Login

हे बंध रेशमाचे

रक्षाबंधनाच्या निमित्त्याने ताईने दादासाठी केलेली खूप मोठी गोष्ट की दादा ती कधीही विसरू शकणार नाही.

         दादा सकाळ पासून सगळं घाईघाईने आवरत होता. एक छोटी पिशवी घेऊन त्यात दोन तीन कपडे कोंबले. बायकोने समान उधार आणून थोडा चिवडा केला होता तो दिला दादाला. बहिणी कडे जायचं तर रिकाम्या हातानी कसं जायचं म्हणून चिवडा दिला तिच्या बाळांसाठी. दादा आवरात होता पण लक्ष कुठे लागत होतं त्याचं....विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं डोक्यात... दुसऱ्या दिवशी राखी होती त्यामुळे सुरेखा वाट बघत असेल. सुरेखाला लहान पणापासून सगळे ताईच म्हणायचे. ताईकडे जायला एरवी दादाला आवडायचं पण आज...
            दादा बस स्टॅन्ड वर आला पण काही केल्या बस येईना. खूप वेळ वाट पाहत बसला होता बिचारा.... डोक्यात मात्र नाना प्रकारचे विचार घोळत होते. ताईकडे गेल्यावर तिला काय देऊ??? राखीला दादा आला आणि काहीच दिलं नाही तर बरं दिसेल का?? तिला काय वाटेल? तिच्या घरचे लोक काय म्हणतील?? ती विचारेल वहिनी का नाही आली तर काय उत्तर देऊ?? अश्या अनेक विचारांनी डोकं नुसतं पिकलं होता.
कसा आणणार तो वहिनीला ?? त्याच्याच जाण्यायेण्याची तजवीज त्याने उसनवारी करून केली होती. तिच्या भाड्याचे अजून दोनशे रुपये कुठून आणणार होता तो? पण ताईला सांगणार तरी काय?? हे कारण तर तो सांगू शकत नव्हता. यंदा इतका पाऊस झाली की सगळी पिकं पाण्याखाली गेली. बी बियाणे, खतं यांच्यासाठी घेतलेलं कर्ज सगळं पाण्यात गेलं. तेच पैसे कसे फेडावे हाच प्रश्न होता.
             तिकडे शेतात गुडघ्याभर चिखलात सगळं धान्य सडून गेलं होतं. बियाण्यावर केलेला सगळा खर्च वाया गेला होता. इकडून तिकडून पैसे गोळा करून त्याने हे सगळं केलं होतं. नवीन धान्य आलं की लोकांचे पैसे चुकते करू असं ठरवल होतं. पण कुठलं काय हे सगळं वाहून गेल्यामुळे... त्याला एकदम रडूच फुटलं. काय करावं त्याला कळत नव्हतं. आत्महत्येचे विचारही मधून मधून मनात डोकवत होते. पण लहान लहान लेकरं कोणाकडे बघतील. बायको पोरं उघड्यावर पडतील असा विचार आला की तो डोकं शांत करायचा. घरात निःशब्द शांतता असायची... कोणी कोणाशी बोलायचं नाही...सगळे फक्त विचारात गढलेले..खायला दाणे आणणार तरी कुठून?? सगळं अंधकारमय जीवन....
            विचाराची शृंखला सुरूच होती... माझ्यापेक्षा लहान बहिणीला कसं सांगावं की तुझ्यासाठी राखीला साधी एक साडी सुद्धा तुला मी घेऊ शकत नाही. तिला कसं सांगावं तेच त्याला कळत नव्हतं... डोळ्यातून नकळत अश्रू वाहायला लागले. तितक्यात ताईच्या गावाकडची बस आली. तो यंत्रवत गर्दीत शिरला. पण डोक्यात सतत तोच विचार काय सांगू ताईला.... काय सांगू ताईला...मध्येच विचार आला की मी आत्महत्या केली तर किती बरं होईल. सगळ्या सगळ्या तून माझी सुटका होईल. ताईला आणि ताईच्या घरच्यांना तोंड देण्याचा आणि मेल्याहून मेल्यासारखे जगण्याचा प्रसंग तरी टळेल. पण मी जर आत्महत्या केली तर माझी छोटी छोटी दोन गोजिरवाणी बाळ काय करतील बिचारी?? उघड्यावर पडतील... अनाथ होतील.. बायको बिचारी कसं सांभाळेल सगळं ...राखीला भावाने आत्महत्या केली म्हटल्यावर माझ्या लहानशा ताईचे काय हाल होतील....सुन्न झालं त्याचं मन...
विचार करता करता ताईच गाव कधी आलं कळलंच नाही. घरी पोचला तर ताईने आनंदाने दार उघडलं. खूप आनंद झाला होता तिला. ती वाटच पाहत होती दादाची. नाचत होती... माझा दादा आला म्हणून... दादाने तोंडावर उसनं हसू आणून ताईला जवळ घेतलं. ताईने पटकन नमस्कार केला, त्याला पाणी दिलं प्यायला. खूप उत्साहाने ती बडबड करत होती. "दादा वहिनीला का नाही आणलं रे?? लेकरं आली असती दोन दिवस तर त्यांनाही बरं वाटलं असतं. त्यांना बीचाऱ्यांना कुठे जायला मिळत नाही. आणायचं दोन दिवस राहिले असते इथे आनंदाने. फिरवलं असतं इकडे तिकडे त्यांना." काय सांगणार बिचारा दादा की काय आरिष्ट ओढवले आहे त्याच्यावर... दादा काहीच बोलत नाही हे बघितल्यावर ताईला सगळा अंदाज आलाच होता. चहा पाणी झालं. ताई जेवणाच्या तयारीला लागली.
           जरा वेळाने ताईचा नवरा दादाला त्याची फॅक्टरी बघायला घेऊन गेला. दादाचा चेहेरा बघून ताई थोडी हिरमुसली होती. दादा दुःखी आहे म्हटल्यावर तिचं मन काही रमत नव्हतं. तरी तिने दादासाठी गोडाधोडाचा स्वयंपाक केला. फॅक्टरी बघून दादाला खूप बरं वाटलं. मी नसलो तरी माझी ताई सुखात आहे हे बघून त्याला भरून आलं. तिच्या नशिबात सुख आहे, ती आनंदात आहे, तिचा संसार सुखात चालला आहे हे बघून तो स्वतःचं दुःख क्षणभर विसरून गेला.
घरी आल्यावर सगळे एकत्र बसून आनंदाने पोटभर जेवले. भाऊजींनी आग्रह करून भरपेट जेऊ घातले. खरं तर कित्येक दिवसात तो पोटभर जेवला पण नव्हता. इथे आल्यापासून दडपणही जरा कमी झाल्यासारखं वाटत होतं. मुलंही मामा आल्यामुळे खूष होती.
            जेवणं झाल्यावर शतपावली करून दादा आणि भाऊजी झोपायला गेले. गप्पा करता करता भाऊजींनी कारखान्याचा व्याप कसा वाढतोय याची माहिती दिली. शेतीवाडीचा, पिकपाण्याचा पण विषय निघाला पण दादाने अगदी जुजबी उत्तरं दिली. काय बोलणार तो तरी बिचारा.... अजून राखी बांधण्याचा कार्यक्रम व्हायचा होता. त्यामुळे टांगती तलवार होतीच दादाच्या डोक्यावर...
            कशी बशी रात्र सरली... भाऊजी सकाळी सकाळीच बाहेर गेले. ते आल्यावर ताई भाऊजींच काहीतरी बोलणं झालं आणि ताईने राखी बांधायला पाट रांगोळी केली. ओवाळणीचं ताट सजवलं. एक सुंदरशी राखी दादाच्या मनगटावर बांधली. मिठाईचा घास त्याला भरवला. दादा अवघडला होता की आता कसं सांगू.... तितक्यात भाऊजींनी एक लिफाफा त्याच्या हातात ठेवला आणि उघडून पाहण्याची विनंती केली. पाहतो तर काय अपॉइंमेंट लेटर....भाऊजींच्या फॅक्टरी मध्ये सुपरवायझरची पोस्ट दादाला दिली होती. दादाच्या डोळ्यात पाणी आलं,"अगं तायडे मी तुला गिफ्ट द्यायचं तर तूच..." शब्दच फुटत नव्हते त्याच्या तोंडून... दादा तू काहीच बोलू नको.. आता बघ सगळं चांगलच होणार आहे." तायडीलाही भरून आलं. तितक्यात दारावरची बेल वाजली. पाहतो तर काय वहिनी आणि मुलं आली होती. भाऊजींनी त्यांना आणायला माणूस पाठवला होता. "आता तुम्ही इथेच राहायचं", मुलं आनंदाने ओरडली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. दादा वहिनी तर भारवून गेले. दादा म्हणाला,"तायडे माझ्यापेक्षा लहान असून खूप मोठ्ठं काम केलेस बघ. खरचच माझी ताई झाली." "अरे दादा रक्षाबंधन म्हणजे भावानीच बहिणीचं रक्षण करायचं असं काही नाही. दोघांनीही एकमेकांना वेळेला मदतीला धाऊन जायचं आणि एकमेकांचा आदर करायचा, नाही का??" ताईने समजावले. सगळेच आनंदात असले तरच खरा आनंद... हेच खरे बंध रेशमाचे....

सौ. मंजुषा गारखेडकर