Login

हे बंध रेशमाचे पर्व 2 भाग 11

Love Story
हे बंध रेशमाचे पर्व 2 - भाग 11

मेघना आणि आशिष लहान मुलांसारखे पकडपकडी खेळत होते. खरंतर कोणत्याही क्षणी दोघांनी एकमेकांना मारलं असतं. शेवटी नेहानेच त्या दोघांना हाक मारून बोलावलं. आशिषने तोंड धुतलं आणि शहाण्या बाळासारखा तो नेहाच्या समोर येऊन बसला. तिने दोन पान हातात घेऊन त्यांच्या मदतीने चहाच पातेलं खाली घेतलं आणि दोघांना प्लास्टिकच्या कप मधून चहा दिला. चहाचा वास दरवळत होता त्यामुळे आशिषने कपात न बघताच चहाचा एक घोट घेतला आणि तोंड वेडावल.


" या.... क....ब्लॅक टी......... " त्याने तसाच तो कप खाली ठेवला. " मला नाही आवडत कोरा चहा.... "


" मग इथे कोण दूध आणून देणारे तुला....?? कॅम्पला गेल्यावर असंच असत सगळं.. असेल त्यात ऍडजस्ट करायच. ताई छान झालाय गं चहा... " मेघनाने पुन्हा एकदा त्याला डिवचलं.


" हो का..... मला माहितेय ते..मी पिऊ शकतो ब्लॅक टी. पण खरी गंम्मत मुलींची असते माहितेय का वहिनी...." तो नेहा नि आनंदकडे बघून सांगू लागला.


" समज एखाद्या हॉटेल मध्ये एखादा मुलगा एकटाच एका टेबलवरती असेल आणि त्याच्या समोरच्या टेबलवरती कोणी मुलगी येऊन बसली... तर त्याला इम्प्रेशन मारण्यासाठी ती असं दाखवते की ती खूप डाएट कॉन्शस आहे..


" वेटर..... 1 ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर......." असं ती जितकं कॉन्फिडन्सने सांगते ना बोट नाचवत.... आणि तेच रसायन जेव्हा पियायची वेळ येते ना तेव्हा तिचं तोंड बघण्यासारखं असतं...... " तो सांगत होता नि सगळे हसत होते.


" कशाला उगीच नखरे करायचे.... उलट मी तर म्हणतो चहा म्हणजे अमृत आहे... हे ब्लॅक टी , स्ट्रॉंग टी या सगळ्या अंधश्रद्धा आहेत...." मेघनाकडे बघत आशिष म्हणाला.


" हो खर आहे... ब्लॅक टी विदाऊट शुगर हे जेवढं म्हणायला सोपं आहे त्याही पेक्षा ते पोटात रिचवण महा कठीण... अरे आम्ही अमेरिकेत असताना असंच व्हायचं.. कुठे गेलो की तेच.. शेवटी साधा चहा मी घरी येऊन करायचे परत.. हो ना आनंद.... " नेहा.


" मग काय.... चला आता चहा पुराण बास झालं.. एकेकाने आवरून घ्या. आपल्याला आज संध्याकाळ पर्यंत तरी देवळात पोहचायचं आहे.... " आनंद पॅन्ट झाडत उठला.


सगळेच मग आपापलं आवरायला गेले. वाटाड्यानी आणलेले छोटे टेंट गुंडाळून घेतले आणि पाठीवरच्या बॅगेत टाकले. आनंद आणि आशिष आवरून आले पण नेहा आणि मेघनाचा कुठे पत्ता नव्हता.


" बायकांचं आयुष्यात कधी वेळेवर आटपणार नाही......" असं म्हणून आनंद मागे वळला तर हाताची घडी घालून नेहा त्याला लूक देत उभी होती.


" कोणाचं आवरत नाही वेळेवर....?? काय....... " त्याला विचारत ती एकेक पाऊल पुढे पुढे येऊ लागली. तसा तसा तो ही मागे मागे जाऊ लागला.


" नेहा.... मी.... ते... सहज म्हणालो. बाकीच्या बायकांना वेळ लागतो पण नेहाचं लवकर आवरत असं सांगत होतो मी आशिषला....विचार वाटल्यास त्याला.... " घाबरलेला आनंद बडबडत होता. ती अजूनही त्याला तसाच लूक देत बरंच लांब घेऊन आली.


" आज काही खरं दिसत नाही दादाच....." आशिष पुटपुटला.


" का रे.... काय झालं....?? " त्याच्या पाठीवर थाप मारत मेघना पुढे आली.


" अग ए बॉडी ब्लिडर हात लागतात तुझे.... जरा सावकाश ना.... " तो जरासा कळवळला.


" कराटे शिकवते मी... ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे मी. ताई सोबत तू पण ये शिकायला... " ती हसली.


" काही नको माझे आई......" त्याने तिच्यासमोर हात जोडले. " तिथे पण मांजरी सारखी धावून येशील माझ्यावर...." तो मिश्किल हसला.


" मी मांजर नि तू कोण..... म्हसोबा काय.... खाऊन खाऊन फुगलेला....." मेघना


" फुगलेला काय.. जिमला जाऊन कमावलेली बॉडी आहे ती. तुझ्यासारखं नाही..नुसतं लोकांना चिडवत बसत. मोठी माणसं गप्प राहून निरीक्षण करतात. माझ्यासारखी...!!! आणि सध्या माझं निरीक्षण मला असं सांगतंय की आनंद दादाच काही खरं नाही.... " त्याने भुवया उडवल्या.


" गप रे...... " मेघना मग बाकीच्या वस्तू आवरू लागली. सगळ्यांनी फेकलेले चहाचे कप , बाकी प्लॅस्टिक कचरा तिने एका प्लॅस्टिक पिशवीत भरून घेतला.


" आवं ताई कशाला भरतायसा समदा कचरा... टाका की हितच..... " एक वाटाड्या म्हणाला.


" अहो काका... म्हणून तर प्रदूषण वाढत. आपणच जिथे तिथे जाऊन कचरा टाकत असतो नि लोकांच्या नावाने बोटं मोडत राहतो. कोण उचलत नाही म्हणुन.. आपण कचरा केलाय तर आपणच स्वच्छ करायला हवं ना...." तिच्या बोलण्यावर त्याने फक्त मान डोलावली आणि आजूबाजूला पडलेला कचरा तिला गोळा करून दिला.

.......................................

आनंद आणि नेहा आता अशा ठिकाणी उभे होते की त्यांना बाकीचे सगळे दिसत होते पण ते दोघं कोणालाच दिसत नव्हते. एका झाडाला टेकून आनंद उभा होता नि त्याच्यासमोर झाडाला हात टेकवुन नेहा....!!


" काय म्हणालास तू.....?? बायकांचं आटपत नाही लवकर....?? काय.... " ती त्याला फुल्ल टशन देत होती.


" नाही तसं नाही..... " त्याने अजुनच अंग चोरून घेतलं. तसं ती अजूनच त्याच्याजवळ सरकली.


" मग कसं......? " ती त्याच्या शर्ट सोबत चाळा करायला लागली.


" नेहु.... अग काय करतेस.... कोणी बघेल ना..!! काय इज्जत लुटतेस काय माझी आता जंगलात....?? " तो जरा वातावरण हलकं करायला म्हणाला. पण अजूनही अवघडलेलाच होता. तिच्या अशा जवळ येण्याने तो सुखावला..


" गप रे.... तुझे हे घारे डोळे बघितले ना की वाटतं मी त्यात बुडूनच जाईन.. तुला माहितेय मला आधी खूप भीती वाटायची घाऱ्या डोळ्यांच्या माणसांची... पण मग भीती गेली कारण लग्नच घाऱ्या डोळ्याच्या बोक्याशी झालं ना....काय करणार....!!!! " ती जरा बाजूला झाली आणि त्याने मोकळा श्वास घेतला. तोपर्यंत ती काय बोलली हे त्याच्या लक्षात यायला वेळ गेला. पण लक्षात आल्यावर त्याने तिला जवळ ओढलं.


" मी... मी घाऱ्या डोळ्यांचा बोका होय... नि तू कोण... माझी मनी माऊ वाटतं.... " त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.. " पण बोचकरणारी ......" तो पुटपुटला. पण नेहाने ते ऐकलच.. ती मग त्याच्या मिठीतुन बाजूला होण्यासाठी धडपडू लागली पण त्याने मिठी अधिकच घट्ट केली.


" मगाशी तू मला लूक देत आलीस ते.... किती घाबरलो होतो मी..... आता तर अजिबातच सोडणार नाही तुला....." तो हळूहळू तिच्या ओठांच्या दिशेने सरकू लागला पण तेवढयात तिने स्वतःला बाजूला केलं. तरी त्याने तिला जवळ ओढलंच.


" कितीही पळालीस तरी माझ्या कचाट्यातून तू सुटू शकणार नाहीस.... जानेमन..... " एक क्युट स्माईल आली त्याच्या चेहऱ्यावर.

त्याने तिला झाडाला टेकवून उभं केलं आणि हळूहळू तिच्याजवळ जाऊ लागला... तो तिच्या ओठांना आपलंस करणार तोच तिथे आशिष आला.


" सॉरी सॉरी.... दादा वहिनी मी काही बघितलं नाही हा.... " त्याने डोळ्यांवर हात घेतले.


" हो का... गुणांचं बाळ हो अगदी.. शिकून घे पण बायकोला कसं पटवायच याचे नामी उपाय.... " नेहाकडे बघून त्याने डोळा मारला.


" ते खूप वेळ झाला तुम्ही आला नाहीत सो बघायला आलो... हात काढू का डोळ्यांवरचा...." आशिष


" काढा.... आता काय राहिलंय...... चला जाऊया. तिघेही मग आधी होते त्या स्पॉटला आले.

.........................................

आता त्यांची पुढची भ्रमंती सुरू झाली. प्रत्येकाने आपापली सॅक उचलली आणि ते चालू लागले. आता जंगल अधिकाधिक दाट होऊ लागले. खूप दिवसात कोणाचं येणं जाणं नसल्याने वाटेवर बऱ्यापैकी झाडी वाढली होती. काठीने वेली, फांद्या बाजूला करत वाटाडे वाट काढत होते. सकाळची उन्ह आता पसरली होती. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने मन प्रसन्न होत होतं.. कितीतरी प्रकारच्या वृक्ष वेली सगळे नव्याने पाहत होते. पक्ष्यांची छोटी छोटी घरटी..... त्यातून डोकावणाऱ्या इवल्याशा पिल्लांचा आवाज.... त्यांना दानापाणी आणण्यासाठी त्यांच्या आई बाबांची चाललेली धडपड.... रानफुलांचा वास.... मधुनच एखाद्या झाडाला लटकलेलं मधाचं पोळं.... आणि झाडांवरून उद्या मारणारी असंख्य माकडे आणि त्यांची छोटीशी पिल्लं निरखत सगळे पुढे पुढे सरकत होते. वाटाड्यांच्या मागोमाग आनंद , त्याच्यामागे आशिष मग मेघना आणि सगळ्यात शेवटी नेहा होती. जिथपर्यंत मोकळ्या जागा होत्या तिथपर्यंत सगळे एकत्रच होते. पण जसजशी वाट निमुळती व्हायला लागली तसं सगळ्यांनी एकेक करत पुढे जायला सुरवात केली. चढणीला सुरवात झाली होती. अर्ध्यापेक्षा जास्त उंचीवर आल्यावर दोन वाटा दिसत होत्या.

" समद्यानी माझ्या मागुमाग या लागीच.... वाट छोटी हाय तवा एकमेकांचे हात धरून चला... तुमास्नी सवय न्हाय ना... " एक वाटाड्या म्हणाला.


" हा आता आपण या डाव्या अंगाच्या बाजूनं जाणार हावंत.... ही दुसरी वाट पुढं गेल्यावर दरीत जातीया... तवा समद्यानी नीट ध्यान देऊन चाला...." दुसरा म्हणाला.


निमुळती वाट त्यात बाजूने असणारी झाडं यामुळे एका वेळी दोघांना चालणं शक्यच नव्हतं... एकेक जण पुढे होई नि मागुन येणाऱ्याला हात देई...बाजूला असणाऱ्या दगडांच्या आधाराने चढता तरी येत होतं... सगळे एकेक कर वरती जाऊ लागले. त्यांच्यापैकी एक वाटाड्या पुढची वाट बघायला बराच वरती गेला होता. त्यामुळे त्याला येणारी बाकीची माणसं सहज दिसत होती. वरून त्याने पाहिलं तर त्याला माणसं कमी दिसली. तो तसाच थोडं खाली उतरून त्याच्या सोबत्या जवळ आला.

" अरे एवढीच कशी समदी..... आपन सगली मिळुन सहा जण हुतो ना... मग पाचचं कशी.....?? "


दुसऱ्या वाटाड्याने मागे पाहिलं तर आनंद , आशिष गप्पा मारत ... हसत वरती येताना दिसले त्यांच्या पाठोपाठ मेघना देखील होती. पण नेहा....?? तिचा तर काहीच पत्ता नव्हता. तिघेही त्या वाटाड्यांजवळ आले.


" काय वं पावन... नेहा ताई कूट दिसना...."


" अहो.... ही काय मागून येतेय..... " आनंदने पाहिलं तर मेघनाच्या मागे नेहा नव्हतीच.. तो जवळजवळ ओरडलाच


" मेघना..... नेहा कुठाय....??? "


" ताई पाठीच होती माझ्या..... आम्ही एकत्रच होतो.. " मेघना


" अग मग गेली कुठे.....?? इथे जंगल आहे तुला माहितेय ना.... मग आमच्या मागुन नाही का राहता येत तुम्हाला....?? " आनंद चिडला होता.


" सॉरी......." मेघना


" सॉरी म्हणुन काय होणारे.... ?? चला तिला शोधायला हवं....."

मेघना आणि आशिष आणि एका वाटाड्याला तिथेच थांबवुन आनंद दुसऱ्या सोबत खाली उतरू लागला.
त्याला आठवलं की मगाशी दोन वाटा दिसल्या होत्या. त्यातल्या दुसऱ्या वाटेने गेल्यावर दरीची भीती होती. नेहा वाट चुकून तिकडे तर गेली नसेल ना.....??? भीतीने त्यांच्या अंगावर काटाच आला... !!


क्रमशः.....

🎭 Series Post

View all