Login

हे बंध रेशमाचे... भाग २

कौटुंबिक कथा

हे बंध रेशमाचे भाग २

दीर्घकथा लेखन स्पर्धा

डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

उमाच्या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम सुरू आहे. आता पुढे...

बारशासाठी भावकीतल्या आलेल्या बायकांच्या ताटात एकेक पेढा आणि घुगऱ्या घालायचे चालले होते. अजून उमाची ओटी भरणे सुरूच होते. सगळ्या कदम भावकीला आमंत्रण होते. नातू झाला म्हणून पारूबाई खूपच आनंदात होती. आपल्या एकुलत्या एका लेकाला मुलगा झाला, घराण्याचा वंशवेल वाढला; त्यामुळे तिने अगदी जोरदार बारसे केले होते. लाडूचे गावजेवण घातले होते.

बारशाला येणाऱ्या बायका बाळासाठी झबलं टोपडं आणि तिच्यासाठी ओटी आणत होत्या. पाव्हण्या बायका एखादा डाग आणत होत्या. पारू बाईची नजर बहिरी ससाण्यासारखी तीव्र होती. दूर असूनही सुनेच्या ओटीत कुणी काय घातले याकडे तिचे बरोबर लक्ष होते.

पुरूष माणसांची बाहेरच्या मांडवात पंगत बसली होती. पुरूषांच्या दोन पंक्ती उठल्याशिवाय बायकांची पंगत बसणार नव्हती. त्यामुळे आत बायकांचा कलकलाट सुरू होता. कामाशिवाय मोकळ्या असणाऱ्या बाया तोंड बंद थोड्याच ठेवतात? काम चालू असले तरी तोंडाने बडबड चालूच असते म्हणा. आतला बायकांच्या दंग्याचा आवाज ऐकून पुरूषांना जेवायचे थांबवले व बायकांची पंगत बसवली.

एवढा वेळ हाकेची वाट पाहणाऱ्या बायका,"बायांनो या जेवाय" अशी हाक आली की रंगात आलेल्या गप्पा सोडून बाहेर मांडवात जाण्याची घाई करू लागल्या. रंगात आलेला प्रसंग सोडून निघालेल्या रखमेला रंजी म्हणाली,
"व्हय गं रखमे, फुडं काय झालं त्येवडं सांग की." पण आता ते सांगण्यापेक्षा रखमीला पंगतीत जागा मिळवायची होती, त्यामुळे ती ते ऐकून न ऐकल्यासारखे करून बाहेर पडली. इकडे रंजीचा जीव कासावीस झाला होता, पुढे काय झाले हे न समजल्यामुळे.
त्यात शाळेतील शिक्षिका ही मागे नव्हत्या. गावच्या बायकांसारखी रेटारेटी करणे मात्र शिक्षिकांना जमत नव्हते; किंवा ते आपल्या पदाला शोभणारे नाही म्हणून त्या करत नव्हत्या, इतकेच. नाही तर त्यांनाही जेवायची घाई होती. एवढा वेळ एकमेकींशी मनसोक्तपणे गप्पा मारणाऱ्या बायकांना गप्पा अर्धवट सोडून जेवायला जायची घाई झाली होती. याचे कारण घरी लवकर जाता येईल हे होते.

शिक्षिकांची काही या पंगतीत वर्णी लागली नाही. चेहरा पाडून त्या उंबरठा ओलांडून परत आत आल्या व नाईलाजाने उमाजवळ बसल्या. उमाला मघापासून जो प्रश्न पडला होता तो तिने विचारला,
"तुम्हाला कुणी आमंत्रण दिलं?"
"कदम बाई, तुम्ही विसरला पण महेश गुरूजींनी आम्हाला आठवणीने बारशाला बोलावले." देशमुख बाई ठसक्यात बोलल्या.
यावर उमा म्हणाली,
"मी सासुरवाशीण, मी कशी कुणाला मनानं आमंत्रण देणार?" हे ऐकून त्या पुढे काहीच बोलल्या नाहीत.
"बाळ सव्वा महिन्याचं झालं. अजून किती दिवस सुट्टीवर आहे?"
"बाळ तीन महिन्यांचे होईपर्यंत," उमाने उत्तर दिले.
"मग कसं करणार? बाळाकडे कोण बघणार?"
"आहेत की सासुबाई आणि ताईसाहेब. मधल्या दोन सुट्ट्यांमध्ये बाळाला पाजण्यासाठी येत जाईन घरी." उमा म्हणाली.
"हो, नोकरी सोडू नका कदम बाई. पोरं काय होतील मोठी घरातल्या माणसांसोबत. नोकरी परत मिळायचे अवघड. त्यात तुम्ही नोकरीला लागल्यापासून गावातच आहे." उमाने मान डोलावली.

होईल थोडी ससेहोलपट, पण नोकरी सोडायची नाही असे तिने मनाशी ठरवले. त्याचवेळी तिचे लक्ष बाळाकडे गेले. ते मोठमोठ्याने मुठी चोखत होते. आणखी दीड महिन्याने या बाळाला घरात ठेवून आपल्याला नोकरीवर रूजू व्हावे लागेल. कसे राहील बाळ आपल्या वाचून? असे वाटून तिने त्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळले.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."

0

🎭 Series Post

View all