( मागील भागात आपण पाहिलं की आनंद आणि नेहा अमेरिकेवरून घरी परतले होते. त्यांच्यासोबत परांजपे काका काकू देखील गावी आल्या. परांजपे काकांना सतत कोणाचा तरी फोन येत असतो. गावी आल्यामुळे आप्पासाहेब नेहाला माहेरपणाला घेऊन त्यांच्या घरी गेले होते. पण इकडे आनंदला काही करमत नव्हतं. म्हणून तो रात्रीच दबकत घराच्या बाहेर पडतो ते थेट अप्पासाहेबांच्या वाड्यावर येतो. नेहाच्या खोलीत जाऊन तो तिच्याशी बोलत असतो. तोच त्यांच्या गडबडीत तो बेडवरून खाली पडतो आणि त्याचा आवाज ऐकून सगळे वरती येतात.आता पाहुयात पुढे )
बाहेरून सगळे दारावर थाप मारत होते. नेहा एकदा आनंद कडे आणि एकदा दाराकडे बघत होती. तिला काय करावं सुचेना.
" आवं ताईसाब दार उघडा...." गंगा मावशी म्हणाली.
" हो आले आले.......... " नेहाने आनंदच्या हातातून आपला हात सोडवुन घेतला आणि तिने त्याला पलंगाखाली लपायला लावलं.
" जा लवकर......... " ती दबक्या आवाजात त्याला म्हणाली.
पण बेड वरून पडल्यामुळे तो आधीच कळवळला होता.. कसातरी सरकत तो बेडखाली सरकला. तो दिसत नाही हे पाहून नेहाने दार उघडले.
" नेहा अग ठीक आहेस ना तू....?? काय झालं ..?? " अप्पा आत आले.
" मी ठीक आहे....."
" आवं पर म्या आवाज ऐकला कोनचा तरी... चोर बिर न्हाय ना शिरला.... " दामू काका पुढे झाले नि त्यांनी खोली तपासायला सुरवात केली..
" इथे....?? नाही .... इथे कुणीच नाही...... " नेहा बेडजवळ सरकली.
" तरी पण तुम्ही बघा नीट........" अप्पा म्हणाले
" कशाला..... ?? नको ..... कुणी नाही इकडे...." तिला आता टेंशन यायला लागलं. दामू काका सगळीकडे नजर फिरवू लागले.
" आनी ताईसाब आवाज कसला वो आला....मगासी..." गंगा मावशीनं विचारलं.
" नाही कसला नाही.... ते... ते मी ... पडले बेडवरून....." तिला काय बोलावं काही सुचेना...
" समदं जसंच्या तसं हाय बगा... कोन न्हाय इकडं ...." दामू काका म्हणाले . तसे सगळे जायला निघाले. त्यांना जाताना बघुन नेहाने हुश्श केलं. पण तेवढ्यात बेडखाली असणाऱ्या धुळीमुळे आनंदला जोरात शिंका आली आणि बाहेर जाणाऱ्या सगळ्यांची पावलं थबकली. त्यांनी मागे वळुन पाहिले. तिला वाटलं झालं संपलं सगळं. तोच तिने त्यांना खोटं खोटं शिंकुन दाखवलं.
" ते... ते.. मी शिंकले. " असं म्हणत ती पुन्हा शिंकली इइकडे बेडखाली असणाऱ्या आनंदला मात्र हसू येत होतं.
" ताईसाब काडा करून देवू काय....? " गंगा मावशीनं विचारलं.
" अग नको. इतकं काही झालं नाही. ... म्हणजे ते बरं आहे माझं. काही लागलं तर सांगेन मी तुम्हाला...तुम्ही जा सगळे झोपा.." ती सगळ्यांना गुंडाळत होती.
" झोप शांतपणे. आम्ही आहोत.." आप्पासाहेब तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवुन बाहेर गेले. पाठोपाठ आलेली नोकर मंडळी देखील गेली.
नेहाने दाराची कडी लावली आणि हुश्श म्हणुन निश्वास सोडला. दोन मिनिटं ती तशीच बसून राहिली. मग बेडखाली लपलेल्या आनंदला तिने जवळजवळ ओढतच बाहेर काढलं..
" चल बाहेर आधी.... ?? "
" मला काय हौस आलेय का इथे लपुन बसायला..?? काय काय करावं लागतंय बायकोसाठी... ? " तो बाहेर येत म्हणाला.
" मी नव्हतं सांगितलं यायला इथे. " ती टेचात म्हणाली
" हो का.. तू येच घरी मग बघतो तुझ्याकडे..." तो तिच्याजवळ जात म्हणाला.
" नाही आले तर.......??? "
" उचलुन नेईन....." तो अटीट्युड दाखवत म्हणाला.
" जा जा..... " दोघेही हसले.
मग तो आला तसाच पुन्हा बाल्कनीतून खाली उतरू लागला. जाण्याआधी त्याने तिच्या कपाळावर किस केलं. ' हळू जा ' ती नजरेनेच म्हणाली. तो शिडीने उतरून गाडी जवळ जाईपर्यंत ती तिथेच उभी होती. तो गेला तशी तीही आत येऊन झोपली. आनंद घरी आला तोच दबक्या पावलांनी. तो परतला तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. तसाच जाऊन तो खोलीत झोपला.
●●●●●●●
सकाळी आनंद उठला तेव्हा सगळ्यांचा नाश्ता सुरू होता. त्याचे विस्कटलेले केस नि पेंगुळलेले डोळे बघून कोणीही सांगेल की तो रात्री नीट झोपला नव्हता. परांजपे काका काकू देखील त्याच्याकडे बघुन हसू लागले. सकाळी आशिष पण मुंबईवरून आला.
" आनंद अरे काय झोप झाली ना का तुझी...?? " वृषालीताईंनी विचारलं.
" नाही म्हणजे ते जागा नवीन आहे ना इकडे........" तो डोळे चोळत म्हणाला.
" ते नेहा वहिनी नाही ना मग झोप येत नसेल आनंद दादाला.... " आशिष बोलला. त्यावर सगळेच हसले. अजुन कोणीतरी बोलायच्या आत तो फ्रेश व्हायला पळाला. आवरून तो डायनिंग टेबलवरती आला. गीता मावशींनी त्याच्या समोर पोह्यांची प्लेट आणुन ठेवली.
" दादा ते तुम्ही काल रात्री नव्हता काय....?? " गीता मावशींच्या प्रश्नांनं त्याचा खाल्लेला घास घशातच अडकला आणि त्याला जोरात ठसका लागला.
" ते.... मी..... पाय मोकळे करायला गेलो होतो. झोप येत नव्हती.. " त्याने नजर चोरत म्हटलं.
" आनंद तू खाऊन घे. मग दुपार नंतर आपण सगळे अप्पासाहेबांकडे जाणार आहोत.. " वृषालीताई.
" का...?? "
" अरे , परांजपे काकांना ते बाग वगरे दाखवणार आहेत. मग तिथेच थोडा फराळ करायचा आणि घरी यायचं...?? " त्या म्हणाल्या. त्यावर त्याने फक्त मान डोलावली.
●●●●●●●●
संध्याकाळी सगळे अप्पासाहेबांच्या वाड्यावर जमले. गडी माणसासोबत थोडं खाण्याचे जिन्नस पुढे पाठवून सगळी जण चालत बाग बघायला निघाले. त्यांच्या घरापासून थोडं लांब नदीजवळ त्यांची बाग होती. नारळी , फोफळी आंबा , काजू शिवाय बाजूने लावलेली फुलझाडं.. बघत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत सगळे नदीजवळ आले. गडी माणसांनी आणलेलं सामान एका बाजुला ठेऊन अप्पांनी हातात झाडू घेतला आणि ते जागा साफ करू लागले.
" अवो अप्पानु तुमी कशापायी करताय. आमी हाय " म्हणून महादू काकांनी त्यांच्याकडून केरसुणी काढून घेतली आणि ते झाडू लागले. मग सगळेच त्यांच्या मदतीला आले. आठ दहा माणसांना बसता येईल एवढी जागा मोकळी केली. आणलेलं सामान अप्पांनी चेक केलं आणि ते कामाला लागले.
" आप्पासाहेब काय करताय...?? " परांजपे काकांनी कुतूहलाने विचारलं.
" काही नाही. तुम्हाला आमची गावाकडची पार्टी दाखवतो..." ते हसले.
मग त्यांनी गंगा मावशी आणि बाकीच्यांना टोमॅटो कांदे चिरायला लावले. एका मोठ्या पातेलीत त्यांनी पोहे घातले. दोन मोठे नारळ खोवुन आणलेलं खोबरं एका डब्यातून आणलं होतं. एका डब्यात नारळ पाणी. एका डब्यात फोडणी.असं सगळं साहित्य तयार होतं.
आनंदचं मात्र कशातच लक्ष नव्हतं. त्याला नेहा कुठेच दिसत नव्हती. थोड्यावेळात नेहा लांबुनच त्याला येताना दिसली. तसा त्याचा चेहरा फुलला. ते आशिषने हेरलं आणि हळूच त्याला कोपर मारलं. तो कळवळला. घरून आणलेल्या वस्तू तिने आप्पांच्या इथे ठेवल्या आणि ती बाजुला झाली. टोमॅटो कांदा चिरून होईपर्यंत बाकीचे मस्त गप्पा मारत होते. मग अप्पांनी एका पातेलीत पोहे त्यात कांदा, टोमॅटो , मीठ, साखर ,डब्यातून आणलेली फोडणी आणि खुप सारं ओलं खोबरं घालुन सगळं व्यवस्थित मिक्स केलं. त्यावर थोडं नारळाचं पाणी घालून ते पोहे थोडावेळ तसेच पाटाखाली दाबुन ठेवले. वृषालीताई , परांजपे काकू बाकीची बाग फिरून आले. आनंद आणि आशिष पण नदीजवळ जाऊन उगीचच दगडं मारत बसले. अप्पांनी मग सगळ्यांना बोलवलं आणि पेपरडीश मधुन सगळ्यांना पोहे दिले. सगळे मस्त गोल बसुन नदीजवळच्या खाण्याचा आनंद लुटत होते.
"आप्पासाहेब याला काय म्हणतात पण...?? " परांजपे काका.
" याला आम्ही पडदे पोहे म्हणतो...काय नेहा...?? "
" म्हणजे ?? "
" अहो याला दडपे पोहे म्हणतात. पोहे छान भाजून घेऊन किंवा मग फोडणी नाहीतर कच्चं तेल घालून पण आपण हे करू शकतो. पण नेहा लहान होती तेव्हा पासून ती त्याला पडदे पोहेच म्हणते..." त्यावर सगळेच हसले.
आनंद आणि नेहाच्या तर समोरासमोर बसून नुसत्या खाणाखुणा चालू होत्या. थोड्या वेळाने सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे गेलं तशी नेहा लाजली आणि तिथून लांब पळाली. नदीच्या इथल्या झाडाजवळ जाऊन ती उभी राहिली. तोच मागुन येऊन कोणीतरी तिच्या तोंडावर जोरात हात ठेवला आणि तिला मागे खेचलं...
क्रमशः....
सॉरी सॉरी खूप सॉरी... भाग पोस्ट करायला खूपच उशीर झाला आहे मला माहित आहे. पण मी मागचा भाग पोस्ट केला तेव्हाच पंधरा दिवसांची रजा घेतली होती..पण जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे अजुन थोडा उशीर झाला. पण आता भाग रेग्युलर पोस्ट होतील. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय. या कथेप्रमाणेच माझी ' क्षण अवचित येता ' ही कथा देखील तुम्हाला तितकीच आवडेल अशी आशा आहे.
©® सायली विवेक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा