Login

हे बंध रेशमाचे... भाग ३

एकत्र कुटुंबाची कथा

हे बंध रेशमाचे... भाग ३

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, बाळाच्या बारशादिवशी आणखी दीड महिन्याने बाळाला घरात ठेवून आपल्याला नोकरीवर रुजू व्हावे लागेल यामुळे उमा भावनावश झाली होती. आता पुढे...

बाहेर जेवायला बसल्याने बायकांचा कलकलाट पूर्ण थांबला होता, कारण आता हाताची आणि तोंडाची लढाई सुरू होती. तेवढ्यात पारूबाई हातात ताट वाढून घेऊन तिच्याकडे आली. तिच्या पुढ्यात ताट ठेवत म्हणाली,
"जिऊन घे. जेवनाची येळ चुकली तर पोराचं प्वाट दुखंल." उमाच्या मांडीवरून तिने बाळाला उचलले व ती त्याच्याशी बोबड्या बोलीत बोलू लागली. उमाने ताट पुढ्यात घेतले व मुकाट्याने जेवायला सुरूवात केली. बाळ अंगावर पित असल्याने तिलाही भूक लागली होती. तिचे जेवण झाल्यावर सासूने बाळाला तिच्याकडे दिले, मग ती जेवायला बाहेर गेली.

सासूचे काळजी घेणे पाहून ती सुखावत होती, पण कधीकधी तिच्या मनात येई, ही काळजी घेणे बाळामुळे आहे. त्यांच्या घराण्याचा वंशज आहे तो. तो सुदृढ, निरोगी व्हावा यासाठी आपली काळजी घेतात. ती स्वतःच्या मनाला समजावत असे, कशी का होईना काळजी घेतात ना? झाले तर! माणसाचे मनच माणसाचा पहिला शत्रू असते.

बाळ झोपले म्हणून तिने त्याला पाळण्यात टाकले आणि ती बाहेर अंगणात आली. जेवणाची मोठी पातेली घासायची म्हणून ती पुढे सरसावली तशी पारूबाई तिच्यावर वसकन ओरडली.
"आत हो पयली. गारठ्याचं पान्यात हात घालनार हाईस व्हय? अजून म्या तुला गार पान्यात हात घालू दिला न्हाय. लेकराला बरसान झालं तर? मी बगते भांड्यांकडं. तू जा आत झाडू मार जा." ती मुकाट्याने घरात शिरली.

रात्री महेशराव काही लवकर घरात आले नाहीत.तिला खरं तर त्यांच्याशी बोलायचे होते. आज आपल्या बाळाचे बारसे झाले याचे सुखद क्षण त्यांच्यासोबत घालवायचे होते, पण बाळंतीणीच्या खोलीत त्यांना प्रवेश निषिद्ध होता. ती बाळाला घेऊन आपल्या बाळंतीणीच्या खोलीत झोपायला गेली. सगळे आवरल्यावर पारूबाई खोलीत आली. तिने पारूबाईचे अंथरुण टाकले होते, त्यावर बसली. दमून गेलेल्या आपल्या सासूकडे पाहत ती म्हणाली,
"आता मला गार पाण्यात हात घालू द्या की आत्या. सव्वा महिना झाला की बाळाला. तुमची एकटीची किती तारांबळ होते."
"लै शानी हायस की. गप बस. मी सांगितल्याबिगर अजाबात गार पान्यात हात घालायचा न्हाय. पोरगं आजारी पडलं तर लेन्याचं देनं हुईल. काय नको, माझं मी करती समदं. तू लेकराला जप म्हंजी बास."
सासूचे हे बोलणे ऐकून आता काय बोलायचे म्हणून ती गप्प बसली.
सासूने हात जोडून डोळे मिटले व भगवंताचे नाव घेऊन जमिनीवर पाठ टेकली.

दमल्यामुळे पाच मिनिटांत पारूबाईची झोप लागली. उमा मात्र छताच्या तुळईकडे पहात विचार करत होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस तिला आठवले. नवी नवरी असताना बावचळून तिच्या हातून चुका घडायच्या. कधी कधी काय करावे हे तिला कळायचे नाही. अशावेळी पारूबाई तिच्यावर रागवायची. त्यामुळे ती अधिकच बावचळून जायची. सकाळी लवकर उठून ती सगळ्यांचा स्वयंपाक बनवायची. महेशराव आणि ती दोघेही गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. तिला लग्नानंतर लगेच नोकरी लागली होती.

नोकरी करते म्हणून तिला घरकामात कसलीही सवलत नव्हती. घरातील सगळी कामे आटपून मग तिने नोकरीला जायचे असा पारूबाईचा दंडक होता. सकाळची तिची कितीही तारांबळ उडाली तरी पारूबाई एकाही कामाला हात लावत नसे. तळहातावर मिसरी घेऊन मधल्या बोटाने ती बार भरल्यासारखी हिरड्यांच्या कडेला भरत असे व ती कामे कशी करतेय याकडे बारकाईने पाहत बसे‌. चूक दिसली रे दिसली की तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होई.
"व्हय गं, अक्कल कुठं गहान ठेवलीया का? ती पावट्याच्या शेंगाची टरफालं म्हशीच्या गव्हानीत टाकायची सोडून कचऱ्यात टाकलीस व्हय? काड ती पयली, आन् टाकून यं म्हशी म्होरं."
ती मुकाट्याने सासू जे सांगेल तसे करत असे. "व्हय गं च्यात साकार का मन घातली न्हाय?"
"घातली आहे की आत्या."
"एवढा आळणीपुचुक च्या प्यायची सवं न्हाय मला. साकार हाय ना घरात? तुज्या बापाकडनं तर आनाय लावली न्हाय ना? न्हे ह्यो च्या माघारी. साकार घालून गरम कर, मग आन." हे ऐकून ती खाली मान घालून चहा घेऊन गेली व त्यात पुन्हा साखर घालून गरम करून आणून दिला. तेव्हापासून ती रोज असाच गोड चहा बनवू लागली. हळूहळू तिलाही असाच काकवीसारखा चहा प्यायची सवय लागली.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."