.तिथे रहदारी थोडी कमी होती. त्यामुळे नवीन गाडी शिकणाऱ्यांना ती जागा चांगली होती. एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि तो खाली उतरला.मग त्याने ड्रायव्हिंग सीट जवळचं दार उघडलं आणि तिला उतरून तिथे बसायला सांगितलं आणि तो दुसऱ्या बाजूने येऊन गाडीत बसला. आधी त्याने तिला गाडीची सगळी माहिती दिली. एकेक पार्टसचा उपयोग सांगितला. त्यानंतर त्याने तिला गाडी स्टार्ट करायला सांगून हळूहळू तिला गाईड करू लागला. त्याप्रमाणे तिनं देखील घाबरतच स्टेरिंगवर हात फिरवायला सुरवात केली. तास दीड तासाच्या सरावानंतर आनंदला कंटाळा आला. मग त्याने कॉफी पिण्यासाठी रेस्टॉरंटला जायचं ठरवलं. तो तिला बाजूच्या सीटवर बसायला सांगुन पुन्हा ड्रायविंग सीटवर येऊन बसला. तो आणि मिताली लग्नाच्या आधी ज्या रेस्टॉरंट मध्ये भेटायचे त्या त्यांच्या नेहमीच्या रेस्टॉरंट जवळ त्याने गाडी आणली. तो गाडीतून खाली उतरला. तेवढ्यात त्याच्या जवळून एक ब्लॅक कलरची गाडी पास झाली. पाठमोऱ्या जाणाऱ्या गाडीकडे पाहून त्याला ती कार त्याच्या ओळखीची आहे असं वाटलं...

क्रमशः......

काही कामांमुळे किंवा मग कथानक सुचायला थोडा वेळ जात असतो त्यामुळे भाग प्रकाशित करायला वेळ लागतो. कथा डोक्यात तयार असते पण ती कथा प्रत्यक्षात सांधतांना मात्र लेखकाची खरी कसरत असते. त्यामुळे भाग पोस्ट करायला उशीर झाला तरी तुम्हाला काहीतरी छान वाचायला मिळेल याची मला खात्री आहे. उशीर झाल्यास शक्यतो मी एका दिवसात दोन भाग पोस्ट करते. त्यामुळे तुमचा एक किंवा दोन दिवसांचा बॅकलॉग भरून निघेल असं मला वाटतं.तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांसाठी खूप खुप धन्यवाद....!!! आजचा भागही तुम्हाला तेवढाच आवडेल....अशी आशा करते...!! Keep reading & enjoy it...!!!

🎭 Series Post

View all