Login

हे बंध रेशमाचे... भाग ४

एकत्र कुटुंबाची कथा
हे बंध रेशमाचे... भाग ४

दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६

विषय :- कौटुंबिक कथा

©® सौ. हेमा पाटील.

उमाला झोप लागत नाही, ती मागील आठवणीत रमली आहे. आता पुढे...

"कसलं कालवण केलंया? त्यात आढं दिसतंया वरचं. शेंगदाणं संपलेती का समदं घरातलं ? शेंगदाण्याचं कुट का घातलं न्हाई?"
"घातलंय की आत्या कुट. जास्त घातले की कालवणाची मूळ चव बिघडते, त्यामुळे तेवढे घातलेय."
"आत्ता गं बया! कालची नांदायला आलेली तू...तू मला शिकीवनार काय चांगलं आन् काय वंगाळ?" हे ऐकून उमाने मान खाली घातली.
तेव्हापासून ती कालवणात अगदी घट्ट गोळा होईपर्यंत कुट घालत असे.

तिला दिवस गेले आणि हळूहळू चित्र पालटायला लागले. तिला काय खावंसं वाटतंय हे सासू इतर कुणामार्फत विचारू लागली. तिच्यासाठी वेगळे काही पदार्थ करू लागली. तिला उलट्या होतात म्हणून फोडण्या स्वतः द्यायला लागली.घरात वडी, लोणचं जेवताना समोर यायला लागलं.
हे सासूचे रूप तिच्यासाठी नवीन होते. तिला असे वाटले की, ती दोन जीवांची आहे, तर आपण थोडा भार उचलावा या हेतूने सासुबाई काम करत आहेत. आपली काळजी घेत आहेत.


महेशराव घरात अजिबात लक्ष देत नसत. "आई आणि तू तुम्ही दोघी मला सारख्याच प्रिय आहात, त्यामुळे तुमच्या दोघींचे जे काय आहे ते तुमचे तुम्हीच बघा. मला यात घेऊ नका." असे त्यांनी तिला अगदी सुरवातीलाच सांगितले होते. तसाही उमाचा स्वभाव तक्रार करण्याचा नव्हता, त्यामुळे ती महेश रावांना काही सांगण्याच्या भानगडीत पडत नसे.

'सासू ही सासूच असते, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे' हे ऐकतच ती लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे सासू कशीही वागली तरी ती गप्प बसत असे. हे दिवस सासूचे आहेत, आपलेही दिवस येणार आहेत अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती.

कष्टाला तिची ना नव्हतीच, फक्त आत्याबाईंनी बडबड करू नये, न रागावता समजावून सांगावे असे तिला वाटत असे. पण हे सासूला कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? नवऱ्याने तर आधीच अंग काढून घेतले होते. सासरेबुवांचे बायकोसमोर काही चालत नव्हते. मग काय सगळा आत्यांच्याच मनाचा कारभार.

"उमा, तुज्या आईला सांग, की आमच्याकडं डोहाळ जेवण द्यायची पद्धत हाय. धा- बारा. करंडं आणावं लागतील त्येस्नी."

हे ऐकून उमा म्हणाली,

"आमच्याकडं पण करतात डोहाळेजेवण, पण आपण स्वतः इतके करंडे द्या असं सांगणं बरं वाटतं नाही. ते देतील की त्यांना शोभेसे."

"त्यांना नाय, आपल्याला शोभलं पायजेल. आपल्या समद्या भावकीत नावं ठिऊन घ्येयाची न्हाईत मला. तिकडं आधीच सांगायचं धा- बारा करंडं द्या म्हनून. तुला जमत नसलं तर म्या निरोप धाडते तुझ्या म्हायेराला." हे ऐकून मात्र उमाला राग आला. तिच्यापर्यंत गोष्टी होत्या तोपर्यंत ठीक होते. माहेरी निरोप पाठवणे तिला अवघड वाटले. तिने ही गोष्ट महेशरावांना सांगितली. त्यांनाही आईचे हे म्हणणे पटले नाही. उमाचा त्यांच्यामागे एकच हट्ट होता, तुमच्या आईला समजवा.

"आईला समजावणे माझ्याच्याने शक्य नाही. तू एक काम कर. आईला खोटेच सांग की, तू तिचा निरोप माहेरी पाठवला आहेस. डोहाळे जेवण येईल तेव्हा जे होईल ते पाहता येईल." नवऱ्याने घेतलेली भूमिका योग्य आहे असे तिला विचाराअंती पटले, त्यामुळे तिने ती गोष्ट अंगिकारली.
निरोप पाठवला आहे असे तिने आत्याबाईंना सांगितले.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.

काय होईल पुढे? ओटीभरणा दिवशी तिच्या माहेरच्या लोकांसमोर सासुबाई तमाशा करतील का? हे पाहूया पुढील भागात...

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."