नेहाने वाड्यावर गेल्यावर त्याला पोहचल्याचा मेसेज केला. रात्री त्याचं जेवणातही लक्ष नव्हतं. तो झोपायला गेला. पण नेहा नव्हती त्यामुळे त्याला चैन पडत नव्हतं. रात्र वाढत होती. आणि इकडे आनंदची चुळबुळ देखील. शेवटी न राहवुन आनंद घराबाहेर पडला ते नेहाला काही झालं तरी भेटायचंच असं ठरवुन...!!
आता पुढे...
आनंद दबकत दबकत रूमबाहेर आला. त्याने जाऊन वृषालीताईंची खोली बघितली तर त्या शांत झोपल्या होत्या. ते बघून त्याने हळुच त्यांच्या खोलीक दार ओढून घेतलं मग तो हॉल मध्ये आला. मेन दरवाजा उघडायला सुरवात केली. पण तो कराकरा वाजायला लागला. तसं बाजूच्या खोलीत झोपलेल्या गीता मावशींना जाग आली. त्या जांभया देत बाहेर आल्या. तर हॉलच दार उघड. त्यांना बघुन आनंद सोफ्यामागे लपला.
" दार उघडं कसं राहिलं...? मगाशी तर मी नीट बंद केलं होतं..." स्वतःशीच बडबडत त्यांनी पुन्हा दार लावुन घेतलं आणि त्या झोपायला गेल्या.
आनंदने ते बघून डोक्यावरच हात मारला. ' बायकोसाठी काय काय करावं लागतंय.. ' असं मनात बडबडतच त्याने हळूच दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. गाडी स्टार्ट केली आणि आपासाहेबांच्या घराकडे वळवली. वाड्याच्या जरा अलीकडेच त्याने गाडी उभी केली आणि तो वाड्यासमोर आला.
' नेहा नेमकी कुठे झोपली असेल.... ' असा विचार करत असतानाच त्याच्या लक्षात आलं की नेहाची रूम वरती माडीवर असते. त्याने मग वरती कसं चढायचं हे ठरवायला सुरवात केली. बाहेर छान टिपूर चांदणं पडलं होतं. त्याच उजेडात त्याने एक शिडी शोधली. ती त्याने वाड्याच्या एका बाजूने लावून तो वर जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण पहिल्या पायरीवर पाय ठेवताच ती काठी मोडली. तो पडलाच असता पण थोडक्यासाठी वाचला. त्याने मग पुढच्या पायरीवर पाऊल ठेवलं आणि एकेक पायरी चढत तो वाड्याच्या वरच्या व्हरांड्यात आला. समोर एकच खोली होती. त्याने खोलीक दार उघडलं आणि तो आत आला. त्या आवाजाने नेहा जागी झाली. तिला वाटलं चोर घुसलाय घरात. ती जोरात ओरडणार तेवढ्यात आनंदने पुढे होऊन तिच्या तोंडावर हात ठेवला.
" ओरडू नको.. मी आहे आनंद...." त्याने सांगितलं आणि हळूहळू तिच्या तोंडावरून हात बाजूला केला.
" तू.... तू काय करतोयस एवढ्या रात्री इथे.... " तिने विचारलं.
" अग जरा हळू.. बाकीचे जागे होतील ना... तुला भेटायला म्हणून एवढे उद्योग करून आलो.... ओरडू नको. नाहीतर बाकीचे पण येतील... " तो म्हणाला.
तिला त्याच्या अशा वागण्याचं हसू आलं. तो आपल्यासाठी म्हणून असा रात्रीचा कधी येईल याची तिने कल्पनाच केली नव्हती.
" अरे पण तुला कोणी इथे बघितलं तर काय म्हणतील...." नेहा
" मी माझ्या बायकोला भेटायला आलोय. घाबरतो की काय कोणाला..." तो तिला जवळ घेत म्हणाला.
" अरे पण... उठेल ना कोणीतरी.... " तिने त्याला दूर ढकललं.
" नाही उठत कोण... तुलाच नको असेन तर जातो मी.... " तो जायला वळला तर तिने त्याला थांबवलं.
त्याने पटकन तिला आपल्या कवेत घेतलं आणि ती काही बोलायच्या आतच तिच्या ओठांना कुलूपबंद केलं. थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला केलं.
" का आलीस मला एकट्याला सोडून...."
" अरे अप्पा म्हणाले चल थोडे दिवस तिकडे. किती दिवसात आली नाहीस... म्हणून आले.... "
" हो का.. माझा विचार नाही अजिबात. आप्पा म्हणाले आली लगेच.. आता अप्पा म्हणाले म्हणून राहणार आहेस का पंधरा दिवस...?? " त्याला आता राग येत होता.
" हो चालेल... मज्जा.. मस्त आराम करते इकडे... " तिने हात उंचावून मस्त एक आळस दिला.
" अजिबात नाही. उद्या गप घरी यायचं आहे. मला काही माहीत नाही.... " तो म्हणाला.
" आणि नाही आले तर..... " ती उगीचच त्याला डीवचत म्हणाली.
" उचलून नेईन तुला... कशी येत नाहीस तेच बघतो ना... " त्याने तिला उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवलं मग खाली ठेवलं. ती हसत होती.
" आनंद ..... आनंद.... कोणाला पटणार तरी आहे का तीन वर्षांपूर्वी दि आनंद देशमुख एक चिडकू ...नि स्ट्रीक माणूस होता ते...."
" हमम... तू बदलवल आहेस मला नेहा...!! नाहीतर मला प्रेम म्हणजे काय हे कधी कळलच नसतं... " त्याने तिच्या कपाळावर किस करत म्हटलं.
" हो का... आता मी तीन वर्षांची वसुली कशी करते ती बघचं तू.... " ती हसत म्हणाली.
" म्हणजे .... काय करणार आहेस तू....? "
" मी आता इकडेच राहणार थोडे दिवस... मग वाटलं तर येईन तिकडे... " ती इकडे तिकडे बघत नाटकी हसली.
" मग त्याचाही वचपा कसा काढायचा ते मला माहित आहे...." त्याने तिला डोळा मारला त्यावर ती लाजली.
" आनंद तू जा आता घरी... तुला कोणी बघितलं ना तर उगीच सगळ्यांना चिडवायला कारण मिळेल... तू जा प्लिज...."
" नाही. आज रात्री मी इकडेच झोपणार आहे... सकाळी लवकर उठून जाईन वाटल्यास.... " असं म्हणून तो तिथेच बेडवरती आडवा झाला. त्याने नेहाला देखील आपल्या जवळ ओढलं.
नेहाचे तर हार्टबीट्स वाढले होते. तिचे श्वास त्याच्या चेहऱ्यावर आदळत होते. त्याने हलकेच तिची समोर आलेली बट मागे सारली आणि पुढे होऊन तिच्या मानेवर हळूच ओठ टेकवले. तशी ती शहारली. तिने त्याला हातानेच बाजूला केले. आणि पुढच्याच क्षणी धप्प.... असा आवाज आला. तिने बाजुला पाहिलं तर आनंद बेड वरून खाली पडला होता.
" आ ...... आ... " तो जोरात ओरडला. नेहाला हसूच आलं. त्याने मग स्वतःच आपलं तोंड बंद केलं आणखी आवाज बाहेर फुटू नये म्हणून. पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाड्यात सगळ्यांनी तो आवाज ऐकला होता आणि सगळे वरती नेहाच्या रुमकडे यायला निघाले.
" अरे असा कसा पडलास तू....?? " ती त्याच्या जवळ जात म्हणाली.
" तू ढकललंस मला....." तो म्हणाला.
" मी नाही.... "
आता ते दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. आनंद नेहाकडे पाहतच राहिला. तिच्या डोळ्यासमोर रुळणारे केस त्याने हातानेच मागे सारले. तिचे श्वास त्याच्या मानेवर जाणवत होते.
" नको ना रे असा बघु.... " ती लाजली.
" मग कोणाला बघु...?.. आता तर तुलाच बघणार आहे. तीन वर्षांची वसुली बाकी आहे. तो तिच्या ओठांवरून हात फिरवत म्हणाला.
तो हळुहळु तिला आपल्या जवळ घेऊ लागला तोच तिचा धक्का त्याच्या दुखऱ्या पायाला लागला आणि तो जोरात कळवळला..तोपर्यंत आप्पासाहेब महादू काका सगळी माणसं नेहाच्या खोलीबाहेर जमली. त्यांनी जोरात दारावर थाप मारली तसे आनंद आणि नेहा दोघेही दचकले.
" नेहा.... बाळा ठीक आहेस ना तू....?? काय झालं..?? दार उघड आधी...." बाहेरून आप्पा विचारत होते.
नेहाने एकदा आनंदकडे आणि एकदा दाराकडे पाहिलं. तिला काय करावं सुचेना.
क्रमशः......
नमस्कार वाचक मंडळी..
हे बंध रेशमाचे या कथेचं दुसरं पर्व यावं अशी खूप वाचकांची इच्छा होती. ते पर्व थोडं उशिरा आलं. पण पहिला भाग पोस्ट केल्यानंतर वाचकांच्या खूप साऱ्या कमेंटस आल्या. खूप भारावून गेले मी. या कथेचे पुढील भागही लवकरच वाचायला मिळतील. तूर्तास काही घरगुती कामामुळे कथेचे भाग पुढील 15 दिवस पोस्ट होऊ शकणार नाहीत. या साठी दिलगिरी व्यक्त करते. तसच ईराच्या चॅम्पियन ट्रॉफी साठी आम्ही ' प्रेषित टीम ' म्हणून ' जरा विसावू या वळणावर ' ही कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आशा आहे या कथेलाही तुमचा तितकाच प्रतिसाद मिळेल. तो प्रतिसाद व्ह्यूजच्या मार्फत दिसावा ही विनंती. आनंद आणि नेहाला भेटेपर्यंत चॅम्पियन ट्रॉफीच्या कथा एन्जॉय करा. मग काय आपण आहोतच. पुन्हा एकदा सॉरी हा..!! भेटू लवकरच.
कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा शेअर करायची असल्यास नावासाहित शेअर करावी.
© ® सायली विवेक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा