Login

हे बंध रेशमाचे...

एकत्र कुटुंबाची कथा

हे बंध रेशमाचे...भाग १

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

"व्हय गं वरुटा कुटं हाय? आधी पाळण्यात वरूटा घालायचा आस्तो. आक्षी पैलटकरीन असल्यागतच वागतीयास जनू." सासुच्या या दरडावत बोलण्याने बाळाला अंगावर पाजत असलेली उमा गोरीमोरी झाली. बाळाला ताईसाहेबांच्या मांडीवर देऊन ती स्वयंपाकघरात आली. तिथला वरवंटा घेऊन तिने कापडाने स्वच्छ पुसला व तो घेऊन ती बाहेर आली. त्या वरवंट्याला झबले, टोपडे घालून तिने तो वरवंटा सासुबाईंच्या हातात दिला.

पारूबाईंनी तो वरवंटा हातात झेलत आपल्या लेकींना हाका मारल्या.
"व्हय गं सारजे, लक्षुमी, यश्वदे या की हिकडं. बाळाला पाळण्यात घालायचा मान आत्याचा आस्तो. तुम्ही कुटं घुटमळत बसलाय? व्हा की पुढं." आईचा खणखणीत आवाजात झालेला नावाचा गजर ऐकून बाळाच्या तिघीही आत्या पुढे आल्या. पारूबाईंनी वरवंटा सारजेच्या हातात दिला. पाळण्याच्या एका बाजूला सारजा व दुसऱ्या बाजूला लक्ष्मी उभी राहिली. सारजेने हातातला वरवंटा "राम घ्या" म्हणत पाळण्याखालून लक्ष्मीच्या हातात दिला. लक्ष्मीने "लक्ष्मण द्या" असे म्हणत तो हातात घेतला. आता पाळण्याच्या वरून तिने ते वरवंटारूपी बाळ सारजेच्या हातात "भरत घ्या" असे म्हणत सोपवले. सारजेने "शत्रुघ्न द्या" म्हणत तो वरवंटा हातात घेतला.

हीच क्रिया अजून दोन वेळा दरवेळी नावे बदलत त्यांनी केली व एकदाचे ते वरवंटारूपी बाळ पाळण्यात ठेवले. त्यानंतर खऱ्या बाळाची पाळण्यात घालण्याची वेळ आली. त्या बाळाला पण असेच वेगवेगळी नावे घेऊन पाळण्याच्या वरून, खालून फिरवणे सुरू झाले तशी उमाच्या काळजात धडधड वाढली. आतापर्यंत वरवंटा होता. तो पडला असता तरी काही बिघडले नसते. आता सव्वा महिन्याचे बाळ हातात होते. बाळाला पाळण्याच्या खालून व्यवस्थितपणे घेतील ना? हातातून बाळ निसटणार तर नाही ना? अशी भीती तिला वाटत होती.

एकदाचे बाळाला पाळण्यात घातले आणि उमाने निःश्वास सोडला. सारजा पाळण्यातील बाळाच्या कानात वाकून म्हणत होती,
"मूठ मूठ घुगऱ्या घ्या, आमच्या अनंतला खेळायला न्या. कुर्रर्र..." बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या चुलत भावजया त्यांच्या पाठीत बुक्क्या मारत होत्या. आता लक्ष्मीचा नंबर आला.
"मूठ मूठ घुगऱ्या घ्या आमच्या विष्णूला खेळायला न्या. कुर्रर्र..." आता बुक्क्या खाण्याची लक्ष्मीची वेळ होती.

आत्यांनी मुलाचे नाव काय ठेवायचं याबाबत उमाला एका शब्दानेही विचारले नाही. त्यांना जे नाव ठेवावेसे वाटले ते त्यांनी ठेवले. उमाच्या मनात विचार आला, 'या बाळाला नऊ महिने मी पोटात वाढवले. आत्ता त्याचे नाव काय ठेवायचे यावर मात्र माझा अधिकार नाही'' पण जगरहाटीच तशी होती, त्यामुळे ती काय विरोध करणार? अन् केला तरी तिची दखल कोण घेणार?

"पहिल्या दिवशी बोलली लीला
दशरथ राजाला पुत्र हो झाला
कौसल्या मातेने झोका हो दिला
जो बाळा जो जो रे जो"
बायकांची पाळणा म्हणत पाळणा हलवायला सुरुवात झाली. बाळाची आई खाली कोपऱ्यात बसली होती, तिच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. बाळाची आजी आणि बाळाच्या आत्या यांनाच आजचा मान होता. बाळाच्या आईनेही ते स्वीकारले होते. ती तिथेच बसून आपल्या बाळाचा नामकरण सोहळा कृतार्थ नजरेने पाहत होती. तिची लेक नंदिनी नवे परकर पोरके घालून मिरवत होती.

एवढ्यात तिच्या शाळेतील सहकारी शिक्षिका घरी आल्या. तिने त्यांना आमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे त्या सगळ्याजणी आल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. लगबगीने उठून ती त्यांना सामोरी गेली व त्यांना आत आणले. त्यांनी आत आल्या आल्या पाळण्याला हात लावून हलवायला सुरुवात केली. ती मग बाजूला जाऊन बसली. पाळणा झाला की बायकांनी तिला पुढे बोलावले.
पाळण्यावर वरून पातळ कापडाचे आवरण घालून तिला ते काढून बाळाचे मुखकमल पहायला सांगितले व विचारले,
"बाळ कुणाचं? उखाण्यात सांगायचं."
"हिरवं लिंबू गारसं
महिपतरावांच्या बाळाच़ं आज आहे बारसं." तिने अशावेळी घ्यायचा जो ठरलेला उखाणा आहे तो घेतला. त्यानंतर तिला पाळण्याखाली बसवून तिची ओटी भरायला बायकांनी सुरूवात केली.
आलेल्या सहकारी शिक्षिकांनीही तिची ओटी भरली. ओटी भरताना देशमुख बाईंनी विचारले,
"काय नाव ठेवले बाळाचे?" यावर काय उत्तर द्यावे हे तिला कळेना. तिकडून बाळाची आत्या म्हणाली,
"अनंत ठेवलं हाय." ते ऐकून उमा काहीच बोलली नाही, देशमुख बाईही मुकाट्याने बाजूला झाली.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."